30 September 2020

News Flash

आम्ही तुम्हाला मिस करतोय..

‘‘प्रेस कॉन्फरन्स आहे आज.’’ माझ्या हॉटेलच्या रूममधला फोन वाजतो. पलीकडे कार्नाडसाहेब असतात.

|| मिलिंद शिंदे

‘‘प्रेस कॉन्फरन्स आहे आज.’’ माझ्या हॉटेलच्या रूममधला फोन वाजतो. पलीकडे कार्नाडसाहेब असतात.

‘‘तुम्हाला यायचंय..’’

मी थोडासा गोंधळलेला. या क्षेत्राला नवखा. मला ‘हो’ही म्हणणं जमेना, ‘नाही’ही  जमेना.

‘‘मी माणूस आणि गाडी पाठवतो. पोहोचा वेळेवर.’’ कार्नाडसाहेबांनी फोन ठेवला. मी मात्र फोन हातातच घेऊन. माझं काय काम आहे प्रेस कॉन्फरन्समध्ये? मला का बोलावलंय? मी काही या सिनेमात प्रमुख भूमिका करत नाहीए, मग मला का बोलावलं असेल? विचार करत उभा राहिलो. पण त्यांचं ‘वेळेवर पोहोचा..’ हे वाक्य पुन्हा कानात घुमलं आणि मी तयार व्हायला सुरुवात केली. ज्या हॉटेलला मी होतो, ते  जिथं पत्रकार परिषद होती तिथून साधारण ६० ते ७० कि. मी. दूर होतं. एवढय़ा धामधुमीत, शूटिंगच्या गराडय़ात कार्नाडसाहेबांना मी कसा लक्षात राहिलो असेन, की यालाही बोलवायचंय. मी अचंबित होऊन, माझ्याकडं त्यातल्या त्यात जे बरे कपडे होते ते परिधान करून तयार झालो. गाडी आली आणि पत्रकार परिषदेच्या दिशेनं माझा प्रवास सुरू झाला.

घाटातल्या वळणावळणांच्या वाटांनी मीही पुन्हा पुन्हा विचार करत होतो, की मी इतका महत्त्वाचा आहे का? इ. इ. गाडी इच्छित स्थळी पोहोचली. मी लाजतबुजत त्या उत्सवी ठिकाणी पोहोचलो. कार्नाडसाहेबांनी पाहिलं.

‘‘हे शिंदे..’’ असं म्हणत ते माझ्या जवळ आले. खूप आनंदी होते कार्नाडसाहेब. त्यांनी हात वर करून सगळ्यांना उद्देशून- ‘‘लेडीज अ‍ॅण्ड जंटलमन..’’ आणि मग ते कानडीमध्ये त्यांच्याशी बोलू लागले. त्यांनी माझी स्पेशल ओळख सगळ्यांना करून दिली. मी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून पास झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

पार्टी जोमात होती. मी मात्र त्या कानडी चित्रपटसृष्टीतल्या मोठमोठय़ा व्यक्तींना पाहत होतो. मी वेळेवर जेवून परत हॉटेलला जावं म्हणून कार्नाडसाहेबांनी त्यांच्या एका सहकाऱ्याला माझ्या दिमतीला लावलं होतं.

मी हरखूनच गेलो होतो.

परवा त्यांच्या निधनाची बातमी वाचली आणि त्यांच्या माझ्या सहवासाची सगळी रिळं डोळ्यासमोरून सरकू लागली.

‘‘आर यू बल्की? आय मीन फ्लेशी?’’

प्राथमिक भेटीनंतर त्यांनी विषयाला हात घातलेलं हे पहिलं वाक्य.

‘‘येता भेटायला- जेवढय़ा लवकर होईल तितकं? माझा नंबर आहेच तुमच्याकडे. मला कळवा..’’ नगरहून कर्नाटक एक्स्प्रेस बेंगलुरुला जाते. अचानक ठरल्यामुळं आणि माहीतही नसल्यामुळं मी जनरल कंपार्टमेंटचं बंगलुरुचं तिकीट काढलं. समस्तांना ज्ञात आहेच, की जनरल कंपार्टमेंटमध्ये एकदा बसलात की बसलात. पण एकदा का उठून जरा जरी गेलात की जागा गेलीच. ती जाईल म्हणून मी पूर्ण पंधरा-सोळा तास कुठेही न जाता एकाच जागेवर बसून राहिलो. सामान फार नव्हतंच. एक शर्ट घेतला होता पांढरा. कुठलेही कपडे घालून किती सुंदर दिसू शकलो असतो मी!

‘मिलिंद शिंदे’ असा नावाचा बोर्ड घेऊन एक माणूस उभा होता बंगलुरु स्टेशनवर. कार्नाडसाहेबांचा ग्रेटनेस. माझ्यासारख्या नवीन, होतकरू नटाच्या मनात असलेल्या प्रश्नांची सोडवणूक त्यांनी त्या एका बोर्डनं केली. कुठं जायचं? कसं जायचं? कार्नाडसाहेबांचं घर कसं शोधायचं? मी त्या बोर्डवाल्यांकडे गेलो. त्यांना सांगितलं.. या बोर्डवर ज्याचं नाव आहे तो मीच आहे. (हा ‘द्वारकी’! याच्याबद्दल पुढे लिहीनच.) ‘‘जी सर..’’ इतकंच द्वारकी बोलले.

गाडी एका हॉटेलला पोहोचली. द्वारकी यांनी सांगितलं, की रूम आहे वर. मला क्षणभर वाटून गेलं की, मी हिरो झालो की काय? न्यायला गाडी. आधीच बुक केलेलं हॉटेल. सोळा-सतरा तासांच्या प्रवासानं चिंबून गेल्यानं अंघोळ करून बाहेर आलो ते जेवण तयार ठेवलेलं. मी रिसेप्शनला फोन केला. ‘‘खाना किसने ऑर्डर किया?’’ ते म्हणाले, ‘कार्नाडसाहबने.’’

मी स्तब्ध.

जेवून हात धुवायला गेलो तोच हॉटेलच्या रूमचा इंटरकॉम वाजला.

‘‘झालं जेवण?’’ कार्नाडसाहेब होते.

‘‘खाली गाडी आहे. या. मी वाट पाहतोय.’’

‘‘मी स्टोरी सांगतो तुम्हाला..’’

कार्नाडसाहेबांनी कथा सांगायला सुरुवात केली. सिनेमाचं नाव ‘कानुरु हेग्गडीथी.’ लेखक ‘कोयेंपू’! ज्ञानपीठ पुरस्कारविजेते! कार्नाडसाहेब असे का होते, हा मला त्यांच्याशी पहिला संपर्क झाल्यापासून पडलेला प्रश्न. ते स्वत: हे सगळं का करतायत? मी काही कुणी नावाजलेला किंवा मोठा नट नाही. मग? पण ते स्वत: मला कथा सांगत होते. माझी भूमिका काय आहे, ते सांगत होते. मी तर साक्षात् एका ज्ञानपीठ विजेत्याला दुसऱ्या ज्ञानपीठ विजेत्याची कथा माझ्यासारख्या काहीच न केलेल्या माणसाला ऐकवताना पाहत होतो. किती मोठा माणूस!

‘‘आवडली तुम्हाला भूमिका?’’ – कार्नाडसाहेब. पण मी त्यांना निर्णय सांगावा अशी माझी स्थिती होती? निश्चितच नाही. पण त्यांचा गेट्रनेस.. लाजवाब. मी नाही म्हणायचं काहीच कारण नव्हतं. मी होकार दिला. कारण इतक्या मोठय़ा माणसाने तुम्हाला विचारल्यावर तुम्ही काय करणार?

‘‘हा तुमचा अ‍ॅडव्हान्स..’’ त्यांनी दिलेलं नोटांचं बंडल मी मुकाट घेतलं. त्या नोटांच्या वजनानं मला कळलं होतं, की हे किती पैसे असले पाहिजेत. कारण कार्नाडसाहेबांनी दिलेलं नोटांचं वजन मी त्या दिवसापर्यंत कधीच अनुभवलं नव्हतं.

‘‘आणि हे तुमचं परतीचं तिकीट.’’

मी ते तिकीट घेतलं.

‘‘मल्लिकाला तुम्हाला भेटायचंय का?’’

‘‘हो..’’ मी कसंबसं म्हणालो.

‘‘माझी गाडी घेऊन जा मग. द्वारकी तुम्हाला सोडून येईल.’’

कार्नाडसाहेबांच्या मोठय़ाशा बंगल्यातून- ज्यावर ‘कार्नाड गणपती’ लिहिलं होतं- मी त्यांच्याच गाडीतून बाहेर पडलो आणि ज्या माझ्या एनएसडीच्या मैत्रिणीमुळे मला हा योग लाभला होता, तिला भेटायला तिच्या घरी गेलो.

एक मुक्काम. पुन्हा निघालो. ज्या गाडीचं तिकीट कार्नाडसाहेबांनी बुक केलं होतं, ते जणू जमिनीवरचं विमानच.. पुण्याला जाणारं! ज्यात टुथपेस्टपासून ते शेव्हिंग क्रीम, रेझर सगळं असणारं किट मला मिळालं. मी ते घेतलं. ठेवलं. पण माझं लक्ष होतं कार्नाडसाहेबांनी दिलेल्या रोख रकमेवर. कारण याआधी मी इतकी मोठी रोख रक्कम कधीच पाहिली नव्हती.

मी नगरला परत आलो. पाहा ना.. गिरीश कार्नाड ज्येष्ठ-श्रेष्ठ.. आणि नगरचा एक साधा नाटक करणारा पोरगा. पण मग काही संपर्कच होईना. तेव्हा मोबाइल नव्हते. एके दिवशी फोन आला.. ‘‘या तारखा.. आणि हे शूटिंग शेडय़ूल.’’ हा फोन आल्यावर काम जातं की काय, ही माझ्या मनातली भीती गेली.

‘‘नॉन-व्हेज खाता का?’’

‘‘हो..’’

‘‘हा सावंत तुम्हाला कानडी शिकवेल.. जेवढं सिनेमात आवश्यक आहे तेवढं.’’

‘‘हा.. आणि हा द्वारकी.. सकाळी येऊन तुम्हाला व्यायाम शिकवेल.’’

लेखक कोयेंपू.. त्यांची ज्ञानपीठ विजेती कादंबरी ‘कानुरु हेग्गडथी’! आणि दिग्दर्शक- ज्ञानपीठ विजेते सर गिरीश कार्नाड.

आधी सांगितल्याप्रमाणं द्वारकी हे माझे फिजिकल ट्रेनर. जाच.. सवय नाही. पण द्वारकी पहाटे पाचला येणार म्हणजे येणार. पण त्यांनी मला तयार केलं. आणि सावंतांनी मला कानडी शिकवली. शूटिंगदरम्यान मी लहान गावातून आलो आहे नि नवखा आहे हे त्यांना माहीत होतं. पण एक दिवस सर माझ्यावर रागावले. त्यांना शूटिंगच्या वेळेस शॉट चालू असताना सूचना करायची सवय होती. मला काहीच माहीत नसल्यानं मी त्यांनी काही सूचना केली की शॉटमधून बाहेर येऊन ‘काय?’ असं विचारायचो. त्यावर ते चिडून म्हणाले, ‘‘माझ्याकडे न बघता मी सांगतोय ते करा..’’ तो धडा मला खूप फायद्याचा ठरला. मला आजही कुणी दिग्दर्शक सुरू असलेल्या शॉटमध्ये काही सांगत असेल तर ते मी निमूटपणे करतो. पण हे कसब माझ्यात आलं ते गिरीश कार्नाड सरांकडून.

शूटिंगदरम्यान मी त्यांना ऐकत होतो, त्यांचं निरीक्षण करत होतो. आणि मला पदोपदी जाणवत होतं- गिरीश कार्नाड या जगद्विख्यात माणसाचं मोठेपण.. आणि तेवढंच जमिनीला धरून वागणं. त्यांचं बोलणं, त्यांचे विचार, त्यांचं आग्रही असणं सतत जाणवायचं.

शूटिंग संपलं.. मी त्यांना निघण्याआधी मिठी मारली. मी त्यांच्या छातीपर्यंतच पोहोचू शकलो. त्यांची उंची कुणीच गाठू शकत नाही. पण त्यांच्या छातीवर माझा कान होता- तो घुमार (रेझोनन्स) मला अजून जाणवतोय.

सकाळी तिकीट घेऊन माणूस आला आणि एक चेक. चेक पाहून मी सरांना फोन केला.

‘‘सर माझे सगळे पैसे मिळालेत. हे काय?’’

‘‘मी तुम्हाला कमी पैसे दिलेत.. हे माझ्याकडून ठेवा तुम्हाला.’’ मन भरून येईल नाही तर काय?

परतीच्या प्रवासात मला कार्नाडसाहेब पुन्हा पुन्हा आठवत होते. आजही आठवतायत..

पुराणकथांचा आधार घेऊन, इतिहासात डोकावून तिथंच न रमता, न अडकता त्याला वर्तमानाशी तोलून भविष्याशी भिडणारा नाटककार तो हाच का? ज्यांच्यासोबत मी इतके दिवस होतो. किती साधे, किती जमिनीवर, किती समजदार. ‘ययाति’, ‘तुघलक’, ‘हयवदन’, ‘नागमंडल’, ‘टिपू सुलतान’, ‘वेडिंग अल्बम’, ‘बिखरे बिंब’ अशी भिन्न आशय-विषयांवरची नाटकं लिहिणारे नाटककार. माझं आवडतं नाटक ‘अग्नीवर्षां’ (‘अग्निजल’, ‘अग्नी बरखा’) लिहिणारे ते हेच का?

त्यांचं वागणं, त्यांची मतं, त्यांचं आग्रही असणं पाहिलं की थक्क व्हायला होतं. लेखक म्हणून.. कलावंत म्हणून. ‘भूमिका’ करणारे नट असतात; पण ‘भूमिका’ घेणारे कमी. त्यातले एक.. सर गिरीश कार्नाड. हे मला सारखं त्यांच्याशी शूटिंगदरम्यान बोलताना जाणवायचं.

कार्नाडसाहेबांचं शूटिंग एकदम शिस्तबद्ध असे. सुरु वात, जेवणाची वेळ आणि समाप्तीही. दुपारी जेवणानंतर ते दहा मिनिटं खुर्ची घेऊन डोकं, मान भिंतीवर रेस्ट होईल अशी जागा घेऊन हुकमी दहाच मिनिटांची झोप घेत असत.

दहाच मिनिटांची अशी हुकमी झोप घेणारा माणूस आता कायमचा निद्राधीन झाला आहे. पण वाटत राहतं, ते आत्ता उठतील आणि म्हणतील, ‘‘चलो.. रेडीऽऽऽ’’

कार्नाडसाहेब, आम्ही तुम्हाला मिस करतोय..

milindrshinde@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2019 12:16 am

Web Title: indian actor girish karnad 3
Next Stories
1 ‘सर सर सरला’
2 मी आणि आम्ही
3 पावसाळी सूर्यफुलं
Just Now!
X