News Flash

आत्मपरीक्षणाचा अंकुश

मागच्या ‘रागदारी’ या लेखात आपण पाहिले की, राग ही एक अनुरूप भावना आहे. तिच्यात सकारात्मक ऊर्जा आहे. त्या ऊर्जेचे वर्णन करताना ज्ञानेश्वरांनी लिहिले आहे, हे आगा

| July 7, 2013 12:08 pm

मागच्या ‘रागदारी’ या लेखात आपण पाहिले की, राग ही एक अनुरूप भावना आहे. तिच्यात सकारात्मक ऊर्जा आहे. त्या ऊर्जेचे वर्णन करताना ज्ञानेश्वरांनी लिहिले आहे,
हे आगा तव घडले।
जीवी चि आधी जडले।
हे चतन्याचे शेजारी।
वसती ज्ञानाच्या एकहारी।
शरीराबरोबरच उत्पन्न झालेली, अंत:करणात चिकटून राहिलेली ही भावना चतन्याच्या शेजारी आहे. अस्तित्वाशी निगडित प्रश्न निर्माण झाल्यावर रागाचा जन्म होतो, परंतु रागाचे क्रोधात रूपांतर म्हणजेच विरूप भावनेत रूपांतर झाले की, विवेक गळून पडतो. जसे समर्थानी सांगितलं की, अहंकारातून मत्सर, मत्सरातून तिरस्कार व तिरस्कारातून क्रोध प्रबळ बनतो. तो आत्मनाशाकडे नेतो. जसं मंथरेने आधी कैकेयीचा पुत्राभिमान किंवा पुत्राविषयीचा अहंकार जागृत केला. सवतीमत्सराच्या फुंकणीने ते निखारे आणखीनच फुलवले आणि महाराणी कैकेयी क्रोधागारात गेल्या आणि तेथूनच पुढे घडलं ते रामायण! आपल्या सवतीच्या या क्रोधाला कौसल्याने व आईच्या क्रोधाला रामाने जर क्रोधानेच उत्तर दिलं असतं तर? पण, त्यांचा ‘संयम’ त्यांना ‘मोठं’ करून गेला, तर कैकेयीच्या क्रोधाने तिला तिच्या सख्ख्या पुत्राच्या भरताच्या मनातून कायमचं उतरवलं, हे नक्की!
पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराज मिर्झाराजे जयसिंहाच्या विनंतीवरून औरंगजेबाच्या भेटीस आग्य्राला गेले; परंतु तिथे दरबारात पोहोचताच त्यांना पंचहजारी मनसबदारांबरोबर उभं केलं गेलं. हे पाहताच तहामुळे दुखावल्या गेलेल्या महाराजांच्या तळपायाची आग मस्तकात गेली व त्यांनी क्रोधाने त्याचा जाहीर निषेध व्यक्त केला. प्रत्यक्ष औरंगजेबासमोर असं करण्याचा हा पहिलाच प्रसंग, त्याही पुढे जाऊन त्याच्याकडे पाठ फिरवून दरबारातून ते संभाजीराजांसकट निघून गेले. केवढा घोर अपमान! त्या अपमानामुळे महाराजांच्या रागाचा पारा चढून क्रोध येणं हे स्वाभाविकपणे घडलं; परंतु औरंगजेबाने नजरकैदेत ठेवताच महाराजांनी क्रोधाला आवर घातला, कारण त्यांना औरंगजेबाचा इतिहास माहीत होता. प्रत्यक्ष वडिलांना, भावांना कैदेत ठेवून हाल हाल करून मारणारा कर्दनकाळ असलेल्या या माणसाशी गाठ होती! आणि महाराजांकडे स्वराज्यातील जनता मोठय़ा आशेने पाहात होती. त्यामुळे आपल्याला आपला अपमान गिळून युक्तीने काम करायला पाहिजे हे त्यांनी ओळखलं. क्रोधाला आवर घातला. त्यातूनच पुढे आग्य्राहून ‘जादूमय’ सुटकेचा अद्भुत प्रसंग घडला! थोडक्यात, आपल्या क्रोधाकडे त्यांनी तटस्थ नजरेनं पाहिलं. आपण राजे-महाराज आहोत, आपल्याला ‘यथायोग्य’ वागणूक मिळालीच पाहिजे या वृथा अभिमानातून क्रोध भडकला होता. औरंगजेबासारख्या क्रूरकम्र्याकडून अशी अपेक्षा बाळगणे गर होतं हे, तसंच त्यातून स्वराज्यावर त्याचे दूरगामी दुष्परिणाम होतील, हे लक्षात घेऊन म्हणजे विवेकाची कास धरून महाराजांनी क्रोधाला आवर घातला व एवढय़ा ‘पोलादी’ नजरकैदेतून कशी जादू केल्यासारखी स्वत:ची, मुलाची व सर्वच सहकाऱ्यांची सहीसलामत सुटका करून घेतली.
फएइळ चे प्रणेते अल्बर्ट एलिस यांनीदेखील त्यांच्या जीवनात क्रोधाला कसा आवर घातला, रागाचं व्यवस्थापन केलं हे पाहणं उद्बोधक ठरेल. तरुण वयात त्यांची कॅरल नावाच्या मुलीबरोबर मत्री झाली. हळूहळू त्या मत्रीचं प्रेमात रूपांतर झालं, परंतु ते होतानासुद्धा त्यांना खूप पाठपुरावा करावा लागला होता. कॅरल आपल्या प्रेमाला योग्य प्रतिसाद देईल का, वगरे प्रश्न होते; परंतु खूप पाठपुरावा केल्यावर कॅरलने त्यांच्या प्रेमाला प्रतिसाद दिला. मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मग त्या संदर्भात तिच्या वडिलांशी बोलायचं होतं, म्हणून ते तिच्या घरी जेवायला गेले. दोघांच्या आíथक परिस्थितीत खूपच दरी होती. अल्बर्ट यांची परिस्थिती सामान्य होती, तर कॅरलचं घर श्रीमंती थाटाचं होतं. उत्कृष्ट इंटीरिअर डेकोरेशन, घरात नोकर वगरे शाही थाट होता. कॅरलच्या वडिलांनी जेवताना तिरस्कारयुक्त नजरेनेच पाहिलं. त्यांचं राहण्याचं ठिकाण, त्यांच्या आई-वडिलांचा झालेला घटस्फोट वगरे ऐकून त्यांच्या कपाळावर आठय़ांचं जाळं निर्माण झालं, पण जेवणानंतर जेव्हा त्यांना लग्नाचा निर्णय ऐकवला तेव्हा त्यांनी त्यांचा, आई-वडिलांचा, आíथक परिस्थितीचा अपमानजनक उल्लेख करून ‘तू असं करूच कसं शकतोस, लग्न केलंस तर माझ्याशी गाठ आहे,’ अशी धमकी दिली व घराबाहेर काढलं. त्यामुळे संतापाने बेभान झालेले अल्बर्ट वाट फुटेल तिकडे चालत गेले. किती वेळ, कुठे चालत होते ते त्यांचं त्यांनाच कळत नव्हतं. पाय नेतील तिथे जात होते. कॅरलच्या वडिलांचे विषारी शब्द त्यांचा पाठलाग करत होते. घरचा, आईवडिलांचा तुच्छतापूर्ण उल्लेख आठवून वेदनांनी ते आतल्या आत विव्हळत होते. ‘नकारच द्यायचा होता तर स्पष्ट नाही म्हणायचं, अपमान करून द्यायची काय गरज होती? माझ्या भावनांना पायदळी तुडवण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला?’ वगरे प्रश्न त्यांच्या मनात उत्पन्न झाले.
मग त्यांनी या सगळ्याकडे तटस्थतेनं पाहायला सुरुवात केली. ‘मला संताप आलाय, पण त्यामागे माझे भरकटणारे विचार आहेत आणि या संतापात जळत राहिलो तर कॅरलशी लग्न करण्याचा मुद्दा बाजूला राहील. त्यामुळे तिच्या वडिलांच्या बोलण्यापेक्षा लग्नाचा विचार करणं आवश्यक आहे,’ असं त्यांना वाटलं.
मग त्यांनी विचार केला, ‘मी तिच्या वडिलांबद्दल जे काही विचार करतोय ते शहाणपणाचं आहे का? ते जे बोलायचं ते बोलून गेले आहेत, आता ती वस्तुस्थिती नाकारणं शहाणपणाचं नाही. घडलेली गोष्ट नाकारणं योग्य नाही. आणखीन जेव्हा मी म्हणतो, ते मला असं कसं बोलू शकतात, तेव्हा त्याचा अर्थ त्यांनी मला असं बोलायलाच नकोच होतं, असा होतो. हा वास्तवाचा विपर्यास आहे. म्हणजे तिच्या वडिलांनी माझ्या मनाप्रमाणे वागायला हवं असा माझा अट्टहास आहे; पण खरं पाहाता, त्यांनी कसं वागावं हे मी ठरवू शकत नाही. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे वागण्याचं जसं स्वातंत्र्य आहे तसंच मलाही आहे आणि त्यांचं बोलणं मनाला लावून घेणं म्हणजे ते बोलले ते खरं मानणं. त्यांनी मला नाकर्ता म्हटलं म्हणजे मी लगेच तसा आहे का? उलट एवढय़ा खडतर परिस्थितीत कष्टाने शिक्षण घेऊन कौटुंबिक जबाबदारी, चरितार्थ सांभाळतोय हा नक्कीच नाकत्रेपणा नाही. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला अवाजवी महत्त्व न देता कॅरलशी लग्न करण्याच्या निश्चयावर ठाम राहण्याच्या माझ्या स्वातंत्र्यावर शिक्कामोर्तब केलं..’ आणि त्यांनी स्वत:ला शांत केलं.
बरं एवढं करून नंतर कॅरलशी त्यांनी लग्न केलं, तिच्या वडिलांचा विरोध असताना आणि हनिमूनसाठी त्या तरल भावनेत त्यांनी हॉटेलच्या रुममध्ये प्रवेश करताच त्यांना कॅरलची चिठ्ठी सापडली की, ‘मी डॅडींना फसवू शकत नाही, मी त्यांच्याकडे जात आहे..’ हे वाचून तर त्यांच्या संतापाचा परत स्फोट झाला. ते तिच्या घरी गेले, तर कॅरलच्या वडिलांनी घटस्फोटाच्या कागदावरच त्यांची सही घेतली व कॅरल हे शांतपणे पाहात होती. एवढा धक्का, लग्नाच्या दिवशीच घटस्फोट! त्यानंतर संतापाचा सतत चार-आठ दिवस उद्रेक होत होता. रागाने ते ओरडायचे, मुठी आपटायचे, गादी तुडवायचे, मोठय़ाने रडायचे. छोटय़ा छोटय़ा गोष्टींनी रागाचा, संतापाचा स्फोट व्हायचा. अगदी सगळी ऊर्जा संपल्यासारखं वाटायचं. असं पाच-सहा दिवस गेल्यावर त्यांनी विचार केला की, हे थांबवायला हवं. मग सगळ्या घटनांचा आढावा घेतला. मग चित्र स्पष्ट व्हायला लागलं. त्यांनी मनाशी विचार केला, ‘या संतापात बाह्य परिस्थितीचा वाटा होता; परंतु केवळ परिस्थिती कारणीभूत नव्हती. या परिस्थितीतून जाणाऱ्या प्रत्येकालाच थोडा असा संताप येत होता? नाही, मग मला येतोय तर त्याला कारण माझे विचार आहेत, परिस्थिती नाही. शांतपणे विचारांचा वेध घेता लक्षात आलं की, सभोवतालचं जग मला हवं तसं असायलाच पाहिजे, नसलं तर ती परिस्थिती मी सहन करू शकणार नाही, हा अविवेक मला क्रोधाकडे नेत होता.’
‘सभोवतालच्या जगाने माझ्या म्हणण्याप्रमाणे वागायला मी काही सृष्टीचा नियंता नाही आणि ते माझ्या मनाप्रमाणे वागले नाहीत, तर जी परिस्थिती उद्भवते ती खरंच इतकी भीषण नाही की, त्यामुळे मला मृत्युसारख्या गोष्टीला सामोरं जावं लागेल. भूकंप, पुराइतकी भीषण नाही. त्याचबरोबर माझ्या संतापामुळे इतर लोक तर बदलत नाहीतच, उलट माझं मानसिक स्वास्थ्य बिघडतं. त्यामुळे मी माझ्या विचारांना बदललं पाहिजे. त्यासाठी ‘व्हर्जिनिया सटीयर’ने म्हटल्या प्रमाणे ‘We have to live in the world as it is, and not as it should be’, त्यामुळे सभोवतालच्या जगाचा विनाअट स्वीकार करा व स्वत:ला बदला हा पर्याय मी स्वीकारला तर माझं मन:स्वास्थ्य सुधारेल!’
थोडक्यात, क्रोध आला तरी थोडय़ा वेळानंतर तटस्थतेने किंवा विलगपणे विचारांचं आत्मपरीक्षण केलं तर तो आवरणं शक्य होतं हे निश्चित! सतत जागृत राहून मनावर आत्मपरीक्षणाचा अंकुश ठेवला तर विचारांचं भान व भावनांवर नियंत्रण मिळवता येईल. जसं,
तुका म्हणे मना पाहिजे अंकुश।
नित्य नवा दिस जागृतीचा॥  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2013 12:08 pm

Web Title: introspection
Next Stories
1 ‘राग’दारी
2 योग्य दिशा
3 माझं अवकाश
Just Now!
X