मनोहर पारनेरकर

samdhun12@gmail.com

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
iPhone users in 91 countries warned to beware of Pegasus like spyware
‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरपासून सावधान! ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना इशारा
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
Use coco peat to flower your home garden
घरातील बाग फुलवण्यासाठी वापरा कोकोपीट, घरच्या घरी कसे तयार करावे कोकोपीट

पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताचा आपल्या सांगीतिक संस्कृतीवर निश्चितपणे प्रभाव पडलेला आहेच. फक्त तो आपल्याला सहजपणे कळेल आणि जाणवेल इतक्या प्रमाणावर पडलेला नाही. भारतीय संगीत संस्कृतीतील निदान चार क्षेत्रं अशी आहेत, की ज्यावर हा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. १) आपल्या शास्त्रीय संगीताच्या दोन्ही पद्धती- हिंदुस्थानी आणि कर्नाटकी, २) भारतीय सिनेसंगीत, ३) भारतीय टीव्हीवरील जाहिराती आणि ४) भारतीय सन्यदलाचं संगीत. यापैकी हिंदुस्थानी आणि कर्नाटकी शास्त्रीय संगीतावरील प्रभावाबद्दल मी वेगळ्याने लिहिणार आहे. या लेखात उरलेल्या तीन क्षेत्रांबद्दल विचार करू या.

भारतीय सिनेसंगीत साधारणपणे १९३० च्या दशकापासून आपल्या सिनेसंगीताला- म्हणजे गाणी आणि पार्श्वसंगीत या दोन्हींना पाश्चात्त्य वाद्यवृंदाची ओळख करून देण्याचं श्रेय तिमिर बरन आणि पंकज मलिक या जोडीला जातं. अतिशय नावीन्यपूर्ण रचना करण्याबद्दल हे दोघं प्रसिद्ध होते. या प्रक्रियेची सुरुवात या जोडीने केल्यानंतरच्या काळात अनिल बिस्वास, नौशाद, शंकर-जयकिशन आणि सलील चौधरी यांच्यासारख्या प्रसिद्ध संगीतकारांनी ही प्रक्रिया खूपच समृद्ध केली. त्यानंतरच्या काळात आर. डी. बर्मन, इलायराजा आणि ए. आर. रेहमान यांनी ती एका वेगळ्याच उंचीवर नेली. (इलायराजा हे अत्यंत चतुरस्र संगीतकार असून ते पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताचेदेखील एक बऱ्यापैकी रचनाकार आहेत.)

इथे वाचकांच्या मनात एक प्रश्न उभा राहू शकतो, की आपल्या सिनेसंगीतकारांनी पाश्चात्त्य ऑर्केस्ट्रेशन इतक्या उत्साहाने का स्वीकारलं? याला उत्तर असं की : हार्मनी ही संकल्पना आपल्या संगीताला एकदम परकी होती. हार्मनीमुळे गाण्याला एक पोत आणि सखोलता मिळते. त्रिमितीय चित्रणामुळे एखाद्या चित्राला जशी खोली मिळते, काहीशी तशीच. हार्मनीमध्ये ऐकायला सुखद वाटतील अशा सुसंवादी सुरांचा संयोग असतो. हार्मनीचे दोन घटक असतात. एक म्हणजे कॉर्ड्स आणि दुसरा घटक म्हणजे काउन्टरपॉइंट. कॉर्ड्स म्हणजे कमीत कमी तीन वेगवेगळे सुसंवादी आणि आनंददायी सूर एकाच वेळी वाजवणं. काउन्टरपॉइंट म्हणजे दोन धुना एकमेकांवर अशा ठेवल्या जातात, की त्या दोन्ही एकाच वेळी ऐकू येतील. गेल्या ८० वर्षांत रचलेल्या बहुतेक सिनेसंगीतात कॉर्ड्सचा मुबलक वापर केलेला दिसतो. पण त्यामानाने काउन्टरपॉइंटचा वापर मात्र फारच क्वचित केलेला दिसून येतो. पंडित रविशंकर यांच्यासारख्या प्रख्यात कलाकारानेदेखील हार्मनीसाठी हिंदी सिनेजगतातील सर्वोत्कृष्ट अ‍ॅरेंजर अ‍ॅन्थनी गोन्साल्विस यांच्या कौशल्याची मदत एकदा घेतली होती. ही मदत १९५५ सालच्या ‘अनुराधा’ या चित्रपटातील संपूर्णपणे रागदारीवर आधारलेल्या गाण्यांना सूक्ष्मशा हार्मोनिक छटा देण्यासाठी  होती.

सिम्फनी ऑर्केस्ट्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या जवळजवळ सर्व वाद्यांचा वापर आपल्या संगीतकारांनी कल्पकतेने केला आहे. याला अपवाद दोन वाद्यांचाच आहे. एक म्हणजे ‘बसून’ (bassoon) हे वाद्य (हे वाद्य विनोदी तसंच करुण परिणाम साधण्यासाठी वापरलं जातं.) आणि दुसरं ‘सेलेस्टा’ (celesta) हे. हे एक ग्लोकनस्पिएन (glockenspien) सारखं वाद्य आहे. (पण त्याचा नाद हा ग्लोकनस्पिएनपेक्षा जास्त मऊशार आणि सूक्ष्म असतो.) पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताचा आपल्या सिनेसंगीतात झालेला सगळ्यात लक्षात राहणारा आणि ठळक वापर म्हणजे ‘इतना ना मुझ से तू प्यार बढा’ हे सलील चौधरी यांनी रचलेलं गाणं आहे. हे गाणं ए. व्ही. एम.च्या १९६१ सालच्या ‘छाया’ या चित्रपटातलं आहे. या गाण्यावरून- जास्त अचूकतेने बोलायचं तर त्याच्या मुखडय़ावरून- सलीलदांवर अनेकदा उचलेगिरीचा आरोप केला गेला आहे, पण तो बरोबर नाही. हे गाणं मोझार्टच्या सर्वोत्तम ‘जी मायनर सिम्फनी क्र. ४०’ या सिम्फनीमधल्या ‘अलेग्रो  मो ल्टो’ (अतिजलद लयीवर) मूव्हमेंटवर आधारलेलं आहे. सलील चौधरी यांना एकेकाळी गुरुस्थानी मानणाऱ्या इलायराजा यांनी जणू आपणही काही त्यांच्या फार मागे नाही असं दाखवून देत मोझार्टच्याच ‘लिटिल जी मायनर  सिम्फनी क्र. २५’ मधील काही अंश ‘अदा विटूक्कू विटूक्कू’ या लोकगीतसदृश गाण्याच्या मुखडय़ासाठी वापरला आहे.

आता सिनेगीतात काउन्टरपॉइंट या घटकाचा वापर केलेली ही सहा उदाहरणं : १) गाणं- ‘उल्फत का जाम ले जा’, गायक- लता मंगेशकर आणि कोरस, १९५५ सालचा सिनेमा ‘उडनखटोला’, संगीतकार- नौशाद, २) गाणं- ‘हाल कैसा है जनाब का’, गायक- किशोरकुमार आणि आशा भोसले, १९५८ सालचा सिनेमा ‘चलती का नाम गाडी’, संगीतकार- एस. डी. बर्मन, ३) गाणं – ‘लेकर हम दीवाना दिल’, १९७३ सालचा सिनेमा ‘यादों की बारात’, गायक- किशोरकुमार आणि आशा भोसले, संगीतकार- आर. डी. बर्मन, ४) गाणं- ‘नी पार्था’, २००० सालचा तमिळ सिनेमा ‘हे राम’, गायक- आशा भोसले आणि हरिहरन, संगीतकार- इलायराजा, ५) गाणं- ‘एन्नूल्ले एन्नूल्ले’, १९७३ सालचा तमिळ सिनेमा ‘वल्ली’, गायिका- स्वर्णलता, संगीतकार- इलायराजा, ६) गाणं- ‘पुंथालीर आदा’. १९८१ सालचा तमिळ सिनेमा ‘पन्नीर पुष्पांगल’, संगीतकार- इलायराजा. या गाण्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या कडव्याच्या मधलं गिटार संगीत.

टीव्हीवरील जाहिराती बहुतेक इंग्रजी, हिंदी किंवा प्रादेशिक टीव्ही वाहिन्यांची सिग्नेचर टय़ून ही भारतीय आणि पाश्चात्त्य संगीताचं मिश्रण असते. पण त्याचं वादन मात्र पाश्चात्त्य वाद्यांच्या संचानं केलेलं असतं. गेल्या दोन दशकांत निदान अर्धा डझन तरी भारतीय व्यावसायिक जाहिरातदारांनी पाश्चात्त्य शास्त्रीय संगीतावर आधारित टीव्ही जाहिराती केल्या असतील. पण या सर्वात जास्त लक्षात राहणारी आणि परिणामकारक अशी जाहिरात टायटन कंपनीची आहे. या जाहिरातीची संकल्पना कंपनीची अ‍ॅड एजन्सी ऑगिल्व्ही माथर यांची होती. त्यांना झेरेक्स देसाई यांचं उत्तेजन आणि सक्रिय सहभाग लाभला होता. देसाई स्वत: टायटन कंपनीचे मुख्य संस्थापक असून, ते पाश्चात्त्य संगीताचे उत्तम जाणकारही  होते. या जाहिरातीचा म्युझिक ट्रॅक मोझार्ट यांच्या सुप्रसिद्ध ‘लिटिल जी मायनर क्र. २५’ या सिम्फनीच्या सुरुवातीच्या मूव्हमेंटवर आधारलेला आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, हिंदुस्थानी लोकसंगीत, रॉक, फंक इत्यादींच्या मिश्रणाचा नावीन्यपूर्ण वापर करून ही थीम टय़ून अनेक प्रकारे वाजवली गेली आहे. या टय़ूनमुळे या जाहिरात मोहिमेची आवाहकता खूप वाढली आहे.

यासारखीच लक्षात राहणारी टीव्हीवरची आणखी एक जाहिरात म्हणजे जे. के. ग्रुपच्या रेमंड सूटिंगची ‘द कम्प्लीट मॅन’ ही जाहिरात मोहीम. त्याची मूळ कल्पना ग्रुपची अ‍ॅड एजन्सी आर. के. स्वामी बीबीडीओ यांनी केली होती. या जाहिरातीतल्या म्युझिक ट्रॅकची धून एक्दम  haunting… म्हणजे मनात घर करून राहणारी आहे. ही धून आणि तिच्या अनेक आकर्षक  आवृत्त्या या रॉबर्ट शुमान यांच्या Kinderscenen (किंडर्सझिनेन किंवा लहानपणीची दृश्यं) या मुळात पियानोसाठी लिहिलेल्या रचनेवरून बांधल्या आहेत. रॉबर्ट शुमान हा रोमॅन्टिक कालखंडातला जर्मन रचनाकार होता. या जाहिरातीत मूळ तुकडय़ासोबत जी ऑर्केस्ट्राची रचना केली आहे ती वेळोवेळी बदलत राहते.

भारतीय सैन्यदलांचं संगीत

आपल्या सशस्त्र सैन्यदलाच्या बँडची स्थापना १९८९ साली झाली. आपल्या तीनही लष्करी सेवांच्या बँडचा यात समावेश आहे. या सर्व बँडमध्ये ब्रास (ट्रम्पेट, ट्रोम्बोन, इ. वाद्ये), वूडिवड (फ्लूट, क्लॅरिनेट, इ. वाद्ये) आणि अनेक प्रकारची तालवाद्ये वापरली जातात. ही सर्व वाद्ये अर्थातच पाश्चात्त्य वाद्ये आहेत. पण यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. कारण आपल्या सन्यदलांना ‘ब्रिटिश इंडियन मिलिटरी’चा वारसा लाभला असल्यामुळे ती परंपरा त्यांनी सहजतेने चालू ठेवली आहे. पण स्वत:ला ‘अस्सल भारतीय’ मानणाऱ्या रा. स्व. संघासारख्या संघटनेलादेखील पाश्चात्त्य वाद्यांच्या या सर्वव्यापी आवाक्यातून सुटता आलेलं नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे. हे त्यांच्या ‘श्रुंगघोष’ या सैनिकी बँडमध्ये दिसून येतं. या बँडची स्थापना १९२७ च्या सुमारास झाली. स्थापनेपासूनच त्यांच्या वाद्यसंचात वेगवेगळे ड्रम्स (लहान आणि मोठे), ब्युगूल, सिम्बल, ट्रायअँगल अशी अनेक प्रकारची पाश्चात्त्य वाद्ये आहेत. आणि अलीकडच्या काळात सॅक्सोफोन, क्लॅरिनेट, ट्रम्पेट ही वाद्येदेखील त्यांनी या वाद्यसंचात समाविष्ट करून घेतली आहेत. सांगीतिक सर्वसमावेशकतेचं हे अखंड दर्शन ‘देशीवादा’चा पुरस्कार करणाऱ्या रा. स्व. संघाच्या एकूण विचारधारेशी सुसंगत नाही; पण वैशिष्टय़पूर्ण मात्र निश्चितच आहे.

शब्दांकन- आनंद थत्ते