21 November 2019

News Flash

वो भूली दास्ताँ..

हिंदी चित्रपटगीतांच्या जगात गायक आणि संगीतकार यांच्या तुलनेत गीतकाराला फार महत्त्व दिलं जात नाही.

|| जयंत टिळक

अत्यंत साधे-सोपे, पण काळजाला भिडणारे अर्थपूर्ण शब्द, तरल भाव आणि काव्यातील उत्कटता ही वैशिष्टय़े असलेल्या ‘ये जिंदगी उसी की है’, ‘यूं हसरतों के दाग’, ‘तुम ही मेरे मंदिर, तुम ही मेरी पूजा’, ‘पल पल दिल के पास’, ‘इक चतुर नार’ अशी विविधढंगी गाणी देऊन रसिकांचे भावविश्व समृद्ध करणाऱ्या गीतकार राजेंद्र कृष्ण यांच्या जन्मशताब्दीची सांगता (६ जून) नुकतीच झाली. त्यानिमित्ताने..

हिंदी चित्रपटगीतांच्या जगात गायक आणि संगीतकार यांच्या तुलनेत गीतकाराला फार महत्त्व दिलं जात नाही. कारण बऱ्याचदा संगीतकाराने तयार केलेल्या चालीवरच गीते लिहिली जातात. अशा वेळी गाण्याची चाल, गाण्याचा मूड (भाव), मीटर (वृत्त) आणि सिच्युएशन (परिस्थिती) या चौकटीतच गीतकाराला शब्द भरायचे असतात, म्हणून असेल कदाचित! अर्थात हेही तेवढंच खरं, की प्रभावी चालीमुळेच गाणं हिट् होतं आणि शब्द लक्षात राहतात. याउलट, उत्तम शब्द, पण सुमार चाल असलेली गीतं मुळीच लक्षात राहत नाहीत. मात्र, आधी गीत लिहिले असेल तर ते जास्त परिणामकारक ठरते. कारण कवी त्यासाठी आपली सारी प्रतिभा पणाला लावत असतो आणि नंतर संगीतकाराची प्रतिभाही पणाला लागते.

हिंदी चित्रपट गीतकारांमध्ये सरळ सरळ दोन गट पडलेले दिसतात. एक उर्दूप्रचूर हिंदीत लिहिणारी शकील बदायूनी, हसरत जयपुरी, मजरुह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, इ. कवी मंडळी आणि दुसरीकडे शुद्ध हिंदीत गीतरचना करणारे शैलेन्द्र, राजेंद्र कृष्ण, नीरज, प्रदीप आणि आनंद बक्षी. गुलज़ार यांची कॅटेगरी आणखीनच निराळी! या पाश्र्वभूमीवर राजेंद्र कृष्ण या गीतकाराचं वैशिष्टय़ म्हणजे उर्दू शायरीचा अभ्यास करूनही त्यांनी गीतरचना करताना मात्र उर्दूचा अट्टहास टाळला. अत्यंत साधे-सोपे, पण काळजाला भिडणारे अर्थपूर्ण शब्द, तरल भाव आणि काव्यातील उत्कटता ही त्यांच्या गीतांची वैशिष्टय़े होती.

लहानपणीच कवितेशी त्यांची मत्री झाली. सिमला येथील अनेक कविसंमेलनांत त्यांची नियमित हजेरी असे. सुरुवातीच्या काळात ते ‘दर्द शिमलवी’ (सिमल्याचे रहिवासी असल्याने ‘शिमलवी’) या नावाने शायरी करत. उर्दूतील प्रख्यात शायर एहसान दानिश यांची शागिर्दी राजेंद्र कृष्ण यांनी स्वीकारल्यावर तर उर्दू शायरी त्यांच्या नसानसांतून वाहू लागली. हिंदी, उर्दू भाषेतील बारकावे जाणून घेण्यासाठी त्यांनी फिराक, पंत, निराला यांचे काव्यसंग्रह अभ्यासले. शायरीच्या वेडापायी ते सिमल्यातील सरकारी नोकरीवर लाथ मारून १९४२ मध्ये मायापुरी मुंबईत दाखल झाले. चित्रपट गीतकार बनण्याची स्वप्ने बघणाऱ्या राजेंद्रजींची पहिली चार वष्रे खूप कष्टाची गेली. त्यानंतर त्यांना ‘जनता’ नावाच्या चित्रपटाची पटकथा आणि दोन गीते लिहिण्याची संधी मिळाली. १९४७ मध्ये त्यांनी ‘जंजीर’ (अर्थात जुना!) चित्रपटाची काही गीते लिहिली. पण खऱ्या अर्थाने त्यांचे भाग्य उजळले ते १९४८ मध्ये. या वर्षी हुस्नलाल भगतराम यांच्याबरोबर ‘आज की रात’ आणि ‘प्यार की जीत’ असे दोन चित्रपट त्यांनी केले. ‘प्यार की जीत’मधील सुरैयाने गायलेल्या ‘तेरे ननों ने चोरी किया’ या गाण्याने त्यांच्या लोकप्रियतेचे नवे दालन उघडले. १९४८ मध्ये गांधीहत्या झाल्यावर त्यांच्यातल्या कवीने अस्वस्थ होऊन ‘सुनो सुनो ऐ दुनियावालो’ हे  गीत लिहिले. राजेंद्रजींचे प्रभावी शब्द, हुस्नलाल भगतराम यांचे संगीत आणि रफीसाहेबांचा बुलंद स्वर यामुळे हे गाणे सर्वदूर लोकप्रिय झाले आणि राजेंद्र कृष्ण यांचे नाव लोकांना माहीत झाले.

त्यापाठोपाठ १९४९ मध्ये हुस्नलाल भगतराम आणि राजेंद्र कृष्ण या जोडीने ‘बडी बहन’मध्ये ‘चले जाना नहीं नन मिला के’, ‘चुप चुप खडे हो जरूर कोई बात है’ आणि ‘जो दिल में खुशी बनकर आए’ अशी तीन हिट् गाणी दिली. शामसुंदर यांच्या संगीताने सजलेल्या ‘लाहोर’ चित्रपटातील ‘बहारें फिर भी आयेगी, मगर हम तुम जुदा होंगे’ हे भावपूर्ण गाणेही लोकांना अतिशय भावले.

मात्र, राजेंद्र कृष्ण यांच्या लेखणीचे सूर विशेष जुळले ते मदन मोहन आणि सी. रामचंद्र या दोन संगीतकारांशी. मदन मोहन यांच्यासाठी त्यांनी ‘पूजा के फूल’, ‘अदालत’, ‘मनमौजी’, ‘देख कबीरा रोया’, ‘आशियाना’, ‘चाचा जिंदाबाद’, ‘जेलर’, ‘जहाँ आरा’, ‘भाई भाई’, ‘गेटवे ऑफ इंडिया’ इ. चित्रपटांसाठी सुंदर गाणी लिहिली. तर सी. रामचंद्र यांच्यासाठी ‘आशा’, ‘आज़ाद’, ‘अमरदीप’, ‘समाधी’, ‘बारीश’, ‘अनारकली’, ‘शहनाई’, ‘अलबेला’ अशा अनेक चित्रपटांसाठी गाणी लिहिली.

‘आझाद’ या संगीतमय चित्रपटाची नऊ गीते राजेंद्र कृष्ण आणि सी. रामचंद्र यांनी एका रात्रीत तयार करून एक आगळा विक्रमच केला होता. त्याचं असं झालं.. ‘आझाद’च्या श्रीरामुलु नायडू या दक्षिण भारतीय निर्मात्याने या दोघांना मुंबईच्या धकाधकीच्या जीवनापासून जरा निवांतपणा मिळावा म्हणून गाणी तयार करण्यासाठी मद्रासला बोलावून घेऊन त्यांची उत्तम हॉटेलात व्यवस्था केली. मात्र, या दोघांनी महिनाभर गाणी तयार करण्याचे सोडून खाणेपिणे, भटकणे अशी नुसती धमाल केली. शेवटी गाणी देण्याचा दिवस अगदी ‘उद्या’वर येऊन ठेपला तेव्हा कुठे भानावर येऊन या दोघांनी एका रात्रीत नऊ गाणी तयार केली. पण एका रात्रीत केली म्हणून त्यांनी गाणी ‘पाडली’ असे मात्र झाले नाही. सर्वच गीते उत्तम व वैविध्यपूर्ण होती. ‘ना बोले ना बोले रे, ‘जा री जा री ओ कारी बदरिया’ ‘अपलम् चपलम्’, ‘कितनी जवां है रात कोई याद आ गया, ‘कितना हसीन है मौसम’, ‘देखो जी बहार आई’, ‘ओ बलिये बलिये, ‘कभी खामोश’ आणि ‘मरना भी है मुहब्बत में’ ही कव्वालीसुद्धा! हा एका रात्रीतला चमत्कार घडू शकला, याचं कारण दोघेही अलौकिक प्रतिभेचे धनी होते.

याच जोडीने ‘गोरे गोरे ओ बाँके छोरे’ (समाधी), ‘मेरे पिया गये रंगून’ (पतंगा), ‘इना मीना डिका’ (आशा), ‘भोली सूरत दिल के खोटे’, ‘शोला जो भडके’ (अलबेला) अशी अनेक धमाल गीते दिली. या गाण्यांच्या अनोख्या ठेक्यावर कित्येक पिढय़ा थिरकल्या. विशेषत: ‘शोला जो भडके’मधील भगवान आणि गीता बाली यांचे नृत्य हा जणू हिंदी चित्रपटातील नृत्याचा वस्तुपाठ बनला. ‘अलबेला’तली ‘धीरे से आजा री अंखियन में’ ही तर हिंदी चित्रपट संगीतातली सर्वोत्कृष्ट लोरी ठरावी.

‘अलबेला’, ‘आझाद’प्रमाणेच ‘अनारकली’ हाही या जोडीच्या सांगीतिक प्रवासातील मलाचा दगड. ‘अनारकली’तली सगळीच गाणी गाजली. विशेषत: ‘ये जिंदगी उसी की है’ या गीताने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. ‘अनारकली’- नंतर आलेल्या ‘मुघल-ए-आझम’ या याच विषयावरील चित्रपटात ‘ये जिंदगी उसी की है’च्या तोडीचं गाणं हवंच, असा आग्रहच के. आसिफने संगीतकार नौशादमियांकडे धरला होता. ‘अनारकली’तली हेमंतकुमार यांच्या धीरगंभीर आवाजातील ‘जाग दर्दे इश्क जाग’ आणि ‘जिंदगी प्यार की दो-चार घडी होती है’ तसेच ‘मोहोब्बत ऐसी धडकन है’ ही गाणीही खूप लोकप्रिय झाली. यात ‘जमाना ये समझा की हम पी के आये’ हे एक वेगळ्याच ढंगाचं गीत होतं. याच जोडीचे ‘शारदा’ चित्रपटातील ‘ओ चांद जहाँ वो जाये’ हे मीनाकुमारी आणि श्यामावर चित्रित झालेले आणि लतादीदी व आशाजींनी आपल्या वैशिष्टय़पूर्ण ढंगांत गायलेले सदाबहार गीत तर केवळ अविस्मरणीयच.

सी. रामचंद्र- राजेंद्र कृष्ण या जोडीप्रमाणेच मदन मोहन- राजेंद्र कृष्ण या जोडीनेही अनेक सुंदर गाणी रसिकांना बहाल केली. १९५२ मधील ‘आशियाना’ हा राज कपूर-नíगस यांच्या भूमिका असलेला त्यांचा पहिला म्युझिकल हिट् चित्रपट. यातील ‘मेरा करार ले जा’ आणि ‘मं पागल, मेरा मनवा पागल’ ही तलत महमूद यांनी गायलेली गीते लोकांना भावली. ‘भाई भाई’ (१९५६) मधील ‘ऐ दिल मुझे बता दे’ हे गीता दत्तच्या आवाजातले गाणे आजही लोकप्रिय आहे. तर ‘कदर जाने ना’ या अप्रतिम गीताने तर गजलसम्राज्ञी बेगम अख्तर यांचे मन जिंकून घेतले होते. ‘गेटवे ऑफ इंडिया’मधील ‘सपने में सजन से दो बाते, इक याद रही, इक भूल गए’ या गीताबद्दल काय बोलावे? किती तरल शब्द! याच चित्रपटातील ‘दो घडी वो जो पास आ बठे’ हे युगलगीतही खूप गोड आहे. ‘देख कबीरा रोया’ हा सुमधुर गीतांचा खजिना असलेला, पण सपशेल आपटलेला चित्रपट. पण यातील ‘कौन आया मेरे मन के द्वारे’ (मन्ना डे), ‘मेरी वीना तुम बिन रोये’, ‘तू प्यार करे या ठुकराये’ (दोन्ही लता) आणि ‘हमसे आया न गया’ हे तलत महमूद यांच्या मखमली आवाजातील गीत रसिकांनी पुन्हा पुन्हा ऐकले.

‘अदालत’मधील ‘यूं हसरतों के दाग’, ‘उनको ये शिकायत है’, ‘जाना था हम से दूर’ या लतादीदींच्या आवाजातील तीन गझला म्हणजे गानरसिकांना मेजवानीच. ‘यूं हसरतों के दाग’मधल्या पहिल्या अंतऱ्यात ‘घर से चले थे हम तो खुशी की तलाश में, गम राह में खडे थे वोही साथ हो लिए..’ असं ते सहज लिहून जातात. यातलं ‘जमीं से हमें आसमां पर’ हे रफी आणि आशा यांनी गायलेलं इतर गाण्यांपेक्षा खूप वेगळं युगुलगीतही लाजवाब. तसेच ‘जेलर’मधील ‘हम प्यार में जलनेवालों को’, ‘बहाना’मधील ‘बेरहम आसमां’ आणि यमन रागातील ‘जा रे बदरा बरी जा’, ‘चाचा िझदाबाद’मधील ‘बरन नींद न आये’, ‘पूजा के फूल’मधील ‘मेरी आँखो से कोई नींद’, ‘मनमौजी’तील ‘मं तो तुम संग नन मिला के’, ‘संजोग’मधील मुकेश यांनी गायलेले ‘भूली हुई यादों’ आणि ‘वो भूली दास्ताँ’ ही गीते म्हणजे राजेन्द्र कृष्ण आणि मदन मोहन या जोडीची अलौकिक कामगिरीच.

राजेंद्रजींनी अन्य संगीतकारांबरोबरही मोलाची कामगिरी केली आहे. हेमंतकुमार यांचं संगीत असलेल्या ‘नागीन’ चित्रपटातील क्ले व्हायोलिनच्या सुरांनी नादावलेले ‘मन डोले मेरा तन डोले रे’ तसेच ‘संगदिल’मधील सज्जाद हुसेन यांच्या संगीताने बहरलेली ‘ये हवा ये रात ये चांदनी’ आणि ‘दिल में समा गये सजन’ ही दोन गोड गाणी, हंसराज बहल यांच्यासाठी लिहिलेले ‘जहाँ डाल डाल पर सोने की चिडीया करती है बसेरा’ (सिकंदर-ए-आझम) हे जोशपूर्ण गीत, ‘ये खामोशियाँ ये तनहाईयाँ’ हे रवीच्या संगीताने बहरलेले मधुर युगुलगीत.. ही सगळी गाणी म्हणजे रसिकांसाठी अनमोल खजिनाच आहेत.

‘खानदान’ या तमिळ चित्रपटाचा रिमेक असलेल्या चित्रपटातील ‘तुम ही मेरी मंझिल, तुम ही मेरी पूजा’ हे लतादीदींच्या आवाजातलं गीत म्हणजे एखादी पत्नी आपल्या पतीवर किती पराकोटीचं प्रेम करू शकते याचं उत्तम उदाहरणच. अर्थात पडद्यावर ‘फरिश्ता’ या वर्णनाला साजेसा सुनील दत्त होता आणि त्यागाची व असीम प्रेमाची मूर्ती नूतनच्या रूपात होती. या उत्कट गीताला त्या वर्षीचा ‘फिल्मफेअर’ पुरस्कार न मिळता तरच नवल होतं. ही लौकिकार्थाने लोरी नाही, पण गाण्यातील उत्कट, पण शांतवणारे भाव आणि समर्पक, संथ चाल तिला लोरीचा दर्जा प्राप्त करून देतात. गंमत म्हणजे दुसऱ्या अंतऱ्यात ‘बहोत रात बीती, चलो मं सुला दूं, पवन छेडे सरगम, मं लोरी सुना दूँ’ अशा लोरीच्या ओळीही आहेत.

संगीतकार सलील चौधरी आणि राजेंद्रजी या जोडीनेही ‘उसने कहाँ था’, ‘झूला’, ‘प्रेमपत्र’, ‘छाया’ या चित्रपटांतून ‘आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे’, ‘एक समय पर दो बरसाते’, ‘दो अखियां झुकी झुकी’, ‘ये मेरे अंधेरे उजाले न होते’, ‘इतना ना मुझ से तू प्यार बढा’, ‘आँसू समझ के क्यूं मुझे’, ‘आँखों में मस्ती शराब की’ अशी अनेक सुंदर गीते रसिकांना दिली. ‘छाया’ चित्रपटासाठी मोझार्टच्या चाळिसाव्या सिंफनीवर आधारित सलिलदांनी एक धून रचली आणि त्यावर राजेन्द्रजींनी ‘इतना ना मुझसे तू प्यार बढा’ असे सुंदर, आशयपूर्ण आणि चपखल शब्द बसविले आणि हे सदाबहार युगुलगीत इथल्या मातीतलं होऊन गेलं.

बिमल रॉय यांच्या ‘प्रेमपत्र’मधलं ‘ये मेरे अंधेरे उजाले न होते’ हे या जोडीचं आणखी एक वैशिष्टय़पूर्ण गाणं. चित्रपटाचा नायक (शशी कपूर) अंध आहे. तो नायिकेला (साधना) म्हणतो, ‘तू माझ्या जीवनात आली नसतीस तर माझ्या जीवनात आनंदाच्या रोशनीऐवजी दु:खाचा काळोख पसरलेला असता. आता तुझ्या डोळ्यांनीच मी हे जग बघतोय.’ यावर नायिका हळव्या, कातर आवाजात त्याला उत्तर देते, ‘न जाने मेरा दिल ये क्यूं कह रहा है, तुम्हें खो न बठूं कहीं रोशनी में..’ वाह! क्या बात है. किती तरल शब्दरचना आणि सलिलदांनी तिला दिलेली अत्यंत सुंदर चाल. साथीला पियानोचे सूर आणि तलत-लता यांचे सुरेल, भावपूर्ण स्वर.

चित्रगुप्त यांच्या ‘भाभी’ या चित्रपटातलं ‘चल उड जा रे पंछी’ या गाण्याबद्दल काय बोलावं? संवेदनशील माणसाला अधिक संवेदनशील करणारं हे अप्रतिम गीत. या गाण्यात पक्ष्याचं रूपक वापरून राजेंद्रजी यांनी माणसाला किती छान संदेश दिला आहे. एखादी व्यक्ती प-प साठवून मोठय़ा कष्टाने आणि चिकाटीने घर बांधते. पण त्या घराचा उपभोग घेण्याचे तिच्या नशिबात असतेच असे नाही. पक्षीसुद्धा उन्हातान्हाची आणि पावसाची पर्वा न करता एकेक काडी जमवून घरटं बांधतात. राजेंद्रजी यावर सहज लिहून जातात.. ‘तू ने तिनका तिनका चुनकर नगरी एक बसायी.. बारीश में तेरी भीगी पाखें, धूप में गर्मी खायी.. गम ना कर जो तेरी मेहनत तेरे काम न आयी.. अच्छा है कुछ ले जाने से देकरही कुछ जाना.’ या जगात ‘आपलं’ असं काहीच नसतं. आपण फळाची, परिणामांची अपेक्षा न धरता आपलं कर्तव्य पार पाडत राहायचं- हा गीतेतला सिद्धान्तच त्यांनी सोप्या, पण परिणामकारक शब्दांत सांगितलेला आहे.

राजेंद्र कृष्ण यांनी गझल आणि हळुवार प्रेमगीतं लिहिली, तशीच राष्ट्रभक्तीपर गीतंही लिहिली. तसेच ‘प्यार किये जा’, ‘बॉम्बे टू गोवा’, ‘साधू और शैतान’सारख्या चित्रपटांसाठी धमाल गीतेही लिहिली. ‘पडोसन’मधील मेहमूद, सुनील दत्त, किशोरकुमार यांच्यावर चित्रित झालेले ‘एक चतुर नार’ हे धमाल गीत कोण विसरेल?

राजेंद्रजींना संगीतकाराने चाल ऐकवायचाच अवकाश; काही मिनिटांतच त्यांची लेखणी झरझर चालू लागे आणि प्रसंगाला व चालीला साजेसं सुंदरसं गाणं आकाराला येई. जणू ते शब्द राजेंद्रजींच्या लेखणीतून उमटण्याची वाटच बघत असावेत. प्रसंगी कागद हाताशी नसल्यास सिगरेटच्या खोक्याच्या आतल्या बाजूवरही ते गाणं लिहीत.

राजेंद्र कृष्ण हे उत्तम गीतकार तर होतेच, पण ते उत्कृष्ट कथा, पटकथाकार व संवादलेखकही होते. दक्षिणेकडल्या अनेक कौटुंबिक चित्रपटांच्या कथा व संवाद त्यांचेच होते. त्यांच्या एका शब्दासरशी तिथले निर्माते कोणाही संगीतकाराला करारबद्ध करीत, एवढा त्यांना तिथे मान होता. राजेंद्र कृष्ण यांनी एकूण ६९ चित्रपटांसाठी गीते लिहिली. तर ‘नया दिन, नयी रात’, ‘ज्वार भाटा’, ‘बॉम्बे टू गोवा’, ‘शहजादा’, ‘मनमंदिर’, ‘सच्चाई’, ‘वारीस’, ‘खानदान’, ‘पूजा के फूल’, ‘मनमौजी’, ‘छाया’, ‘भाई भाई’, ‘नागीन’ अशा अनेक चित्रपटांचे संवादही लिहिले. महमूदच्या ‘पडोसन’च्या गाण्यांबरोबरच पटकथा आणि संवादही राजेंद्र कृष्ण यांनीच लिहिले आहेत.

जाता जाता.. साहिर, मजरुह, आनंद बक्षी, गुलजार यांच्या गाण्यांवर आधारित बक्कळ कार्यक्रम मुंबई-पुण्यात नेहमी होत असतात. राजेंद्र कृष्ण यांच्या विविधरंगी गाण्यांवर आधारित कार्यक्रम करण्याचे कुणी का मनावर घेत नाही याचं मला सखेद आश्चर्य वाटतं.

jayant.tilak@gmail.com

First Published on June 9, 2019 12:11 am

Web Title: indian poet rajendra krishan jayant tilak
Just Now!
X