News Flash

स्त्रियांच्या विचारक्षमतेचा पट

वेदकाळ ते वर्तमानापर्यंत ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे अशा स्त्रियांच्या विचारांचा मागोवा घेणारे ‘जाणिवा जाग्या होताना..’ या अरुणा ढेरे यांच्या पुस्तकाला विद्या बाळ

| March 22, 2015 01:46 am

वेदकाळ ते वर्तमानापर्यंत ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे अशा स्त्रियांच्या विचारांचा मागोवा घेणारे ‘जाणिवा जाग्या होताना..’ या अरुणा ढेरे यांच्या पुस्तकाला विद्या बाळ  यांनी लिहिलेली ही संपादित प्रस्तावना..
सुरेश एजन्सीतर्फे हे पुस्तक प्रकाशित होत आहे..
डॉ. अरुणा ढेरे या पुस्तकाच्या लेखिका आहेत. त्यांचं नाव हे केवळ व्याकरणानुसार ‘विशेषनाम’ राहिलेलं नाही. अत्यंत अभ्यासपूर्ण काम, दर्जेदार भाषा आणि विचार यांनी समृद्ध लेखन करणारी एक अव्वल दर्जाची लेखिका या अर्थाने साहित्य क्षेत्रात हे एक आता ‘विशेषनाम’ झालं आहे!
कथा, कविता, ललित लेख या प्रकारच्या लेखनामुळे लेखिका वाचकांना परिचित आहेच; पण या लेखनाइतकाच वडील डॉ. रा. चिं. ढेरे यांचा अभ्यास आणि संशोधनाचा वसा जोपासण्याची जबाबदारी लेखिकेने मनापासून स्वीकारली आहे. आपल्या संवेदनशीलतेची साथ न सोडता संशोधन आणि सामाजिक lr16जाणिवेचं बोट धरून सामाजिक इतिहासाचे किती तरी अंधारे, उपेक्षित कोपरे तिने आपल्या लेखनातून उजळले आहेत.
‘जाणिवा जाग्या होताना’मध्ये लेखिकेने स्त्रियांच्या निर्भय विचारांचा मागोवा घेतला आहे. एक-दोन नव्हे, २५ शतकांइतक्या मोठय़ा कालावधीची ही वाटचाल आहे. वेदकाळापासून ते विसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंतचा हा कालावधी आहे. त्यामुळे अर्थातच त्यात वेदकाळ, पुराणं, जुना इतिहास आणि ताजा इतिहास या सगळ्यांचे संदर्भ आहेत.
कशासाठी लेखिकेने केला असावा हा अभ्यास? मला वाटतं, आज २१ व्या शतकाची तेरा-चौदा र्वष उलटल्यावर, विज्ञान-तंत्रज्ञानाची एवढी प्रगती झाल्यावर, नवनवीन प्रकारे स्त्री-पुरुषांची मनं, शरीरं, मेंदू, हृदयं अनेकानेक वैज्ञानिक शोधांच्या भिंगाखालून गेल्यावरही बहुसंख्यांना वाटतं, ‘किती झालं तरी पुरुष तो पुरुष आणि बाई ती बाई. तो श्रेष्ठ आणि ती कनिष्ठच!’ पृथ्वीतलावरचा मानवी इतिहास सांगतो की, अशा प्रकारचा संस्कार करत स्त्री-पुरुषांच्या मनाची घडण करणारी पुरुषसत्ताक व्यवस्था पाच हजार वर्षांपासून अस्तित्वात आहे. त्यामुळेच जगभरात आणि भारतातही ‘स्त्रीला कुठे काय कळतंय?’ असं म्हणत तिला नगण्य करण्याचा आणि नाकळतं ठेवण्याचा पुरुषसत्ताक व्यवस्थेचा व्यवहार चालूच आहे.
या पुस्तकात अगदी पहिल्या गार्गीविषयीच्या लेखात लेखिका म्हणते, ‘ज्ञान हे जसे मानवी संस्कृतीच्या विकासाचे मूलकारण आहे, तसे ते मानवी स्वातंत्र्याचेही मूलकारण आहे. मानवी जीवन आणि जीवनसंघटन यांच्याविषयीचे ज्ञान बाहय़सृष्टीच्या ज्ञानासमवेत जितके विस्तारत जाते, तितकाच मानवी स्वातंत्र्याचा परीघही विस्तारला जातो. हे ज्ञान स्त्री-पुरुष सर्वानाच आवश्यक आहे. ज्ञानार्जनाच्या सामाजिक व्यवस्थेमधील लिंगभेदावर आधारित विषमता अन्याय्य तर आहेच; पण मानवी प्रगतीला घातकही आहे.’ या पुस्तकाचा सारा रोख या एका महत्त्वाच्या विचारावर आहे. समता, स्वातंत्र्य, न्याय या लोकशाही मूल्यांचा या विचाराला पाया आहे.
अखिल मानवजातीचा विचार करता या २५ शतकांच्या कालपटावर भारतात विविध ठिकाणी, विविध कार्यक्षेत्रांत स्वत:च्या आणि सर्वाच्या हितासाठी संघर्ष करणाऱ्या स्त्रियांना शोधून काढून त्यांना तुमच्या-आमच्यासमोर एकत्रितपणे ठेवणारं हे लेखन आहे. त्याचा हेतू उदात्त, त्यासाठी केलेला अभ्यास सखोल, त्याचा आवाका व्यापक आणि या साऱ्याला विवेक, संवेदनशीलता यांची सजग साथ या साऱ्यासह केलेल्या मांडणीत लेखिकेची स्वत:ची सोपी, पण शब्दघन अशी शैली यामुळे हे पुस्तक विचार करण्यासाठीची फारशी अनुकूलता नसलेल्या काळातल्या आणि थोडय़ा सुविधा मिळालेल्या नंतरच्या काळातल्या स्त्रियांच्या विचारक्षमतेचा पटच आपल्यासमोर उलगडून ठेवते.
या पुस्तकात वेदकाळातल्या गार्गी, मैत्रेयी आहेत. महाभारतातली द्रौपदी आहे. थेरीगाथेतल्या गौतमी, विमला, पूर्णिका आहेत. कर्नाटक, पंजाब, काश्मीर व महाराष्ट्रातल्या संतस्त्रिया आहेत. मराठय़ांच्या इतिहासातल्या जिजाबाई, ताराबाई, गोपिकाबाई आहेत. अहल्याबाई होळकर आहेत. सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे आणि त्यानंतरच्या पंडिता रमाबाई, रमाबाई रानडय़ांपासून इरावतीबाई कर्वे, दुर्गा भागवत, मालती बेडेकर, कुसुमावती देशपांडय़ांपर्यंत ४०-४५ स्त्रियांचा समावेश आहे. या पुस्तकात विठाबाई चौधरी, मथुराबाई जोशी, जाईबाई चौधरी, सावित्रीबाई रोडे, रुक्कैया हुसेन, शेवंताबाई निकंबे, मालिनीबाई किबे, मनकर्णिका जोग अशा बहुसंख्यांना माहीत नसलेल्या, पण ज्यांची माहिती करून घेणं आवश्यक आहे, अशाही स्त्रियांचा समावेश आहे. यातूनच लेखिकेचा साक्षेपी शोध आणि अभ्यास आपल्यापर्यंत पोचतो. लोकपरंपरेतील अनाम स्त्रियांनाही लेखिकेने बाजूला ठेवलेलं नाही.
२५ शतकांच्या स्त्रियांच्या वाटचालीतून निर्भय विचारांच्या ४५ स्त्रिया निवडणं हे काम सोपं नाही. कारण या साऱ्यांच्या आगेमागे आणखी काहीजणीही असणारच. त्या सापडल्या नसतील किंवा पुस्तकाच्या पानांच्या मर्यादेत त्यांना समाविष्ट करता आलं नसेल. यामुळे ‘त्यांना’ का वगळलं? किंवा ‘त्या बऱ्या दिसल्या नाहीत!’ अशा आक्षेपांचं सावट पुस्तकावर येऊ शकतं. मात्र, ज्या निवडल्या गेल्या, त्यांच्या विचारांची ओळख चार-पाचशे शब्दांमध्ये करून देण्याचं काम मुळीच सोपं नाही. या साऱ्याजणींचा ‘विचार’ महत्त्वाचा म्हणून त्यांच्या जीवनातल्या बाकी गोष्टींना लेखिकेने कात्री लावली असली तरी तो विचार काळाच्या कुठल्या टप्प्यावरच्या कोंदणातला आहे हे समजण्यासाठी आजूबाजूचा किमान संदर्भ देणंही आवश्यक आहे. कुठल्या चिवट कणखर मातीचं आवरण भेदून हे विचाराचे कोंब जमिनीवर डोकं काढून उभे राहिले, हे वाचकांपर्यंत पोहोचवणं हे तर लेखिकेच्या दृष्टीने महत्त्वाचंच आहे. म्हणूनच या साऱ्या कष्टप्रद अभ्यासातून हे निर्भय विचारांचं धन आपल्यासमोर येणं सामाजिकदृष्टय़ा अतिशय महत्त्वाचं आहे. मला तर हे सारं वाचताना विठाबाई चौधरी, मथुराबाई जोशी, जाईबाई चौधरी, शेवंताबाई निकंबे, मालिनीबाई किबे या काहीजणींना आपण यापूर्वी ओळखत नव्हतो, यामुळे अपराधीच वाटलं!
वेदकाळातील स्त्रियांचं सामाजिक स्थान यासंबंधी बोलताना नेहमीच याज्ञवल्क्याशी युक्तिवाद करणाऱ्या स्त्रिया म्हणून गार्गी-मैत्रेयी ही नावं घेतली जातात. त्यापैकी मैत्रेयी ही त्याची पत्नी, तर गार्गी ही ब्रह्मवादिनी होती. या दोघीही स्वत:शी विचार करत, ज्ञान मिळवत जगणाऱ्या आणि म्हणूनच आत्मविश्वास असणाऱ्या, आत्मनिर्भर, विचारवंत स्त्रिया होत्या. पण त्याच काळातल्या सर्वसामान्य स्त्रिया या सामान्यच होत्या. गार्गी-मैत्रियींसारखे अपवाद वगळता स्त्रियांना शिकण्याची सुविधा नव्हती.
उपनयनाचा संस्कार म्हणजे आठव्या वर्षी मुलाला विद्या शिकवण्यासाठी गुरुगृही पाठवणारा महत्त्वाचा संस्कार. मुलींसाठी याबाबत काय व्यवहार होता? मुलींसाठी उपनयन विधी होता, पण त्याला मर्यादा होत्या. विद्याभ्यासासाठी मुलगी गुरुगृही न जाता वडिलांजवळ शिकत असे. त्यामुळे घराबाहेरचं जग आणि वडिलांपलीकडचा विद्याव्यासंग यांच्या अनुभवाच्या बाबतीत तिच्यावर मर्यादा पडल्या. हा मर्यादित विद्याभ्यासही लग्न होईपर्यंत म्हणजे उपनयनानंतर जेमतेम आठ-नऊ वर्षांपर्यंतच चालत असे. शिवाय उपनयन न झालेली मुलगी ब्राह्मण न मानता शूद्र मानली जात असे. त्यामुळे जात टिकवण्यासाठी का होईना, मुलींचं उपनयन करून तिला जुजबी शिक्षण देणं, एवढाच उपनयन विधीचा आणि त्या काळातील स्त्री-पुरुष समतेचा अर्थ काढता येतो. यासंदर्भात डॉ. आ. ह. साळुंखे यांचं ‘हिंदू धर्म आणि स्त्री’ हे पुस्तक त्या काळातल्या स्त्री-पुरुष विषमतेचं लख्ख दर्शन घडवतं. इथे या पुस्तकाचा तपशील देण्याचं कारण हे की, वेदकाळापासून पुरुष शिकत, वाढत राहतील अशी व्यवस्था भारतात आहे. स्त्रीसाठी या सुविधा नसताना आणि इतर कौटुंबिक, सामाजिक, जातीय, धर्मीय अशा अनंत प्रकारच्या अडचणी असताना, त्या पार करत स्त्रिया नेहमीच विचार करत आल्या आहेत. शिक्षणाचा विचार सर्वसामान्य पुरुषांप्रमाणे स्त्रियांसाठी गेल्या दोनेक शतकांत रुजत गेला. त्यामुळेच आधी त्यांच्या नावावर ना ग्रंथ, ना तत्त्वज्ञानाचे अभ्यास जमा झाले! शिक्षण हे ज्ञानापर्यंत पोहोचण्याचं महत्त्वाचं साधन आहेच, पण ते नसतानाही स्त्रियांनी जो विचार केला, त्यासाठी जो संघर्ष केला, त्या अनुभवाचाही मोठा वाटा आहे. म्हणूनच शिक्षण न घेताही अनेक जणींनी ज्ञान मिळवलं. कुठे कुठे नजरेआड राहिलेलं, धूळ खात पडलेलं, अपघाताने सापडलेलं असं हे विचारधन लेखिकेने एकत्रितपणे या पुस्तकातून आपल्या हाती दिलं आहे.
ज्ञान आणि स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टी स्त्री-पुरुष दोघांसाठी सारख्याच आवश्यक आहेत, असा विचार लेखिकेने मांडला आहे. या विचाराला पुष्टी देणारा विचार अल्वा मिर्दाल व व्हायोला क्लेन या दोन समाजशास्त्रज्ञ स्त्रियांनी मांडला आहे. त्या असं प्रतिपादन करतात की, जोपर्यंत कोणत्याही देशाच्या समृद्धीचं मोजमाप करत असताना जंगल, जमीन, सूर्यप्रकाश, समुद्रकिनारा, खनिज संपत्ती इ. स्रोतांच्या बरोबरीने त्या देशातील ‘स्त्रिया’ या मानवी स्रोताची दखल घेतली जात नाही तोपर्यंत तो देश खऱ्या अर्थाने समृद्ध होऊच शकणार नाही. यादृष्टीने भारतातल्या या महत्त्वाच्या स्त्री-विचारांचा खजिना या पुस्तकात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2015 1:46 am

Web Title: janiva jagya hotana by aruna dhere
Next Stories
1 नटाचे नटत्व
2 एकमात्र सांगीतिक ‘फिनॉमेनन’
3 हरफनमौला
Just Now!
X