भारतीय विद्याभवनच्या आंतरमहाविद्यालयीन नाटय़स्पर्धा म्हणजे एक अप्रूपच होते. त्यावेळी दूरदर्शन नव्हते. जिवंत, भावपूर्ण कलाविष्कार फक्त नाटकांतूनच अनुभवायला मिळायचा. त्यामुळे नाटक करणारे आणि बघणारेही स्वत:ला ‘ग्रेट’ समजायचे. काही कॉलेजेस्चे दिग्दर्शक ठरलेले असायचे. रामचंद्र वर्दे व नान् संझगिरी हे या स्पर्धेचे निष्णात दिग्दर्शक. स्पर्धेच्या मोसमात ते तीन ते चार महाविद्यालयांच्या नाटकांचं दिग्दर्शन करीत. दामू केंकरे व नंदकुमार रावते हे जरा अधिक नाववाल्या महाविद्यालयांचे दिग्दर्शक. त्यांना आणि ते दिग्दर्शन करीत असलेल्या महाविद्यालयांच्या स्पर्धेतल्या अस्तित्वाला सारेच दबकून असत.  
१९५१ पासून सुरू झालेल्या भारतीय विद्याभवनच्या आंतरमहाविद्यालयीन नाटय़स्पर्धा म्हणजे एक अप्रूपच होते. चार दिवसांच्या प्राथमिक स्पर्धा काय, किंवा दिवसभराची अंतिम स्पर्धा काय; युवाउत्साहाचे प्रचंड धबधबेच कोसळत राहायचे. त्यावेळी दूरदर्शन नव्हते. जिवंत, भावपूर्ण कलाविष्कार फक्त नाटकांतूनच अनुभवायला मिळायचा. त्यामुळे नाटक करणारे आणि बघणारेही स्वत:ला ‘ग्रेट’ समजायचे. आपोआपच त्यांच्याभोवती एक वलय फिरत राहायचे. कॉलेजेस उघडल्यापासून महिना- दीड महिना जातो- न जातो तोच स्पर्धेच्या नाटकाचे वेध लागायचे. नव्यानेच प्रवेश घेतलेली नाटकेच्छू मंडळी दररोज कॉलेजच्या मराठी वाङ्मय मंडळाच्या नोटीस बोर्डावरून फेरी मारायची. नाटकाच्या- म्हणजेच नटांच्या सिलेक्शनच्या बैठकीची तारीख-वेळ असलेल्या नोटिशीची प्रतीक्षा केली जायची. अनुभवी विद्यार्थ्यांने बुजुर्गाच्या तोऱ्यात नाटकाची आणि दिग्दर्शकाची अगोदरच निवड केलेली असायची. चांगले कलावंत मिळणं किती कठीण असतं, हे दाखवून मग तो त्याने अगोदरच निवडलेल्या विद्यार्थी कलावंतांची वर्णी लावायचा. त्या बुजुर्गाचा आणि नाटकासाठी निवडले गेलेल्यांचा भाव तेव्हापासून वधारत जायचा तो अगदी स्पर्धेत पारितोषिक मिळेपर्यंत किंवा न मिळेपर्यंतही.
काही कॉलेजेस्चे दिग्दर्शक ठरलेले असायचे. रामचंद्र वर्दे व नान् संझगिरी हे दोन त्यावेळच्या महाविद्यालयीन स्पर्धेचे निष्णात व नामवंत दिग्दर्शक होते. स्पर्धेच्या या मोसमात हे दिग्दर्शक तीन ते चार महाविद्यालयांच्या नाटकांचं दिग्दर्शन करीत असत. नान् संझगिरींना ‘नान्’ का म्हणायचे, ते कशाचे संक्षिप्त रूप होते, हे कधीच कुणाला कळलं नाही. पांढराशुभ्र पायजमा आणि झब्बा. झब्ब्याची कॉलर आपल्या नेहमीच्या शर्टासारखी ओपन. त्या झब्ब्याच्या वरच्या खिशात एक कागदाची घडी असायची. त्यावर एम-ई-एन अशी इंग्रजी आद्याक्षरे असायची. मॉर्निग, इव्हनिंग व नाइट असे ते रकाने असायचे. ते त्यांचं तालमीला जाण्याचं टाइमटेबल. सकाळी, दुपारी आणि रात्री तालमीला जायच्या कॉलेजेसची त्यावर नोंद असायची. दुसऱ्या दिवशीच्या तालमीची वेळ त्या तक्त्यावरून ठरत असे. नान् संझगिरी ललितकलादर्शच्या भालचंद्र पेंढारकरांच्या कंपनीतले कलावंत होते. तर रामचंद्र वर्दे हे मो. ग. रांगणेकरांच्या नाटय़निकेतनमधले कलावंत होते. या दोन दिग्गज संस्थांच्या नाटय़बाजाची छाप या दोन्ही दिग्दर्शकांवर पडली होती. चटपटीत आणि टापटिपीच्या प्रयोगांचे स्पर्धेतले ते अध्वर्यु होते. आजच्या प्रयोगांच्या नेटक्या आणि झटपट दर्शनाचे मूळ श्रेय या स्पर्धेतल्या या दिग्दर्शकांना द्यायला हवे.
ग्रँट मेडिकल कॉलेजच्या एकांकिका रामचंद्र वर्दे दिग्दर्शित करीत. तेच त्या एकांकिकेचे लेखक असत. काशीनाथ घाणेकर त्यांच्या एकांकिकेचा नायक असे. त्याला मध्यवर्ती ठेवूनच साऱ्या एकांकिकेचं लेखन, आरेखन होत असे. पात्रांच्या हालचाली, वेगवेगळे आकृतिबंध आणि कृतीतून हशे मिळवणे, हा त्या प्रयोगाचा बाज असे. दिग्दर्शक वर्दे प्रयोग अगदी काटेकोर व चोख बसवीत असत. एकांकिका हा एकपात्री प्रयोग वाटू नये म्हणून आजूबाजूच्या लोकांची गर्दी किंवा येणे-जाणेया ना त्या निमित्ताने घडवून डॉ. काशीनाथ घाणेकरांना भरपूर वाव मिळण्याच्या संधी दिग्दर्शक उपलब्ध करून देत असे. दरवर्षी अभिनयाचे पारितोषिक घाणेकरांच्या खिशात सहजच पडे. डॉ. काशीनाथ घाणेकर हा अत्यंत देखणा नट व्यावसायिक रंगभूमीला दिला तो याच स्पर्धेनं. बालगंधर्वानंतरचा लोकप्रिय नट म्हणून तो मानला गेला.
दामू केंकरे व नंदकुमार रावते हे जरा अधिक नाववाल्या महाविद्यालयांचे दिग्दर्शक. या दिग्दर्शकांना आणि ते दिग्दर्शन करीत असलेल्या महाविद्यालयांच्या स्पर्धेतल्या अस्तित्वाला सारेच दबकून असत. रंगमंचावर नटांना अधिकाधिक चालण्याचं काम नंदकुमार रावते यांनी आपल्या प्रयोगातून दिलं.
दामू केंकरे यांचे प्रयोग म्हणजे एक अपूर्व अनुभव होता. १९५४ मध्ये वसंत माने लिखित ‘ब्रह्मचारी यक्ष’ ही एकांकिका जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सने सादर केली होती. जे. जे.च्या प्रयोगांचे सर्वेसर्वा दामू केंकरेच असत. वरील एकांकिकेतील हॉटेलमधल्या पोट्र्रेटमधलीच मुलगी उंचावरून पायऱ्या उतरत नायकाच्या रूममध्ये भुतासारखी अलगद पावलं टाकताना पाहून टवाळी करण्याच्या इराद्याने जय्यत तयारीत असलेला प्रेक्षक जागच्या जागी थिजला होता. क्षणभर गेला आणि मग साऱ्याच प्रेक्षागृहाने प्रचंड टाळ्यांचा कडकडाट केला. सूचक नेपथ्य आणि प्रतीकात्मक नेपथ्य यांतील जो फरक आजच्या रंगकर्मीच्या ध्यानात येत नाही, तो दामू केंकरे यांनी आपल्या दिग्दर्शनाने ‘राक्षसाचा जन्म’ या अनंत काणेकरलिखित एकांकिकेच्या आविष्काराने स्पष्ट केला होता. अणुबॉम्बची निर्मिती या विषयावरील या एकांकिकेत लेखक एक अमंगल, पापी व्यक्तिरेखा निर्माण करतो. राक्षसाची ही व्यक्तिरेखा रंगमंचावर उघडय़ा पडलेल्या पुस्तकाच्या पानावर पडलेल्या लेखकाच्या सावलीतून अवतीर्ण होते आणि मग तो राक्षस सारा रंगमंचच व्यापून टाकतो. लेखकानेच निर्माण केलेली ती व्यक्तिरेखा असल्यामुळे ती कितीही दुष्ट, पापी असली तरी तो त्याला मारू शकत नाही. अखेर लेखकच आत्महत्या करतो. प्रतीकात्मकता आणि सर्जनतेची सूचकता यांचे अचंबित करणारे मिश्रण दिग्दर्शकाने रंगमंचावर समूर्त केले होते. ‘अधांतरातील अर्धा तास’ या एकांकिकेत दामू केंकरे यांनी दाखवलेली लोंबकळती लिफ्ट हा तेव्हा फार मोठा कुतूहलाचा विषय ठरला होता. ‘वैऱ्याची रात्र’ या विजय तेंडुलकरलिखित एकांकिकेत रंगमंच आणि प्रेक्षक यांचं स्थानच बदलण्याचा प्रयोग केंकरे यांनी केला होता. वेगळे, नवे प्रयोग करणारा एक सर्जनशील दिग्दर्शक म्हणून दामू केंकरे नावारूपास आले ते याच स्पर्धेतून. आयुष्याच्या अखेपर्यंत त्यांनी प्रायोगिकतेची जी पताका फडफडवत ठेवली, तिचं उगमस्थान भारतीय विद्याभवनची नाटय़स्पर्धा हे होतं.
रुपारेल कॉलेजने पु. ल. देशपांडेलिखित ‘सारं कसं शांत शांत’  ही एकांकिका सादर केली ती १९५७ सालच्या स्पर्धेत. नान् संझगिरी यांनी दिग्दर्शित केलेली ही एकांकिका चषकविजेती ठरली. त्यातल्या मीना पेठे, गोरे, महाजन वगैरे कलावंतांची नावं आठवतात. रंगवलेला पडदा वगैरे नसताना केवळ मूकाभिनयातून पर्वतीचं उभं केलेलं वातावरण, पर्वती वर चढून आल्याचा अभिनय, आसनाची विशिष्ट मांडणी व त्याचा वापर या सगळ्यातून शून्यातून पर्वती पाहिल्याचा तो अनुभव खूपच दाद मिळवता झाला. नाटकातील मूकाभिनयाची ताकद प्रथमच या एकांकिकेने महाविद्यालयीन रंगकर्मीना दाखवून दिली. आणि मूळातल्या लिखित विनोदाला या सूचक अभिनयामुळे अनेक धुमारे फुटले.
या वर्षी खालसा कॉलेजने य स्पर्धेत भाग घेतला तो ‘काळ आला होता’ या एकांकिकेने. त्यावेळी रंगमंचावर आलेल्या ‘दुरिताचे तिमिर जावो’ या नाटकाच्या पहिल्या अंकाचं ते संक्षिप्तीकरण मीच केलेलं होतं. बिननाववाल्या कॉलेजला नाववाला लेखक आपली एकांकिका का म्हणून देईल? त्यामुळे मलाच हा खटाटोप करावा लागला. त्यातील दिगूची भूमिका मी केली. त्यासाठी मूळ व्यावसायिक नाटकाचे लागोपाठचे तीन प्रयोग पाहून मी श्रमिक नट झालो होतो. नान् संझगिरी आमच्या प्रयोगाचे दिग्दर्शक होते. एवढं गंभीर नाटक स्पर्धेचे विद्यार्थी प्रेक्षक कसे घेतील, अशी शंका होती. पोटात भीतीचा गोळा उठला होता. ते बोलणे परीक्षकांना ‘अभिनय’ वाटला आणि मला सवरेत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक मिळाले. त्यानंतर या स्पर्धेत आणि राज्य नाटय़स्पर्धेतही मला अभिनयाची पारितोषिके मिळाली. एकूण ‘या स्पर्धेने एक बरा नट दिला,’ असं त्यावेळी लोकांनी म्हटलं असेल. आमच्या या एकांकिकेचा अंतिम स्पर्धेतला प्रयोग पाहायला मूळ भूमिका करणारे भालचंद्र पेंढारकर आले होते. स्पर्धेतल्या दिगूचे काम पाहून ‘माझ्या भूमिकेला लोकांचे डोळे का पाणावतात ते मला कळले. मी स्वत:लाच त्या नाटकात पाहिले,’ असे त्यांचे उद्गार स्पर्धेच्या निमित्ताने केलेल्या नाटय़परीक्षणात छापले होते. थोडक्यात, मला नक्कल चांगली जमली होती.
याच स्पर्धेत आम्ही मामा वरेरकर यांच्या  ‘अ-पूर्व बंगाल’ या नाटकाचा एक प्रवेश सादर केला होता. दिग्दर्शक अर्थात नान् संझगिरीच होते. भारताच्या फाळणीवरचं हे नाटक होतं. दंगलखोर नायकाच्या घराला आग लावतात असे त्यात दृश्य होते. दिवाणखान्याच्या मधल्या दरवाजाच्या मागे समोरासमोर दोघांना हातात पेटत्या मशाली घेऊन उभं केलं आणि पेटलेल्या मशालीवरून राळीचा भुगा फेकत राहिलो. ज्वाळा दरवाजातून भपकन् जोरात आत शिरायच्या. क्षणभरातच राख खाली पडायची. पण प्रत्यक्षात आग लागल्याचे दृश्य भयानक दिसायचे. या दृश्यानंतर टाळ्यांच्या कडकडाटाने पडदा पडला. आमचा ट्रिकसीन यशस्वी झाला. पण एकूण प्रकार पाहून विद्याभवनच्या संयोजकांनी त्या वर्षीपासून रंगमंचावरील जिवंत आगीच्या प्रयोगाला बंदी केली. बक्षीस मिळवण्यात यशस्वी झालो नसलो तरी भावी रंगभूमी ‘फायरप्रूफ’ करण्यात आमचा सहभाग होता. इतिहास याची नोंद घेईल काय? विद्याभवनच्या स्पर्धेने काय साधले? या प्रश्नाच्या उत्तरात ही ‘अग्निप्रवेशबंदी’ यायला हरकत नाही.
एलफिन्स्टन कॉलेजने रत्नाकर मतकरीलिखित ‘सांगाती’ ही गंभीर एकांकिका सादर केली होती. रेखा सबनीस आणि सतीश साक्रीकर अशा दोनच व्यक्तिरेखांची ती एकांकिका होती. एकांकिका सुरू झाली आणि प्रेक्षकांनी प्रचंड गदारोळ करायला सुरुवात केली. काही ऐकूच येईना. आता काय होणार, कळेना. परीक्षकांमध्ये दाजी भाटवडेकर होते. त्यांनी सांगितलं, ‘आम्हाला ही एकांकिका पाहायची आहे.’ सगळ्या प्रेक्षकांना बाहेर जायला सांगण्यात आलं. एकांकिकेचे लेखकही बाहेर पडले. नंतर त्या एकांकिकेचा प्रयोग फक्त परीक्षकांनी पाहिला. ती एकांकिका सवरेत्कृष्ट ठरली. नाटय़स्पर्धाच्या परीक्षकांनी अनुकरण करावं अशी ही घटना आहे.
नाटकाचं बिटक
बघता बघता ‘नाटक बिटक’ सदर भरतवाक्यात आलं. ‘नाटक’ भरपूर झालं, पण ‘बिटक’ राहिलं. ज्या नाटकांच्या साक्षीनं मी अध्र्या शतकाची वाटचाल केली त्यांचा सहानुभव इतरेजनांना देण्याचा प्रयत्न करावा, स्मरणरंजनाचा आनंद वाटून वाढवावा, हाच या सदराचा हेतू होता. सगळं स्मृतींतून उतरवलं होतं. त्यासाठी संबंधित संस्थांनी, रंगकर्मीनी साहाय्य केलं. मनात रुतलेल्या नाटकाला प्रसंगांच्या विंगा मिळाल्या. पात्राक्षरे उभी राहिली. नाटय़समीक्षा वा इतिहासकथन हा हेतूच नव्हता. दस्तावेजी थोडे तरी काही असावे, पुढच्यांना बैठक मिळावी, एवढीच इच्छा होती. कालचा प्रवास आजच्या पिढीपुढे उभा राहावा आणि कालच्यांचे स्मरणरंजन व्हावे, हेच मनीमानसी होतं. एक नाटय़पिढी कसली नाटकं करीत होती, त्यासाठी काय करीत होती, याची अंधूकशी तरी कल्पना वर्तमान पिढीला यावी, हीच अपेक्षा होती. पंधरवडय़ाने प्रसिद्ध होणाऱ्या लेखांनंतर महाराष्ट्रातून ठिकठिकाणाहून जे मेल, दूरध्वनी आले, त्यावरून ही अपेक्षा बऱ्याच प्रमाणात सफल झाली असं म्हणायला हरकत नाही.
हे नाटय़धन सुशोभित करण्यासाठी अनेकांनी साहाय्य केलं. छायाचित्रे मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागली. मान्यवर संस्थांमध्येही दस्तावेज ठेवण्याची पद्धत अजूनही नाही, ही खेदाची बाब आहे. आता संगणकासारखं माध्यम हाताशी असताना तरी त्यांनी दस्तावेज ठेवण्याची सवय लावून घ्यायला हवी.
‘नाटक बिटक’ या सदरासाठी पुढील व्यक्तींनी साहाय्य केलं. त्यांचे मन:पूर्वक आभार!
लीला हडप (लिट्ल थिएटर), प्रतिभा मतकरी (बालरंगभूमी), रवी सावंत (आविष्कार), रामचंद्र वरक (आय. एन. टी.), पुरुषोत्तम बेर्डे, डॉ. शरद भुथाडिया, शशिकांत कुळकर्णी (पी. डी. ए.), सुभाष भागवत (साहित्य संघ), लालन सारंग, दिलीप प्रभावळकर, प्रशांत दळवी, डॉ. हेमू अधिकारी, निरंजन मेहता (विद्याभवन), सुनंदा भोगले.
(समाप्त)

mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Controversy on Ramayana
सीतेच्या हातून रावणाला गोमांस, हनुमानाचं विकृत चित्रण, विद्यापीठातील नाटकाचा वाद आहे काय?
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!