स्वत:च्या संपूर्ण नावातलं आद्याक्षर घेऊन जेव्हा ग्रंथनाम तयार केलं जातं तेव्हा ते आत्मकथनच असणार हे वेगळं सांगायची गरज उरत नाही. अरुण महादेव काकडे जेव्हा ‘अमका’ होतो तेव्हा तो तमका नसतोच नसतो. आत्मवृत्त म्हटल्यावर काही वैयक्तिक भाग येणारच, पण तो इथे विशेष महत्त्वाचा नाही.
पुण्याची ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन’ आणि मुंबईतील ‘रंगायन’ व ‘आविष्कार’ या नाटय़संस्थांच्या जडणघडणीचे साक्षीदार असलेल्या काकडेकाका यांचं हे आत्मकथन इतकं साधं आणि सोपं आहे की, एकाच क्षेत्रात दीर्घकाळ निष्ठेनं काम करणाऱ्या कुणालाही आपणही आत्मचरित्र लिहावं व कुणी तरी ते छापावं असं वाटल्यास नवल नाही.
आत्मचरित्र म्हटल्यावर त्यात जन्म घ्यावाच लागतो आणि मग आपोआपच बालपण, शालेय जीवन, महाविद्यालयीन दिवस आणि नोकरीची हयात, लग्न यांना सामावून घेणं अपरिहार्य होतं.
सर्वसामान्यांचा जन्मापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतचा कालखंड जसा थोडय़ा फार कष्टाचा आणि धावपळीचा जातो तसाच तो काकडेंचाही गेला. त्यात उल्लेखनीय वा नोंद घेण्याजोगं काही नाही.
नाटय़संस्थांचे उत्तम निर्माते म्हणजेच व्यवस्थापक म्हणून काकडेकाका ख्यातकीर्त झाले. त्यांच्यात हे नेटक्या व्यवस्थापनेचं, सर्वाना सांभाळून घेण्याच्या वृत्तीचं बीज कुठं पडलं? वाडिया कॉलेजमध्ये स्टुडंट मॅनेजरची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या समयसूचकतेनं व त्वरित निर्णय घेण्यानं जी वेळ निभावून नेली, त्यातच त्यांच्या भावी व्यवस्थापकाची बीजं दिसून येतात.
वाडिया कॉलेजच्या गॅदरिंगच्या नाटकासाठी काकडय़ांनी दिग्दर्शक म्हणून भालबा केळकरांना पाचारण केलं आणि आचार्य अत्र्यांची फार्सिकल नाटकं बसवण्यात हातखंडा असलेल्या भालबांच्या दिग्दर्शन प्रक्रियेचं त्यांना साक्षीदार होता आलं. भालबांच्या दिग्दर्शनाची पद्धती ते ठोकळमानानं नमूद करतात, पण दिग्दर्शनातील त्यांची एखादी अविस्मरणीय कृती किंवा हालचाल मात्र काकडेंना आठवलेली दिसत नाही. वाडियामधील ‘अंमलदार’ नाटकात काकडय़ांनी भालबांच्या मार्गदर्शनाखाली ‘हरभट’ रंगवला. हेच त्यांचं रंगभूमीवरचं पहिलं पाऊल.
कॉलेजच्या गॅदरिंगच्या नाटकाच्या हकिगती सांगताना वेगवेगळ्या प्राध्यापकांचीही ओळख करून दिली जाते. मराठी वाङ्मय मंडळाचा सेक्रेटरी असताना पु.ल. देशपांडे, मो.ग. रांगणेकर यांना त्यांनी अध्यक्ष म्हणून आणल्यानंतरच्या समारंभाचंही वर्णन केलं जातं. पी.डी.ए.च्या नाटकांच्या तालमींनाही काकडे हजेरी लावत असत. त्यातूनच ते भालबांच्या पी.डी.ए.चे एक मेहनती कार्यकर्ते झाले. नोकरीनिमित्त पुण्याहून मुंबईला आल्यावर काकडे यांनी विजया जयवंत (मेहता) यांच्या नाटय़शिक्षण वर्गात प्रवेश मिळवला. भालबांचा विद्यार्थी म्हणून आणि अरविंद देशपांडे यांच्या ओळखीचा म्हणून हा प्रवेश मिळवणं सोपं गेलं. त्यानंतर ‘इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स’तर्फे झालेल्या ‘शितू’ या गो.नी. दांडेकरांच्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाची व त्यानंतरच्याही प्रयोगाची माहिती मिळते. ते विजय तेंडुलकरांचं प्रथम दर्शन, त्यांच्या ‘श्रीमंत’ नाटकाची गोष्ट, त्यांच्या लेखनाबद्दल मत वगैरे वगैरे सारं सांगून टाकलं आहे. नाटककार तेंडुलकरांनी त्यांच्यावर कसा व किती प्रभाव पाडला हेच त्यातून कळतं. आचार्य अत्रे ‘श्रीमंत’च्या रौप्यमहोत्सवी प्रयोगाला आले आणि दुसऱ्या दिवशी ‘मराठा’मध्ये तेंडुलकरांचा व त्यांच्या नाटकाचा गौरव करणारा अग्रलेखच त्यांनी लिहिला. ‘श्रीमंत’ नाटकाची गोष्ट आणि नाटय़स्वाद लिहून ते थांबत नाहीत, तर ख्यातनाम मुकाभिनयपटू (माइम) मार्सेल मासरेच्या त्यांनी पाहिलेल्या प्रयोगाचे ‘आंखो देखा’ सविस्तर वर्णन काकडेकाका करतात. थोडय़ा थोडक्या नाहीत, तर एकांकिका धरून सुमारे २२ नाटकांच्या गोष्टी सविस्तर त्यांनी सांगितल्या आहेत. त्यात रंगायनची सर्व नाटकं आणि आविष्कारच्या ‘तुघलक’पर्यंतची कथानकं आहेतच, पण त्यांनी कॉलेजमध्ये सादर केलेल्या ‘भ्रमाचा भोपळा’, ‘खडाष्टक’, ‘अंमलदार’, ‘देवमाणूस’सह ‘पी.डी.ए.’च्या ‘वेडय़ाचं घर उन्हात’, ‘जगन्नाथाचा रथ’, ‘देवाचं मनोराज्य’ आणि काही बालनाटय़ांचाही समावेश आहे. नाटकाच्या कथानकांचा हा भाग वेगळा काढून ‘इसापनीतीच्या गोष्टी’प्रमाणे नाटकांच्या गोष्टींचं एक वेगळंच पुस्तक काढता येईल.
चिं.त्र्यं. खानोलकरांच्या ‘एक शून्य बाजीराव’ या नाटकाची गोष्ट विस्तारानं सांगताना त्यांनी ‘न-नाटय़’ (अ‍ॅब्सर्ड प्ले)विषयीही माहिती दिली आहे.
‘वेडय़ाचं घर उन्हात’च्या प्रयोगात समईवरील तडतडणाऱ्या वातीबरोबर हालचाल करणाऱ्या प्रकाशयोजनेबद्दल व त्या वेळी दादासाहेबांचे ज्ञानेश्वरी ऐकू येणारे पठण, याचा मात्र उल्लेख केला जात नाही. मराठी रंगभूमीवरील अविस्मरणीय रंगमंचीय परिणामांपैकी तो एक होता.
‘तुघलक’ नाटकाच्या प्रयोगात ख्यातनाम प्रकाशयोजनाकार तापस सेन यांनी राजधानी बदलताना प्रचंड जनसमुदायाचा एक्सोडसचा निर्माण केलेला परिणाम नोंदवला जातो, पण त्याच वेळी दामू केंकरे यांनी या नाटकाचं जे अर्थपूर्ण नेपथ्य केलं होतं (मराठी नेपथ्याच्या इतिहासात जे महत्त्वाचं मानलं जातं.) त्याच्या अन्वयार्थाचा काकडेकाकांना विसर पडलेला दिसतो. महाविद्यालयीन नाटय़स्पर्धेत ग्रँट मेडिकल कॉलेजचे डॉ. काशिनाथ घाणेकर काम करीत असलेल्या एकांकिकांचं दिग्दर्शन नान् संझगिरी करीत असत असा चुकीचा उल्लेख ते करतात. रामचंद्र वर्दे हे डॉ. काशिनाथ घाणेकरांचे केवळ दिग्दर्शकच नव्हते, तर स्पर्धेत डॉक्टरांना वाव मिळेल अशा एकांकिकाही रामचंद्र वर्दे यांनी लिहिल्या होत्या. त्यांनी लिहिलेल्या व घाणेकरांनी अभिनित करून पारितोषिक मिळवलेल्या एका एकांकिकेचं नाव ‘पाहुणचार’ असं होतं.
‘शितू’ नाटकाची गोष्ट ते सांगतात. चित्रपटगृहात रात्री केलेल्या रंगतालमीला होज पाइपने सारं थिएटर पाण्यानं धुऊन काढल्याचं नमूद केलं जातं, पण ‘शितू’ नाटकाच्या प्रयोगाला नेपथ्यातल्या वास्तवपूर्ण अंगणासाठी रंगमंच शेणाने सारवला होता या घटनेचा उल्लेख मात्र ते शिताफीनं टाळतात.
‘पी.डी.ए.’ व ‘रंगायन’ या दोन नाटय़संस्थांचा सहयोग घडवून आणण्याचा प्रयत्न करणारे अरुण काकडेच. ‘रंगायन’च्या बहुतेक नाटकांतून भूमिका करणारे डॉ. श्रीराम लागू मूळचे पी.डी.ए.चेच कलाकार. त्यांना रंगायनच्या रंगमंचावर पाचारण करण्यात काकडेकाकांचा महत्त्वाचा भाग होता.
नाटककार विजय तेंडुलकर, शं.गो. साठे, दिग्दर्शक भालबा केळकर, सत्यदेव दुबे, नेपथ्यकार राम शितूत, रंगायनचे हितचिंतक विनोद दोशी या व्यक्तींची शब्दचित्रे थोडक्या शब्दांत छान उमटली आहेत.
वास्तविक काकडेकाकांची कामगिरी ही अजोड आहे, मोलाची आहे यात शंकाच नाही. त्यांच्यामुळेच तीन नाटय़संस्था उभ्या राहिल्या. दीर्घकाळ कार्यरत राहिल्या, पण काकडेकाकांना कधी स्वत:ला ‘सोऽहं’ हा प्रश्न विचारलेला दिसत नाही. ‘रंगायन’च्या विघटनाच्या वेळी ते मतदान न करता अश्रूंची वाट मोकळी करण्यासाठी बाहेर निघून गेले. दशकभर निरलसपणे, अथक परिश्रम करून संस्थेचं काम करणाऱ्याला ऐन प्रसंगात बोलण्याचा काही अधिकार आहे की नाही? त्या वेळी भावाकुल होऊन काकडेकाकांनी तो अधिकार बजावला नसेल, पण आज तरी त्याबद्दलची खंत व्यक्त करायला हवी होती. तसं झालं असतं तर त्या घटनेचा पुस्तकात माफक मेलोड्रामा झाला नसता.
वेगवेगळ्या प्रयोगांच्या निमित्तानं काकडेकाका महाराष्ट्रभर फिरले. त्या त्या ठिकाणची नाटय़गृहं वा नाटय़स्थळं कशी आहेत? हौशी मंडळांना कशा प्रकारच्या गैरसोयींना तोंड द्यावं लागतं? प्रत्येक शहरात-गावात एका छोटय़ा सुसज्ज नाटय़गृहाची का आवश्यकता आहे? त्यामुळे रंगकार्याला चालना कशी मिळू शकते? या प्रश्नांवरील अनुभवांचे बोल काकडेकाकांनी ऐकवले असते; हौशी, प्रायोगिकांसाठी आवश्यक रंगमंच- हाच विषय आपल्या पुस्तकाचा केला असता, तर तो अमकातमका होण्याऐवजी नेमका झाला असता.
त्या त्या संस्थांच्या अर्थकारणाबद्दल वा प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल ते काही बोलत नाहीत, त्याऐवजी नाटकाच्या गोष्टी सांगत बसतात. ‘रंगायन’ची भूमिका इतर नाटकवाल्यांपेक्षा वेगळी कशी होती हेही ते सांगत नाहीत. आजूबाजूला ‘नाटकी नाटकं,’ ‘खोटी नाटकं’ चालू असताना रंगायननं खऱ्या हाडामांसाच्या माणसांची वास्तवतावादी नाटकं दिली. करमणुकीच्या पलीकडे जाऊन अनुभव देण्याचा प्रयत्न केला. कमीत कमी एवढं तरी त्यांनी स्पष्टपणे सांगायला पाहिजे होतं. त्या ऐवजी ते अ‍ॅब्सर्ड नाटकाची शिकवणी घेतात किंवा ‘ससा आणि कासव’ची गोष्ट सांगत बसतात. या नाटकाचे प्रयोग व्हायला पाहिजेत, अशी इच्छा प्रकट केल्यावर विजयाबाई त्यांना म्हणतात, की तुला काय त्या पांग्यासारखं मॅनेजर व्हायचं काय? बाई खरंच बोलल्या. काकडेंचा पिंडच मॅनेजरचा. नाटकाच्या गुणवत्तेपेक्षा, नाटक कसंही असो त्याचे अधिकाधिक प्रयोग करण्यातच त्यांना रस. त्यांची ही सवय आजच्या ‘आविष्कार’पर्यंत तशीच चालू राहिली.
भालबा केळकर, विजया मेहता, अरविंद देशपांडे, विजय तेंडुलकर यांच्यासारख्या नाटय़ दिग्गजांच्या सहवासात राहूनही काकडेकाकांवर त्यांचा विशेष परिणाम झालेला दिसत नाही एवढं मात्र या पुस्तकावरून कळतं. आपली विशिष्ट कक्षा सोडून त्यांनी वेगळ्याच विस्तृत क्षेत्रावर लेखनबाजी केली. इंटिमेट होण्याऐवजी भल्या मोठय़ा रंगमंचावर वावरायला गेले आणि सैरभैर झाले. स्वानुभवाच्या मंचावरच त्यांनी फिरायला हवं होतं.
नाटककार, दिग्दर्शक, नट, तंत्रज्ञ हे नाटय़विश्वातले खरे सर्जनकार. प्रयोगाचं सर्जन त्यानंतरचे. काकडेकाका व्यवस्थापक, निर्माता म्हणजे त्या सर्जनाचे संगोपन करणारे. आजच्या भाषेत ‘सर्जनपाल’. लहान मुलाला नवीन खेळणं सापडलं, की ते त्याच खेळण्याशी तासन्तास खेळत बसतं. या पुस्तकात ‘सर्जन’ या शब्दाचं तेच झालं आहे. तो अखेपर्यंत इतक्या वेळा घोळवला आहे की वाचकालाच त्या शब्दाच्या कळा लागाव्यात.
इतकं असलं तरी संस्थांच्या नाटकांच्या जडणघडणीतले अनेक तपशील येथे सापडतात. त्या दृष्टीनं नाटय़वृत्तांत किंवा अहवाल म्हणून हे पुस्तक दस्तावेजी महत्त्वाचं आहे. नाटय़ग्रंथात वेगळ्या प्रकारची भर टाकणारं आहे. ख्यातनाम साहित्यिका विजयाबाई राजाध्यक्ष यांची प्रस्तावना लाभल्यामुळे या पुस्तकाचं मोल वाढलं आहे. ओघवती भाषा व छोटी प्रकरणं या वैशिष्टय़ामुळे पुस्तक एका बैठकीत वाचून पूर्ण करता येतं.
सखोल दृष्टिकोनाचा अभाव हे जरी ‘अमका’चं व्यवच्छेदक लक्षण असलं, तरी या पुस्तकाचा ल.सा.वि. काढायचा असेल तर तो असा असेल- कुठचीही नाटय़संस्था दीर्घकाळ कार्यरत ठेवायची असेल तर त्यासाठी एक तरी ‘काकडेकाका’ हवेतच.
‘अमका’ – अरुण महादेव काकडे
आविष्कार-मौज प्रकाशन, मुंबई,
पृष्ठे – २६८, मूल्य – ४०० रुपये.