News Flash

दखल : मनोज्ञ विश्लेषण

कवयित्री बहिणाबाईंनी शब्दबद्ध केलेली मनाची ही अवस्था प्रत्येकजण अनुभवत असतो.

‘मन पाखरू पाखरू,

त्याची काय सांगू मात?

आता व्हतं भुईवर,

गेलं गेलं आभायात’

कवयित्री बहिणाबाईंनी शब्दबद्ध केलेली मनाची ही अवस्था प्रत्येकजण अनुभवत असतो. माणसाच्या मनाचा ठाव घेणं ही आत्यंतिक कठीण गोष्ट. मात्र, अनेक मानसोपचारतज्ज्ञ मानसशास्त्राच्या दृष्टीने या अवघड मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न करतात. ‘मना मना, दार उघड’ हे डॉ. शोभा पाटकर यांचे पुस्तक म्हणजे मनातील भावभावनांचा सखोलपणे घेतलेला धांडोळा! समुपदेशन करताना लेखिकेला मानवी जीवनाचे जाणवलेले वास्तव म्हणजे हे पुस्तक होय. लेखिकने सुरुवातीलाच मेंदू आणि मन यांच्यातील अविभाज्य नातं विशद केलं आहे. मन:स्थिती आणि परिस्थिती यांचं नातं लेखिकेने उलगडून दाखवलं आहे. मन समजून घेण्यासाठी मानवी मेंदूची रचना जाणून घेणे आवश्यक आहे. त्याची सविस्तर माहिती लेखिकेने दिली आहे. त्यानंतर मन:स्थिती, परिस्थिती आणि मेंदू यांचे नाते उलगडून दाखविले आहे. मुलांचे संगोपन करताना त्यांचे मन समजून घेणे कसे आवश्यक आहे याचे महत्त्वपर्ण मार्गदर्शन या पुस्तकातून होते. मुलांचा सकारात्मक आणि नकारात्मक व्यक्तिमत्त्व विकास, विकासाचे विविध पैलू यांविषयीची माहिती त्यातून मिळते. सकारात्मक मनोविज्ञान, सकारात्मक जीवनाचे पैलू आदी अनेक गोष्टींचा मागोवा या पुस्तकात घेण्यात आला आहे.

भावभावनांचे जग उलगडताना भावनांची ओळख, भावनांचे नियमन आणि नियोजन, भावनांचे जाणीवपूर्व नियोजन कसे करावे, भावनांचे नियंत्रण या गोष्टींचे सखोल विश्लेषण करण्यात आले आहे.

‘आपण आणि नैतिकता’ याविषयी सांगताना संस्कार रुजविणे, संस्कार आणि त्यांचे काटेकोर पालन, संस्कार- एक भावनात्मक द्वंद्व, संस्कार, नैतिक शिक्षण, पाप-पुण्य, श्रद्धा आणि त्याग या संकल्पनांविषयीचे उत्तम विश्लेषण करण्यात आले आहे. अगदी साधी-सोपी उदाहरणे देऊन हा विषय मांडण्यात आला आहे.

त्याचबरोबर मानसिक अस्थिरता, मानसिक व्याधींची तोंडओळख, संवादपद्धती यांची माहितीही दिली आहे. मनाची अवस्था गोंधळी झाली की समुपदेशन किती महत्त्वाची भूमिका बजावते हे लेखिका समजावून सांगते. या पुस्तकात मनाविषयीची शास्त्रीय मांडणी करताना कुठेही भाषेचा बोजडपणा जाणवत नाही. साधी-सोपी मांडणी आणि उदाहरणे यामुळे हे पुस्तक वाचनीय आणि माहितीपूर्ण झाले आहे.

‘मना मना, दार उघड’- डॉ. शोभा पाटकर, लोकवाङ्मयगृह, पृष्ठे- १८४, मूल्य- २५० रु.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 12:02 am

Web Title: intervention psychological analysis akp 94
Next Stories
1 चवीचवीने… : सुगरण आत्या
2 पडसाद : विचारांची संयत मांडणी
3 पाडवा आणि गोडवा
Just Now!
X