29 March 2020

News Flash

व्यापारउदीम ठप्प

काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्टीज’(केसीसीआय)चे अध्यक्ष शेख आशिक यांच्याशी साधलेला संवाद

(संग्रहित छायाचित्र)

काश्मीरमधील व्यावसायिकांची सर्वात मोठी संघटना अर्थात ‘काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्टीज’(केसीसीआय)चे अध्यक्ष शेख आशिक यांनी जम्मू आणि काश्मीर राज्याचा विशेष दर्जा रद्द झाल्याच्या सहा महिन्यांपश्चात खोऱ्यातील परिस्थितीविषयी ‘इंडियन एक्सप्रेस’शी साधलेला हा संवाद..

काश्मीरमधील उद्योग-व्यवसायाची सध्याची स्थिती काय आहे?

– सुरुवातीला लादले गेलेले प्रतिबंध आता उठवले असले तरी व्यापार-व्यवसायाच्या दृष्टीने फारशी सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही. सरकारने काही घोषणा जरूर केल्या आहेत, परंतु व्यवसाय क्षेत्राचे विचाराल तर त्यांचे हाल सुरूच आहेत. हलाखीत असलेल्या व्यवसाय क्षेत्राला मदत अथवा दिलासा मिळेल असे कोणतेही धोरण सरकारकडून अद्यापि आलेले नाही.

तुम्ही सरकारकडून कोणत्या भरपाईची मागणी केली आहे काय?

– नुकसान भरपाईचे विसरूनच जा; परंतु गेले पाच-सहा महिने व्यापार-व्यवसायात खंड पडला असल्याने सरकारनेच स्वत:हून अशा अडचणीत सापडलेल्या व्यावसायिकांसाठी दिलासादायी धोरण घेऊन पुढे यायला हवे. सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक व्यावसायिक विलक्षण ताणाखाली आहे. किंबहुना, प्रचंड आर्थिक ताण सोसत ते तग धरून आहेत. आम्ही सरकारपुढे आमचे गाऱ्हाणे मांडून या समस्येचे गांभीर्य त्यांना समजावून दिले आहे. आता त्यांनीच निर्णय घ्यावयाचा आहे.

व्यवसाय क्षेत्राच्या फेरउभारणीसाठी तुमची काही योजना आहे काय?

– आम्ही अनेकांगांनी प्रयत्न आणि विचार करतो आहोत. त्यातून काय साधते ते पाहावे लागेल. जसे मी म्हटले त्याप्रमाणे नुकतीच नायब राज्यपालांची भेट आम्ही घेतली. सध्या व्यवसाय-उद्योगांपुढील समस्यांचे स्वरूप काय आहे हे आम्ही त्यांना कळवले आहे. मला वाटते की, पार थंडावलेल्या येथल्या व्यापार-उद्योगाच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी एक ठोस धोरण आणले पाहिजे. पण अजून तरी त्या दिशेने काही घडताना दिसत नाही. व्यापार-उदीम क्षेत्रातील आमचे व्यावसायिक बंधू, नागरी समाजातील व्यक्ती आणि प्रख्यात वकिलांची तात्काळ सुटका करावी अशी आमची मागणी आहे. तिची पूर्तताही अजून प्रलंबित आहे.

सरकार तुम्हाला पुरेशी मदत देत आहे का?

– आमच्या मोबाइलवरील इंटरनेट सेवा पुन्हा सुरू झाली आहे खरी; पण ती २जी इंटरनेट सेवा आहे. अशा परिस्थितीत कोणताही व्यवसाय कसा चालवला जाऊ  शकतो, हे माझ्या तरी समजेपलीकडचे आहे. आम्हाला आमचा व्यवसाय पुन:स्थापित करायचा झाल्यास मोकळीक मिळायला हवी. अगदी निर्धोकमुक्ततेत तो करण्याची मुभा मिळायला हवी. आम्हाला सामाजिक संवादासाठी नव्हे, तर आमच्या व्यवसायाला गती देऊ  शकेल अशी वेगवान इंटरनेट सेवा उपलब्ध व्हायला हवी. अनेक व्यवसायांची मदार पूर्णपणे वेगवान इंटरनेटवरच आहे. आणि सरकारनेही ही गरज ध्यानात घ्यायला हवी. आमच्या शिष्टमंडळाने जेव्हा नायब राज्यपालांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी या बाबी ऐकून घेतल्या आहेत. आमच्या समस्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या आहेत. एकंदरीत अडचणी काय आहेत याची त्यांनाही जाणीव आहे. यासंबंधाने आता जो काही निर्णय घ्यायचा, तो सर्वस्वी त्यांच्याच हाती आहे.

व्यापार क्षेत्राला ५ ऑगस्टपश्चात झालेल्या एकूण तोटय़ाचा काही अदमास तुम्ही घेतला आहे का?

– काश्मीर खोऱ्यात ५ ऑगस्टपश्चात अनिश्चिततेच्या परिस्थितीमुळे झालेले आर्थिक नुकसान १७,८०० कोटी रुपयांच्या घरात जाणारे असून, तब्बल पाच लाख लोकांनी आपला रोजगार गमावला आहे. आम्ही तयार केलेल्या अहवालातील निरीक्षणांनुसार, व्यापार-उद्योग ठप्प झाल्याच्या परिणामी लाखोच्या संख्येने बेरोजगारी, तसेच वित्तीय संस्थांकडून उसनवारी केलेल्या मंडळींनी परतफेडीची क्षमताही गमावली आहे. तसेच लक्षणीय प्रमाणात कर्जखाती दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर जाऊन पोहोचली आहेत. जवळपास सर्वच क्षेत्रांना मोठय़ा नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे.

पण सरकारने तर खोऱ्यातील इंटरनेट सेवा पुन्हा सुरू केली आहे..

– एखाद्या रुग्णाला त्याच्या आजारपणाच्या पहिल्या ६० ते ९० दिवसांत कोणतेही औषध दिले गेले नाही आणि त्यानंतर त्याला मोठा कालावधी लोटल्यावर औषधोपचार सुरू केले गेले, तर समोर जे काही घडताना दिसेल, तेच सध्या काश्मीरमधील व्यवसाय क्षेत्राबाबत लागू आहे. इंटरनेट सुरू झाले, परंतु ते २जी मोबाइल इंटरनेट आहे. सगळ्या जगाला माहीत आहे की, आम्ही बरीच झळ सोसली आहे आणि या अशा परिस्थितीतून फेरउभारीची आमच्याकडून अपेक्षा केली जात आहे. तथापि, व्यावसायिक पुनरुज्जीवनाच्या दिशेने सुरू असलेली ही वाटचाल खचितच नाही.

विशेष दर्जा रद्द केला गेल्याने काश्मीरचा विकास साधला जाईल, या दाव्यावर सरकार ठाम आहे. मागील सहा महिन्यांत तुमच्या अनुभवास आलेले बदल नेमके काय आहेत?

– विकासाची गोष्ट सध्यापुरती तरी विसरून जा. आमचे म्हणणे आमच्या सध्याच्या व्यवसायाची घडी पुन्हा स्थापित करण्याची आहे. आधी होते तेच व्यवसाय लयाला गेलेले आहेत, तिथे भविष्यासाठी आम्ही कोणता पायंडा पाडणार आहोत? विद्यमान व्यवसायांचा फेरविकास हाच आजच्या घडीला सर्वात मोठा विकास ठरू शकेल असे मला वाटते. काश्मीर सध्या आर्थिक पतनाच्या समीप जाऊन पोहोचला आहे. त्या संबंधाने तातडीने काहीतरी करण्याची नितांत गरज आहे.

येणाऱ्या काळाकडे तुम्ही कसे पाहता?

– आम्ही आशावादी आहोत. मी एक व्यापारी आहे आणि मला माझा व्यवसाय कोणत्याही स्थितीत करायचाच आहे. परिस्थिती लवकरच बदलेल आणि काश्मीर खोऱ्यातील व्यापार-उदीमाला चालू वर्षांत काहीसा दिलासा मिळेल अशी आशा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2020 4:20 am

Web Title: interview with shaikh ashik president of kashmir chamber of commerce and industries abn 97
Next Stories
1 हास्य आणि भाष्य : प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे..
2 इतिहासाचे चष्मे : वसाहतवाद : युगांतराचा मागोवा
3 खेळ मांडला.. : कोबी ब्रायंट समजून घेताना..
Just Now!
X