News Flash

इस्लाम- ज्ञात आणि अज्ञात

इस्लामच्या उदयानंतर पैगंबर काळात आणि त्यानंतर धर्मप्रसार आणि धर्मातरे झाली.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. शमसुद्दिन तांबोळी

lokrang@expressindia.com

आज भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर इस्लाम हा बहुचर्चित विषय ठरला आहे. इस्लामनेच आपल्या अनुयायांना बडी किताब कुराणचा अन्वयार्थ आपापल्या पद्धतीने लावण्याची परवानगी दिली आहे. इस्लामचा पगाम देणारे हजरत मुहंमद पैगंबर यांच्या निधनानंतर सत्तास्थान आणि खलिफा पदावरून शिया-सुन्नी हे इस्लामचे दोन संप्रदाय निर्माण झाले. पहिल्या चार खलिफांचा कालावधी  इस्लामचा सुवर्णकाळ समजला जातो. या काळातच कुराण संपादन करण्यात आले. या काळातच कुराणातील कालक्रम, घटना आणि अन्वयार्थ याबाबत विविध मतभेद समोर आले. या विविध विचारधारेवर आधारित अभ्यासकांच्या नावाने सुन्नी संप्रदायात  हानफी – हनबली – मालिकी आणि शाफी हे उपपंथ निर्माण झाले. जगात विविध मुस्लीम देशांत त्यांचे  अनुयायी आहेत.

इस्लामच्या उदयानंतर पैगंबर काळात आणि त्यानंतर धर्मप्रसार आणि धर्मातरे झाली. यात विविध टोळ्या, प्रगत, अप्रगत गटांचा समावेश आहे. भारतात व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या लोकांकडून इस्लामचा प्रवेश झाला. हे व्यापारी इस्लामचे ज्ञानी होतेच असे नाही. नंतर राज्यकर्त्यांचा प्रभाव, सुफी संतांची शिकवण यातून भारतातील उच्चवर्णीय, आदिवासी, अप्रगत, अस्पृश्य समजलेल्या समूहाने इस्लाम स्वीकारला. स्वत:चा अभ्यास नसल्याने किंवा इस्लाम समजून दिला नसल्याने हा समाज धर्माचरणासाठी मुल्ला, मौलवी, उलेमा या पुरोहित वर्गावर अवलंबून राहिला. गरज असेल तेव्हा फतव्यामार्फत धर्माचरण करण्यात येत असे. इस्लामने स्वत:ची अक्कल वापरण्याचा सल्ला दिला, मात्र या धर्मातरित समाजाने नक्कल करण्यात समाधान मानले. यातूनच इस्लामला अनअपेक्षित असलेली  पुरोहितशाही जन्माला आली. समाजाने धर्माबाबतीत परावलंबित्व स्वीकारले. यातूनच अर्थ, अनर्थ आणि अन्वयार्थ जन्माला आले.

भारतातील सुन्नी संप्रदायात देवबंदी, बरेलवी, तबलिकी अशा प्रभावी विचारधारा आहेत. यातूनच इस्लाम मधील बहुसांस्कृतिकता जन्माला आली.  इस्लामच्या शिकवणुकीबद्दल संभ्रम निर्माण झाले. विविध परंपरा, चालीरीती म्हणजेच इस्लाम, राजकीय आणि धार्मिक अश्रफी वर्गाचे धार्मिक वर्तन म्हणजे इस्लाम असा साधा-सोपा अर्थ काढण्यात आला. तोच अर्थ प्रसारित झाला. हाच इस्लाम आहे असा अन्य धर्मीयांचा समज झाला. ही पार्श्वभूमी अनेक अनर्थास कारणीभूत ठरली. ज्यामुळे इस्लामची उदारमतवादी परंपरा अस्पष्ट राहून पारंपरिक प्रतिमा गडद झाली.

ज्येष्ठ बुद्धिप्रामाण्यवादी आणि मानवतावादी अभ्यासक एम. एन. रॉय आपल्या ‘हिस्टॉरिकल रोल ऑफ इस्लाम’मध्ये असे म्हणतात की, ‘‘इस्लामच्या बाबतीत सर्वात अनभिज्ञता असणारा समाज म्हणजे मुस्लीम समाज आहे.’’ हा अभिप्राय लक्षात घेतला तर इस्लामच्या बाबतीत अन्य धर्मीय समुदायातील अनभिज्ञता किती असेल हे आपण समजून घेऊ शकतो. इस्लामसंबंधी असणारे अनेक समज-गैरसमज, मतप्रवाह, वादग्रस्त संकल्पना यांबद्दलचा अभ्यासपूर्ण खुलासा अभ्यासक अब्दुल कादर मुकादम यांनी ‘इस्लाम – ज्ञात आणि अज्ञात’ या ग्रंथात केला आहे.

लेखकाचे असे प्रतिपादन आहे की, इस्लामपूर्व काळातील स्थितीचे समग्र आकलन केल्याशिवाय इस्लामने जगाला दिलेले योगदान समजून घेता येणार नाही. पुस्तकाचा आरंभच होतो तो इस्लामची स्थापना झाली त्या भूमी आणि त्याच्या पार्श्वभूमीपासून. लेखकाचे असे म्हणणे आहे की भूमी आणि पार्श्वभूमी समजून घेतल्याशिवाय एखाद्या धर्माची बलस्थाने आणि मर्यादा याचे आकलन होणार नाही. इस्लामपूर्व  अज्ञानयुगात असणारी अराजकता, अन्याय, अंधश्रद्धा, अत्याचार, शोषण, नरबळी प्रथा, अनेक देवदैवतांचे अस्तित्व वगैरे, हे त्या काळातील मातृसत्ताक, पितृसत्ताक उपासना पद्धती अस्तित्वात होत्या. यांच्यातील सत्तास्पर्धा कलह  यासंदर्भात लेखकाने दिलेले दाखले इस्लामचे तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतात. हजरत मुहंमद यांच्या जन्मानंतरचा संघर्ष, अनाथपणा, जडणघडणीवरील परिणाम, त्यांचा प्रामाणिकपणा, विवाह वगैरे. ६१० मधील इस्लामचे आगमन आणि ६३२ मध्ये प्रेषितांचे झालेले निधन या कालखंडांतील घडामोडी, वेळोवेळी केलेला संघर्ष, घेतलेल्या भूमिका आणि अनुयायांना दिलेले सल्ले, समझोते ही पार्श्वभूमी इस्लामच्या आकलनासाठी उपयुक्त असल्याने त्याचा सविस्तर तपशील लेखकाने विविध प्रकरणांतून स्पष्ट केला आहे.

याचबरोबर इस्लामची समाज रचना, स्वरूप, अर्थविचार आणि मूल्यव्यवस्था सामाजिक क्रांती समजून घेण्यासाठी साहाय्यक ठरते.

इस्लामी संस्कृतीची वाटचाल समजून घेत असताना मुस्लीम समाजमानसावर प्रभाव असलेल्या शरीयत म्हणजे आचारसंहिता आणि फिक् म्हणजे न्यायशास्त्र यासंदर्भात लेखकांनी दिलेली माहिती अनेक गैरसमज दूर करणारी आहे. इस्लाममधील महिलांचे स्थान आजही बहुचर्चित विषय आहे. तलाक पद्धती, बहुपत्नीत्व, बुरखा पद्धती यासंदर्भात केलेले विवेचन तसेच यानिमित्ताने होणारे आरोप आणि प्रत्यारोप, इ. वाचकांना इस्लामकडे पाहण्याचा नवा विचार देऊ शकतील.

इस्लामला कुटुंबनियोजन मान्य नाही अशी धर्मवादी भूमिका पुरोहित वर्गाने घेतल्यामुळे त्याचा परिणाम मुस्लीम समाजावर झाला. हिंदू आणि इतर धर्मीयांकडूनही इस्लामला कुटुंबनियोजन मान्य नसल्याचा प्रचार करण्यात आला. मुस्लीम समाजात कुटुंबनियोजन केले  जात नाही असा आजही आरोप करण्यात येतो. त्याचे राजकारण होत असल्याचे आपण अनुभवतो. अब्दुल कादर मुकादम यांनी ‘इस्लाम आणि कुटुंबनियोजन’ या प्रकरणात याबाबतीत दिलेली माहिती.. गैरसमज आणि मुस्लिमांची पारंपरिक प्रतिमा दूर करणारी आहे. इस्लामचा आधार घेत मुस्लीम बांधव इस्लामला काय मंजूर – नामंजूर ठरवतात. पुरोहित वर्गाने विरोध केला की अशी शिकवण धर्मग्रंथातच असली पाहिजे असा एक तर्क काढण्यात येतो. मात्र, यासंदर्भात धर्मग्रंथातील उपदेश समजून घेण्याच्या भानगडीत लोक पडत नाहीत. त्यामुळे लोकसमजुती आणि धर्मग्रंथ यात तफावत दिसते.

मुस्लीम समाजाबरोबरच अन्य धर्मीयांकडून इस्लाममधील जिहाद, काफिर, दारुल इस्लाम, वहाबी इस्लाम, इस्लाममधील सनातनी परंपरा अलीकडच्या काळातील मूलत्तत्त्वादी, दहशतवादी संघटना या आणि अशा काही संकल्पना, घटनांच्या बाबतीत खल करण्यात येत असतो. या संकल्पना आणि घटनांचा मूलाधार काय आहे?  इस्लामच्या उदारमतवादी भूमिकेचा अन्वयार्थ लेखकांनी विविध संदर्भ देत पुस्तकात मांडला आहे, जो आजच्या काळात महत्त्वपूर्ण आहे.

एखाद्या धार्मिक समूहाच्या वर्तनास त्या धर्माची शिकवण जबाबदार असते असा एक रूढ समज प्रचलित आहे. त्यामुळे मुस्लीम समाजाच्या रूढीबद्ध वर्तनास इस्लामच जबाबदार आहे असे गृहीत धरले जाते. मात्र वास्तव काही औरच असू शकते. हे वास्तव इस्लाम ज्ञात आणि अज्ञात वाचताना लक्षात येईल. मुस्लीम जगतातील अनेक अप्रिय घटनांसाठी इस्लामला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्या मित्रांनी हे पुस्तक जरूर वाचले पाहिजे.

पुस्तिकाची प्रस्तावना संजीवनी खेर यांनी लिहिली आहे. त्यात या पुस्तकाचे वेगळेपण आणि महत्त्व सर्वासाठी कसे आहे हे मांडले आहे. पण या प्रस्तावनेतील एक अभिप्राय खटकला. त्या संदर्भवजा लिहितात ‘सारे दहशतवादी मुस्लीम असतात, पण सारे मुस्लीम दहशतवादी नसतात हे सत्य आज ध्यानात ठेवणे गरजेचे आहे.’ यातील सारे दहशतवादी मुस्लीम असतात, हे समीकरण पुन्हा एकदा तपासले पाहिजे असे मला वाटते.

मुस्लीम धर्मसुधारकांनी इस्लामचा उदारमतवाद मांडण्याचा प्रयत्न यापूर्वीही केला आहे. सर सय्यद अहमद खान, मोहम्मद इकबाल, मौलाना आझाद ते असगर अली इंजिनिअपर्यंत.. हीच परंपरा अब्दुल कादर मुकादम यांनी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रा. नरहर कुरुंदकर म्हणतात, ‘सर्वच धर्म मोठे असतात हे एक सत्य आहे. सर्वच धर्माच्या मर्यादा असतात हे दुसरे सत्य आहे. हिंदू समाजाने मुस्लीम धर्मातील मोठेपणा समजून घ्यावा आणि स्वत:च्या धर्मातील मर्यादा, तसेच मुस्लीम समाजाने  हिंदू धर्मातील मोठेपणा समजून घ्यावा आणि स्वधर्मातील मर्यादा.’ आपापल्या धर्मातील कालविसंगत मर्यादा समजून घेतल्यास समाजसुधारणेची प्रक्रिया अधिक गतिमान होऊ शकते. धर्मातील चिरंतन आणि तत्कालिक तत्त्वे  कोणती हेसुद्धा या पुस्तिकेत आले असते तर ते अधिक भरीव योगदान ठरले असते असे वाटते.

‘ इस्लाम- ज्ञात आणि अज्ञात’,

– अब्दुल कादर मुकादम, अक्षर प्रकाशन,

पृष्ठे- २१६, मूल्य- ३०० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2020 4:10 am

Web Title: islam dnyat ani adnyat akshar prakashan abdul kadar book review abn 97
Next Stories
1 या चिमण्यांनो, या गं या
2 सांगतो ऐका : इंदौर की गलियां!
3 अफसाना लिख रही हूँ.. : ‘तेरे बिना जिया जाये ना’
Just Now!
X