(लोकशाहीच्या पवित्र मंदिरातील पंचवार्षकि पूजा म्हणजे निवडणूक! (अति होतेय हे. पण असू दे!) या निवडणुकीच्या पहिल्या काही टप्प्यांत आमचा मतदारराजा उठला आणि उत्तरपूजेची वाट पाहत पुन्हा झोपलासुद्धा. मुंबईसह काही ठिकाणी मात्र तो डोळे किलकिले करून पाहतोय. या अर्धजागृत मतदारराजास आमची ही कळकळीची विनंती..)

जागो रे राजा, जागो रे
झोपेला टाटा कर
चहा पी, चर्चा सोड
वोटकार्ड घेऊनी
भागो रे

नोट लेना वोट देना
लालपानी घोट घे ना
जात तेरी जान लेना
फिर कहीं जा के बटन
दाबो रे
जागो रे राजा, जागो रे

दादा ताई अन्ना भाऊ
आपला हाय
आपल्याचसाठी
खपला हाय
खोलात नको जाऊ, खोल
घपला हाय
खालीपिली मगजमारी
छोडो रे
जागो रे राजा, जागो रे

निवडणूक सण
लोकशाहीचा
दुबार पेरणीच्या
शाईचा
दसरा दिवाळी
होळीचा
कलगीतुरा
शिवीगाळीचा
गेले दोन मास
झाला टाइमपास खास
अभी तो टाली
मारो रे
जागो रे राजा, जागो रे

कुणाची लाट
कुणा कात्रजचा घाट
कोणी तरी कुणाची
लावलीय वाट
याचं पारडं जड
आणि त्याचंसुद्धा वर
वार्तापत्री विकतच्या
शक्यतांचा थर
तरीसुद्धा नाही
हरली िहमत
पण तुला त्याची
कशी ना किंमत?

अरे, तुझ्याचसाठी
चालले सारे
विकासाची हवा
प्रगतीचे वारे
फक्त बोल
काय हवे?
देवळावरती
छप्पर नवे?
सोसायटीचा
मेन्टेनन्स?
की घरामध्ये
हायमास्ट दिवे?
गल्लीमध्ये
डांबरी सडक?
की पेयसुरक्षा
एकदम कडक?
निवडणुकीचा
हा बाजार
आज रोख
उद्या उधार
म्हणून आजच आपला पत्ता
खोलो रे
जागो रे राजा, जागो रे..

लोकशाही म्हणजे यंव अन् त्यंव
मतदान म्हणजे यंव अन् त्यंव
मेणबत्ती लगाके ये विग्यापनी बलून
सबजन मिल के
फोडो रे..
जागो रे राजा, जागो रे..