एखादी गोष्ट आपली कमजोरी असू शकते व तीच गोष्ट आपले शक्तिस्थानदेखील असू शकते, असे सांगितले तर बहुतांश मंडळी चक्रावून जातील. पण ‘सोने’ हा शब्द उच्चारला की मनात एकाच वेळेला सकारात्मक व नकारात्मक विचार येतात. अडीअडचणीला स्वत:चे दागदागिने विकून घराला आíथक संकटातून खेचून बाहेर काढणाऱ्या स्त्रिया बघितल्या की सोन्याची ताकद समजते. त्याचवेळी शेजारणीकडे एखादा नवीन दागिना बघितला की तसाच दागिना खरेदी करण्यासाठी आकाशपाताळ एक करणाऱ्या स्त्रीकडे बघून सोने हा एक शाप वाटतो. गुंतवणूकविश्वात तर सोने हा एक प्रचंड गोंधळ निर्माण करणारा विषय आहे.
‘सोने एक पशाचेही उत्पन्न देत नाही!’ अशा शब्दांत जगातील सर्वात श्रीमंत गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी सोन्याची बोळवण केली आहे. वॉरेन बफे जरी सोन्याला गुंतवणूक मानत नसले तरी बरेच गुंतवणूकतज्ज्ञ पोर्टफोलिओमध्ये ५ ते १० टक्के सोने असावे असे म्हणतात.
सोने महागाईशी लढायची एक ढाल आहे. अर्थव्यवस्था संकटात सापडते तेव्हा सोन्याचे भाव वर जातात. अर्थव्यवस्थेची मंदी, मोठमोठे घोटाळे, परचक्र अशा काळात शेअर्स, बाँड्स व इतर मालमत्तांचे भाव कोसळतात. मात्र, जेवढी अनिश्चितता जास्त, तेवढा सोन्याचा भाव अधिक. त्यामुळे ‘कठीण समय येता’ पोर्टफोलिओचा त्राता म्हणूनही सोने महत्त्वाचे ठरते. परंतु सोन्यापासून कसलेही उत्पन्न मिळत नाही. शेअर्सपासून डिव्हिडंड मिळतो, रोख्यांवर व्याज मिळते. सोन्याचे मात्र तसे नाही. त्यामुळेच सोन्यावर अतिरेकी भिस्त ठेवू नये. मरण अटळ आहे म्हणून फक्त आयुर्वमिा घेणे जेवढे मूर्खपणाचे ठरेल; तेवढाच मूर्खपणा सगळे पसे सोन्यात गुंतविण्यात आहे. पोर्टफोलिओमध्ये ५ ते १० टक्के सोने असले म्हणजे झाले.
सोन्याचा अंतर्भाव गुंतवणुकीत केला म्हणून सोन्याच्या दागिनाप्रेमींनी हुरळून जाऊ नये. सोन्याचे दागिने म्हणजे सोन्यातील गुंतवणूक नव्हे. गुंतवणुकीची व्याख्या समजून घेतली तर सोन्याचे दागिने व सोन्यातील गुंतवणूक या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे समजून येईल.
गुंतवणूक ही एक प्रक्रिया आहे. सुरुवातीला माणसाकडे रोकड असते. ती रोकड देऊन तो एखादी मालमत्ता (शेअर्स, रोखे) विकत घेतो व कालांतराने ती मालमत्ता विकून त्याच्या हाती रोख रक्कम येते. म्हणजेच रोख- मालमत्ता- रोख अशा तीन टप्प्यांत ही प्रक्रिया पूर्ण होते. आता सोनेखरेदीची प्रक्रिया बघू. माझ्याजवळ रोख रक्कम असते, ती देऊन मी सोन्याचे दागिने विकत घेते. पण ते दागिने मी कधीच विकत नाही. जोवर माझ्यावर एखादे मोठे आíथक संकट येत नाही, तोवर मी सोन्याचे दागिने विकत नाही. सोन्याचा भाव वाढला म्हणून सोने विकणारी व्यक्ती विरळाच.
 किंबहुना, घरातील दागिने विकणे हे घर संकटात आल्याचे लक्षण मानले जाते. म्हणून सोन्याचे दागिने म्हणजे सोन्यातील गुंतवणूक नव्हे. ती आपली भावनिक गरज आहे.
खरेदी-विक्रीची सहजता हा मुद्दादेखील सोन्याच्या गुंतवणुकीच्या चच्रेत लक्षात घेतला पाहिजे. सोने जागतिक चलन आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात ते विकता येते, हे आपण अनेकदा वाचले-ऐकले आहे. पण ते कोणत्या किमतीला विकता येते, हे बघणे महत्त्वाचे आहे. सोन्याचे नाणे खरेदी करताना बाजारभावापेक्षा जास्त पसे सोनार घेतो. याला तुम्ही घडणावळ म्हणू शकता. तेच नाणे त्याच सोनाराकडे विकले तर तो बाजारभावापेक्षा ५ ते १० टक्के कमी पसे आपल्याला देतो. तसेच वळी, नाणी, बिस्किटे साठवून ठेवणे ही एक वेगळीच जोखीम आहे. सोन्याची गुणवत्ता हा पट्टीच्या पोहणाऱ्यांना जलसमाधी देणारा महासागर आहे. त्याबद्दल न बोलणे चांगले. यावर उपाय म्हणून म्युच्युअल फंडांनी सोन्यात गुंतवणूक करणारे गोल्ड ईटीएफ बाजारात आणले. गोल्ड ईटीएफचे एक युनिटचे मूल्य साधारणत: एक ग्रॅम सोन्याच्या मूल्याच्या आसपास असते. परंतु स्टॉक मार्केटमध्ये या युनिटची खरेदी-विक्री नेहमी एक ग्रॅम सोन्याच्या किमतीच्या जवळपास होईल, याची शाश्वती नाही. तरीही खरेदी-विक्रीची सोय, सोयीची कररचना आणि विश्वासार्हता या कसोटय़ांवर गोल्ड ईटीएफ बरे वाटतात. डीमॅट खाते असले की गोल्ड ईटीएफच्या युनिटची खरेदी-विक्री करणे शक्य होते.
आता गोल्ड ईटीएफचा एक व्यावहारिक उपयोग बघू. समजा, पुढील वर्षी मे महिन्यात तुमच्या घरात एक लग्न आहे. तुम्हाला तेव्हा दहा तोळ्याचे सोन्याचे दागिने घ्यायचे आहेत. तेव्हा सोन्याची किंमत अचानक वर गेली तर फटका नको म्हणून दर महिन्याला एक तोळा याप्रमाणे सोने खरेदी करण्याचा तुमचा विचार आहे. अशा परिस्थितीत दर महिन्याला गोल्ड ईटीएफचे दहा युनिट दहा महिने घ्यावेत. सोनेखरेदीला जाताना ते युनिट विकून रोख पसे घ्यावेत व मनाप्रमाणे दागिने खरेदी करावे. मधल्या काळात सोन्याची वळी, नाणी सांभाळायची जोखीम नाही. ज्या सोनाराकडून वळी घेतली, त्याच सोनाराकडून दागिने घ्यायचे अलिखित बंधन नाही. सोन्याचे भाव फार खाली-वर झाले तर कराचे भान बाळगावे लागेल.