आज २१ जून.. आंतरराष्ट्रीय योग-दिन! या संकल्पनेचा पाठपुरावा करणारे व त्यायोगे जगभरात योगविषयक जाणीवजागृतीचे स्वप्न पाहणारे ‘स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थान’ या जगातील एकमेव योग विद्यापीठाचे संस्थापक डॉ. एच. आर. नागेंद्र यांच्याशी केलेल्या चर्चेवर आधारित योग-दिनाचे महत्त्व सांगणारा लेख..
आज २१ जून! जगभरात साजरा होत असलेला पहिला आंतरराष्ट्रीय योग-दिन! दिल्लीसह जगभरातल्या सुमारे दोनशे देशांमधून मुख्यत्वे योगाची प्रात्यक्षिके, जनजागरणाचे कार्यक्रम आणि योगशास्त्राबद्दलची समजूत वृद्धिंगत करणाऱ्या नानविध उपक्रमांच्या माध्यमातून हा दिवस साजरा होणार आहे. साप आणि गारुडय़ांचा देश ही एकेकाळी जागतिक समाजाच्या मन:पटलावर कोरली गेलेली भारताची प्रतिमा गेल्या ६०-७० वर्षांत खूपच सुधारली आहे. बॉलीवूडचे सिनेमे, भारतीय खाद्यपदार्थ आणि पाककला, भारताचा एक आण्विक शक्ती म्हणून झालेला उदय आणि भारताची तरुण पिढी माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्व-प्रतिभेने निर्माण करत असलेला देशाचा दबदबा इत्यादी अनेक घटकांमुळे भारताची प्रतिमा अधिक चांगली होत गेली. lr19अर्थात तरीही जागतिक पातळीवर भारताविषयीची साक्षरता बऱ्यापैकी वाढूनसुद्धा आपल्या प्राचीन, संपन्न संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेली आपली परंपरागत ज्ञानसंपदा सामान्यत: उपेक्षितच राहत आली. २१ जूनच्या आंतरराष्ट्रीय योग-दिनाच्या निमित्ताने परंपरागत भारतीय ज्ञानसंपदेला विश्वमान्यता मिळत आहे आणि म्हणूनच या दिवसाचे विशेष महत्त्व आहे!
भारतात उगम पावलेली योग-विज्ञानाची सरिता आता विश्वाच्या कानाकोपऱ्यात सर्वदूर पसरली आहे. मुदलात तत्त्वज्ञानाचा व्यापक आणि सखोल मूलाधार असलेले हे शास्त्र काहींनी आध्यात्मिक वळणांनी पुढे नेले, तर अनेकांनी त्याच्या व्याधीमुक्ती तंत्राच्या अंगावर भर देऊन उपयोजित योगशास्त्र म्हणून ते आपापल्या पद्धतीने विकसित केले. त्यामुळेच ज्ञानयोग, भक्तियोग, राजयोग अशी सैद्धान्तिक मांडणी अंतर्निहित असलेली तत्त्वज्ञानाची बैठक समजून घेण्याच्या भानगडीत न पडता अनेकांनी हठयोगापासून ‘पॉवर-योगा’पर्यंत जे जे आपल्याला भावेल, रुचेल आणि पचेल ते उपयोजनेच्या (ंस्र्स्र्’्रूं३्रल्ल) पातळीवर पुढे नेले. परिणामी सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात जिथे सतत नवनव्या, क्लिष्ट व आव्हानात्मक समस्यांचा मुकाबला करावा लागतो, त्या आपल्या देशात प्रतिरोधन (ढ१ी५ील्ल३्रल्ल) आणि उपचार पद्धती ही या शास्त्राची अंगे लोकप्रिय होत गेली. साहजिकच संगीत वा कलेच्या प्रांतात जशी शास्त्रोक्त आणि सुगम अशी विभागणी प्रचलित झाली, तशीच ती योगशास्त्र या विषयातही झाली.
लोकांच्या सर्वसाधारण समजुतीच्या पातळीवर या शास्त्राचे असे विभाजन समजण्याजोगे आहे. पण आधुनिक ज्ञानयुगात एक संपन्न ज्ञानशाखा म्हणून योगशास्त्राला मान्यता मिळण्यासाठी आणि ते विकसित होण्यासाठी गुरू, बाबा, क्रिया आणि कसरतींच्या पलीकडे ते घेऊन
जाण्याची निकड होती. ही निकड आधुनिक, अकादमिक चौकटीत योगशास्त्र बसवून कशी भागवता येईल, आणि परिपूर्ण ज्ञानशाखा म्हणून योगाचा विकास कशा प्रकारे साधता येईल, याबद्दलची संकल्पना सर्वप्रथम मांडली ती विवेकानंद केंद्राच्या एकनाथजी रानडे यांनी! एकनाथजींचे एक समर्पित व ध्यासयोगी अनुयायी डॉ. एच. आर. नागेंद्र यांनी ही संकल्पना आपल्या आयुष्याचे ‘मिशन’ म्हणून स्वीकारली आणि गेली ५० वर्षे झपाटल्यासारखे ते या ध्येयसाधनेत मग्न आहेत.
बंगळुरू शहराच्या दक्षिणेस बानेरघट्टा अभयारण्याला लागून असलेल्या जिगनी या छोटय़ाशा गावाच्या परिसरात सुमारे शंभर एकराच्या विस्तीर्ण जागेत विकसित झालेले ‘स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थान’ नावाचे (र-श्अरअ) अभिमत विद्यापीठ हे डॉ. नागेंद्र यांच्या तपश्चर्येचे दृश्य फलित! स्वातंत्र्योत्तर काळात ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात अंतरीच्या प्रेरणेने झपाटून जाऊन ज्यांनी अथक परिश्रमांतून एक परिपूर्ण संस्थाजीवन यशस्वीपणे साकारले अशा ध्येयनिष्ठांच्या मांदियाळीत डॉ. नागेंद्र यांचे स्थान खूप अव्वल आहे. १ जानेवारी १९४३ रोजी जन्मलेल्या नागेंद्रांची कौटुंबिक पाश्र्वभूमीही ज्ञान- परंपरा समृद्ध करणाऱ्यांची आहे. त्यांची थोरली बहीण डॉ. नागरत्ना ‘दीदी’ याही त्यांच्यासारख्याच ध्येयवेडय़ा. आजही वयाच्या सत्तरीत अध्ययन आणि अध्यापनात मन:पूत रमलेल्या अशा त्या एक वैद्यकीय ‘डॉक्टर’! गंमत म्हणजे आज विद्यापीठाचे संस्थापक कुलपती म्हणून विलक्षण कर्तेपणाने अनेकविध भूमिका पार पाडणारे नागेंद्रजी वैद्यकीय डॉक्टर नाहीत. बंगलोरच्याच इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधून १९६८ साली ते बाहेर पडले ते अभियांत्रिकीमधल्या दोन डॉक्टरेट्स आणि एम. ई. अशी भक्कम भांडवलाची कमाई करून! पुढे कॅनडातील एका विद्यापीठात, नंतर अमेरिकेच्या नासा संस्थेत, बॉस्टनच्या हार्वर्ड विद्यापीठात व ब्रिटनमधील एका विद्यापीठात त्यांनी विशारदोत्तर (पोस्ट-डॉक) संशोधन केले. नासामध्ये असताना क्रायोजनिक अभियांत्रिकीवर त्यांनी डझनभर निबंध लिहिले आणि १९६९ साली नील आर्मस्ट्राँग चंद्रावर पोहोचला त्या चांद्रमोहिमेच्या व्यवस्थापनात त्यांनी भाग घेतला होता.
१९७४ मध्ये भारतात परतल्यानंतर नागेंद्रजींची भेट झाली विवेकानंद केंद्राचे प्रमुख पदाधिकारी आर. एन. वेंकटरमन यांच्याशी. त्यांच्या आग्रहावरून ते कन्याकुमारीला विवेकानंद स्मारक बघायला गेले. आणि तेथून परतले ते या स्मारकाचे प्रणेते एकनाथजी रानडय़ांच्या व्यक्तिमत्त्वाने विलक्षण प्रभावित होऊन! विवेकानंद केंद्रात जीवनव्रती म्हणून दाखल होऊन सेवाप्रकल्प उभारायचे, की योगशास्त्रात संशोधन करण्यासाठी संस्था उभी करायची, अशी दुविधा समोर आल्यानंतर डॉ. नागेंद्र यांनी खूप विचारांती आणि एकनाथजी रानडे यांच्या संपूर्ण पाठिंब्याने दुसरा पर्याय निवडला आणि तिथून या संस्थेच्या वाटचालीची सुरुवात झाली.
२००२ मध्ये अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळालेली ही संस्था निसर्गाच्या कुशीत नांदते आहे. शेतं, वृक्षराजी, उपचार प्रणालींच्या बैठय़ा इमारती, विद्यार्थ्यांची वसतिगृहे, प्रशासनिक आणि अकादमिक कामांसाठीची भवने, अतिथीगृहे, प्रयोगशाळा अशा सर्व पसाऱ्यात उठून दिसते ती ‘ओम’ आकाराची बसकी, वैशिष्टय़पूर्ण इमारत व विवेकानंदांचा भव्य पुतळा. या पुतळ्याच्या साक्षीने डॉ. नागेंद्र यांच्या पुढाकाराने आणि परिश्रमांतून जगातले पहिले व एकमेव योग विद्यापीठ आज जगभरात ख्याती मिळवीत आहे.
स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थेच्या निसर्गरम्य परिसरात संस्थेचे कुलपती डॉ. एच. आर. नागेंद्र यांचं कार्यालय आहे. या कार्यालयातील त्यांच्या खोलीच्या दोन भिंती संपूर्णत: संस्थेला मिळालेल्या सन्मानचिन्हांनी भरलेल्या आहेत. प्रसन्न, सुहास्य वदनाने बातचीत करणारे, धीरगंभीर, पण तरीही मैत्रिपूर्ण आणि प्रेमळ गप्पा मारणारे नागेंद्रजी समोरच्याला चटकन् आपलंसं करतात. जूनच्या पहिल्या सप्ताहात त्यांच्या याच कार्यालयात त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला तेव्हा मनात मुख्य विषय होता तो आंतरराष्ट्रीय योग-दिनाचा! योग-दिन साजरा करण्यासाठी काम करीत असलेल्या अनेक समित्यांची मुख्य जबाबदारी डॉ. नागेंद्र यांच्याकडे आहे. शिवाय आयुष मंत्रालयाच्या एका कार्यगटाचे प्रमुख म्हणूनही नागेंद्रजी जबाबदारी सांभाळतात. एकनाथजी रानडे यांनी ‘एक जीवन.. एक मिशन’ ही कल्पना मांडली होती. आणि या कल्पनेस अनुसरूनच नागेंद्रजींनी योगशास्त्राला संपूर्णपणे वाहून घेतलं आहे. त्यांची प्रेरणा, त्यांचे परिश्रम, त्यांनी साध्य केलेल्या गोष्टी, आंतरराष्ट्रीय योग-दिनाची संकल्पना व भविष्यातील योजना अशा अनेकविध विषयांवर त्यांच्याशी झालेल्या विस्तृत गप्पांचा हा अंश..
एकनाथजींचे प्रेरक व्यक्तिमत्त्व व त्यांच्या कार्यशैलीतील प्रभावी पैलूंबद्दल काय सांगाल?
– एकनाथजींची माझी पहिली भेट झाली तीच तब्बल तीन तास चालली. मी विज्ञानाचा विद्यार्थी; पण विज्ञानाचा नेमका हेतू काय, विज्ञानाचे नेमके गंतव्य स्थान काय, याबद्दल मी गोंधळलेला होतो. माझ्या अंतरंगात जी शोधयात्रा सुरू होती, तिला त्यांनी योगशास्त्राच्या वळणावर आणून ठेवलं. विलक्षण प्रखर स्मरणशक्ती, उत्कृष्ट संघटनकौशल्य आणि सर्वोत्तमाचा निरंतर ध्यास ही रानडे यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्टय़े होती. ते जसे अतिशय चिवट आशावादी होते, तसेच गुणवत्तेशी तडजोड न करणारे ‘परफेक्शनिस्ट’ही होते. इंग्रजीवर आपले प्रभुत्व नाही याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी विलक्षण परिश्रमांती इंग्रजीवर हुकुमत मिळवली. एकदा एका प्रसंगात एका विशिष्ट पत्राचा मसुदा अत्याधिक निदरेष हवा, या आग्रहापोटी त्यांनी १८ वेळा तो बदलला. त्यांची शिस्त अतिशय कडक होती. पण तितकेच ते मायाळूही होते.
‘स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्था’ या अभिमत विद्यापीठाची संकल्पना, आत्तापर्यंतची वाटचाल, त्याची संशोधन क्षेत्रातील वैशिष्टय़पूर्ण कामगिरी व योगदान याबद्दल तुम्ही काय सांगाल?
– माझ्या दोन डॉक्टरेट्स आणि त्यानंतर विविध शोधप्रबंध असं सगळं झाल्यानंतर बंगळुरूमध्ये वास्तव्याला असलेले चिंतक आणि अभ्यासक प्रा. सत्यनारायण शास्त्री यांनी मला उपनिषदांचा अभ्यास करायला उद्युक्त केलं. त्यासाठी संस्कृत भाषा अवगत असायला हवी म्हणून मी संस्कृत शिकलो. उपनिषदे वाचून मी योगाभ्यासाकडे आकर्षित झालो.
एकनाथजी रानडय़ांनाही योगाविषयी खूप कळकळ व आस्था होती. त्यांनी माझी बहीण डॉ. नागरत्ना यांना ‘तुझं स्वप्न काय?’ असा प्रश्न विचारला होता. त्यावर ‘योगविषयक संशोधन, प्रशिक्षण आणि प्रचार’ असं मोघम उत्तर तिनं दिलं. त्यावर एकनाथजी म्हणाले की, ‘अंथरूण पाहून पाय पसरण्याचा विचार हा अपराध आहे. तुम्ही मोठा विचार करा. योग विद्यापीठ स्थापन करण्याची आकांक्षा बाळगा.’ तिथूनच या विचाराला चालना मिळाली आणि पुढे १९७५ मध्ये संशोधन संस्था म्हणून ‘एस-व्यासा’ची स्थापना झाली.
२००२ मध्ये आम्हाला अभिमत विद्यापीठ म्हणून मान्यता मिळेपर्यंत आम्ही प्रमाणपत्र व पदविका पाठय़क्रम चालवायचो खरे; पण आमचा भर होता संशोधनावर! ‘अस्थमाच्या विकारावर योगाद्वारे उपचार’ या शीर्षकाचा मी आणि माझी बहीण डॉ. नागरत्ना यांनी संयुक्तपणे लिहिलेला शोधनिबंध १९८६ मध्ये ‘अमेरिकन जर्नल ऑफ अस्थमा’ या प्रतिष्ठित नियतकालिकात प्रकाशित झाला. पुढे ब्रिटिश मेडिकल जर्नलनेही आमच्या संशोधनाला प्रसिद्धी दिली. या दोन्ही नियतकालिकांमुळे आम्ही एका रात्रीत जगप्रसिद्ध झालो.
योगशास्त्राकडे एक चमत्कार, एक कसरत म्हणून नव्हे, तर एक ज्ञानशाखा म्हणून उभ्या जगाने पाहायचे असेल तर योगाच्या उपचारक्षमतेबद्दल प्रयोगाधिष्ठित अशा ठाम निष्कर्षांच्या आधारे आपण संशोधन घडवून आणून त्याची प्रसिद्धी करायला हवी, याबद्दल आम्ही नेहमीच आग्रही होतो. त्यातूनच आज मधुमेह, कर्करोग, अतिरक्तदाब, हृदयविकार, मतिमंदत्व, निराशाग्रस्तता आणि एच. आय. व्ही. अशा सात दुर्धर व्याधींवर योगशास्त्राच्या माध्यमातून केलेल्या यशस्वी उपचारांना आता ज्ञानमान्यता मिळाली आहे. भारतीय संशोधनाच्या- त्यातही आपल्या पारंपरिक ज्ञानशाखांतील अर्वाचीन संशोधनासंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर संदेह उपस्थित केला जातो. पण आमच्याकडे चाचण्यांच्या परिणामांचे पुरावेच इतके रोखठोक असायचे, की परदेशातून प्रकाशित होणाऱ्या नियतकालिकांना ते नाकारणं शक्यच नव्हतं. क्षयरोगावरील योगोपचारांचे आमचे संशोधन मांडणारा निबंध त्यांनी पाच वर्षे अडवून ठेवला होता. भारतीय मेडिकल जर्नलवाल्यांनीही आमच्या योगविषयक संशोधनाला सापत्न वागणूक दिली होती. त्यांनी अकारण नाकारलेला आमचा निबंध ब्रिटिश मेडिकल जर्नलने स्वीकारल्यावर मग आपल्याकडील तज्ज्ञांचे डोळे उघडले.
कर्करोगावरच्या संशोधनाच्या वेळी आम्ही हे दाखवून दिले की, ६०० कॅन्सर रुग्णांपैकी ज्यांनी ज्यांनी विभाजित (आ + ऊ + म) आणि संयुक्त (ओम) ओंकाराचं नियमित आणि रचनाबद्ध उच्चारण केलं, त्यांच्या शरीरातल्या कॅन्सर-पेशींची वाढ मंद होत होत थांबली. ह्य़ूस्टन (टेक्सस)च्या एम. डी. अँड्रय़ूज कॅन्सर सेंटरसमोर हय़ूस्टन शहरात राहणाऱ्यांपैकी सुमारे ४ % रहिवाशांना कॅन्सरची बाधा झाल्यामुळे मोठेच आव्हान उभे राहिले होते. त्यावेळी आमच्या आग्रहावरून ते बंगळुरूला आमचं काम बघायला आले. आमच्याकडे त्यावेळी ३५० कॅन्सर रुग्णांवर आम्ही उपचार करीत होतो. स्तनाच्या कर्करोगग्रस्तांनाही आमच्या उपचारांमुळे खूप बरं वाटल्याची उदाहरणं होती. १९८६ मध्ये ही मंडळी येऊन गेल्यानंतर तर आमच्या कार्याचा आणखीनच बोलबाला झाला.
योगशास्त्राच्या विकासात आम्ही नेमकं काय केलं, या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आमच्या परंपरागत ज्ञानसंपदेची शास्त्रीय उकल करून तिची सुविहित मांडणी करणे आणि परंपरागत ज्ञानाची आधुनिक विज्ञानाशी सुयोग्य सांगड घालणे, हे काम आम्ही बऱ्यापैकी पुढे घेऊन गेलो आहोत.
योगशास्त्राच्या शास्त्रीय मांडणीचा विकास, योगशास्त्राची लोकप्रियता, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगाबद्दलचा दृष्टिकोन तसेच आंतरराष्ट्रीय योग-दिनाच्या संकल्पनेबद्दल सविस्तर सांगाल का?
– आपल्याकडे पंचकोशांचा- म्हणजे अन्नमय, प्राणमय, ज्ञानमय, विज्ञानमय आणि आनंदमय अशा कोशांचा विचार सांगितलेला आहे. पतंजली योगसूत्रांसह आपल्याकडची प्राचीन, परंपरागत ज्ञानसंपदा या सर्व घटकांचा विचार करणारी आहे. अलीकडच्या काळात बिहारमधल्या मुंघेर येथील बिहार योग भारतीने आधुनिक काळातील योगशास्त्राच्या शिक्षण-प्रशिक्षणात खूप काम केलंय. दिल्लीच्या भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतले डॉ. मुकुंद भोले यांनी ‘योगमीमांसा’ लिहून महत्त्वाची कामगिरी केलीय. शिवाय लोणावळ्याच्या कैवल्यधामशी संबंधित कुवलियानंद यांनीही मोठं काम केलेलं आहे. आम्ही २००२ मध्ये अभिमत विद्यापीठ म्हणून मान्यताप्राप्त होण्यापूर्वी बंगलोर विद्यापीठाची संलग्नता घेऊन अनेक पाठय़क्रम राबवीत होतो.
बाबा रामदेव, श्री श्री रविशंकर आणि इतर अनेकांमुळे सुगम आणि उपयोजित योगशास्त्र लोकप्रिय झालंय. पण अजूनही खूप काही करण्याची गरज आहे. सर्वानी एकत्र बसून, विचारविनिमय करून योगाच्या काही समान धारणा, समान क्रिया विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. १९८६ पासून आम्ही एक द्वैवार्षिक आंतरराष्ट्रीय परिषद भरविण्यास सुरुवात केली आहे. सुमारे हजारभर योग-अभ्यासक देशविदेशातून त्यात सहभागी होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी १९८३ पासून योगाभ्यास करताहेत. आत्तापर्यंत अनेकदा ते आमच्या प्रशांती कुटीरमध्ये येऊन गेले आहेत. अजूनही किमान रोज एक तास ते योगाभ्यास करतात.
आमच्या विद्यापीठाशी घनिष्ठ संबंध असलेले लिस्बनला वास्तव्यास असणारे पोर्तुगीज नागरिक अमृत सूर्यानंद हे तिथले प्रसिद्ध योगगुरू आहेत. २००४ मध्ये त्यांनी प्रथम आंतरराष्ट्रीय योग-दिन साजरा करण्याचा पुरस्कार केला आणि त्यासाठी २१ जूनचा आग्रह धरला. गेली चार वर्षें आम्ही या संकल्पनेचा पाठपुरावा केला. पंतप्रधान मोदींनी त्यात लक्ष घातल्यानंतर ही कल्पना उचलून धरली गेली.
योगशास्त्राच्या भविष्यातील वाटचालीसंदर्भात जी आव्हाने आहेत, त्याबद्दल काय सांगाल?
योगशास्त्राची समजूत वाढवणे, आणखीन सखोल आणि व्यापक संशोधनास चालना देणे तसेच योगप्रचारासाठी साहित्याची सर्व भाषांमधून निर्मिती करणे, ही काही ठळक आव्हाने आहेत. त्याचबरोबर नको त्या वादग्रस्त मुद्दय़ांपासून योगशास्त्राचा बचाव करणे हेही एक आव्हान आहेच. आपल्याकडे काहींनी सूर्यनमस्काराला विरोध केलाय. पण मी हे सांगू इच्छितो की, सूर्यनमस्कार खूप कठीण आहेत. योगविषयक मूलभूत वाङ्मयात त्यांचा समावेश नाही. महाराष्ट्रात विकसित झालेला हा व्यायामप्रकार आहे. त्यामुळे सूर्यनमस्कारांवरून उगीच वादंग निर्माण करण्यात काहीच हशील नाही.
आंतरराष्ट्रीय योग-दिनानिमित्ताने सर्वानीच योग-साक्षरता वाढवून उत्तम आरोग्यासाठी योगाभ्यास सुरू करण्याचा संकल्प करावा, हीच अपेक्षा आहे. स्वत:चे आरोग्य स्वत: सांभाळणे हीसुद्धा एक समाजसेवाच आहे!
 विनय सहस्रबुद्धे  – vinays57@gmail.com

sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
Sadabhau Khot on Devendra Fadnavis
“एकलव्याने एक अंगठा दिला होता, पण मी फडणवीसांसाठी दोन अंगठे द्यायला तयार”; सदाभाऊ खोत यांचे विधान
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी