‘पीहळद नि हो गोरी’, ‘तूप खाल्ल्यावर लगेच काही रूप येत नसतं’ अनेकदा या म्हणींचा प्रत्यय आपल्या सभोवतालची माणसं मधूनमधून देतच असतात. आता तर ‘इन्स्टंट’चा जमाना आहे. टाकला मेसेज व्हॉट्स अ‍ॅपवर की पोचला अमेरिकेत! आता इथे मी काय करतोय त्याचं शूटिंगसुद्धा लगेच जगाच्या दुसऱ्या कानाकोपऱ्यातील माझा नातलग बघू शकतो. ‘टू मिनिट्स, मॅगी नूडल्स’, अक्षरश: दोन मिनिटांत नूडल्सच नाही अगदी मेदूवडा, उपमा वगरे ‘रेडी टू मेक’ पॅकेट्समधून तयार होत असतात. विशेषत: गेल्या २० वर्षांत इन्स्टंटचा प्रादुर्भाव फारच झपाटय़ााने पसरू लागला आहे. त्यामुळे सर्वच गोष्टी (यश, ध्येयप्राप्ती) पटापट मिळाव्यात ही अपेक्षा (अट्टहास?) वाढलेली दिसते.
परवा माझ्याकडे एक तरुणी आली होती सल्ल्यासाठी. अस्मिता तिचं नाव, साधारण २३-२४ वर्षांची होती. इंजिनीअर झाली होती. लगेच तिला कॅम्पस इंटरव्ह्यूमधून नोकरीची संधी चालत आली होती. चांगल्या पगाराची, चांगल्या कंपनीतील नोकरी! आईवडिलांना तर खूप आनंद झाला होता. तिच्या प्रगतीबाबत ते अगदी समाधानी होते. ‘डॉक्टर, अहो मला आता जेवढा पगार आहे तेवढा अस्मिताला सुरुवातीपासूनच मिळतोय, त्यामुळे मला तर खूप समाधान आहे. पण तिलाच काय झालंय, समजत नाही.’
मग मी अस्मिताकडे वळलो. तिचे बाबा बाहेर जाऊन बसले. ‘बोल अस्मिता, तू का नाखूश आहेस? नोकरी का सोडायचा विचार करत्येस?’
‘डॉक्टर, माझं स्वप्न खूप वेगळं आहे आणि इथे पगारही कमी आहे. मला काही हा जॉब पसंत नाही. पण मी आईबाबांना दुखवूही शकत नाही. खरं तर मी जॉबला जातच नाही. मी अमेरिकन लायब्ररीमध्ये जाऊन वाचत बसते, नेटवर बसते, असा वेळ घालवते. मला छोटय़ा पायऱ्यांवर किंवा खालच्या पायरीवर अडकून पडायचं नाही. मला वरच्या स्थानावर लवकरात लवकर पोहोचायचंय. सुरुवातीला मी गेलेही कसंबसं. सकाळी उठावंसं वाटायचं नाही, उठले तरी काही जावंसं वाटायचं नाही. भूकही नाही लागायची, काहीही न खाता मी निघायचे. छातीत धडधड व्हायची. म्हणून मी हा अमेरिकन लायब्ररीचा पर्याय निवडलाय.
‘अगं पण तुझ्या आईवडिलांना उद्या हे कळेलच कधी तरी मग त्यांना किती धक्का बसेल?’
‘डॉक्टर, मला कळतंय, पण काय करू काही समजत नाही हो.’
अस्मिताचं स्वप्न तिला अगतिक करत होतं की, अस्मिताचा एकूण दृष्टिकोन तिला अगतिक करत होता?
मध्यंतरी एकदा माझ्याकडे निनाद आला होता. चांगला उंचपुरा, देखणा मुलगा, बरोबर सगळी अत्याधुनिक गॅझेट्स. पण त्याच्या देहबोलीत तो रुबाब नव्हता.
त्याचा चेहराही मलूल होता.
‘निनाद अरे काय झालं? काय होतंय तुला?’
‘डॉक्टर, मी खूप निराश झालोय. काय करावं काही कळतच नाही. डॉक्टर, मी एवढा इंजिनीअर झालो, मॅनेजमेंटची डीग्री घेतली. पण जॉब येतात ते सगळे कमी पगाराचेच. त्यामुळे गेलं वर्षभर नुसते अ‍ॅप्लिकेशन, इंटरव्ह्यू देतोय. पण काही मनासारखा जॉब मिळत नाही. आता एक-दीड वर्षांची गॅप झाली. त्यामुळे आणखीनच प्रॉब्लेम झालाय जॉब मिळण्यात. घरी आईबाबा आता माझ्याशी बोलत नाहीत. मी सगळे जॉब घालवतो त्यामुळे ते चिडले आहेत माझ्यावर.’
‘मलासुद्धा काही सुचत नाहीए. नुसता घरात बसून राहतो. कारण मित्रही त्यांच्या कामात असतात. कोणाची तर लग्नंही झालीयेत. काही वेळा तर झोपसुद्धा येत नाही. काय करावं काही कळत नाही. पण एवढा शिकलेला असूनसुद्धा एवढं कमी पगाराचं काम स्वीकारणं पटतच नाही. पण माझी इतर स्वप्नंसुद्धा त्यामुळे माझ्यापासून दूर पळतायेत हे कळूनसुद्धा काही करू शकत नाही.’
निनादसुद्धा त्याच्या स्वप्नातील जॉब शोधत बसला होता. तो मिळत नव्हता. त्यामुळे नराश्याच्या गत्रेत ढकलला जात होता. थोडक्यात काय, दोघांनाही वाटत होतं माझं स्वप्न इन्स्टंटली पूर्ण व्हावं. माझं स्वप्न मी माझ्या ब्लॉगवर टाकलं की, लगेचच पूर्ण व्हायलाच पाहिजे असा त्यांचा अट्टहास होता. स्वप्नं प्रत्येकजणच बघत असतो. पण सगळीच स्वप्नं पूर्ण होतात असं नाही. किंवा स्वप्नांऐवजी ध्येय म्हटलं तरी ध्येयापर्यंत काही ‘इन्स्टंटली’ पोहोचता येत नाही. ध्येयापर्यंत जाणाऱ्या शिडीची प्रत्येक पायरी चढतच जावं लागतं. आपल्याला पंख नाहीत त्यामुळे खालून ध्येयापर्यंत उडी मारून चालत नाही. नाहीतर आपणच जखमी होऊ. जसं निनाद, अस्मिताचं झालं होतं.
स्वप्नं लगेच पूर्ण होण्याचा त्यांचा ‘अविवेकी’ अट्टहास त्यांना नराश्याकडे, वैफल्याकडे नेत होता. त्या नकारात्मक अविवेकी भावना निर्माण करत होता. त्या नकारात्मक अविवेकी भावनेतून अस्मिताकडून तर नकारात्मक अविवेकी वागणं (खोटं बोलणं) होत होतं. याला कारण माझ्या निर्णयाने कोणीच दुखावताच कामा नये हा तिचा अविवेकही होताच.
स्वप्नं बघणं चुकीचं नाही, पण स्वप्नपूर्ती किंवा ध्येयपूर्ती ही काही आपोआप होत नाही. त्यासाठी छोटय़ा  छोटय़ा पायऱ्यांनीच वर जावं लागतं. काही वेळा त्यात अडथळेही येतात. ते पार करून पुढे जावं लागतं. या सर्वाची तयारी ठेवावी लागते. मोठी स्वप्नं बघणाऱ्यांना तर ती अडथळ्यांची शर्यतच असते. शिवाजी महाराजांनी, जिजाबाईंनी िहदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं किंवा ध्येय ठेवलं ते पूर्ण करण्यासाठी किती अग्निदिव्यातून त्यांना जावं लागलं हा इतिहास सर्वश्रुत आहे. स्वातंत्र्याच्या ध्येयाबाबतही हेच म्हणता येईल. त्यामुळे ध्येय ठेवताना, स्वप्नं बघताना छोटय़ा छोटय़ा पायऱ्यांवरूनच वर जाण्याचा ‘विवेकी’ प्रवास मान्य करावा तर अविवेकी विरूप भावना निर्माण होणार नाहीत. प्रवास जास्त आश्वासक होईल. ध्येयापर्यंतच्या प्रवासात अपयशाचीही तयारी ठेवावी वा कमी यशाची तयारी ठेवावी तर हा विवेकी विचार तुम्हाला जिद्द देईल.
ज्येष्ठ तत्त्वज्ञ व्हाइस रॉ यांनी एके ठिकाणी म्हटलंय की, ‘आजचं यश आणि आजचं अपयश म्हणजे आयुष्याच्या प्रदीर्घ प्रवासातलं केवळ एक पाऊल आहे. अपयश कधी अंतिम नसतं व यश शाश्वत नसतं. आयुष्य हा एक खेळ आहे. तुम्ही जर पुरेसा वेळ खेळत राहिलात तर तुम्ही जिंकाल. मध्येच सोडून देऊ नका. शेवटपर्यंत पुरेशा अवधीपर्यंत खेळा. बघता बघता तुम्ही फिनििशग लाइन ओलांडून जाल.’
तेव्हा आयुष्याच्या प्रवासात इन्स्टंट काही नसतं, वाट पाहावी लागते. ध्येयप्राप्तीसाठी विवेकपूर्ण दृष्टिकोन, नियोजनबद्ध प्रयत्न, पायऱ्यापायऱ्यांनी पोचण्याची चिकाटी, मेहनत यांचा मिलाफ आपल्याला यशापर्यंत नेऊ शकतो!