प्रीती सागर हे नाव जिंगलमध्ये गायिकांत प्रथम क्रमांकाचं होतं. अतिशय गोड आवाज. जिंगल गाण्यासाठी लागणारी त्यातील नाटय़पूर्णता, मराठी/ हिंदी/ इंग्लिश भाषा अवगत असल्यामुळे गाण्यातली सहजता आणि उत्तम आकलनशक्तीच्या जोरावर तिने जिंगलच्या क्षेत्रामध्ये अनेक वर्षे राज्य केलं. तिचं बघून मग सुषमा श्रेष्ठ तयार झाली. कविता कृष्णमूर्तीचा आपला एक वेगळा आवाज होता. कारण ती अभिजात आणि सुगम संगीत दोन्ही शिकलेली होती. या सर्वासाठी सकाळी ८ ते १० रेडिओवाणीमध्ये स्कॅच करायचो, तोच रियाज होता. रोज पाच-पाच, सहा-सहा जिंगल्स त्यांना गायला मिळायच्या. वेगवेगळ्या सुरांत, वेगवेगळ्या रागांत. कोणत्या शब्दांवर जोर द्यायचा, कुठे नाजूकपणा हवा, हे रोज शिकायला मिळायचे. रोज संगीतकारही नवे. कधी नाथनजी, कधी सुरेशजी, तर कधी वेदपाल वा अशोक पत्की!
लता मंगेशकरांना जशी त्यांच्या पदार्पणात नवीन नवीन जाणकार संगीतकारांकडे शिकण्याची संधी मिळाली तसंच काहीसं या मंडळींनाही भाग्य लाभलं. जिंगलचे आधारस्तंभ कोण, असं जर विचारलं तर वनराज भाटिया, पी.पी. वैद्यनाथन, सुरेश कुमार, वेदपालजी ही नावं घ्यावी लागतील.
या प्रत्येकाची काम करण्याची एक वेगळी धाटणी होती. वनराज भाटिया हे इंग्लिश सिंफनी-ऑपेराचा प्रभाव ज्यांच्यावर आहे असे संगीतकार आहेत. या विषयांवर लेक्चर द्यायला त्यांना परदेशातून बोलावणे येत असे. कॉर्डस् म्हणजे काय? हे आर.डी. बर्मनकडे गिटार वाजवणारी मंडळी सांगू शकतील. सुनील कौशिक, गगन, एहसान, रमेश अय्यरही त्यापैकीच होत. एहसान म्हणजे शंकर-एहसान-लॉय या त्रिकूट संगीतकारांपैकी! तो जेव्हा नवीनच वनराजकडे आला होता तेव्हा वनराज भाटिया एकदम वैतागायचे. ‘इसको सिक्स-एट मालूम नही और गिटार बजाने आया है! अशोक, तू समझाओ इसको.’ असं म्हणून ते त्याला माझ्याकडे पाठवायचे. मग मी ‘झिंक्  चिका- झिंक् चिका’ असं त्याला म्हणून दाखवायचो. तेही नाही कळलं तर ‘रमय्या वस्तावैया’ गाणं म्हणून दाखवत असे. आजही कधी तो भेटला की, ‘आपने उस टाइम संभाल लिया इसलिये मैं म्युझिशियन बना. थँक्स!’ असं कृतज्ञतेनं म्हणतो. आज तो कोणत्या उंचीला आहे हे तुम्ही जाणताच.
वनराजचं हिंदी जेमतेमच होतं. इंग्लिशवर मात्र प्रभुत्व! त्यांना सुरुवातीच्या काळात प्रीती सागर टय़ून बनवायला मदत करायची. मग त्याची-माझी ओळख झाली. मी त्याच्याकडे सिंथ वाजवायचो. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’पासून आमची जास्त दोस्ती झाली. एक दिवस तो मला म्हणाला,‘तू नाथन् के पास सिंथ बजाने जाता है ना?’
मी म्हटलं, ‘हो.’
तो म्हणाला, ‘तू तो ठसे टय़ूनभी बनाकर देता है! देखा है मैंने.’
 मी म्हटलं, ‘ऐसा कुछ नही. कही वो फस जाता है- या दिमाग ब्लँक होता है तो करता हूँ मदद!’
‘नहीं, नहीं. आजसे मेरे लिये भी करोगे! तुम्हे कुछ एक्स्ट्रा पैसे दे दँूगा!’ त्याने आग्रहच केला.
त्यांच्याबरोबर ‘कथा दोन गणपतरावांची’, ‘मम्मो’, अनेक जिंगल्स आणि ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ केलं. माझ्या घरीच त्याची रिहर्सल व्हायची. आणि शेवटचं काम म्हणजे ‘सरदारी बेगम’! मी, आरती अंकलीकर आणि जावेद अख्तर असे तिघे बसून एका आठवडय़ात रेडिओवाणीमध्ये १३ गाणी केली होती. त्यानंतर आरतीच्या आयुष्यातला ‘टर्निग पॉइंट’ म्हणून लोक या चित्रपटाला संबोधू लागले.
वनराज भाटियाचं हिंदीचं ज्ञान कमी असल्यामुळे त्याला वाटायचं, की भांगवाडी थिएटरमध्ये होतात तसली गाणी किंवा अशोक कुमार, देविका राणी, लीला चिटणीस यांच्या काळातील गाणी (अछुत कन्या) म्हणजे हिंदी गाणी! पण त्यांना माहीत नव्हतं, की हा ठुमरी गायिकेवर आधारित सिनेमा आहे. मग जावेदजी मुखडा द्यायचे. त्याला चाल लागेपर्यंत आतून अंतरा यायचा. सकाळी एक गाणं व दुपारी एक गाणं अशी आमची कामाची पद्धत होती. मग आरतीच्या नावावर रेकॉर्ड खपेल की नाही, अशी चर्चा सुरू झाली. आरतीचं शास्त्रीय संगीतात नाव होतं, पण सिनेमासाठी? मग कोणीतरी सांगितलं की, ‘दोन गाणी आशा भोसलेंच्या आवाजात करा.’ मग आशाजींनी दोन गाणी म्हटली. मी हार्मोनियमवर, शराफत तबला, घुंघरू, दिलरुबा/ सारंगी आणि ऑर्गनवर आप्पा वालावलकर असे मोजून पाच जण होतो. आणि सर्व गाणी ‘लाइव्ह’ केली. अगोदर ट्रॅक, मग डबिंग वगैरे प्रकार नाही. आशाताई एकदम खूश होत्या.
गायकांमध्ये सगळेच आपापल्या गायन कौशल्याने जिंगलमध्ये प्राण ओतत असत. प्रीती सागर ही जुन्या जमान्यातील कलाकार मोती सागर यांची मुलगी. मलबार हिलला राहायची. त्यांच्या बाजूला वनराज भाटिया राहायचा. सुरेंद्रनाथ या गायक नटाची दोन मुलं होती. त्यांनी आपली स्वत:ची ‘फार’ कंपनी काढली. अनेक जिंगल्स त्यांनी केली. या सर्वाचा एक ग्रुप होता. तसंच श्याम बेनेगल, शक्ती कपूर, गोविंद निहलानी, वनराज भाटिया असा एक चित्रपटासाठीचा ग्रुप होता. गायिकांमध्ये प्रीती सागर व गायकांत पंकज मित्रा. मग सुषमा श्रेष्ठ, विनय मांडके, विनोद राठोड, कुनाल गांजावाला, वाणी जयराम, कविता कृष्णमूर्ती, बलराम, कुरुविला, रघू वगैरे सर्व भाषांतील मंडळी तयार झाली. कोणत्या प्रकृतीचं जिंगल आहे, कोणती भाषा आहे, त्याप्रमाणे गायकांना बोलावलं जायचं! ही सर्व मंडळी नुसती गायक म्हणून श्रेष्ठ नव्हती, तर त्यांच्या आवाजात ‘नाटय़’ होतं- जे जिंगलला आवश्यक असतं. विनय मांडके हा सर्वाचा ‘बाप माणूस’ होता. नकला करण्यात पटाईत. अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या नकला तो हुबेहूब करायचा. त्याचा जिंगलसाठी खूप उपयोग व्हायचा. एक संगीतकारही त्याच्यामध्ये दडलेला होता. कंपोझिशनमध्येही तो मदत करायचा. ‘हमारा बजाज’ ही जिंगलही त्याचीच! संगीतकार म्हणून त्याचं नशीब चाललं नाही, पण गायक म्हणून त्याने एक काळ गाजवला. नंतरच्या काळात महालक्ष्मी अय्यर, शंकर महादेवन, केके अशी नवीन पिढीतली मंडळी आली.
दुर्गा जसराजचा मला एके दिवशी सकाळी फोन आला. म्हणाली, ‘एक मुलगा आला आहे जसराजजींकडे भेटायला. खूप छान गातो. तुम्हीही ऐकावं असं मला वाटतं.’
मी म्हटलं, ‘रविवारी घेऊन ये!’
ती म्हणाली, ‘नाही, नाही! तो माझ्याबरोबरच आहे. तुम्ही घरी असाल तर आता दहा मिनिटांत घेऊन येते.’
मी माहीमला राहतो व ती शिवाजी पार्कला राजा बढे चौकात राजकमल बिल्डिंगमध्ये. दहाव्या मिनिटाला दोघेही हजर!
मी म्हटलं, ‘कुछ सुनाओ!’
त्यानं ‘बगळ्यांची माळ’ ऐकवलं. मग एक कर्नाटकी गाणं ऐकवलं. त्यात ताना, सरगम होती. लयकारी होती. मी चाटच झालो. म्हटलं, ‘कल क्या कर रहे हो?’
तो म्हणाला, ‘सर! बेकार हूँ! इसिलिये तो आपके पास आया हँू!’
दुसऱ्या दिवशी ‘कमांडर’ सीरियलचं टायटल साँग व एक जिंगल त्याच्याकडून गाऊन घेतली. ते ‘कमांडर’चं टायटल साँग इतकं हिट झालं की मला इतर संगीतकारांचे फोन येऊ लागले. ‘हा कोण नवीन मुलगा आहे? नाव काय त्याचं? नंबर द्या त्याचा.’
पुढची वर्ष-दीड वर्षे तो फक्त आलापी करण्यासाठी रेकॉर्डिग करायचा. मला म्हणाला, ‘अशोकजी, आलाप गा-गा के कंटाला आया है. कोई गाना देताही नही.’ पण थोडय़ाच दिवसांत देवाने त्याची ही इच्छा पूर्ण केली. ‘ब्रेथलेस’ म्हणून त्यानं एक अल्बम केला आणि तो इतका गाजला, की त्याने मग मागे वळून पाहिलंच नाही. आज केव्हाही, कधीही फोन केला, की माझ्या कामासाठी तो धावत येतो. ‘आज जो भी हूँ, आपकी वजहसे,’ असं म्हणतो. पण मला वाटतं, तुमच्यामध्ये गुण पाहिजेत, मग दिशा दाखवणारा भेटतोच कुणीतरी!
कविता कृष्णमूर्तीचंही तसंच आहे. लग्न झाल्यापासून ती बंगलोरला असते. भेटली की म्हणणार, ‘आप बुलाते नहीं गाने को?’
मी म्हटलं, ‘तुला बंगलोरहून बोलावणार म्हणजे फ्लाईटचं तिकीट, हॉटेल आणि मग तुझी बिदागी- एवढं मराठी निर्मात्याला नाही परवडणार.’ त्यावर ती म्हणते, ‘कौन कहता है ये सब देने के लिये? मैं अपने खर्चेसे आऊंगी. मुझे बस आपके मेलोडीयस गाने गाने है.’ त्यावेळी मला धन्य झाल्यासारखं वाटतं.

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
navi mumbai, nerul, save Kandalvan protest, Cricket umpires, association, activate, environment, marathi news,
कांदळवन वाचवण्यासाठी क्रिकेट पंच संघटनाही सक्रिय, नेरुळच्या चाणक्य तलाव परिसरात आंदोलन
buldhana japan marathi news, japanese language buldhana marathi news
गरिबीच्या अंधारावर मात करत निघाली उगवत्या सूर्याच्या देशात; बकऱ्या वळणाऱ्या रमाई कन्येला जपानमध्ये लाखोंचे ‘पॅकेज’