तुम्ही कल्पना करा, तुम्हाला शाळेत अमूक वाजताच जाण्याची सक्ती नाही. तासन् तास एकाच वर्गात बसण्याचं बंधन नाही. बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि खिडकीतून त्याची मजा लुटताना मागून बाईंचा पाठीत सॉलिड रट्टा नाही.. अशी शाळा असती तर?  लहानग्यांनाच काय, मोठय़ांनाही अशा शाळांचं कुतूहल वाटेल. ती हवीहवीशी वाटेल.  सध्या शिक्षणाची जी बजबजपुरी माजली आहे त्यात हे निव्वळ स्वप्नरंजन वाटेल. पण अशी शाळा हे स्वप्नरंजन नाही. जगात अशा काही शाळा आहेत, जिथे मुलांमध्ये जीवनमूल्यं उंचावण्याचा प्रयत्न केला जातो. मुलांच्या विकासाच्या दृष्टीने शिस्त, अभ्यासक्रम आणि परीक्षा अप्रस्तुत असून त्यांची देखभाल, संवर्धन, स्वातंत्र्य यांना खूप महत्त्व दिलं जातं.
‘खऱ्या शिक्षणाच्या शोधात’ या पुस्तकात डेव्हिड ग्रिबल यांनी जीवनमूल्यं उंचावणाऱ्या चौदा शाळांविषयी माहिती दिली आहे. यात इस्रायल, न्यूझीलंड, स्वित्र्झलड, ब्रिटन, इक्वॅडोर आणि भारत या देशांतील शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये समरहिल, डर्टिग्टन हॉल स्कूल, तामारिकी स्कूल, सड्बरी व्हॅली स्कूल, ब्रॅम्बलवूड स्कूल, क्लेनग्रप्प ल्युफिनजेन, कौंटेस्थार्प कम्युनिटी कॉलेज, द डेमोक्रेटिक स्कूल ऑफ हडेरा, नीलबाग आणि सुमावनम्, द बार्बारा टेलर स्कूल, द पेस्टालॉझ्झि स्कूल, मिरांबिका, द ग्लोबल स्कूल आण् िसँड्स स्कूल या शाळांचा समावेश आहे.
पुस्तकाची सुरुवात होते ते ए. एस. नील यांनी सुरू केलेल्या ‘समरहिल’ या शाळेपासून. इथली बहुतांशी मुलं ही गुन्हेगारी प्रवृत्तीची. पण याच शाळेतील विद्यार्थी पुढे विद्यापीठातले प्राध्यापक, डॉक्टर, अभियंते, शिक्षक झाले. भविष्यात विद्यार्थी आपल्या पेशात असमाधानानं काम करण्यापेक्षा तो समाधानानं काम करेल याकडे ‘समरहिल’चा कल असतो. इथं  साचेबद्ध शिक्षणापेक्षा मुलांचं मानसिक स्वास्थ्य आणि स्वातंत्र्य याला खूप मोल होतं. मुलांना त्यांच्या मनासारखं जगू देणं हा ‘समरहिल’चा गाभा. आणि तसं त्यांना वागू दिलं तर ते आपलं आयुष्य अधिक सुंदर घडवू शकतात, हा विश्वास.
समाजात विविध वृत्ती- प्रवृत्तीचे लोक असतात. प्रत्येकात काही वेगळी खास गोष्ट असते. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, कुवत वेगळी. हे जाणून मुलांना ‘स्वत:’ची ओळख करून देणारी शाळा म्हणजे डर्टिग्टन हॉल स्कूल.
सँड्स स्कूलही अशीच वेगळी शाळा. विद्यार्थ्यांनी मोकळेपणानं आपले विचार आणि समस्या मांडायच्या आणि त्या त्यांनीच चर्चेतून सोडवायच्या, हा या शाळेचा विशेष. इथं मुलांची कोणतीही गटबाजी नाही. प्रत्येकालाच स्वत:चं मत मांडण्याचा हक्क असतो, हे शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न ही शाळा करत आहे.
अमेरिकेतली सड्बरी व्हॅली स्कूल म्हणजे प्रत्येक मुलाला हवीहवीशी वाटणारी शाळा. अगदी आपल्या    स्वप्नातलीच शाळा म्हणा ना!  मुलांना जे आवडेल, जे करावंसं वाटेल, ते करायची मुभा या शाळेत आहे. हो, पण हे करताना मुलांमध्ये नकळतपणे जबाबदारीची जाणीव कशी निर्माण होते आणि ती आपली कामं जबाबदारीनं कशी पार पाडतात, याचा उत्तम अनुभव या शाळेच्या व्यवस्थापनाला आला. या शाळेतली मुलं कुंभारकामापासून अगदी  मेंढय़ापालन, मासेमारीचीही कामं करतात, कारण ती त्यांना आवडतात. कुठलंही काम कमीपणाचं नसतं, हा इथला वस्तुपाठ!
ब्रॅम्बलवूड स्कूल ही शाळा नावापासूनच वेगळी. या शाळेला याच नावानं कोणी ओळखत नाहीत. कारण या शाळेला तिचं खरं नाव प्रसिद्ध करायचंच नाही. शाळेची इमारत बांधली तीही टाकाऊपासून टिकाऊ या धर्तीवर. या शाळेतील शिकण्याच्या व शिकविण्याच्या पद्धतीतला लवचिकपणा हे इथलं मोठं वैशिष्टय़!
‘द बार्बारा टेलर स्कूल’ ही एक प्राथमिक शाळा. या शाळेला लहानग्यांचं विश्व खूप अचूक पद्धतीनं उमगलं आणि त्यानुसार त्यांनी मुलांना आकार देण्याचा प्रयत्न केला. इथला शिक्षकही मुलांमध्ये मूल होऊन खेळत असे. ‘हसतखेळत शिक्षण’ हे या शाळेनं खऱ्या अर्थानं सिद्ध करून दाखवलं.
बंगरुळू येथील नील बाग  व सुमावनम् या दोन शाळांचा विशेष म्हणजे इथल्या गरिबांना गरिबीपासून सुटका करण्यात या शाळांनी मदत केली. आर्थिकदृष्टय़ा ‘नाही रे’ वर्गाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम या शाळांनी केलं. शाळेत उपस्थितीची सक्ती नाही. तसेच एकमेकांशी स्पर्धा न करता एकमेकांना प्रोत्साहन देऊन सहकार्याची भावना वृद्धिंगत करणं हेच या शाळांचं मुख्य ध्येय. ‘हसत-खेळत शिक्षण’ हा त्यांचा मुख्य गाभा.
नवी दिल्लीतील श्री अरोबिंदो आश्रमाच्या परिसरातील ‘मिरांबिका’ ही भारतातील अशीच वेगळी शाळा. या शाळेत वेगवेगळे प्रकल्प करण्यावर भर दिला जातो. तसेच जे प्रकल्प करायचे आहेत त्याची निवड मुलांनीच करावी, याकडे कटाक्ष. सतत चर्चा करून एखादी गोष्ट अधिक उत्तम पातळीपर्यंत पोहोचवणं यावर अधिक भर असतो. शारीरिक कौशल्य, निसर्गाविषयी आस्था निर्माण करण्यावर अधिक भर देण्याला महत्त्व दिलं जातं.
जपानमधल्या टोकयो शूरे, नानोमी चिल्ड्रेन्स व्हिलेज, द ग्लोबल स्कूल या शाळांचा विशेष म्हणजे आखीवरेखीव वेळापत्रकातही खेळीमेळीच्या वातावरणात अभ्यास, प्रकल्प यांच्यावर भर दिला जातो. मुलांच्या नैसर्गिक वाढीवर या शाळांचा भर आहे.
इस्रायलच्या ‘द डेमॉक्रेटिक स्कूल ऑफ हडेरा’मध्ये मुलांना मुक्तचर्चेसाठी प्रोत्साहन दिलं जातं. त्यामुळे मुलांच्या विचारसरणीत ठोकळेबाजपणा न येता मुक्त विचारसरणीची मुभा मुलांना दिली गेलेली. मुलांनी मांडलेल्या विचारांचा आदर आणि त्यावर समर्पक चर्चा, हे इथलं वैशिष्टय़! शिक्षकांशी कोणत्याही विषयावर सहज होणारी चर्चा, अभ्यासक्रेंद्र म्हणून राखून ठेवलेल्या आणि कायम उघडय़ा असणाऱ्या खोल्या, तसेच बाहेरील व्यावसायिकांसोबत थेट काम करण्याची मुभा ही या शाळेची आणखी काही वैशिष्टय़ं.
या पुस्तकात समाविष्ट शाळांच्या शैक्षणिक कार्यपद्धतींमध्ये मुलांचं स्वातंत्र्य आणि त्यांच्यावर दाखविलेला प्रचंड विश्वास हे या शाळांचं समान सूत्र म्हणता येईल. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या शाळा आजच्या शैक्षणिक साठमारीत ‘स्वप्नवत’ वाटाव्यात अशाच आहेत. कारण मुलांवर अतिशिस्तीचा बडगा उगारणारे शिक्षक, मुलांच्या मेंदूत वारेमाप विषयांची कोंबली जाणारी माहिती, खेळांना असलेलं दुय्यम स्थान, शिक्षकांकडून ‘हाताची घडी तोंडावर बोट’ याच उक्तीचा वारंवार केला जाणारा पुनरुच्चार.. शाळेची फी जितकी जास्त, तितका त्या शाळेचा शैक्षणिक दर्जा उच्च असा समज करून घेणारे, पाल्याला वयाच्या तिसऱ्या वर्षांपासूनच अभ्यासाच्या स्पध्रेत उतरवणारे पालक.. अशा सर्वानीच हे पुस्तक हाती घ्यावं आणि वाचावं. कारण हे पुस्तक म्हणजे मुलांवर पूर्णपणे अविश्वास दाखविणाऱ्या शिक्षक-पालकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन आहे!
‘खऱ्या शिक्षणाच्या शोधात’ – डेव्हिड ग्रिबल, अनुवाद- डॉ. वृंदा चापेकर, मनोविकास प्रकाशन, पुणे, पृष्ठे- ३८०, मूल्य – ३५० रुपये.