|| माधव वझे

१९९० च्या दशकातली गोष्ट. एक दिवस सकाळी घरूनच बंगलोरला गिरीश कार्नाड यांच्या घरी फोन केला आणि त्यांची मुलाखत मागितली. कोणतेही आढेवेढे न घेता त्यांनी मान्य केलं. आपण पुढच्या काही दिवसांत पुण्याला येत आहोत, तेव्हा पुण्यातच मुलाखत देता येईल असंही म्हणाले.

केव्हातरी फिल्म इन्स्टिटय़ूटमधून मला फोन आला : गिरीश कार्नाड पुण्यात आले आहेत आणि त्यांनी भेटीला बोलावलं आहे संध्याकाळी. संध्याकाळी त्यांना भेटायला गेलो तर तिथल्या कार्यालयाबाहेर गिरीश कार्नाड बसलेले होते. म्हणाले, ‘चल, आपण बाहेर झाडाखाली कट्टय़ावर बसू या.’ इकडच्या तिकडच्या गप्पागोष्टी झाल्यावर म्हणाले, ‘चल, सांग.. कोणकोणते प्रश्न आहेत तुझे?’

त्यांनी मला ‘अरे-तुरे’ म्हटलं आणि मग आमच्यामधलं अंतर एकदमच कमी झालं.

‘प्रश्न? मी प्रश्न वगैरे काही आणलेले नाहीत. मला तुझा निरोप होता- भेटायला बोलावलं आहे म्हणून. मुलाखतीचं माहीत असतं तर मी प्रश्न तर आणले असतेच; शिवाय रेकॉर्डरही घेऊन आलो असतो.’

माझ्या खांद्यावर हात टाकून छानसं हसला गिरीश. काहीतरी निरोपाचा घोटाळा झाल्याचं त्याच्या लक्षात आलं होतं. मग मीच सुचवलं की, उद्या-परवा केव्हाही मी तयार आहे. पण गिरीशला बंगलोरला दुसऱ्याच दिवशी परतायचं होतं.

‘तुलाच आता बंगलोरला यावं लागेल. मी पुन्हा लवकर पुण्याला येईनसं वाटत नाही. तू असं कर- बंगलोरला ये. माझ्याच घरी उतर. म्हणजे आपल्या सोयीनं पाहिजे तेव्हा पाहिजे तितकं आपल्याला बोलता येईल..’

काही दिवसांनी बंगलोरला गिरीशला फोन केला आणि आम्ही मुलाखतीचे दिवस ठरवले. दुसऱ्या दिवशी बंगलोरहून गिरीशचा फोन. त्यांच्या घरी मी उतरणार असं धरूनच तो चालला होता. फोनवर घराचा पत्ता जवळजवळ पाचएक मिनिटं सांगत होता. रस्त्यातल्या अनेक खुणांसकट! त्याचं बोलणं संपण्याची मी वाट पाहत होतो. शेवटी त्याला म्हटलं, ‘नको. घरी नको. मी एखाद्या हॉटेलमध्ये उतरेन. तिथे मला माझा असा स्वत:चा वेळ मिळेल. आणि अर्थात तुमच्या घरी तुलाही.’ काहीशा नाराजीनं त्यानं माझं म्हणणं मान्य केलं.

दोन दिवसांनी पुन्हा गिरीशचा फोन..

‘ठीक आहे. तू हॉटेलमध्ये उतरणार म्हणतोस तर उतर. पण हॉटेल मी निवडतो. तुला बंगलोरची माहिती नाही. आमच्या घराजवळ हॉटेल असेल असं नाही. बंगलोर अवाच्या सवा पसरलेलं शहर आहे. पण सुदैवानं इथं मला ओळखतात. मी निवडतो हॉटेल. काळजी करू नकोस. तिकीट मात्र वेळेवर काढ. ऐनवेळी मिळायला अवघड जाईल. अर्थात तुला कल्पना असेलच. तूही खूप प्रवास केला असणार.’

त्यानंतर एक दिवस गेला आणि गिरीशनं फोन करून हॉटेलचं नाव, पत्ता, जवळपासच्या खुणा वगैरे सगळं मला सांगितलं. स्टेशनवर आपण गाडी पाठवत असल्याचंही म्हणाला. ‘रिक्षा वगैरे तुला जमणार नाही. डोक्याला ताप होईल..’ वगैरे.

ठरल्याप्रमाणे त्यांची गाडी मला न्यायला आली होती. त्याच्या ड्रायव्हरनं मला बहुतेक माझ्या नजरेवरून ओळखलं असावं. मला नमस्कार करून त्यानं गाडीत बसवलं आणि कित्येक चौक पार करून शेवटी हॉटेलवर आणून सोडलं.

खोलीत जाऊन स्थिरस्थावर झाल्यावर गिरीशला फोन केला, तर म्हणाला, ‘माधव, तू प्रवासातून आला आहेस. म्हणून आज विश्रांती घे. जेवायला माझ्या घरी ये. मी गाडी पाठवतो. आपण उद्यापासून बोलू या.’

अनेक क्रॉस रोड पार करून अखेर जे. पी. नगरला पंधराव्या क्रॉस रोडवरच्या त्याच्या घरी पोहोचलो. साठच्या दशकात पुण्याच्या डेक्कन जिमखान्यावर जसं शांत वातावरण असायचं, तसं हे जे. पी. नगर. म्हटलं तर घर, म्हटलं तर बंगला. घराच्या दरवाजाला लागूनच एक जिना. थेट वरच्या मजल्यावरच्या एका खोलीकडे जाणारा. ड्रायव्हरनं दरवाजातून आत नेलं तर गिरीशच समोर आला. तळमजला तसा काहीसा अंधारलेला. एक माजघर. त्याला जोडून स्वयंपाकघर. दोन्ही प्रशस्त. जवळच कोपऱ्यात एक जिना. त्या जिन्यानं त्याच्यापाठोपाठ वर गेलो आणि लक्षात आलं, रस्त्यावरून आपण पाहिली ती हीच खोली. तशी छोटीशीच. टेबल-खुर्ची, भिंतीतली कपाटं वगैरे. गिरीश एकसारखा काही ना काही प्रश्न विचारत होता.. ‘विजयाबाई सध्या काय करताहेत? नवीन नाटक कोणतं आहे सध्या?’

त्यानं बहुधा जाणलं असावं, की त्याची-माझी फारशी ओळख नसल्यामुळे काहीसं दडपण येऊन मी गप्प गप्प राहतो आहे. बोलताना तो हसऱ्या चेहऱ्यानं बोलतो. चेहऱ्यावर उत्सुकता असते त्याच्या. जसं काही त्याला काही माहीतच नाही.

जेवण झाल्यावर म्हणाला, ‘माधव, तुला जरा विश्रांती घ्यायची आहे? थोडंसं पडायचं आहे? मी घेणार आहे थोडी विश्रांती.’

पण मी हॉटेलवर परतणं पसंत केलं आणि लगोलग परतलोही.

मुलाखत आज सुरू होणार होती. त्यानं पुन्हा गाडी पाठवली आणि अगदी वेळेवर त्याच्या घरी पोहोचलो. बाहेरच्या जिन्यानं वरच्या मजल्यावरच्या त्या खोलीमध्ये गेलो तर कुणीच नव्हतं. तिथं खुर्चीवर बसून प्रश्नांचे कागद- (चांगले चाळीसएक प्रश्न होते विचारायचे!) रेकॉर्डर अशी जुळवाजुळव करतो आहे तोच गिरीश आला. अगदी ताजातवाना, हसतमुख. त्याच्या टेबलामागच्या खुर्चीत तो बसणार तितक्यात त्याच्या लक्षात आलं- टेबलावर खूपच पसारा आहे. पुस्तकं, शब्दकोश, पेनस्टॅन्ड, काही पाकिटं, फेवीस्टिक असं काहीबाही. आणि त्या गर्दीत माझा रेकॉर्डर ठेवायची मी धडपड करतो आहे.

‘Sorry, I should have kept it clean…’ एरवी अस्खलित मराठीमध्ये बोलत असला तरी त्याचा सहजोद्गार येतो इंग्रजीमधून. त्यानं भराभर वस्तूंचा पसारा आवरला. माझ्या रेकॉर्डरसाठी वायर कमी पडते आहे हे पाहून धावपळ करून रेकॉर्डरचं कनेक्शन मिळवून दिलं. मी फक्त पाहत होतो. मनात आलं, कोण कोणाची मुलाखत घेतो आहे? हाच किती काळजी करतो आहे!

शेवटी एकदाचं सगळं जमलं. आणि मी पहिला प्रश्न केला.. ‘बालपण कसं होतं? शाळेत असतानाच म्हणे वडिलांबरोबर नाटक पाहायला जात होतात घरचे सगळे?’

आणि मग एकदम खुलून त्यानं बोलायला सुरुवात केली. आपली मिथकं, मिथ्यकथा, संगीत नाटकं, तर कधी ज्यांअनुई, ब्रेख्त, शाकुंतल, मृच्छकटिक, भारतीय घरांची भौगोलिक-सांस्कृतिक रचना, नाटककार- दिग्दर्शक संबंध, नाटक आणि समकालीन जाणिवा.. कितीतरी विषय बोलण्यामध्ये येत राहिले आणि त्यामधून सर्वार्थानं एक समृद्ध व्यक्तिमत्त्व अनुभवाला येत गेलं. बोलत असताना त्यानं ‘कुचंबणा’ हा शब्द उच्चारला आणि त्याक्षणी त्याने प्रश्न केला, ‘कुचंबणा’ की ‘कुच्यंबणा’? कारण माझं मराठी जरा..’ त्यानं केलेला उच्चार बरोबरच होता आणि त्याचं मराठी उत्तमच होतं, हे मी पाहत-ऐकतच होतो.

ओळीनं तीन दिवस सकाळ-दुपार मुलाखतीची सत्रं सुरू राहिली. त्या दिवशी संध्याकाळी पुण्याला परतायचं होतं. मुलाखत संपली. कागदपत्रं, रेकॉर्डर वगैरेची आवराआवर करताना म्हटलं, ‘गिरीश, तुझी काही प्रकाशचित्रं दे. चित्रपटातली नको. रंगभूमीसंबंधातली.’ तर म्हणाला, ‘माझ्याकडे प्रकाशचित्रं अजिबात नाहीत. असलीच तर कुठे ठेवली असतील, ते आठवतदेखील नाही.’

त्याला म्हटलं, ‘गिरीश, मुलाखतीबरोबर प्रकाशचित्रं नसतील तर माझा प्रकाशक मित्र मला उभं करणार नाही दारात.’ तेव्हा कुठं इथं बघ, तिथं शोध असं करत स्वत:ची फक्त दोन प्रकाशचित्रं त्यानं माझ्या हातावर टेकवली. मी हताश झालो. आंतरराष्ट्रीय कीर्तीचा हा माणूस! याच्याकडे प्रकाशचित्रं नसावीत? माझी ती अवस्था पाहून तो म्हणाला, ‘तू पुण्याला जा. काही दिवसांनी मी थोडी तरी प्रकाशचित्रं नक्की पाठवतो.’

काय म्हणणार यावर!

हॉटेलवर त्याच्या गाडीतून परतलो. खोलीमध्ये जाऊन आवराआवर केली. चहा मागवला. तिथे खुर्चीवर बसून राहिलो. वातानुकूलित खोलीत डुलकी केव्हा लागली कळलं नाही. जागा झालो तेव्हा निघायची वेळ झाली होती. खाली फोन करून खोली सोडत असल्याचं सांगितलं. एक मुलगा आला. त्यानं सामान उचललं. लिफ्टमधून खाली उतरलो. हॉटेलचे सगळे सोपस्कार पूर्ण केले आणि स्टेशनवर जाण्यासाठी रिक्षा-टॅक्सी मागवायला सांगितलं. तिथेच बसून राहिलो. दहाएक मिनिटांत रिक्षा आली. रिक्षा आता निघणार, तेवढय़ात हॉटेलमधला तो मुलगा धावत आला आणि म्हणाला, ‘साहेब, तुम्हाला फोन आला आहे.’ फोन घेतला- तर गिरीश!

‘माधव, सॉरी.. तू निघतो आहेस ते समजलं; पण थांब. मला आठ-दहा प्रकाशचित्रं मिळाली आहेत. त्याच्या प्रती काढून, एका मोठय़ा कागदावर त्या उतरवून पाठवतो आहे ड्रायव्हरबरोबर. आणि ड्रायव्हर तुला स्टेशनवर घेऊन जाईल.’

गाडी घेऊन ड्रायव्हर आला. गुंडाळी केलेला मोठा कागद त्यानं माझ्या हाती दिला. गाडी स्टेशनच्या रस्त्याला लागली. काय झालं कोणास ठाऊक.. डोळे पाण्यानं भरून आले.

पुढे ‘राजहंस’नं त्या मुलाखतीचं पुस्तक ‘रंगमुद्रा’ प्रकाशित केलं. त्यात ज्यांच्या मुलाखती होत्या त्या चौदा रंगकर्मीना एकेक प्रत पाठवली. त्यापैकी एकटय़ा गिरीशनं पत्र पाठवलं..

प्रिय माधव..

तू पाठवलेलं ‘रंगमुद्रा’ मिळालं. मुलाखती वाचताना खूप आनंद झाला. पुस्तक छान काढलं आहे. या पुस्तकाबद्दल आणि त्यामध्ये माझा समावेश केल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या ग्रंथसंग्रहालयात या पुस्तकाची छान भर पडली आहे.

तुझा..

गिरीश

ते पत्र गिरीश कार्नाड गेल्याचं कळल्यावर पुन्हा वाचलं.. आणि एक चित्रपटच नजरेसमोर चमकून गेला.

vazemadhav@hotmail.com