वर्तमानपत्रामध्ये आलेल्या एका अनोख्या बातमीने माझे लक्ष वेधून घेतले. भारतामधील एक प्रसिद्ध उद्योगपती वृद्धापकाळामुळे एका सप्ततारांकित हॉटेलच्या खोलीमध्ये निधन पावले. वास्तविक पाहता बातमीच्या एवढय़ा भागापर्यंत जगावेगळे फारसे काही नव्हते. परंतु बातमीचा उत्तरार्ध माझ्या डोक्यात विचारचक्रांना गती देता झाला. सदर उद्योगपती त्या हॉटेलमधील एका खोलीलाच गेली ३७ वर्ष आपले घर करून राहिलेले होते.
३७ वर्षांचा प्रदीर्घ काळ, तारुण्यातून प्रौढावस्था आणि तद्नंतर येणारी वृद्धावस्था. या साऱ्या अवस्थांना ते त्या हॉटेलच्या विशिष्ट खोलीमधूनच सामोरे गेले. त्यांची संपत्ती अंदाजे साडेतीनशे कोटी होती. इतक्या धनाढय़ उद्योगपतीला देशातील कोणत्याही शहरात अतिउच्चभ्रू वस्तीमध्ये आपला बंगला किंवा पेंटहाऊस घेणे शक्य झाले नसते का? कदाचित त्यांची तशी घरे असतीलही. पण तरीसुद्धा हॉटेलमधील त्या खोलीला त्यांनी त्यांच्या आयुष्यात प्रथमक्रम दिला होता आणि तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक चित्रतारे तसेच उद्योगपती प्रदीर्घ काळपर्यंत विशिष्ट हॉटेलमधील खोल्या आरक्षित करून ठेवतात याची मला कल्पना आहे. आमचा लाडका सदाबहार देवानंद मुंबईच्या सन् अँण्ड सँडमध्ये अशाच एका आरक्षित स्वीटमध्ये अनेक दिवस राहायचा, हेही त्याने ‘रोमान्सिंग विथ लाइफ’ या आपल्या आत्मचरित्रात नमूद केले आहे. परंतु, आयुष्याची ३७ वर्ष  एका हॉटेलला आपले घर करणे अद्भुतच म्हणावयास हवे. बरं ते हॉटेल त्यांच्या स्वत:च्या मालकीचेही नव्हते.
कोणत्या गोष्टी या निर्णयाला कारणीभूत ठरल्या असाव्यात? कदाचित त्यांना आवडत असलेला एकटेपणा, लाँड्री, जेवणखाण, स्वच्छता आणि टापटीप यांचा विचार त्यांनी नक्कीच केला असेल. कदाचित सुरक्षेचे मुद्देही अंतर्भूत असतील. तर कदाचित ऐरेगरे, नथ्यूखैरे यांच्या व्हिजिटस् टाळण्यासाठी हा मार्ग चोखाळला असेल. कारण कोणतेही असो, हॉटेलला आपले कायमस्वरूपी घर करण्याचा त्यांचा हा निर्णय अद्भुतच म्हणावयास हवा. आपण सारेचजण सभा, परिषदा, कार्यशाळा, व्याख्याने आणि कधी मित्र आणि कुटुंबियांसोबत काढलेल्या सहली या कारणांस्तव हॉटेलमध्ये राहणे पसंत करतो. अगदी ‘एक्स्ट्रा कॉट’ टाकून दोघांच्या रूममध्ये चौघांनी राहण्याचा उपद्व्यापही आमच्या उमेदवारीच्या काळात आम्ही केला आहे. आणि आजही परिषदांना जाताना माझे पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थी करतात. आयुष्यात जसजशी प्रगती होत जाते तसतशी खोलीच्या आरक्षणाच्या स्तरामध्ये उन्नती होते आणि त्रितारांकितपासून सप्ततारांकित हॉटेलकडेही वाटचाल होते. आपल्या खिशाची खोली जेवढी मोठी, तेवढी मिळणाऱ्या खोलीची लांबी वाढते. मग चहा १८० रुपयाला का? आणि बाहेर १० रुपयाला मिळणारी पाण्याची बाटली ५० रुपयांना का? हे प्रश्न अप्रस्तुत ठरतात. हा रुबाब फार तर एखाद् दोन दिवस पुरतो आणि पुन्हा घराच्या अनामिक ओढीने आपण आपल्या वन अथवा टू बी-एच-केकडे धाव घेतो.  मग बाथरूममध्ये बादलीतले गरम पाणी तांब्याने डोक्यावर ओतून घेताना जाकुझीची आठवण होते, पण शेवटी काय, साबण लावून पाणीच तर ओतायचे ना, अशी आपण आपली समजूत घालतो.
विद्यापीठाचे एक अंग म्हणजे हॉटेल आणि कॅटरिंग मॅनेजमेंटचा विभाग असल्यामुळे त्या अभ्यासक्रमाचा जवळून आणि बारकाईने अभ्यास करण्याची संधी मला मिळाली आहे. या विद्याशाखेकडून तुमच्या-माझ्यासारख्या सर्वसामान्यांनी पुष्कळ काही शिकण्यासारखे आहे. अगदी जेवणाच्या ताटात कोणते पदार्थ कुठे वाढायचे इथपासून किती खोलगट वाटय़ांना पसंती द्यावयाची, कोणत्या स्वरूपातील चमचे वापरावयाचे आणि कोणते मद्य कोणत्या आकाराच्या ग्लासमधून सव्‍‌र्ह करावयाचे, इत्यादी हाऊसकीपिंगची काही तत्त्वे आपण जर आपल्या रोजच्या घरामध्ये अमलात आणली तर फारसे कष्ट न घेता घरातील टापटिपीला विलक्षण उठाव येईल हे सत्य आहे. विद्यापीठांनीही केवळ पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांच्या चौकटीत अडकून न पडता अशा गोष्टींचे चार आठवडय़ांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालू केले तर त्याला आपण मोठय़ा प्रमाणात पाठिंबा देणे गरजेचे आहे. कारण यामुळे आपलेच जीवन अधिक सुंदर आणि सहन करता येण्याजोगे होईल.  
अर्थात, घराचे हॉटेल करावयाचे असे माझे अजिबात म्हणणे नाही. कारण घर आणि हॉटेल या दोन वास्तूंमध्येच मूलभूत फरक आहे. घर दगड-विटांपेक्षा माया आणि आत्मीयतेने सजते. त्याला प्रेमाचे झुंबर लागते आणि परस्परांवर ओरडण्याचा तसेच जिव्हाळ्याने वागण्याचा हक्क प्राप्त होतो. यालाच आपण ‘घरपण’ असे म्हणतो. इथल्या गॅलरीत मग घरातील व्यक्तींचे ओले कपडे वाळत घातले म्हणून कोणी तक्रार करत नाही. किंबहुना, मुंबईसारख्या महानगरात त्या गॅलरीचे अडीच फूटही काही वर्षांनंतर हॉल आणि स्वयंपाकघराला पाय पसरायला अधिक जागा उपलब्ध करून देतात. इथल्या फुलबागा डालडय़ाच्या डब्यात फुलतात आणि नवीन लग्न झालेले जोडपे घरात आले की जुनीजाणती माणसे हॉलमध्ये रात्री पथारी पसरतात. हे सांगावे लागत नाही, याचा वेगळा चार्ज पडत नाही, याच्यावर सरचार्ज आणि सरकारची डय़ुटी नसते, कारण हे घर असते.  नीटनेटके आणि टापटीप ठेवणे हे बाहेर नोकरी करण्यापेक्षा अधिक जटिल असे चोवीस तासाचे काम असते. आणि कधी कधी इतस्तत: पसरलेल्या पसाऱ्यामध्येही एक आगळीवेगळी शिस्त असते.   “Please don’t touch my stuff, because there is a tremendous order in my disorder”  हे माझे घरातील रोजचे पालूपद माझ्यातील शिस्तप्रिय बेशिस्तीला सन्मान देत असते. घर आवरण्याच्या निमित्ताने कोणी कागद, फाइल्स हलविल्या की झालाच गोंधळ म्हणून समजावयाचे. त्यातच घरातील लहान मुले आणि पाळीव प्राणी यांचा घरातील विविध गोष्टींवर तुमच्यापेक्षा वरचढ हक्क असतो. म्हणून तर घरातील सगळेजण जमिनीवर आणि चार पायांची आमची श्वानकन्या ‘जेसी’ कोचावर हे दृश्य आमच्या घरात नवीन नाही. घराचे घरपण आणि सप्ततारांकित हॉटेलची टापटीप या दोन बाबीच मुळात परस्परविरोधी आहेत. अर्थात कोणाला काय आवडते हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तेव्हा हॉटेलमधील नीटनीटकेपणा मी माझ्या डोळयांत साठवतो. तेथील कलाकुसर, रंगांची जुळणी, उत्तमरीत्या देखभाल केलेले फíनचर या सर्वाचे अप्रूप वाटते. पण शेवटी घरातील सोफ्याच्या कठडय़ावर किंवा डायिनग टेबलच्या लाकडावर, ‘बरसात में तुमसे मिले हम, ताक् धीनाधिन’ याचा ठेका वाजविताना जो ‘मझा’ येतो, तो सप्ततारांकित हॉटेलमध्ये येत नाही.  
.. तस्मात् घरातील महिलावर्गाने कितीही आरडाओरडा केला तरी मी संध्याकाळी बाथरूममधून बाहेर आल्यावर टॉवेल गुंडाळून उघडय़ा अंगाने टी.व्ही. पाहण्याचा माझा नेम चुकविणार नाही. ऑफिसमधून आल्यावर पायातील मोजे हॉलमध्येच टाकणार आणि कोचावर पाय वर घेऊन बसणार.. कारण हे माझे घर आहे.