आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना नुकताच महाराष्ट्र फाउंडेशनचा साहित्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. विज्ञानप्रसार हे उद्दिष्ट ठेवून नारळीकरांनी मराठीमध्ये विज्ञानकथा हा वाङ्मयप्रकार रुजवला. त्यांच्या विज्ञानकथा लेखनाची वैशिष्टय़े सांगणारा लेख..
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. विसाव्या शतकातली. कुणा एका मराठी मासिकानं कथा स्पर्धा घेतली. कथा मागवल्या गेल्या. परीक्षक नेमले गेले. त्यांनी महाराष्ट्रातील आणि बाहेरील स्पर्धकांकडून आलेल्या कथांचं परीक्षण केलं. निर्णय जाहीर केला. कुणा एका ना. वि. ज. आद्याक्षरं असलेल्या स्पर्धकाला पारितोषिक जाहीर झालं. त्यानंतर कळलं, की ती आद्याक्षरं प्रत्यक्ष विजेत्याच्याच नावाची आद्याक्षरं उलट दिली गेली होती. विजेत्याचं खरं नाव होतं जयंत विष्णु नारळीकर.
मराठी ललित साहित्यात ‘विज्ञान ललिता’ला तोंडावर सांगायला खूप उच्च स्थान आहे. परंतु प्रत्यक्षात त्याला नगण्य ठरवलं तर जातं नाही ना असा संशय घ्यायला जागा आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे प्रथम दर्शनीच एक पूर्वग्रह बनवला जातो. विज्ञान कळायला कठीण आहे. ज्याला विज्ञान समजतं तो फारसा ललित साहित्य, मग ते विज्ञान ललित का असेना, वाचायला जात नाही. आणि ज्याला विज्ञान समजत नाही तो विज्ञान ललित साहित्य वाचायच्या भानगडीतच पडत नाही. हे माझं विधान आकाशातून पाडलेलं नाहीय. हे एका मराठी समीक्षकाने माझ्या समोर केलेले विधान आहे. साहित्य समीक्षक अशा साहित्यापासून दोन हात दूरच राहतो असा माझा तरी अनुभव आहे. तरीही विज्ञान साहित्याची पुस्तकं खपतात. का?
या प्रश्नाचं उत्तर कदाचित स्टिफन हॉकिंगच्या ‘अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम’ या गाजलेल्या पुस्तकाचा संदर्भ घेऊन सांगता येईल. ते पुस्तक हातोहात खपलं. एका वार्ताहरानं त्यावर काही जणांच्या मुलाखती घेतल्या. तेव्हा कळलं की ते पुस्तक घेणाऱ्या बहुसंख्य वाचकांनी ते फक्त शान म्हणून खरेदी केलं होतं. त्या पुस्तकानं त्यांच्या दिवानखान्याची शान वाढवली आणि त्यांची गणती एका सुसंस्कृत समाजात केली गेली. प्रत्यक्षात पुस्तक कुणी वाचलं कुणी नाही.
मुंबईतील एका प्रख्यात वृत्तपत्रानं एक विज्ञान नियतकालिक चालवलं. ते नीट चालावं म्हणून त्याला एकविसाव्या शतकाच्या आरंभाच्या वर्षांचं नावही दिलं. त्याच्या संपादक मंडळातील एका सदस्यानं उघड केलेलं दु:ख समजण्यासारखं आहे. त्यानं म्हटलं, ‘आमचं हे नियतकालिक सामान्य माणसाला विज्ञानाचं ज्ञान मिळावं या उद्देशानं प्रकाशित केलं जातं. परंतु ते नियतकालिक केवळ जे विज्ञानाचं संशोधन करतात तेच फक्त पाहतात. वाचणारे जवळ जवळ कोणीच नाहीत.’ उघड आहे की ते नियतकालिक २००१ पर्यंत देखील टिकू शकलं नाही.
विज्ञान ललित साहित्य पाश्चात्य देशात खूप वाचलं जातं. तिथं खपतंही. भारतात तितकं खपत नाही. फारसं वाचलं जातं असं मी छातीठोकपणे सांगू शकत नाही. आता हा निराशेचा सूर का, कोणीही विचारेल.
इतकं सारं असूनही मराठी वाचकांनी नाविज यांचं, आय मीन, जयंत विष्णु नारळीकरांचं विज्ञान ललित साहित्य उचलून धरलं गेलं. त्यांच्या पुस्तकांच्या सर्वात जास्त आवृत्त्या निघाल्या. कदाचित आणखीनही निघतील. का? इथं कदाचित सामान्य मराठी वाचकांच्या चोखंदळ अभिरूचीचं दर्शन घडू शकतं. विज्ञान ललित साहित्यात फँटसीला कधी कधी अतोनात महत्त्व दिलं जातं. त्यात अंतरिक्ष प्रवास आल्याशिवाय ते विज्ञान ललित म्हणवून घेऊ शकत नाही. त्यात बाह्य जगतातील प्रवासी आले तर अती उत्तम. त्यांच्या आणि पृथ्वीवासीयांमधील युद्धं हा विषय अगदी एच. जी. वेल्सपासून प्रचलित आहे. आणि आवडणारा आहे. ‘टर्मिनेटर’ ते ‘ए व्हर्सस पी’ (एलियन व्हर्सेस प्रीडेटर) या मालिका टीव्हीनं गाजवल्यात. मायकेल क्रिप्टनचं ‘ज्युरासिक पार्क’ हे दुसरं टोक. हे सारं नारळीकरांच्या साहित्यात आढळत नाही. तरीही त्यांच्या साहित्यानं मराठी वाचकांच्या मनावर पगडा बसवला. कसा?
साधी शैली. (नारळीकर नावाच्या माणसासारखी.) एक साधं उद्दिष्ट, लोकांपर्यंत विज्ञान पोचवायचं. शक्य तितक्या साध्या शब्दात ते समजावून सांगायचं. विष्णु शर्मानं ‘पंचतंत्रा’च्या कथांमध्ये जे तंत्र वापरलं, तसंच काही तरी. गहन विषय सोप्या पद्धतीतून मांडायचा. कथारूपासारखं सोपं काहीच नाही. वेदांचं ज्ञान उपनिषदातून समजेलच असं नाही. त्याला पुराणांमधील कथांची जोड दिली तर ते समजायला अधिक सोपं जातं. कदाचित पुराणं त्या काळात त्याचसाठी लिहिली गेली असावीत. आज आपण त्यांना भाकड कथा म्हणून त्याचा तिटकारा अथवा थट्टा करू. परंतु वेदांमधील परमेश्वरी संकल्पनेला पुराणांनी उभार दिला. तसंच विज्ञानातील गहन तत्त्वं समजण्यासाठी विज्ञान कल्पितांचा एक भक्कम असा आधार होऊ शकतो. नारळीकरांच्या कथांमध्ये हाच संकल्प दिसून येतो.
‘मराठी विज्ञान ललित साहित्य म्हणजेच जयंत विष्णु नारळीकर’ हे समीकरण अतिशयोक्तीचं नाही. ‘यक्षांची देणगी’ हा नारळीकरांचा कथासंग्रह आजही मराठी वाचक वर्गाकडून त्याच उत्कंठेने वाचला जातो. ‘वामन परत न आला’ आजही भौतिकशास्त्रातील एक गूढ विषयाचं आकलन करून देऊ पाहतो. ‘प्रेषित’ मानवी इतिहासाच्या पुनरावृत्तीचा संदेश देतो. ‘यक्षांच्या देणगी’नं मूर्त स्वरूप धारण केलेलं आहे. शीत युगाची चाहुल सर्वत्र दिसून येत आहे. अंतरिक्षातील लघुग्रहांची भ्रमणं आपल्याला पुन्हा पुन्हा सूचना देत आहेत. हे सत्य आहे. नुसतं विज्ञान कल्पित नाही. नारळीकरांच्या विज्ञान ललिताला त्यांच्या संशोधनाचा जबरदस्त आधार आहे. त्यामुळे त्यांच्या विज्ञान ललिताला एक वेगळीच ऑथेंटिसिटी येते. एक अधिकृतपणा येतो. एक वेगळंच वजन प्राप्त होतं. एका वेगळ्याच सत्याचा अनुभव येतो. तो इतरांच्या साहित्यात येतोच असं म्हणता येणार नाही.
‘साहित्यात या पुढे कल्पिताला वाव असणार नाही’ असं एका प्रख्यात आणि जागतिक स्तरावरील साहित्यिकानं म्हटलंय असं एका समीक्षकानं माझ्या एका कादंबरीच्या संदर्भात लिहून पाठवलेलं होतं. साहित्यानं केवळ आजच्या मानवी जीवनावर भाष्य करावं असं काहींचं आवर्जून म्हणणं आहे. त्यांना फँटसी पचत नाही. रोमँटिसिझम आवडत नाही. भविष्यवाणीवर त्यांचा विश्वास नाही. एका विशिष्ट निराशाजन्य (का निराशाजनक?) जीवनपद्धतीवर त्यांचा विश्वास आहे. अशांना विज्ञान कल्पिताचं वावडं आहे. त्यामुळे विज्ञान कल्पिताकडे साहित्यिक मूल्यं नसतात असा दावा केला जातो. विज्ञानानं कितीही उंच भरारी घेतली तरी भूतकाळाला कवटाळून बसून मानवाच्या असंख्य दु:खांना गोंजारीत बसायची प्रवृत्ती साहित्यानं जोपासलेली आहे. ती प्रवृत्ती ज्यांना आवडते त्यांना ते अवश्य करू द्या. दु:खाचे रंग हजार म्हणून कौतुक करत बसू द्या. गालिब (असद)नं म्हटलंय तसं,
ग़मे हस्तीका असद क्या हैं जुज मर्ग इलाज
शमा हर रंग में जलती हैं सहर होने तक
जीवनातील दु:खांचा मृत्यू शिवाय दुसरा काय इलाज आहे? मशालीची ज्योत पहाट होईपर्यंत सर्व छटांमधून रंगत जळते. ठीक आहे. तेच तेच रंग रंगवणं ज्यांना पसंत आहे त्यांनी ते अवश्य करावं. परंतु माझ्या मते, विज्ञान ललिताकडे मानवी आकलनाच्या क्षितिजापलीकडे पाहायची क्षमता असल्यामुळे त्याने ते अवश्य पाहावं. आणि त्याने ते इतरांना पाहू द्यावं. धरणीवरील पाय भक्कमपणे रोवून ते साहित्य आपल्याला काही तरी नवं पाहायची शक्ती देते असं मला वाटतं. आणि ती त्याची क्षमता नारळीकरांनी आपल्या साहित्यातून सिद्ध केलीय असं माझं मत आहे.
मराठीतील विज्ञान कल्पित साहित्याला उभार येवो न येवो, नारळीकरांचं ऋण हे साहित्य सदैव मान्य करील. त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायला नारळीकरांचं योगदान महत्त्वपूर्ण ठरलेलं आहे. बहादूर शहा जफर या शेवटच्या मोगल बादशहाच्या काळी वर उल्लेख केलेला गालिब (असदउल्ला) हा उर्दू शायरही होऊन गेला. किंबहुना त्या काळी भरपूर शायर होते आणि शायरीही होत असे. खुद्द जफरही एक शायर होता. गालिबनं आत्मस्तुतीचा दोष पत्करून म्हटलंय,
हैं और भी दुनियामें सुखनवर बहोत अच्छे
कहतें हैं गालिब का है अंदाजे बयाँ और
जगात अनेक छान शायर आहेत. परंतु गालिबच्या वर्णन करायच्या खुबीत काही तरी विशेष आहे. तसंच मी म्हणेन, आपल्याकडे विज्ञान लेखक खूप आहेत. परंतु नारळीकरांच्या लेखणीतील अधिकारयुक्त क्षमता केवळ त्यांचीच आहे, आणि आगळी आहे. कहते हैं के ‘नाविज का है अंदाजे बयाँ और।’