दूध का नासतं?
दुधात आणि हवेतही प्रचंड सूक्ष्मजीव असतात. अगदी तुमच्या हातावरसुद्धा लाखो सूक्ष्मजीव असतील. तर हे छोटे जीव दुधातल्या घटकांचं विघटन करून स्वत:चा खाऊ तयार करतात. म्हणजे समजा, दुधात एक प्रकारची साखर असेल तर तिचं काही प्रकारच्या आम्लांमध्ये रूपांतर करतात. या सगळ्या प्रक्रियेमुळे दूध नासतं. दूध फ्रीजमध्ये ठेवलं की, थंड वातावरणामुळे या छोटय़ा जिवांना फार काही करता येत नाही. त्यामुळे फ्रीजमध्ये दूध टिकतं.

उंचावर गेल्यावर गार का वाटतं?
आपल्याला गरम होतं त्याचं कारण म्हणजे सूर्याच्या किरणांमुळं जमीन तापते आणि मग तिच्या जवळची हवा तापत जाते आणि आपल्याला गरम वाटतं. सूर्यकिरणांमुळे हवा तेवढी तापत नसते. त्यामुळं आपण मग जमिनीपासून जसजसे वर जाऊ तसतसं आपल्याला गार वाटायला लागतं. शिवाय जसजसं वर जाऊ तसतशी हवाही विरळ व्हायला लागते. त्यामुळं खालून आलेला जो तापलेपणा असतो तो वपर्यंत जायला वेळ लागतो, त्यामुळेसुद्धा गार वाटतं.

आकाश निळं का दिसतं?
खरं तर आकाशाला कुठला रंगच नसतो. आपल्याला हा रंग दिसतो तो असतो सूर्याचा. सूर्याचे किरण वातावरणातून आपल्यापर्यंत येतात. वातावरण म्हणजे आपल्या पृथ्वीभोवतीचं आवरण असतं. त्या आवरणात या किरणांमधले बाकीचे रंग शोषले जातात आणि निळा रंग आपल्यापर्यंत पोचतो. पण हे सगळे किरण असतात ते आपल्याबरोबर डोक्यावर आहेत का, तिरके येतात किंवा इतर गोष्टींवरसुद्धा हा रंग ठरत असतो. त्यामुळं कधीकधी आपल्याला हेच आकाश तांबूस किंवा इतर वेगळ्या रंगांचंसुध्दा दिसतं.

पक्ष्यांचे पाय वेगवेगळे का असतात?
पक्षी आपल्या पायांचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करतात. जसा त्यांचा उपयोग तसे त्यांचे पाय. आता बदकाला पाण्यात पोहायचं असतं म्हणून त्याच्या पायांना निसर्गानं पडदे दिलेत.
काही पक्ष्यांचे पाय मजबूत असतात, कारण त्यांना त्यांचं भक्ष्य पायांत पकडायचं असतं. बरेच पक्षी झाडावर झोपतात. त्यामुळं झाडांवरून पडू नये यासाठीही त्यांच्या पायांची रचना तशी असते. चालणाऱ्या पक्ष्यांच्या पायांची रचना आणखी वेगळी असते.

माठात पाणी गार का होतं?
माठ मातीने तयार केलेला असतो. या माठाला अगदी बारीक बारीक छिद्रं असतात. या छिद्रांतून हळूहळू पाणी झिरपत असतं. बाहेर आलेलं पाणी असतं त्याचं बाष्पीभवन होतं. त्यासाठी ते माठातील उष्णता शोषून घेतं. त्यामुळे आतलं पाणी गार होतं आणि आपल्याला मिळतं गार आणि चवदार पाणी.

मासे श्वास घेतात का?
ऑक्सिजन म्हणजे प्राणवायूच असतो. आपल्याला लागतो तसा माशांनाही ऑक्सिजन लागतो. ते आपल्यासारखा नाकातून श्वास घेत नाहीत. पण देवानं त्यांना छोटे छोटे कल्ले दिलेत. त्यांचा ते वापर करतात. या कल्ल्यांमधून पाणी आत जातं. त्या पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन त्यांच्या रक्तामध्ये शोषला जातो आणि ते पाणी पुन्हा बाहेर पडतं. जेव्हा पाणी खूप दूषित असतं, तेव्हा त्यातलं ऑक्सिजनचं प्रमाण खूप कमी झालेलं असतं. त्या पाण्यात मासे जगत नाहीत.