News Flash

कामगार संघटनेच्या अंतरंगात..

मार्कुस डाबरे हे वसईतील भुईगाव येथील कॅथॉलिक ख्रिश्चन. मॅट्रिकनंतर बी. कॉम.साठी त्यांनी प्रवेश घेतला, पण त्यात मन लागले नाही.

| March 22, 2015 02:03 am

मार्कुस डाबरे हे वसईतील भुईगाव येथील कॅथॉलिक ख्रिश्चन. मॅट्रिकनंतर बी. कॉम.साठी त्यांनी प्रवेश घेतला, पण त्यात मन लागले नाही. मग त्यांनी सरळ नोकरीची वाट धरली. एक-दोन नोकऱ्या बदलत १९६५ मध्ये ते व्होल्टासमध्ये कारकून म्हणून रुजू झाले. तिथे त्यांनी कामगार संघटनेत काम करायला सुरुवात केली आणि पुढे कंपनीच्या महासंघाच्या सरचिटणीसपदापर्यंत मजल मारली. १९९७ मध्ये त्यांना कण्यावरच्या शस्त्रक्रियेमुळे नोकरीचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतरही ते स्वस्थ बसले नाहीत, तर वसईतील राजकारणात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला, सामाजिक काम केले. ‘हरित वसई’चा लढा लढले. त्यांचे आत्मचरित्र ‘कामगार आहे मी’ या नावाने ग्रंथालीने त्यांच्या मुद्रण सुविधा केंद्रामार्फत प्रकाशित केले आहे. बडय़ा उद्योगपतींची, राजकीय नेत्यांची तसेच इतर क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रे व आत्मचरित्रे नेहमीच lr18प्रकाशित होत असतात; पण कामगार नेत्यांची त्यामानाने कमी. म्हणूनच या पुस्तकाविषयी कुतूहल असणे साहजिक आहे.     
कॅथॉलिक ख्रिश्चन अशी डाबरेंची पहिल्या वाक्यातच ओळख करून द्यायचे कारण म्हणजे त्यांनीच ती तशी करून दिलेली आहे. इतकेच नाही तर आपल्या ख्रिश्चन असण्याचा संदर्भ अनेक ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच त्यांनी काळाच्या मागे जात ‘आमचे पूर्वज सुमारे ४५० वर्षांपूर्वी सामवेदी ब्राह्मण होते. त्यांनी धर्मातर केले. ते का केले असावे, हा प्रश्न मला छळतो,’ असे लिहिले आहे. वस्तुत: ख्रिश्चन धर्माची तत्त्वे त्यांच्या अंगात भिनलेली आहेत. वृत्तीने व मनाने त्यांचा या धर्मावर प्रगाढ विश्वास दिसतो. असे असूनही हा दुभंग का, कळत नाही.
कामगार संघटनेत ते जाण्यासाठी कारण ठरली एक घटना. कार्यालयात ते पाय घसरून काचेच्या पार्टिशनवर पडले. उजवी मांडी रक्ताने भरून गेली. पण एकही दाक्षिणात्य कर्मचारी किंवा अधिकारी त्यांच्या मदतीला आला नाही. त्यांनी राघवन नावाच्या कामगार नेत्याला ही बाब सांगितली आणि पुढे संघटनेत सक्रिय भाग घेणे सुरू केले. कामगार-मालक संबंध, कामगार चळवळी इत्यादीबाबत या पुस्तकातून काय प्रत्ययास येते, हे काही उदाहरणांसह बघू. व्होल्टास कंपनीने स्टॉकिस्ट डीलर्स नेमणे सुरू केले. त्यामुळे उत्पादित माल कंपनीच्या गोदामांऐवजी थेट या डीलर्सकडे जाऊ  लागला. त्याला युनियनने हरकत घेतली. संघर्ष वाढत गेला. कंपनीने टाळेबंदी जाहीर केली. शेवटी कामगार आयुक्तांसमोर समझोता होऊन ९६ दिवसांनंतर पुन्हा कंपनीचे कामकाज सुरू झाले. विचार करता लक्षात येतं की, कुठल्याही कंपनीला खर्च कमी करणे आवश्यक असते. हा चांगला मार्ग त्यांना सापडला होता. या कामाशी संबंधित कामगारांना इतर ठिकाणी सामावून घ्यायचे कंपनीने ठरवले होते किंवा नाही, ते यात दिलेले नाही. पण मुख्यत: युनियनने हा प्रश्न- ‘आम्हाला विचारल्याशिवाय निर्णय घेताच कसा?’ असा केवळ प्रतिष्ठेचा बनवलेला होता असे दिसते. शिवाय निदर्शनांचा एक मार्ग म्हणून कामगार मध्यम दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या घरांवर मोर्चे काढत व घोषणाबाजी होई. त्या घरांतील बायका-मुलांना याची किती धास्ती वाटली असावी याची युनियनला चिंता नव्हती असे दिसते. एकदा तर अधिकाऱ्यांवर राग म्हणून डाबरे व त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी मिळून सहा अधिकाऱ्यांच्या कार परत केल्या. म्हटले तर ही क्षुल्लक कृती; पण त्यामागची वृत्ती योग्य नाही. १९७३ मध्ये कंपनीच्या आधुनिकीकरणाच्या धोरणाविरुद्धही संघर्ष पेटला. कंपनीने टाळेबंदी जाहीर केली. ती तब्बल १३६ दिवस चालली. शेवटी समझोता झाला. कंपनीचा रेफ्रिजरेटर बनवण्याचा विभाग होता. त्यात १९२ कामगार रोज ४८ फ्रिजचे उत्पादन करीत. कंपनीच्या अभ्यासाप्रमाणे, ते रोज ९० असायला हवे होते. युनियनच्या एका गटाने अर्थातच या गोष्टीला विरोध केला. डाबरे यांनी ‘रोज ६० फ्रिज देऊ ’ अशी व्यवस्थापनाशी बोलणी केली. पण दुसऱ्या गटाच्या विरोधामुळे ते शक्य झाले नाही आणि शेवटी हा विभाग बंद पडला. १९२ कामगारांच्या वाटय़ाला खस्ता आल्या. डाबरे यांनी याविषयी तळमळीने खंत व्यक्त केली आहे. कंपनीच्या कामकाजाचे संगणकीकरण करण्याचा प्रश्नही १९७३ पासून कामगार संघटनेच्या विरोधामुळे रखडला होता. डाबरेंना जाणवले की, यामुळे कंपनीला व्यवसाय गमवावा लागत आहे. शिवाय अनेक कामगारांची मुले संगणक क्षेत्रात आहेत. स्वत: डाबरेंची मुले संगणक क्षेत्रात होती. मुलांशी बोलल्यावर तर या गोष्टीला विरोध करण्याचे काहीच कारण नाही, हे त्यांच्या लक्षात आले. मग थोडय़ाफार कामगारांचा व नेत्यांचा विरोध बाजूला ठेवून १९९३ मध्ये संघटनेने संगणकीकरणाला मान्यता दिली व हा प्रश्न सुटला. पण यावरून लक्षात येते, की केवळ अज्ञानामुळे संघटनेने कंपनी व कामगार या दोघांच्या हिताच्या बाबीला विरोध केला होता व त्यामुळे वीस वर्षांनी कंपनी मागे पडली. यात कामगारांचे नुकसान असे झाले, की ज्यांना संगणक शिकायला मिळाला असता ते खूप प्रगती करू शकले असते.  
कामगार नेत्यांचे आपापसातील हेवेदावे हेही टोकाचे. त्याबाबत डाबरे यांचे भाष्य बोलके आहे. सैन्यात एकी कायम ठेवायची असेल तर त्याला सतत युद्धावर पाठवावे लागते, तसेच कामगार नेत्यांमध्ये एकी ठेवायची असेल तर सतत व्यवस्थापनाबरोबर संघर्ष हवा. डाबरे यांनी कामगारांच्या अपप्रवृत्तीची काही उदाहरणेही दिली आहेत व त्यावर टीकाही केली आहे. २४० पानांच्या या पुस्तकात तब्बल ६५ प्रकरणे आहेत. पण त्यातील बरीच केवळ सव्वा ते दीड पानांची आहेत. तसेच काही खूप किरकोळ बाबींचा उल्लेख केलेला आहे. उदा. दाते या सहकाऱ्याने आषाढीला मटन खाल्ले! म्हणजे पुस्तकाचे आणखीन काटेकोर संपादन करायला हवे होते.
नोकरीनंतर ‘हरित वसई’साठी त्यांनी निकराचा लढा दिला. पण त्याचे वेगळे पुस्तक असल्याने त्याचा जास्त तपशील या पुस्तकात दिलेला नाही. ख्रिश्चन धर्मातील तसेच बायबलमधील तत्त्वे, वचने यांचा त्यांनी सढळ वापर केलेला आहे. मात्र, तो चपखल व अगदी आवश्यक आहे का, याबाबत मतभेद होऊ  शकतात.
‘कामगार आहे मी, तळपती तलवार आहे..’ ही नारायण सुर्वेची अतिशय लोकप्रिय कविता. शीर्षकात तिचा उपयोग केलेला असल्याने चित्रकार सतीश खानविलकर यांनी लाल कोयता असलेला हात दाखवत छान मुखपृष्ठ केले आहे.     
‘कामगार आहे मी’ : मार्कुस डाबरे,
ग्रंथाली प्रकाशन, पृष्ठे-२४१, मूल्य- रु. २५०.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2015 2:03 am

Web Title: kamgar ahe mi by markus dabre
Next Stories
1 लळा लागला असा की..
2 न-नक्षलीचे विषण्ण आत्मवृत्त
3 अलिप्त कष्टकऱ्यांचं लावारिस जगणं
Just Now!
X