पं. नेहरू यांचे तब्बल सहा वर्षे मुख्य सुरक्षा अधिकारी राहिलेल्या के. एफ. रुस्तमजी यांचे ‘आय वॉज नेहरूज श्ॉडो’ हे पुस्तक २००६ साली प्रसिद्ध झाले. नुकतीच त्याची द्वितीय आवृत्ती प्रकाशित झाली आहे. त्या पुस्तकाची ओळख..
सीमा सुरक्षा दलाचे संस्थापक प्रमुख या नात्याने सुप्रसिद्ध झालेले आय.पी.एस. अधिकारी के. एफ. रुस्तमजी १९५२ ते १९५८ या काळात पं. जवाहरलाल नेहरू यांचे मुख्य सुरक्षा अधिकारी होते. पोलीस दलात असले तरी रुस्तमजी टिपिकल पोलिसी खाक्याने वावरणारे सुरक्षाप्रमुख नव्हते. लोकशाही- प्रशासन, राजकीय नेते आणि त्यांचा जनसंपर्क, शासन- प्रमुख आणि त्यांचे सहकारी नोकरशहा यांच्यातील नातेसंबंधांची ताकद आणि त्यांच्या मर्यादा, लोकनेतृत्वाच्या मूल्यमापनाच्या कसोटय़ा इ. अनेक विषयांबद्दलची मर्मदृष्टी त्यांच्यापाशी होती. असा विचारी आणि संवेदनशील अधिकारी अतिशय महत्त्वाच्या पदावर जबाबदारी सांभाळताना ज्यावेळी नियमितपणे डायरी लिहितो त्यावेळी आपोआपच एक ‘डॉक्युमेंटेशन’ किंवा प्र-लेखन घडून येते. रुस्तमजी यांच्या डायऱ्यांचे नेटके संपादन करून पी. व्ही. राजगोपाल यांनी आकाराला आणलेले ‘आय वॉज नेहरूज श्ॉडो’ हे पुस्तक म्हणजे निकटवर्ती नेत्यांच्या मूल्यमापनासाठी आवश्यक असलेली समदृष्टी आणि सार्वजनिक व्यवहारांबद्दलची प्रगाढ जाण या दोहोंचा समन्वय साधलेले लिखाण म्हणायला हवे.
अडीचएकशे पानांच्या या पुस्तकात तब्बल बारा प्रकरणे असली तरी ‘नेहरू – एक व्यक्ती’, ‘नेहरूंचे राग-लोभ’, ‘पंतप्रधान नेहरू’, ‘नेहरू आणि काँग्रेस’ आणि ‘नेहरूंमधील दोष’ ही काही प्रकरणे नेहरूंना समग्रतेने समजून घेण्याच्या संदर्भात विशेषत्वाने वाचण्याजोगी! या सर्व लेखनात एखाद्या विशिष्ट घटनेच्या अनुषंगाने शेरेबाजी करून लगेचच निष्कर्ष काढण्याच्या मोहापासून रुस्तमजी कटाक्षाने दूर राहिले आहेत. परंतु त्याचबरोबर हातचे काही न राखता जे म्हणायचे आहे ते डायरी-लिखाणाशी एकनिष्ठ राहून आपण म्हणायला तर हवेच याबाबतचा आग्रहही त्यांनी सोडलेला नाही. नेहरूंसारख्या विलक्षण लोकप्रिय, करिष्माधारी आणि तीव्र रागलोभाच्या व्यक्तीच्या अतिशय निकट वावरताना आणि समोर येणारे कडू-गोड प्रसंग निभावून नेतानाही रुस्तमजींनी ही समदृष्टी आणि निíलप्तता सोडली नाही हे त्यांच्या या लिखाणाचे उल्लेखनीय वैशिष्टय़ होय!
तीव्र राग-लोभ असले तरी नेहरू मधूनच, ‘मूड’ चांगला असेल तेव्हा खेळकर होत, विनोद करत आणि आपण कसे खोडकर होतो त्याच्या हकिगतीही सांगत. आपल्या पोशाखाबद्दल ते अतिशय दक्ष असायचे. टोपी घालण्याबद्दलही ते आग्रही असायचे आणि रुस्तमजींच्या मते ‘टोपी न घालता ते वावरले असते तर अध्र्या अधिक भारताला ते ओळखताच आले नसते!’ व्यक्ती म्हणून नेहरूंच्या राहणीमानाबाबतचे अनेक गरसमज रुस्तमजींच्या लिखाणातून दूर होतात. प्रवासात कमीतकमी सामान नेण्याबद्दल ते आग्रही असत. अन्न असो वा पाणी, वाया जाऊ देणे त्यांना खपत नसे. ‘‘कित्येकदा कारने प्रवास करताना वाटेत एखादा उघडा नळ धो-धो वाहताना दिसे आणि गाडय़ा थांबवून कोणाला तरी पाठवून नेहरू तो बंद करवून घेत!’’ नाश्त्याला ब्रेड आणि बटर हा त्यांचा लाडका मेन्यू असायचा. १९५३ मध्ये बंगालच्या प्रवासात असताना तिथल्या राज्यपाल पद्मजा नायडू यांनी मोठय़ा प्रेमाने त्यांच्या नाश्त्यासाठी टोमॅटो सॉस मागविले. पण ‘‘नंतर तोंडात चव रेंगाळविणारे कोणतेही पदार्थ मला आवडत नाहीत!’’ असं ताडकन सांगून नेहरूंनी सॉस नाकारला.
तुमच्या अदम्य उत्साहाचे रहस्य काय, असं रुस्तमजींनी एकदा नेहरूंना विचारलं. नेहरू म्हणाले, ‘माझी पचनशक्ती खूप चांगली आहे. मी जास्त खात नाही आणि निद्रानाशाची मला कधीही चिंता नसते. खूप थकल्यानंतरच मी झोपतो नि एकदा पाठ टेकली की निद्रादेवीची आराधना मला कधी करावी लागत नाही.’ प्रवासात मध्येच थांबून रस्त्याला लागून असलेल्या दुकानातली थंडाई किंवा एखाद्या लहान मुलाने देऊ केलेली मिठाई खाण्यात नेहरूंना कसलाही संकोच नसे. एकेकाळी दिवसाला २०-२५ सिगारेटी ओढणारे नेहरू नंतर नंतर फक्त पाचवर आले.
खेळकर मूड असला तरी नेहरू क्वचितच ‘जोक’ करत. एकदा चेन्नईच्या मीनाबकम विमानतळावर दुरूनच राज्यपाल श्रीप्रकाश त्यांच्या ‘ट्रेडमार्क’ पांढऱ्या छत्रीसह येताना दिसले. ‘मला वाटतं, श्रीप्रकाश चंद्राच्या चांदण्यातही छत्री वापरत असावेत’, नेहरू गमतीनं म्हणाले.
होस्पेट या गावी एका स्वागत समारंभात एकाएकी छायाचित्रकाराच्या कॅमेऱ्यांचा क्लिकक्लिकाट झाल्यावर कॅमेरा बल्बच्या तीव्र चकमकाटामुळे भांबावलेल्या नगरसेवकाच्या हातातून स्वागत भाषणाचा कागदच कसा गळून पडला आणि त्या एकाच प्रसंगात नेहरूंना गडगडाटी हसताना आपण कसं पाहिलं, त्याचं रंजक वर्णनही रुस्तमजींनी केलं आहे.
पं. जवाहरलाल नेहरू शीघ्रकोपी स्वभावासाठी प्रसिद्ध होते. १६ ऑगस्ट १९५३ला पाकिस्तानचे त्या वेळचे पंतप्रधान मोहंमद अली आणि त्यांच्या बेगम भारत भेटीवर आले होते. त्या वेळी पालम विमानतळावर मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली. गर्दी काबूत ठेवण्यासाठी पोलीस आवश्यकच होते. पण पोलीस आणि युनिफॉर्ममधल्या माणसांविषयी सूक्ष्म तिरस्कार असलेल्या नेहरूंनी पोलिसांनाच काबूत ठेवले. परिणामी प्रत्यक्ष पाहुणे आल्यानंतर चेंगराचेंगरी झाली आणि नेहरू इतके चिडले की हातातल्या पुष्पगुच्छाचे तडाखे देत, मधे आले त्यांना बाजूला सारत, रागाने लालबुंद होत ते कसेबसे गाडीत बसले. रुस्तमजी लिहितात,   ‘‘जे. एन. संतापले की थेट माझ्या तीन वर्षांच्या मुलीसारखे (तिचे नाव करमन) वागत! ताडकन उठत, हात-पाय आपटत, जे जे समोर आणू ते ते सपशेल नाकारत..’’
एखाद्या कार्यक्रमात मध्येच घुसून स्वाक्षरी मागणारी मुले किंवा हमखास बिघडणारा माइक आणि कधी कधी औपचारिकतेचा अतिरेक यामुळे नेहरू भडकत. मोरारजी देसाईंनी एकदा त्यांना नम्रपणे विचारलं, ‘‘नाश्ता किती वाजता घेणार तुम्ही, पंडितजी?’’ त्यावर नेहरू ताडकन उद्गारले, ‘‘किती वाजता? किती वाजता म्हणजे काय? सकाळी बाहेर पडण्यापूर्वी काही मिनिटे आधी..’’
आज नेत्यांच्या सुरक्षेच्या संदर्भातले प्रश्न आणखी टोकदार झाले आहेत. पण तेवढे ते नसतानाच्या काळातही अवतीभवती गणवेशधारी सुरक्षा-रक्षकांच्या कोंडाळ्यात वावरण्याची पं. नेहरूंना मनस्वी चीड होती. सुरक्षा-व्यवस्था नेहमीच नेहरूंच्या संतापाचे कारण बनत असे, आणि राग निघत असे तो सुरक्षा प्रमुखावर. एका प्रसंगाबद्दल रुस्तमजी लिहितात, ‘‘चेन्नईला एकदा विमानतळाबाहेर जमलेल्या अलोट आणि अनावर गर्दीपासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरक्षा अधिकाऱ्यांवर नेहरू चांगलेच संतापले. तो राग माझ्यावर काढण्यासाठी ते संध्याकाळच्या सभेत थेट गर्दीतच घुसले. बॅरिकेड्स तुटल्या आणि गर्दी आणखीनच अनावर झाली. मी चटकन स्टेजवर चढून माइक हातात घेतला आणि घोषणा केली ‘‘मि. प्राइम मिनिस्टर, यू मस्ट कम बॅक टू द रोस्ट्रम!’’ असे अनेक प्रसंग येऊनही नेहरूंबद्दलच्या मनस्वी आदरभावनेत कपात न करता रुस्तमजी पुढे लिहितात, ‘‘सहा वर्षांच्या काळात मी अगणित वेळा नेहरूंच्या संतापाचा बळी ठरलो. पण चांगली गोष्ट म्हणजे संतापाचा प्रसंग संपल्यानंतर थोडय़ाच वेळात पंडितजी इतक्या मायेनं वागत की त्यातूनच आपण दिलगीर असल्याचंही ते सूचित करत.’’
देशाची एकता आणि अखंडता नेहरूंसाठी विलक्षण महत्त्वाची होती असं नमूद करून रुस्तमजी सांगतात की, ही एकात्मता रुजवण्यासाठी महिन्यातून किमान १५ दिवस ते प्रवास करत. वृत्तीने मितभाषी असलेले नेहरू शांतपणे ऐकत, वाचत आणि पत्रांच्या माध्यमातून संपर्क ठेवत. स्वातंत्र्यानंतर लगेचच्या काळात काँग्रेसच्या अधिवेशनात असो वा सरकारी कार्यक्रमात, नेहरूंनी जमावाच्या बेशिस्तीकडे सतत दुर्लक्ष केले. पुढे ही बेशिस्त वाढत गेली तसे त्यांनी भाषणांमधून शिस्तीचे धडे द्यायला सुरुवात केली. त्यांच्या बहुतेक सर्व भाषणांमध्ये परिश्रमांचं महत्त्व आणि गरज ते विशद करून सांगत. नेहरूंच्या भाषणांच्या विषयवस्तूंबद्दल मार्मिक भाष्य करताना रुस्तमजी लिहितात, ‘‘जे.एन.चं मन नेहमी भविष्यात (विहरत) असे. ते क्वचितच भूतकाळाबद्दल बोलत आणि वर्तमानाबाबतही त्यांना फारशी रुची नसे. भवितव्याचा विचार करण्याचा जणू त्यांना नादच होता.’’
नेहरू शासक म्हणून कसे भासले? रुस्तमजींच्या मते नेहरू कितीही लोकतांत्रिक असले तरी आपली एकदा बनविलेली मते सहसा बदलत नसत. त्यांचं मत बदलवणारा हरीचा लाल त्या वेळच्या सचिवांमध्ये तरी नव्हताच. निर्णय घेण्याचा एकाधिकार केवळ आणि केवळ नेहरूंकडेच होता. त्यांच्या आजूबाजूला खूप हुशार आणि बुद्धिमान सल्लागार होते. ‘‘पण ही माणसं आपली विचक्षण बुद्धी क्वचितच वापरीत. ते नेहरूंच्या मताचा अंदाज घेऊन निर्णयाचे आडाखे बांधत.’’ पं. नेहरूंच्या नेतृत्वशैलीबद्दल रुस्तमजी यांनी जे लिहिले आहे ते विलक्षण भेदक आणि तरीही वास्तविक आहे.
सहा वष्रे त्यांना जवळून बघितल्यानंतरही रुस्तमजी म्हणतात, ‘‘खरे नेहरू कोणते आणि बनावट कोणते हे समजण्याच्या स्थितीत मी नव्हतो. लहान मुलांकडून गुलाबपुष्प स्वीकारताना वा गर्दीतल्या महिलेकडे पुष्पहार फेकताना वाकणारे नेहरू बघताना हे ते कॅमेऱ्यासाठी करतायत की लोकप्रियतेसाठी, असा प्रश्न मला पडे. आपल्या प्रतिमेसाठी त्यांनी इतके कशाला करायला हवे असा प्रश्न मनात येई. आपण लोकांना आवडतो हे त्यांना आवडायचे काय? बहुधा ते बरोबरही असेल.. बहुसंख्यांना नाराज न करता, त्यांची मर्जी राखून सामोपचाराच्या माध्यमातून विश्वबंधुतेचा ध्यास हेच त्यांचे उद्दिष्ट होते, बहुधा!’’ आणखी एका ठिकाणी रुस्तमजी लिहितात, ‘‘१५ ऑगस्ट १९४७ ला सत्तेवर आलेल्या मंत्रिमंडळातील फक्त तिघेच दहा वर्षांनंतरही मंत्रिमंडळात होते. ते तिघे म्हणजे नेहरू, आझाद आणि जगजीवन राम. पण तरीही सारे काही तेच तेच असल्याचे वातावरण होते, त्याचे कारण नेहरूंचा विलक्षण दबदबा. आपल्या इनर सर्कलमध्ये प्रवेश देण्याबाबत नेहरूंचा एकमेव निकष होता तो म्हणजे निष्ठा. स्वत:चे मत असो वा नसो, (नेहरूंविषयी) निष्ठा असली म्हणजे पुरे. अशा व्यक्तीने नेहरूंबद्दल विश्वास बाळगावा, त्यांची प्रशंसा करावी आणि पूज्यभाव बाळगावा.. त्याने विरोध करता कामा नये, निषेध तर अजिबातच नाही.’’ (पृष्ठ क्र. १९४)
पं. नेहरू एक विचारी राज्यकर्ते होते. आपण नेमकं काय करतो आहोत, हा प्रश्न त्यांना सतत सतावत असे. एकदा दिलखुलासपणे गप्पा मारताना ते रुस्तमजींना म्हणाले, ‘‘मी पंतप्रधान झाल्यापासून माझ्या व्यक्तिमत्त्वाचा ऱ्हासच सुरू आहे. लोकांना सतत भेटत राहून मी स्वत:ला ताजंतवानं ठेवतो. पण हे प्रयत्नपूर्वकच करावं लागतं. शहरांतलं जगणं निरंतर पोकळ होत चाललंय. (तिथे) स्वत:तील गुणसंपदा विकसित करायला वेळच उरत नाही. पर्वत, पहाड आणि जंगलांमध्ये गुणसंपदा विकसित होते. त्यातूनच आयुष्याला अर्थ मिळतो.’’
महत्त्वाचं म्हणजे सुरक्षा अधिकारी असले तरी एका पातळीवर रुस्तमजी नेहरूंच्या मित्रासारखे झाले होते. लोकशाहीचे गुणदोष, भाषावार प्रांतरचना, पर्यटन, धरणांचा विकास अशा अनेक विषयांवर नेहरू रुस्तमजींशी गप्पा मारत. १९५८ च्या मे महिन्यात रुस्तमजी मध्य प्रदेशात पोलीस महानिरीक्षकपदावर नियुक्त झाले. अनौपचारिक निरोपाचा कार्यक्रम म्हणून नेहरूंनी मोठय़ा प्रेमानं रुस्तमजी आणि त्यांच्या पत्नी- नाजू यांना जेवायला बोलावलं. त्या प्रसंगाचं हृद्य वर्णन पुस्तकाच्या शेवटी आहे. इंदिरा आणि फिरोज गांधीही जेवायला हजर होते. रुस्तमजी लिहितात, ‘‘अनेक जुन्या आठवणींची उजळणी करत आम्ही जेवत होतो. साधेच पदार्थ, साध्याशा थाळ्यांमध्ये वाढून आम्ही आमच्या हातांनीच खात होतो. शेवटी (खाणं संपल्यावर एकटीनंच उठायचं कसं म्हणून अवघडून बसलेल्या) नाजूला नेहरू म्हणाले, ‘झालं असेल तर घे हात धुऊन!’ (इतकी अनौपचारिकता!) निघताना इंदिरा आम्हाला निरोप द्यायला खालपर्यंत आल्या.’’
एका स्वतंत्र प्रकरणात ‘‘दुसरी फळी न उभी करणे, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याबाबतचे अपयश न लक्षात घेणे आणि लोकांवर नको इतका विश्वास ठेवणे’’ हे पं. नेहरूंमधील दोषही रुस्तमजींनी स्पष्टपणे दाखवले आहेत. पण एका महत्त्वाच्या दोषाबद्दलचे त्यांचे परखड मत विशेष उल्लेखनीय आहे. ते म्हणतात की, स्वत: साधे आणि भ्रष्टाचारमुक्त असूनसुद्धा आजूबाजूच्या लोकांच्या भ्रष्टाचाराला आवर घालणे नेहरूंना जमले नाही. ‘‘आपल्याशी व्यक्तिगतरीत्या निष्ठावान आणि समíपत लोकांना – त्यांच्यात कितीही दोष असले तरी – नेहरूंनी नेहमीच अभय दिले.’’
इतिहासाची पुनरावृत्ती होत राहते असं म्हणतात ते खोटं नसतं, ते असं!