‘जास्वंदी’ हे माझे नाटक १९७६ साली पॉप्युलर प्रकाशनाने छापले. पुस्तकरूपाने ते अवतरण्याआधीच त्याचे चार भाषांमधून प्रयोग झाले होते. हिंदी, मराठी, गुजराती आणि सिंधी. माझ्या कुठल्याही नाटकाने- याआधी किंवा यानंतर हा विक्रम केलेला नाही. हे नाटक मी का लिहिले? ते कसे सुचले? ते सामान्य नाटकांहून कसे वेगळे आहे? मांजरांची पात्रे कुठून आली? हे प्रश्न मला वारंवार विचारले जातात. त्यांच्या निरसनासाठी या पुस्तकाच्या प्रस्तावनेमधला मजकूर मी इथे नमूद करते. त्यावरून मांजरांच्या गौडबंगालाचा उलगडा व्हायला मदत होईल.
मांजर प्रथम माझ्या आयुष्यात आलं, ते माझ्या पाळण्यात. खरं तर मांजरं आधीपासूनच होती; मीच उपरी आले. घरात प्रत्येकाला मांजराची विलक्षण आवड. आमचं कुटुंब लहान असल्यामुळे की काय, घराला भरलेपणा आणण्याची जबाबदारी मांजरांवर येऊन पडे. निजताना बिछान्यात आणि जेवताना पंगतीला मांजर नाही, असं कधी घडलं नाही. असंख्य मांजरं झाली. पुढे आयुष्यात माणसं आली. त्यातली बहुतेक चोरपावलांनी निघूनही गेली. मांजरं मात्र नखं रोवून माझ्या स्मृतिविश्वात आपलं स्थान कायम राखून आहेत.
मांजरांच्यातच वाढल्यामुळे त्यांच्या वेधक हालचाली आणि लीला मी बारकाईने अभ्यासाव्यात, हे अपरिहार्यच होतं. त्यांची किती रूपे वर्णावीत? पाठीची कमान करून शिकारीवर उडी घेण्याच्या पवित्र्यातला शंभू, घशातून लडिवाळ आवाज काढीत माझ्या पायाभोवती वेटोळे करून दूध मागणारी शांती, चोरी ‘रंगे हाथ’ पकडल्यावर कान मागे मुडपून ओशाळवाणे तोंड करणारा बबन, किंवा पंख्याला पोट करून नुसताच सुस्तावून पडलेला माखन.. अशा अगणित आठवणी मी जतन करून ठेवल्या आहेत. मांजरांचे निरीक्षण करताना फार पूर्वीच एक गोष्ट माझ्या लक्षात आली. मांजरेही मनुष्यावलोकन करतात. एखाद्या कोपऱ्यात बसून, डोळे मिटून त्यांचे सूक्ष्म निरीक्षण चालू असते. एवढेच नव्हे, तर माणसांविषयी त्यांचे मत फारसे चांगले नाही.
ही जाणीव कैक र्वष मनातल्या कुठल्यातरी कप्प्यात गप्प पडून राहिली होती. तिला एके दिवशी अचानक वाचा फुटली आणि ‘जास्वंदी’ नाटकात मन्या-बन्या अवतरले. त्याचं असं झालं : मी टेबलावर पेन चावत बसले होते. काही सुचत नव्हतं. मी कोरी होते. अर्थात कागदही कोरेच होते. मग उडी मारून बन्या आणि मन्या टेबलावर चढले. माझ्या पुढय़ात बसले. म्हणाले, ‘‘आमच्यावर लिही.’’
‘‘काय लिहू?’’
‘‘नाटक. काहीही लिही-’’
आणि मग मी काहीबाही लिहिले. प्रेमकथा साधीच होती. ती मांजरांच्या दृष्टिकोनातून उलगडते, ही गोष्ट विशेष होती. हटके.
एक गडगंज श्रीमंत उद्योजक. (तो स्वत: कधी स्टेजवर येत नाही.) त्याची सुस्वभावी, सुस्वरूप पत्नी सोनिया. त्यांना मूलबाळ नाही. अमाप माया करण्याची क्षमता असलेली सोनिया त्यामुळे अतृप्त. सैरभैर. आपले साम्राज्य येनकेनप्रकारेण वाढवण्याच्या नादात असलेल्या तिच्या नवऱ्याला तिचे फारसे भान नाही. ती फक्त एक सुंदर ‘स्टेटस सिंबल’! घरात काम करणारी रंगाबाई आणि तानपुरे ड्रायव्हर हे दोघे कुटिल, कारस्थानी चाकर. एकमेकांवर कुरघोडी करीत लांडीलबाडी करण्याचे नित्यनवे मार्ग शोधणारे.
सोनियाला कुणीतरी दोन बोके आणून देते. ते असतात उकिरडय़ावरचे; पण अतिशय गोजिरवाणे. मोठय़ा कौतुकाने ती त्यांना घरी आणते. रंगाबाई नाक मुरडून सांगतात, ‘यांना बाहेर बागेतच राहू दे. आत घाण करतील. घरात नको कहार.’ ‘शहाण्या आहात!’ सोनिया उत्तरते- ‘घराला घरपण यावं म्हणून तर आणलं आहे यांना!’ यावर रंगाबाई टोमणा मारतात- ‘घराला घरपण मांजरांनी येतं व्हय?’
सोनिया मांजरांना जीव लावते. तेही तिच्यावर खूप माया करतात. एक मोठी पोकळी भरून निघते. आणि मग एक तरुण तिच्या दुनियेत प्रवेश करतो. शांत सरोवर ढवळून निघते. तारुण्यसुलभ उत्कटतेने उदयन आकर्षक आणि एकाकी अशा सोनियाच्या प्रेमात पडतो. त्याच्या स्नेहमय आपुलकीने सुखावलेली सोनियाही हळूहळू त्याच्याकडे आकर्षित होते. एक आर्त प्रेमकहाणी सुरू होते, आणि अटळपणे सर्वनाशाकडे ती रोरावत जाते. मन्या, बन्या (आणि अर्थातच प्रेक्षक!) दिङ्मूढ होऊन पाहत राहतात.
मांजरांचा दृष्टिकोन हा या नाटकाचा कणा आहे. ग्रीक नाटकांमधून ‘कोरस’ची कामगिरी असते, तीच इथे मन्या-बन्याची आहे. मंचावर घडणाऱ्या घटनांवर ते वेळोवेळी मार्मिक भाष्य करतात. माणसांच्या अगम्य वर्तनाचा अर्थ लावू पाहतात. त्याचबरोबर कथेच्या गुंतागुंतीत ते स्वत:च सामावून जातात. नाटय़मय प्रसंगांमध्ये सक्रियपणे भाग घेतात.
उकिरडय़ावर सापडलेल्या बोक्यांना साहजिकच घरी आणल्या आणल्या सोनिया साफ करते. त्यांना ब्रश करते. त्यांना हा सोपस्कार आवडत नाही.
बन्या : शी! पावडर लावली मला.
मन्या : तीट नाही ना लावली?
बन्या : ..रोज आंघोळीचा हा तमाशा होणार असेल तर मी चाललो.
मन्या : मघाशी मिळालं तसं मलईचं दूध सकाळ-संध्याकाळ मिळणार असलं तर आपण स्नान काय, संध्यासुद्धा करायला तयार आहोत.
बन्या : ठीक आहे. एकूण काय, वाडगाभर मलईच्या दुधासाठी यांच्या ताटाखालचं मांजर व्हायचं आपण.
हळूहळू मन्या-बन्या माणसाळू लागतात. त्यांना सोनियाचा लळा लागतो. तिच्या भल्यासाठी दोघे जागरूक राहतात. अनाहूतपणे कानावर पडलेले ड्रायव्हर आणि रंगाबाईंचे कारस्थानी खलबत ऐकून अस्वस्थ होतात.
बन्या : कसले लोक पाळले आहेत तिनं.. साप-विंचू बरे.
मन्या : असं वाटतं, एकेकाच्या नरडीचा घोट घ्यावा..
बन्या : विष बाधेल त्यांचं..
मन्या : निदान तोंडं ओरबाडून काढावीत त्यांची.
बन्या : आता लागलास त्यांच्यासारखं बोलायला.
मन्या : संगती संग दोषेण-
दोघा बोक्यांना उदयन तसा पसंत असतो, कारण तो त्यांच्या लाडक्या मालकिणीच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलवू शकतो, तिचा थोडा विरंगुळा करू शकतो. पण एका अगतिक संध्याकाळी दोघा प्रेमिकांचा संयम सुटतो. त्यांचा प्रणयप्रसंग बन्या अनपेक्षितपणे खिडकीमधून पाहतो आणि सुन्न होऊन जातो. आपला क्षोभ तो मन्याजवळ व्यक्त करतो. मन्या थंडच राहतो.
मन्या : हे बघ बन्या, एक बाई आणि एक पुरुष निसर्गाला धरून वागले, तर आपल्या काकाचं काय गाठोडं जातं?
बन्या : म्हणजे नवरा-बायकोच्या पवित्र नात्याला अर्थ उरला नाही, असं म्हण ना.
मन्या : पवित्र नातं? वा, बन्याबापू! हे आपणच का बोलताहात?.. काय रे, मी आसपास नसलो, की माझ्या झिपरीवर तू किती वेळा झडप घातली आहेस, सांग बघू.
बन्या : हे बघ- गोष्ट चालली आहे माणसांची.. मांजरांची नव्हे. आपल्याला एकच नातं ठाऊक आहे.. नर आणि मादीचं. पण ही माणसं- नाही पाळता येत, तर स्वत:भोवती लक्ष्मणरेषा आखावीच कशाला?
मन्या : वेडय़ा, लक्ष्मणरेषा पाळण्यासाठी नसतेच मुळी. ती ओलांडण्यासाठीच असते.
सुदेश स्यालने नेहमीप्रमाणे नाटकाचे हिंदूीमध्ये छान भाषांतर केले. पण पुन्हा आम्ही नावापाशी अडखळलो. शेवटी कुणीतरी ‘पंजे’ सुचवलं. दुसरं काही न सुचल्यामुळे शेवटी तेच मुक्रर केलं. ‘एक तमाशा अच्छा खासा’च्या जोडीला आणखी एक निष्प्रभ मथळा!
पात्रांची जुळवाजुळव सुरू झाली. सोनियासाठी शोध करावाच लागला नाही. मूर्तिमंत सोनिया आमच्या नाटय़वर्तुळात होती. सुषमा सेठ! ‘सखाराम बाइंडर’च्या आमच्या प्रयोगात तिने अप्रतिम चंपा उभी केली होती. आकर्षक, घरंदाज, वागण्या-बोलण्यात उच्चवर्गीय सफाई असणारी, नेमक्या वयाची आणि उज्ज्वल कीर्तीची ‘सुष्’ ही जणू सोनियाची भूमिका करण्यासाठीच भूतलावर अवतरली होती. रवी दुबे हा उंच, देखणा आणि हसतमुख तरुण उदयनसाठी निवडला. (रवी आता हॉटेलच्या धंद्यात मोठय़ा हुद्दय़ावर आहे. अभिनेत्री लिलेट दुबे त्याची बायको.) ड्रायव्हरची भूमिका सुभाष गुप्ता या आमच्या नेहमीच्या यशस्वी कलाकाराने केली. ‘जी हुजूर’मधला तो अंमलदार होता. सुभाषची गंमत अशी की, तालमीची वेळ काहीही असू दे, तो त्या वेळेचा शेवटचा ठोका पडण्याची सम गाठून ‘एंट्री’ घेत असे. (हॉलमध्ये ठोके वाजणारे मोठे घडय़ाळ होते.) काटेकोर वक्तशीरपणासाठी मी प्रख्यात (बदनाम?) होते. त्यामुळे सुभाषच्या या नित्यनेमाचे मला फार कौतुक वाटे. नंतर खूप वर्षांनी त्याने सांगितले की, वीस मिनिटं आधी येऊन तो लपून बसत असे. नेमकी वेळ झाली, की ठोका गाठून तो रुबाबदार एंट्री घेई! मोहिनी माथूर ही दिल्लीची जुनी, जानीमानी अभिनेत्री. मोठ्ठाड, काहीशी उग्र. ती रंगाबाई फार चपखल भासली. तिचे आणि सुभाषचे प्रवेश काय रंगत! अगदी नेहले पे दहला. बोक्यांसाठी उत्तम नट मिळाले. माझा लाडका कलाकार किमती आनंद (पंजाबी ‘चक्का’मधला कुचकामी नवरा आणि ‘सखाराम’मध्ये चंपाचा दारुडा नवरा) आणि त्याने पकडून आणलेला त्याचा एक दोस्त मदन शर्मा. या बोक्यांना प्रेक्षक डोक्यावर घेत.
मांजरांचे कोणत्याही प्रकारे ‘सोंग’ उभे करायचे नाही, यावर माझा कटाक्ष होता. मुखवटे, कान, शेपटी इ. काही सामग्री आम्ही वापरली नाही. साधे कुडते आणि जुनाट जीन्स घातलेले दोघे तरुण जेव्हा मंचावर प्रथम येतात तेव्हा, हे नेमके कोण, असा प्रेक्षकांना प्रश्न पडतो. त्यातून आल्या आल्या जेव्हा दोघे दिवाणाखाली दडी मारतात, तेव्हा विस्मय अधिकच गहरा होतो. थोडय़ाच वेळात खुलासा होतो आणि नाटक वेग पकडते.
आमच्या तालमी सुरळीत झाल्या. नाटकाचे नेपथ्य थोडे गुंतागुंतीचे होते. एकाच वेळी बाग, आतले दालन आणि शयनगृह हे दृश्यमान होते. कारण अधूनमधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी असा पात्रांचा मुक्त वावर चालू असे. पण अगदी मोजक्या नेपथ्यमांडणीमध्ये आम्हाला चांगला परिणाम साधता आला. मी निर्माण केलेल्या नेपथ्यरचनांमध्ये ‘पंजे’चा क्रमांक बराच वरचा लागेल.
एक नावीन्यपूर्ण नाटक म्हणून आमच्या या नाटकाचा बराच बोलबाला झाला. मोठय़ा संख्येने प्रेक्षक खेळांना हजर राहिले. आणि दिल्लीत ‘पंजे’चे खेळ झालेही अनेक.
ठ.र.ऊ. मध्ये अरुणच्या वर्गात रमेश जांजानी म्हणून एक विद्यार्थी होता. स्कूल सोडल्यावर त्याने मुंबईला सिंधी रंगभूमीसाठी पुष्कळ काम केले. आमचा प्रयोग पाहायला रमेश आला होता. त्याने तात्काळ आपण ‘पंजे’ सिंधीमध्ये करणार, असे घोषित केले आणि त्याप्रमाणे ते केलेही. मी त्याचा प्रयोग पाहू शकले नाही. पण रमेशने दोन-चार परीक्षणांची कात्रणे धाडली होती, त्यावरून त्याने बरीच मेहनत घेतल्याचे दिसून आले. ‘‘आम्ही तुझं नाटक हाँगकाँगला नेतो आहोत,’’ असा एके दिवशी त्याचा फोन आला. आमचं ते शेवटचं संभाषण. परत आल्यानंतर काही अल्पशा आजाराने तो अगदी अकाली गेला. बटुमूर्ती रमेश हरहुन्नरी नट होता. ‘कथा’ या माझ्या चित्रपटात त्याने एका चाळकऱ्याची छोटी भूमिका मोठय़ा झोकात केली होती. ‘‘बायकोला जरा कपडे धुवायला मदत केली तर एवढं काय बिघडलं?,’’ तो तावातावाने इतर चाळकऱ्यांना विचारतो, ‘‘ती नाही का मला भांडी घासायला मदत करीत?’’ बायकोच्या अखंड बडबडीला कंटाळून कानात कापसाचे बोळे घालणाराही तोच.
नाटक पाहून झपाटलेली आणखी एक व्यक्ती म्हणजे गुजराती रंगभूमीची तरला मेहता. तरला ही दीना पाठक आणि शांता गांधी (ठरऊ मधील माझ्या शिक्षिका) यांची धाकटी बहीण. तिने र्धमेद्रची नायिका म्हणून ‘शोला और शबनम’ या हिंदी सिनेमात काम केलं होतं. तरला सुंदर होती आणि महत्त्वाकांक्षीही. गुर्जर भाषेत नाटक करून त्याची निर्मिती (आणि अर्थात सोनियाची भूमिका!) स्वत: करण्याचा मानस तिने बोलून दाखवला. मी आनंदाने परवानगी दिली. गुजराती ‘पंजे’ची जुळवाजुळव सुरू झाली.
तर मुंबईला सिंधी आणि गुजराती भाषांमधून माझ्या या मांजरांच्या नाटकाने वर्णी लावली. दिल्लीला हिंदीमधून प्रयोग तर चालूच होते. पण मूळ मराठी नाटकाचं काय? माझी टेलिव्हिजनची नोकरी आणि इतर अवधानं सांभाळून मला मुंबईला जाऊन मराठी प्रयोग बसवणं शक्य नव्हतं. ‘कलावैभव’च्या मोहन तोंडवळकरांच्या कानावर नाटकाची चर्चा गेली होती. त्यांचा मुंबईहून मला फोन आला. कलावैभवने ‘पंजे’चे मराठी प्रयोग करण्याच्या प्रस्तावाबद्दल आमचा दूरध्वनीवरून संवाद सुरू झाला. तोंडवळकर स्पष्टवक्ते आणि परखड बोलणारे होते, म्हणून त्यांच्याशी बोलणे सुलभ झाले. पाच-सहा टेलिसत्रांच्या नंतर आमचे संगनमत झाले आणि मराठी प्रयोगाचा जिम्मा कलावैभवने उचलावा, असे ठरले.
दरम्यान, गुजराती ‘पंजे’ मंचावर उगवले आणि मावळलेदेखील. मी ते पाहण्याच्या आतच नाटकावर कायमचा पडदा पडला. तरलाच्या उत्साहाचं चीज झालं नाही याचं मला वाईट वाटलं.
तोंडवळकरांनी मोठय़ा जोशात काम सुरू केलं. दिग्दर्शनाची जबाबदारी विजया मेहताने स्वीकारली. दुधात साखर! पण सोनियाची भूमिका ती स्वत:च करणार आहे, हे ऐकून मी जराशी चक्रावले. कारण सोनियाच्या माझ्या संकल्पनेत ती अजिबात बसत नव्हती. तिच्या अभिनयाच्या ताकदीबद्दल मला संदेह नसला, तरी! अर्थात एकदा परवानगी दिल्यानंतर स्वत:ची मते सांगत बसणे हे व्यावसायिक शिष्टाचाराला धरून नव्हते.
‘‘मराठी नाव काय ठरलं मग?’’ तोंडवळकरांचा फोन आला.
‘‘अजून काही सुचलं नाही.’’
‘‘अहो, काय असं? प्रसिद्धी अडून राहिली आहे. लवकर छानसं नाव काढा.. तुमचं हिंदी नाव काय म्हणालात?’’
‘‘पंजे.’’
‘‘बेकार!’’
‘‘कबूल.’’
मग मी युद्धपातळीवरून एखादं साजिरं नाव कळवायचं कबूल केलं. अमुक मुदतीमध्ये नाही कळवलं तर खुशाल तुम्ही नाव ठरवा, असंही मी सांगितलं. दिली मुदत उलटून गेली. मग तोंडवळकरांचा फोन आला. ‘बारसं झालं आहे. नाव ठेवलं आहे- ‘जास्वंदी’!’
मला नाव फारसं रुचलं नाही. ‘पंजे’पेक्षा बरं होतं, एवढंच.
(क्रमश:)

A case has been registered against the scribes in the city police station for embezzlement of examination fees by the scribes of Miraj High School
लेखनिकाने केला अपहार, ३५८ विद्यार्थी मात्र निकालापासून वंचित
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !
Razmanama Mahabharata in Persian language
महाभारत संस्कृतातून फारसीत; अकबराच्या साहित्यिक आविष्काराबद्दल तुम्हाला माहितेय का?
Rajendra Pawar vs Ajit Pawar
“..आणि तेव्हापासून पवार कुटुंबीयात दुरावा निर्माण झाला”, बारामतीमध्ये निनावी पत्र व्हायरल; राजेंद्र पवार म्हणाले…