लिहायला लागल्यापासून मला एक प्रश्न हमखास विचारला जातो, ‘गुलजारजी, आप ये नज्म वगैरा कैसे लिखते है?’ अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर या प्रश्नाचं उत्तर कोणालाच देता येणार नाही. कविता सुचण्याचा कोणताही एक क्षण सांगता येत नाही. ती एक प्रक्रिया आहे. आयुष्य जगत असताना तुम्ही अनेक lr07माध्यमं पडताळून बघत असता. एक वेळ अशी होती, की कदाचित संगीत हेच माझं सर्वस्व झालं असतं. घरात रेडिओवर आम्ही गाणी ऐकायचो. आमच्या गल्लीतही कव्वाली ऐकायचो. पण घरून नेहमीच याला मज्जाव होता. संगीत, गाणंबजावणं वगैरेचा काही उपयोग नाही, हे काम बेकार लोकांचं आहे, असं आम्हाला ऐकवलं जायचं. तरी ही आवड काही कमी झाली नाही. मग मी अशी एक गोष्ट शोधली, जी आपण करू शकतो, परंतु घरच्यांना ती कळणार नाही! ती म्हणजे कविता! लहानपणी शाळेत मौलवीसाहेब आम्हाला अंताक्षरी खेळायला सांगत. आमच्याकडे त्याला ‘बैतबाजी’ म्हणायचे. एखाद्या शेरचा शेवटचा शब्द पकडून त्यापासून दुसरा शेर म्हणायचा. त्यात आम्ही बेइमानी करायचो. ‘जिंदगी उसीका नाम है’ वगैरे शेर असेल आणि आम्हाला ‘य’ अक्षर आलं असेल तर आम्ही ‘ये जिंदगी उसीका नाम है’ वगैरे सुरू करायचो. मौलवीसाहेब आम्हाला पक्के पकडायचे. यातून मग स्वत:च शेर तयार करायची सवय लागली. हळूहळू मी शेर रचू लागलो. कधीतरी कुणीतरी आपण रचलेल्या ओळींची तारीफ केली की lr03मूठभर मांस चढायचं. तिथून मग आपल्यालाही लिहिता येतं, शेर रचता येतात हा विश्वास वाटू लागला. माझा गुरू गालिब तिथेच भेटला.
आणि याच काळात कधीतरी टागोर भेटले. अर्थात पुस्तकांमधूनच! टागोरांची भेट, त्यांचं साहित्य व त्यांच्या कवितांचं माझ्या आयुष्यात येणं हा माझ्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी देणारा क्षण होता. त्या वयात मला रहस्यकथा खूप आवडत. मला आठवतं, त्यावेळी अनेक स्थलांतरीत लोक आमच्या मोहल्ल्यात काहीबाही विकायला येत. त्यात एक पेपरविक्रेताही आपला ठेला मांडून बसायचा. त्याच्याकडे काही पुस्तकंही होती. चार आण्यांत आठवडय़ासाठी पुस्तक घेऊन जाण्याची तिथे मुभा होती. रहस्यकथेची पुस्तकं मी रात्रभर वाचून दुसऱ्या दिवशी त्या माणसाला परत करायला जायचो. तो एक दिवस माझ्यावर वैतागला. म्हणाला, ‘चार आण्यात किती पुस्तकं वाचणार?,’ आणि पुस्तकांच्या थप्पीतून वरचं एक पुस्तक काढून त्यानं माझ्या हातावर टेकवलं. त्या माणसाला कल्पनाही नसेल, की त्याने माझ्या हातात ठेवलेलं ते पुस्तक माझं सगळं आयुष्य बदलणार आहे! ते पुस्तक होतं रवींद्रनाथ टागोरांचं ‘गार्डनर’! त्यानंतर मी त्या माणसाकडून अनेक पुस्तकं घेतली. पण हे पुस्तक मात्र माझ्याकडेच ठेवलं. बेइमानीची ती सुरुवात होती. टागोरांची अनेक पुस्तकं त्या काळात मी वाचली. त्यानं माझ्या वाचनाची दिशा आणि आवडही बदलली. मग ठरवलं- टागोर बंगालीतून वाचून काढायचे. बंगाली दोस्त जमवले. त्यांची भाषा आवडायला लागली. यानंतरच कविता हे माध्यम माझ्या हाती आलं.
बंगाली संस्कृतीचं वैशिष्टय़ म्हणजे टागोर हा माणूस सबंध बंगालची संस्कृती बनून राहिला आहे. त्यांची गाणी, कविता, संगीत लहानथोरांना मुखोद्गत असतं. मुलांच्या शिक्षणाची सुरुवातच टागोरांच्या सहजपाठानं होते. एक माणूस समस्त मनुष्यसमूहाची संस्कृती बनून राहिल्याचं दुसरं उदाहरण माझ्या तरी पाहण्यात नाही. टागोरांच्या चोरलेल्या पुस्तकापासून सुरू झालेला माझा प्रवास आता त्यांच्या काही lr02कवितांच्या भाषांतरापर्यंत पोहोचला आहे. टागोरांच्या कवितांचं मी केलेलं भाषांतर आता पुस्तकरूपात येत आहे. टागोरांनी बंगाली मुलांसाठी लिहिलेले छोटे छोटे धडे, गाणी मी हिंदीत आणत आहे. टागोर भेटले नसते तर मी कवी झालो नसतो. आणि कवी झालो नसतो, तर मी काहीच बनू शकलो नसतो.
कवितेत वाच्यार्थापेक्षा बरंच अधिक काही अनुस्यूत असतं. ‘हात छुटे भी तो रिश्तें नहीं तोडा करतें’ असं काही मी लिहून जातो तेव्हा ती ओळ तुम्ही एका नात्याला लागू करून बघा, किंवा मग पाकिस्तानला उद्देशून.. तिचा अर्थ बदलत जातो. एका खासगी क्षणाबद्दल लिहिलेल्या कवितेला हे असं अस्तर जोडलं तर तिचा पैसच बदलतो.
लेखकाच्या आयुष्यात एक वेळ अशीही येते, की तुम्ही फक्त लिहायचं म्हणून लिहिता. तुम्हाला लिहिण्याचं तंत्र माहीत असतं. तुमच्याकडे शब्द असतात, पण भावना नसतात. काही सांगण्याची प्रबळ ऊर्मी नसते. त्यातून मग लेखनात एक प्रकारचं साचलेपण येत जातं. आज बऱ्याच चित्रपटांच्या बाबतीत हेच अनुभवायला मिळतं. त्यांच्याकडे तंत्र चांगलं आहे, पण सांगायला काहीच नाही. एखादी गोष्ट उत्स्फूर्तपणे तुमच्या हातून लिहिली जाते तेव्हा तुम्हीही चकित होता. तो क्षण साक्षात्काराचा असतो. तुम्ही जे वाचता, अनुभवता, पाहता ते तुमच्यात मुरत जातं आणि त्यातलं काही नकळत नेणिवेच्या कप्प्यात साठवलं जातं. आणि एखाद्या निर्मितीच्या क्षणी त्यातलं बरंच काही तुमच्या समोर येऊन उभं ठाकतं. त्यातलं काय घेऊ अन् काय नको अशा संभ्रमात असताना त्या सगळ्याच्या पलीकडचं काहीतरी तुमच्या लेखणीतून झरझर उतरत जातं. तो क्षण अस्सल निर्मितीचा असतो. आणि ते तुम्हाला जाणवतंही. त्यावर तुमची मोहोर असते. माझ्या ‘त्रिवेणी’ या काव्यप्रकाराचा जन्मही असाच झाला. रेघोटय़ा मारताना एखाद्या रेघोटीला दुसरीने छेद दिला तर वेगळंच काहीतरी समोर येतं. तिला आणखी एका रेघोटीने छेद दिला तर आधी दिसलेल्या प्रतिमेपेक्षा वेगळीच प्रतिमा डोळ्यांसमोर तरळायला लागते, ती त्रिवेणी! एका शेरच्या दोन ओळी लिहिल्यावर आणखी काहीतरी वेगळं ध्वनित करावंसं वाटतं. त्या दोघांमध्ये दडलेली एक तिसरी ओळ दिसायला लागते. ती नसली तरीही त्या दोन ओळींमुळे शेर पूर्ण होतो, हे खरं. पण ती ओळ त्या दोन ओळींच्या खाली लिहिली की पहिल्या दोन ओळींमधून ध्वनित होणारा अर्थ बदलून जातो. कवितेचा हा फॉर्म मला भावला. त्यावर काम करत गेलो आणि त्रिवेणी सुचत गेल्या. हे नाव ठेवताना माझ्या मनात गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा विचार होता. जमिनीवरून वाहणाऱ्या गंगा आणि यमुना दिसतात, पण सरस्वती दिसत नाही. ती गुप्तपणे वाहत असते. ती सरस्वती दाखवा, म्हणजे आपोआप त्रिवेणी बनेल!
यादरम्यान मराठी साहित्याचा परिचय झाला. मराठीचं वाचन नव्हतं, पण ऐकायचो भरपूर. पुलं बा. भ. बोरकर, मर्ढेकरांच्या कवितांच्या वाचनाचे कार्यक्रम करायचे. ते मी ऐकलेत. त्याचवेळी विकास देसाई यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. तत्पूर्वी मराठीची ओळख झाली होती. तुम्ही ज्या प्रदेशात राहता त्या प्रदेशातील हवेत, अन्नात, पाण्यात, एवढंच नव्हे तर सबंध भवतालात त्या प्रदेशाची संस्कृती असतेच असते. ती आत्मसात करण्यासाठी कष्ट घ्यावे लागत नाहीत. ती आपोआप तुमच्या रक्तात भिनत जाते. मी इतकी र्वष मुंबईत राहतोय. सबंध महाराष्ट्र फिरलो आहे. हे सगळं करता करता मी इथल्या साहित्यिक-सांस्कृतिक वातावरणाशी जोडला गेलो. या प्रवासात एके दिवशी एक तरुण माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘मला तुम्हाला भेटायचंय.’ मी त्याला सकाळी आठ वाजताची वेळ दिली. एके सकाळी आठ वाजता तो माझ्या घरात आला आणि मग घरचाच झाला. त्याचं नाव अरुण शेवते! शेवतेंशी होणाऱ्या गप्पांमधून मराठी कविता अधिक जवळ येत गेली. त्यांच्या ‘ऋतुरंग’साठी मी मराठीतल्या काही कवितांचा अनुवाद केला. या मातीचं आपणही देणं लागतो, ही भावना त्यात होती. त्यातूनच काही मराठी कविता उर्दू व हिंदीत अनुवादित करण्याची कल्पना सुचली. माझ्याही कथा-कविता मराठीत आल्या. अंबरिश मिश्र यांनी त्यासाठी बरीच मेहनत घेतली.
मी देशभरात खूप फिरतो. पार पूर्वाचलापासून कन्याकुमारीपर्यंत. दक्षिणेला जायचं असेल तर पुण्यात पीएलसाहेबांचं दर्शन आणि उत्तरेला जायचं असेल तर नाशकात कुसुमाग्रजांची भेट ठरलेलीच. त्यांच्याकडून खूप मिळालं. त्यातूनच कुसुमाग्रजांच्या कवितांचा अनुवाद करायला घेतला. त्यासाठी पुन्हा अरुण शेवतेंचीच मदत झाली. लिपी वाचता यायची, पण शब्दांचे अर्थ व भाव कळत नसे. म्हणून मग मराठी मित्रमंडळींना पकडून त्यांच्याकडून ते समजून घेऊ लागलो. पण एक वेळ अशी आली, की माझे मित्र मला घाबरू लागले. माझ्याकडे यायचं टाळू लागले. कोण जाणे, गुलजार कविता वाचायला बसवेल अशी भीती त्यांना वाटत असे. त्यावेळी अमृता सुभाष आणि अमोल पालेकर यांनी मला खूप मदत केली. अमृता तर हिंदी आणि इंग्रजी भाषेतच नाही, तर हातवारे व हावभावांतूनही कविता  समजावून द्यायची. हळूहळू माझी भीड चेपली आणि पहिल्यांदा मी पुण्यात कुसुमाग्रजांच्या कवितांवरचा कार्यक्रम केला. पुण्यात जवळपास प्रत्येकाला कुसुमाग्रज पाठ असल्याने तिथे पावती मिळणं, हे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. तो कार्यक्रम चांगला झाला आणि मला आत्मविश्वास मिळाला.
विंदा करंदीकरांच्या कविता त्यांच्याच तोंडून ऐकण्याची संधी मला एकदा मिळाली. सुरतमध्ये त्यांचा कार्यक्रम होता. ती एक वेगळीच अनुभूती होती. सुरतमधल्या एका हॉलमध्ये ते काव्यवाचन करत होते आणि अचानक वीज गेली. त्यामुळे ध्वनिक्षेपक बंद पडला. पण विंदा थांबले नाहीत. त्यांनी आपल्या कवितांची वही बाजूला सारून मुखोद्गत कविता त्याच लयीत सुरू ठेवल्या. त्यानंतर कुणीतरी पेट्रोमॅक्स आणले. त्यांच्याजवळ ठेवले. पण तोवर सभागृहातील एकही श्रोता जागचा हलला नव्हता वा रसभंग झाल्यानं अस्फुटसा उद्गारही कुणी काढला नाही. अंधारात सगळेजण विंदांच्या कविता शांतपणे ऐकत होते. थोडय़ा वेळाने वीज आली आणि ध्वनिक्षेपकही सुरू झाला. पण विजेच्या जाण्याने ना विंदांच्या काव्यवाचनात खंड पडला, ना प्रेक्षकांच्या तन्मयतेत! तो एक विलक्षण अनुभव होता.  
दरम्यान, दिलीप चित्रे यांच्याशी  माझी ओळख झाली. ते मराठी कविता मला इंग्रजीत उत्तम प्रकारे अनुवादित करत ऐकवत. अनेकदा तर कवितेचा अर्थ सांगताना ते मूळ कवितेपासून खूपच लांब निघून जात. कवितेवर बोलता बोलता एक वेगळीच कविता जन्माला यायची. न्यूयॉर्कमध्ये भाषा संमेलनासाठी आम्ही गेलो होतो. भारतीय विद्या भवनात उतरलो होतो. रोज तोच तो नाश्ता खाऊन  विटलो होतो. त्यात तो अमेरिकन नाश्ता! मग मी दिलीपदांना सोबत घेऊन बाहेर पडायचो. न्यूयॉर्कमधील रेस्तराँ पालथी घालत चमचमीत नॉन-व्हेज जेवण आणि शराब कुठे मिळेल, याचा शोध घेत फिरायचो. आणि मग गप्पांची मैफल जी रंगायची.. अशावेळीच तुम्हाला काही मिळत जातं.
याच टप्प्यावर कधीतरी ग्रेस आणि नामदेव ढसाळ भेटले. त्यांच्या कवितांमधली खोली आणि गहिरेपण मला भावतं. ग्रेस यांच्याबरोबरची शेवटची भेट माझ्या मनावर कायम कोरली गेली आहे. त्यांना भेटलो तेव्हा माहीत होतं की, आपला हा मित्र मैफल अध्र्यात सोडून अनंताच्या प्रवासाला जाणार आहे. पुण्यातील दीनानाथ हॉस्पिटलमधली ती खोली अजूनही डोळ्यांसमोर दिसते. ग्रेस झोपले होते. मला पाहताच उठून बसले. डॉक्टरांचा गराडा आजूबाजूला होता. खूप वेळ बोलत होतो आम्ही दोघं. बोलताना त्यांना त्रास होतोय हे जाणवत होतं. पण तुम्ही उठून तरी कसं जाणार? तेही हे माहीत असताना- की कदाचित उद्या, कदाचित आज किंवा पुढल्या क्षणीही ते आपल्यात नसणार आहेत. अशा वेळी अलविदा तरी कसं म्हणणार? दोघं एकमेकांचे हात घट्ट पकडून बसलो होतो. तो क्षण लांबवण्याचा प्रयत्न करत होतो. डॉक्टर आजूबाजूला होते आणि त्यांना  ‘आता आराम करा..’ असं खुणावत होते. शेवटी ग्रेसनीच समजूतदारपणा दाखवत हाताची पकड सैल केली. पण ती करता करता म्हणाले, ‘पुढल्या वेळी एक कविता घेऊन या..’‘तलवारों पर बिछा रख्खा हैं..’ हे त्यांचं शेवटचं वाक्य!
माझ्या कविता वाचणाऱ्यांमध्ये किंवा माझ्या कविता लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्यांमध्ये सगळ्यात पहिला क्रमांक लागतो, तो माझे जिगरी दोस्त संजीव कुमार आणि पंचम यांचा! ते माझ्या कवितांचे ‘अँकर’ होते. माझ्या हातात असतं तर सगळ्याच चित्रपटांत मी या दोघांबरोबर काम केलं असतं.  सध्या विशाल भारद्वाज माझ्या गाण्यांना आणि कवितांना खूप छान प्रकारे पोहोचवतो. पंचमची जागा त्याने घेतली आहे. काव्यवाचनात नसीर आणि टॉम ऑल्टरला तोड नाही. मराठीत सौमित्र हे चोखपणे करतो. खूप नाटय़पूर्ण असतं त्याचं काव्यवाचन!   मला नेहमी विचारलं जातं की, तुम्ही प्रत्येक पिढीला आपलेसे का वाटता? याचं रहस्य काय? खरं तर हा प्रश्न आजच्या तरुणांनाच विचारायला हवा. खरं तर याची मलाही उत्सुकता आहे. मला कसं कळणार, की त्यांना माझ्या कवितांमधलं, माझ्या गाण्यांमधलं नेमकं काय भावतं? मी त्यांना आवडतो, हा त्यांचा चांगुलपणा आहे. खरं सांगायचं तर मी जसा आहे तसाच मी लोकांसमोर जातो. मी भूतकाळाचं ओझं बाळगत नाही, किंवा कोणत्याही संदेशाची पोतडी सोबत घेऊन फिरत नाही. तुम्ही स्वत:शी प्रामाणिक असलात तर इतरांशीही तसेच राहाल. मी तसा जगत आलोय. कदाचित त्यामुळेच प्रत्येक पिढीबरोबर मी ‘कनेक्ट’ होऊ शकत असेन. लहान मुलांबरोबर मी कधीच त्यांचा ‘चाचा’ किंवा ‘दादा, नाना’ म्हणून वागत नाही. त्यांच्याबरोबर मीही लहान मूल बनतो. तर माझ्याहून ज्येष्ठ असलेल्यांना विनम्र होऊन पाया पडतानाही मला कमीपणा वाटत नाही. अर्थात प्रत्येक पिढीशी जोडले जाण्याचा असा काही ठोस मंत्र नाही. त्यामुळे माझ्याबाबतीत हे कसं घडतं, याचं स्पष्टीकरण देणं खूपच अवघड आहे. मी कधीच कोणत्या गोष्टीचा आव आणत नाही किंवा ढोंगही करीत नाही. मी जसा आहे तसाच लोकांसमोर येतो. त्यात मला कोणतीही लाज वाटत नाही. मला जेवढं येतं तेवढंच मी सांगतो. आपल्याला येत नसलेल्या गोष्टीही मला येतात असा दावा मी कधी केला नाही आणि करणारही नाही. कदाचित हीच गोष्ट मला प्रत्येक पिढीशी जोडत आली असावी. याचं कारण तुम्ही त्यांना भेटता तेव्हा तुम्हीही त्यांच्याकडून बरंच काही शिकत असता. त्याचा आदर करणं खूप महत्त्वाचं आहे.
मला तरुण मंडळी खूप आवडतात. ती प्रामाणिक आणि पारदर्शी असतात. स्वत:शी आणि स्वत:च्या मूल्यांशीही! मी माझ्या आणि माझ्या आधीच्या पिढीचाही ढोंगीपणा पाहिला आहे. तो ढोंगीपणा नसता तर आम्ही आज जे सहन करतोय, ते सहन करावं लागलं नसतं. भ्रष्टाचार, काळे धंदे, अन्याय, अत्याचार, शोषण यांच्याविरोधात आमची तसंच आमच्या आधीची पिढी ठामपणे उभी राहिली असती तर आजचं चित्र वेगळं दिसलं असतं. व्यक्तिगत नातेसंबंधांतही आम्ही खूप ढोंगी आहोत. आमच्या वेळी वडिलांनी सांगितलं, ‘काकांच्या मुलीचं लग्न आहे, गावाला जावं लागेल..’ तर काय टाप होती आमची नकार द्यायची! आम्ही गुपचूप सुट्टी काढून काकांच्या मुलीच्या लग्नाला जायचो. आजची पिढी अजिबात तसं करत नाही. ‘कशाला लग्नाला जायचं? तेच काका ना, ज्यांनी आपल्या जमिनी हडपल्या.. ज्यांच्याविरुद्ध आपण कोर्टात खटला लढवला? त्यांच्यामुळेच तुम्हाला शहरात यावं लागलं?’ हे असे प्रश्न आजची पिढी विचारते. ते अजिबात ढोंगी नाहीत. जे आहे ते रोखठोक बोलून मोकळे होतात.
कदाचित आमच्या पिढीला भूतकाळाचं ओझं उतरवणं शक्य झालं नाही. आमच्या आणि आमच्या आधीच्या पिढीनेही ब्रिटिशराज पाहिलं. ती परदेशातून आलेली माणसं आमचे राजे होते आणि आम्ही त्यांचे गुलाम होतो. ती गुलामीच कुठंतरी आमच्यात मुरली आहे. त्यावेळचे आमचे नेते मात्र खूप प्रामाणिक होते. त्यांच्यासमोर निश्चित ध्येयं होती. पण एक गोष्ट मात्र विचारात घ्यायला हवी. सत्य हे कधीच संपूर्ण सत्य नसतं आणि असत्य हेसुद्धा कधी संपूर्ण असत्य असत नाही. प्रत्येक वेळी खरं बोलायलाच हवं अशी गरज नसते. पण तुमच्या खोटय़ा बोलण्यानं कुणाचं नुकसान होता नये. आजची पिढी स्वतंत्र विचारांची आहे. ती हा सगळा विचार करते. ‘ही पिढी बेफिकीर आहे. त्यांना एक भाषा सलग बोलता येत नाही,’ असे आरोप होत असतात. हे खरंय, की आजचे तरुण दोन-तीन भाषा एकत्र बोलतात. पण हा कालखंडही भविष्यात मागे पडेल असं मला वाटतं. सध्या आपल्या मनातली गोष्ट एकाच भाषेत सलग बोलून दाखवणारे तरुण खूप कमी आहेत. त्याचं कारण असं बोलल्यास ती भाषा पूर्णपणे समजून घेणारे कुणी आढळत नाही. याचा प्रभाव हिंदी चित्रपटांतूनही दिसतो. बोलताना ते इंग्रजीचा वापर करतात, तर चित्रपटातले अर्धेअधिक संवाद इंग्रजी-हिंदीमिश्रित असतात. असं पात्र मग गाणं गायला लागल्यावर गालिबची गजल नाहीच गाणार. ते पात्र अशा मिश्रित भाषेतलं गाणंच गाणार. माझं गाणं ज्या कॅरेक्टरच्या तोंडी असेल, ते कॅरेक्टर चित्रपटात जी भाषा बोलतं, त्याच भाषेत ते गाणार ना! ‘बंटी और बबली’ चित्रपटातलं ‘कजरारे कजरारे’ हे गाणं घ्या! त्या गाण्यातली मुलगी पंजाबी आहे. ती कानपूरहून मुंबईत ‘मिस वर्ल्ड’ व्हायला आली आहे. बोलताना ती इंग्रजीची चिरफाड करतच बोलते. त्यामुळेच गाताना ती म्हणते, ‘आँखे भी कमाल करती है.. पर्सनलसा सवाल करती है..’ इथे ‘पर्सनल’ हा शब्द तिच्या तोंडी चपखल बसतो.
चित्रपटात सर्वात आधी गाण्याची चाल येते, त्या चालीवर मग शब्द येतात. हे आतापासूनच नाही, तर खूप जुन्या काळापासून चालत आलेलं आहे. त्यावेळी पिटात बसून बंदिश किंवा लोकगीत गायलं जायचं. त्यात एखादं गाणं खूप लोकप्रिय झालं तर सांगितलं जायचं की, तेच वाजवा. ते ऐकायला लोक येत. मग त्या गाण्याचा आणि प्रत्यक्ष पडद्यावरच्या दृश्याचा परस्परांशी काही संबंध असो वा नसो. लोकगीतांत त्या गाण्याचा एकच अंतरा असायचा. मग मुन्शीकडून लिहून घ्या, अशी ऑर्डर निघायची. मग त्या चालीवर शब्द लिहून घेतले जात. तेव्हाही आणि आताही बहुतांश वेळा चित्रपटातील गाणी चालीवरच लिहिली जातात.
गाणी लिहिताना आम्हाला ऱ्हिदम दिला जातो.. म्हणजे ठेका! चाल कोणत्या ठेक्यातली आहे, तिचं मीटर काय आहे, या गोष्टी सांगितल्या जातात. शायरी तसंच कवितेची फक्त २०-२२ मीटर आहेत. पण संगीताचे मीटर खूप आहेत. त्यामुळे विविध मीटरचा वापर करून गाणं लिहायचं म्हटल्यावर मजा येते. त्यात वैविध्य येतं. चोकअप झालेला पाइप साफ करणं हे एखाद्या प्लंबरसाठी जेवढं कठीण असतं, तेवढंच हुकूमाबर लिहिणं गीतकारासाठी आव्हानात्मक असतं. पण ते त्याचं काम आहे. त्याचा व्यवसाय आहे तो! काही गीतकार या पद्धतीबद्दल दु:ख व्यक्त करत असतील तर त्यांना दु:ख दाखवायला आवडतं म्हणा किंवा त्यांना नेहमीच सहानुभूतीची अपेक्षा असते असं म्हणा! काही गीतकार सांगतात की, आता मूड नाहीये लिहायचा! हे मूड वगैरे व्यवसायात बाजूला ठेवावं लागतं. संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेला वाजवला जाणारा यमन कल्याण राग पं. रविशंकर यांना सकाळी नऊ वाजता वाजवायला सांगा. ते वाजवणारच! कारण तिथे व्यवसायाचा प्रश्न आहे; मूडचा काही संबंध नाही. तुम्हाला तारखा मिळाल्या आहेत, चित्रीकरण करायचं आहे, अशावेळी ‘माझा मूड नाही, मी सीन लिहू शकत नाही,’ असल्या सबबी कोणीच ऐकून घेणार नाही. काही वेळा मात्र आधी गाणं लिहिलेलं असतं. नंतर ते संगीतकार स्वरबद्ध करतो. उदाहरणच द्यायचं तर ‘मेरा कुछ सामान..’ या गाण्याचं देता येईल. पण ते चित्रपटातल्या प्रसंगाशी मिळतंजुळतं आहे की नाही, याचाही विचार करावा लागतो. दिग्दर्शकाला ते गाणं पटलं तरच ते चित्रपटात राहतं.
मी एक हलवाई आहे. मी फक्त जिलेब्या विकत राहिलो तर कसं चालेल? अधेमधे नमकीनही खायला दिलं पाहिजे, तरच जिलेब्या खायची मजा वाढेल. मग रबडीही द्यायला हवी. बालुशाहीदेखील द्यायला हवी. गमतीचा भाग सोडा, पण मला एकच एक प्रकारे लिहिणं आवडत नाही. त्यात वैविध्य हवं. नाहीतर उद्या माझं लिखाणही कोणी वाचणार नाही. परंतु मनात चाललेल्या गोंधळाला कविता वाट करून देईल की कथा, हे मात्र मलाही माहीत नसतं. कधी कधी मात्र थेटच कळतं, की ही भावना कवितेचीच आहे. तर कधी कधी कविता लिहूनही खूप काही सांगायचं राहून गेलंय असं वाटतं, त्यातून कथेचा जन्म होतो.
‘बडी परेशान करती है ये बुढीया मुझे..
रात को खांसती है, दवाई पिती है..
फिर हात मेरा पकड के सो जाती है..
फिर चद्दर उतार देती हैं खुदही लाथ मार के
और कहती हैं के ठंड लगती है..
अपनें हातों से तुझे चिता पें डालकर आया था
अब भी ठंड लगती है तुझे?
जाती क्यों नहीं?’
तुम्हाला जेव्हा कळतं, की हा म्हातारा त्याच्या मेलेल्या बायकोबद्दल बोलतो आहे, तेव्हा तुम्हाला या कवितेचा एक वेगळाच पदर जाणवतो. ही गोष्ट खूप रंजक आहे, पण कवितेत बसणारी नाही. मग मी त्यावर एक लघुकथा लिहिली. त्यात मी म्हातारा-म्हातारीचं पात्र उभं केलं. त्यांचं नातं उलगडून दाखवलं. अशा प्रकारे मला वेगळा फॉर्म मिळाला- माझ्या भावना मांडण्याचा!
गाणं काही स्वत:ची ओळख घेऊन येत नाही. ते चित्रपटाबरोबरच येतं. त्या गाण्याची स्वत:ची ओळखही बनली पाहिजे आणि त्याने चित्रपटाच्या आशयातही भर टाकली पाहिजे, हे जमवणं आम्हा गीतकारांचं कसब आहे. त्यात खरी मजा आणि आव्हान आहे. ‘बिडी जलाईले’ हे गाणं लिहिताना पडद्यावरचा माहोल माझ्या डोळ्यासमोर होता. तिथे ‘मोरा गोरा अंग लईले..’ हे गाणं चालणारच नाही. ते वाजलं, तर ना ती बाई ठुमका मारू शकणार, ना तिच्या आसपासचे लोक बेहोश होऊन नाचू शकणार.
जगजित सिंग आणि मी आम्ही एकत्र खूप काम केलं आहे. पण त्यांना माझ्याबाबत नेहमी प्रश्न भेडसवायचे. एका शेरचे दोन भाग असतात. एक वरची ओळ आणि दुसरी खालची ओळ! या दोन ओळींचा काहीतरी एकमेकांशी संबंध असायला हवा ना, असं कोणीतरी त्यांना जाऊन विचारलं. त्यावर ते वैतागून म्हणाले होते, ‘यार वो गुलजारको ही जाके पूछों.’ त्यांची दुसरी तक्रार : कवितेत वा गजलमध्ये अनेक गोष्टी अव्यक्त राहतात. जगजितजींचं म्हणणं असे की, तुम्ही सरळ काय ते बोलून का टाकत नाही? माणसानं थेट बोलावं. त्यावर मी त्यांना म्हटलं होतं, ‘यार, मैं बहोत निशानें लगाता हूँ, लेकिन तुम्हारे दिल पे एक भी नहीं लगता.’
दुसऱ्या बाजूला कविता म्हणजे तुम्ही केलेलं ठोस विधान असतं. तुम्हाला त्या विधानाची पाठराखण करावी लागते. चित्रपटगीतात  विधान नसतं. ‘दिल ढुंढता है..’ हे गाणं म्हणून खूप चांगलं आहे. गालिबच्या एका शेरचं वर्णन आणि स्पष्टीकरण त्यात आहे. गालिबला अपेक्षित असलेले हे फुरसतीचे क्षण कोणते, हे माझं विधान आहे. कविता लिहिताना तुमच्या डोक्यात काहीतरी घुमत असावं लागतं. ते घुमणं वेगळं असतं.
असं घुमणं सुरू होतं- एखादा जिव्हारी लागणारा प्रसंग घडल्यावर! पेशावरच्या शाळेत झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यात अनेक मुलांची झालेल्या चाळणीचं वृत्त ऐकल्यानंतर, ती दृश्यं पाहिल्यावर मला जाणवलं, की यावर मला प्रतिक्रिया नोंदवली पाहिजे. पण ती मी सोशल नेटवर्किंग साइट्वर नाही, तर माझ्या कवितेतून नोंदवली. मला वाटतं, प्रत्येक माणसाने अशा घटनांवर ‘रिअ‍ॅक्ट’ व्हायला हवं. हा विचार घोळत राहिला मनात.. आणि एक-दोन दिवसांत एक कविता प्रसवली. यासाठी खूप वेळही लागू शकतो.. तुमच्या मनात ते घोळत राहतं.. तुम्हाला त्रास देत राहतं.. आणि मग त्यावर प्रतिक्रियेदाखल एखादी कविता जन्माला येते. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मी थेट प्रतिक्रिया देत नसलो तरीही माझ्या कवितांमधून त्याचं प्रतिबिंब उमटत असतंच की!    
शब्दांकन : रोहन टिल्लू
  
(गुलजार यांच्या या मुलाखतीचा व्हिडिओ http://www.YouTube.com/LoksattaLive येथे पाहावयास मिळेल.)

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
loksatta kutuhal article about perfect artificial intelligence
कुतूहल : परिपूर्ण बुद्धिमत्तेचे धोके
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…