कविवर्य विंदा करंदीकर यांनी चतुष्खंडी मुक्तछंदात अनुवादित केलेल्या ‘राजा लिअर’चे वादळी स्वगत रंगभवनाच्या चोहो दिशांना संचार करीत होते. शब्दांच्या आणि आवाजाच्या विजा कडाडत होत्या. डॉ. शरद भुथाडियांचा तो थरकाप उडवणारा लिअर आज आठवला तरी अंगावर काटा उभा राहतो. भावनिक कल्लोळ, मानसिक आरोह-अवरोह ही बहुतांशी मोठय़ा नाटकाची व्यवच्छेदक लक्षणे असतात. राजा लिअरच्या मनातला आणि बाहेरचा प्रमाथी झंझावात डॉ. भुथाडियांनी आणि ‘प्रत्यय’च्या कलावंतांनी साक्षात्कारी केला होता.
गर्जा वादळांनो, थोबाड फाटेपर्यंत! करा आक्रोश!
करा गर्जना!
हे जलस्तंभांनो आणि तुफानांनो, सोडा फूत्कार
आमचे मनोरे भिजून जाईपर्यंत, आमचे पवनकुक्कुट
बुडेपावेतो!
विचारवेगाने संचार करणाऱ्या हे गंधकाग्नींनो,
ओकाच्या वृक्षांना दुभंगून टाकणाऱ्या
वज्रांच्या अग्रदूतांनो,
माझे शुभ्र डोके काढा होरपळून, चराचर कापवणाऱ्या
हे विद्युतगर्जने,
हा पृथ्वीचा सघन गोलाकार, कर सपाट एकाच
तडाख्यात!
टाक फोडून निसर्गाचे साचे, कर नष्ट एका दमात
सगळे बीजद्रव्य
ज्यातून निपजते ही जात कृतघ्न माणसांची..
कविवर्य विंदा करंदीकर यांनी चतुष्खंडी मुक्तछंदात अनुवादित केलेल्या ‘राजा लिअर’चे हे वादळी स्वगत रंगभवनाच्या चोहो दिशांना संचार करीत होते. शब्दांच्या आणि आवाजाच्या विजा कडाडत होत्या. डॉ. शरद भुथाडियांचा तो थरकाप उडवणारा लिअर आज आठवला तरी अंगावर काटा उभा राहतो.
तो थरार अनुभवतानाच मी आनंदूनही गेलो होतो. उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि तितकाच उत्तुंग अभिनय मराठी रंगभूमीला कित्येक वर्षे पारखा झाला होता. १९९३ च्या राज्य नाटय़स्पर्धेने ‘प्रत्यय’ या कोल्हापुरी संस्थेमार्फत डॉ. भुथाडियांच्या साक्षात्कारांनी हा अनुभव पुन्हा दिला. त्यांच्या रूपाने कितीतरी वर्षांनी मराठी रंगभूमीला नटवर्य नानासाहेब फाटक यांचा एक अस्सल, सुविद्य वारस मिळाला होता. ‘तसे नट नाहीत म्हणून तशी नाटकं नाहीत,’ ही नाटककारांची सबब आता चालण्यासारखी नव्हती. मराठी नाटकाला दुसरे नानासाहेब मिळाले होते.
जागतिक नाटय़वाङ्मयात शेक्सपीअरच्या ‘किंग लिअर’ची गणना सर्वोत्तम श्रेष्ठ शोकांतिकेत होते. त्याचे भाषांतरकार विंदा करंदीकर यांनी या अनुवादाला स्वत:ची व्यासंगपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. त्यात नमूद केलंय : ‘शेक्सपीअरला निंदणारा बर्नार्ड शॉसुद्धा या नाटकाच्या बाबतीत ‘ठ ेंल्ल ६्र’’ी५ी१ ६१्र३ी ं ुी३३ी१ ३१ंॠी८ि ३ँंल्ल छीं१..’ असे म्हणतो.
तात्यासाहेब शिरवाडकरांचे ‘नटसम्राट’ हे नाटक मराठीतील ‘एकच प्याला’नंतरची श्रेष्ठ शोकांतिका मानली जाते. ती सम्राटाचीच शोकांतिका असली तरी तो नाटकातला सम्राट आहे. त्याचे जग रंगभूमीपुरतेच मर्यादित आहे. शिवाय बेलवलकरांची शोकांतिका होते ती नाटकामुळे नसून त्यांच्या वृद्धत्वामुळे होते. एका वृद्धाची शोकांतिका मोठी वाटण्यासाठी नाटककाराने तिला ‘राजा लिअर’चा पोशाख चढवला आहे, इतकेच. खऱ्याखुऱ्या राजा लिअरची शोकांतिका त्यानं आपलं साम्राज्य आपल्या मुलींना देऊन टाकल्यामुळे झाली आहे. शिवाय ती एकटय़ा लिअरची शोकांतिका नाही; ती त्याला अव्हेरणाऱ्या गॉनरिल व रीगन या दोन मुलींची आहे. तद्वतच त्याला अखेरीस आसरा देणाऱ्या कॉर्डिलियाचीही आहे. ती स्वामीनिष्ठ केंटची आहे, तशीच ग्लॉस्टरच्या जहागीरदाराची व त्याच्या एडगर या औरस पुत्राची आणि एडमंड या अनौरस पुत्राचीही आहे. भोवतालची झाडे छोटी असली म्हणजे त्यांच्यातले उंच झाड अधिकच उंच वाटते, तसेच या लिअरला शेक्सपीअरने दुय्यम पात्रांच्या दुय्यम शोकांतिकेने अधिकच उंच वा मोठे केले आहे.
बापाकडून सर्वस्व मिळवूनही दोन मुली बापालाच अनिकेत करून टाकतात.. भ्रमिष्ट होण्याच्या अवस्थेपर्यंत पोचवतात. या शोकांतिकेला समांतर अशी नाटकातली दुसरी शोकांतिका आहे ग्लॉस्टर या बापाची. त्याला त्याचा अनौरस मुलगा एडमंड दगा देतो आणि अविश्वासू म्हणून ज्याला त्याने नाकारलेला असतो, त्या औरस पुत्र एडगरलाच वेषांतरे करून, कधी टुकार टॉम, तर कधी शेतकरी बनून बापाची पाठराखण करावी लागते. अशा या ग्लॉस्टरला- त्यानं लिअरला दुष्ट पोरींपासून पळून जाण्यास मदत केली म्हणून शिक्षा केली जाते ती त्याचे दोन्ही डोळे काढण्याची! लिअरच्या स्वामीनिष्ठ केंटला कायमचे खोडय़ात अडकवले जाते. तर अखेरीस बापाला जवळ करणाऱ्या कॉर्डिलियाला फाशी दिली जाते. आणि तिचे शव हातावर घेऊन आलेल्या, ती जिवंतच आहे असं मानणाऱ्या लिअरचा तिचे ओठ निरखीत असताना निर्माण झालेल्या प्रचंड भावोर्मीने देहान्त होतो. पायरी-पायरीने आणि पात्रा-पात्रातून शोकान्त कळसाला पोचतो.
‘किंग लिअर’च्या विषयाबाबत प्रस्तावनेत लिहिले आहे.. ‘पण गंमत अशी की, अमक्याची शोकांतिका वा तमक्याची शोकांतिका अशा विनाशसूचक शब्दांनी ‘किंग लिअर’च्या सबंध विषयाला कधीच भिडता येणार नाही. कारण या नाटकामध्ये कशाचा नाश होतो, या जाणिवेइतकेच  कशाचे सृजन होते, ही जाणीवही महत्त्वाची आहे. आणि त्यातील सृजनात्मक जाणीव व्यक्त करण्यासाठी ‘आत्म्याचे पुनरुज्जीवन’ असा शब्दप्रयोग विषयाच्या मांडणीतच अंतर्भूत  करावा लागेल. या नाटकाचा विषय विनाश आहे, तसाच सृजनही आहे. ‘पार्थिव अस्मितेच्या विनाशातून घडलेले मानवी आत्म्याचे पुनरुज्जीवन हा ‘किंग लिअर’चा खरा विषय.’
मराठीमधलं ‘किंग लिअर’चं तिसरं भाषांतर म्हणजे विंदांचं ‘राजा लिअर’ (१९७४). त्यापूर्वीची भाषांतरे मोरो शंकर रानडे यांचं ‘अतिपीडचरित’ (१८८१) आणि आचार्य अत्रे यांचं ‘सम्राटसिंह’ (१९६८). काव्यात्म प्रतिभा आणि विचक्षण दृष्टिकोन या गुणविशेषांमुळे विंदांचं भाषांतर एकमेवाद्वितीय झालं आहे. विंदांची जन्मभूमी असलेल्या कोकणानेही त्यांना काही अचूक शब्द दिले आहेत. या नाटय़प्रयोगाचं दिग्दर्शन डॉ. शरद भुथाडिया यांनीच केलं होतं. मूळ नाटक पाच अंकांचं आणि २६ प्रवेशांचं आहे. आशयाला आणि व्यक्तिरेखांनाही धक्का पोहोचणार नाही याची खबरदारी घेऊन दिग्दर्शकाने त्याची दोन अंकी छान रंगावृत्ती तयार केली होती. शैलीदार अभिनयाची मागणी करणारे हे नाटक असले, तरी शब्द आणि काव्य हे घटक या नाटकाचे प्राण आहेत, याचं भान ठेवून शब्दांवर हालचालींची कुरघोडी होणार नाही याचं व्यवधान काळजीपूर्वक पाळलं गेलं होतं. ‘मुक्तछंद’ ही या नाटकाची शोभा आहे. अर्थ अधिक टोकदार करणारा मुक्तछंदाचा वाचिक आविष्कार हे एक कठीण कसब असते. ते कसब लिअरच्या भूमिकेत डॉ. भुथाडियांनी पुरेपूर व्यक्त केलंच; पण दुय्यम पात्रांनीही समाधानकारक समज दाखवली.
प्रयोगाची उच्चारपद्धती आणि प्रदीर्घ लांबीच्या मूळ संहितेचं प्रयोगासाठी केलेलं संपादन याबाबत संस्थेच्या स्मरणिकेत दिग्दर्शकाचं टिपण दिलं आहे, ते असं : ‘शेक्सपीअरच्या ब्लँक व्हर्सचे विंदांनी ‘चतुष्खंडी’ मुक्तछंदामध्ये भाषांतर केलं आहे. त्याच्या उच्चारपद्धतीचा एक आराखडाही परिशिष्टात दिला आहे. पण तो प्रत्यक्षात आणणे कितपत शक्य होईल याबद्दल साशंकता वाटत होती. शेवटी वाक्याचा भावार्थ आणि त्यामागील विचारांच्या अनुषंगाने उच्चारपद्धती करायचे ठरवून वाचने सुरू केली. त्यातून एक भाषारूप साकार होत गेले.. एक उच्चारपद्धती अंगवळणी पडत गेली. ‘नाटक हवे तेवढे एडिट करा,’ असा सल्ला आणि परवानगी विंदांनी आधीच दिली होती. लिअरच्या मानसिकतेमध्ये घडत जाणाऱ्या बदलांच्या अनुषंगाने नाटकाचे एडिटिंग केले. ग्लॉस्टर-एडमंड हे कथानक लिअरच्या शोकांतिकेला समांतर जाणारे. ते पूर्णपणे रंगावृत्तीत येईल अशी खबरदारी घेतली. गॉनरिल आणि रीगन या दोन्ही मुलींकडून अपमानित झाल्याने बसलेला जबरदस्त मानसिक धक्का ही लिअरच्या वेडाची पहिली पायरी आहे. निसर्गाच्या रौद्र स्वरूपाशी नाते सांगत ते प्रकट होते आणि टुकार टॉमच्या दर्शनातून ते पुढे सरकते. लिअरच्या मानसिक वेडाचाराला त्याच्या आत्मिक मुक्तीची सर्जक बाजूदेखील आहे. हे दोन्ही टप्पे नाटकाच्या पहिल्या व दुसऱ्या अंकासाठी निवडून तीन अंकांची विभागणी केली.’
‘प्रत्यय’ने सादर केलेल्या या ‘राजा लिअर’च्या प्रयोगाचे नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार आणि पाश्र्वसंगीतकार अनुक्रमे अनिल सडोलीकर, नरहर कुलकर्णी व किरण खेबूडकर होते. त्यांचा प्रयोगाच्या तांत्रिकतेबाबतचा विचारही नोंद घेण्यासारखा आहे : (शोकात्म नाटय़ावर तंत्राने कुरघोडी करू नये म्हणून) वास्तवदर्शी नेपथ्याऐवजी सूचक नेपथ्य असावे असा विचार आला. नेपथ्यातून मध्ययुगीन काळाचे सूचन होण्यासाठी कमान आणि त्याला जोडून जिन्याची योजना केली. प्रयोगाच्या कार्याच्या दृष्टीने चबुतरा व स्लोप गरजेचे वाटले. नाटकाच्या वातावरणनिर्मितीसाठी हे सर्व नेपथ्य गडद, मळकट हिरव्या करडय़ा रंगातून रंगवले. या रंगाबरोबरच सेक्शनल लायटिंगमुळे उदास, गंभीर वातावरणाची निर्मिती व्हावी अशी अपेक्षा आहे. नाटकातील गडदपणा दिसून यावा यासाठी एका बाजूने प्रकाश आणि दुसऱ्या बाजूने मंद कलरशेडचा वापर केला आहे. अंधाऱ्या पावसाळी रात्रीतले वादळ मंद निळ्या प्रकाशाने सूचित केले. कडाडणाऱ्या विजेकरता स्ट्रोबची योजना. पात्रांचे पोषाख गडद रंगातील आणि त्यांची विभागणी ‘मॅकबेथ-जॉब’ रंगभूमीप्रमाणे. पाश्र्वसंगीतासाठी पाश्चात्य स्वरमेळाचा वापर करणे अपरिहार्य वाटले. प्रवेशातील भावावस्था आणि संगीताचा सूचित भाव यांचा मेळ ही बरीचशी वैयक्तिक सौंदर्यदृष्टीची बाब असणे अपरिहार्य आहे. त्यात रोमँटिक शैलीने तुटक भावपरिपोष होऊ नये अशी काळजी घेतली.
नाटकाचे दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ एखाद्या कलाकृतीचा किती अंगाने विचार करीत होते, हे आजच्या नवोदितांना कळावे या हेतूनेच रंगकर्मीची स्वत:ची भूमिका वर दिली आहे. आनंदाची गोष्ट ही, की त्यांच्या या अपेक्षा प्रयोगात सर्वार्थाने सफल- म्हणजेच परिणामकारक झाल्या. अशा प्रकारच्या तांत्रिक कृतींमुळे नायकाचा शोकात्म प्रवास व नाटकातील रौद्रभीषणता अधोरेखित होण्यास मदत झाली. डॉ. शरद भुथाडिया यांनी वाचिक अभिनयात परिणामाचा उच्चांक गाठला. लिअरच्या स्वगतांनी तर शहारून गेलो होतो. मुलीच्या कृतघ्नतेचा पहिला धक्का बसतो त्यावेळी त्यांनी मुद्राभिनयातून व्यक्त केलेला कल्लोळ लक्षणीय होता. दुय्यम पात्रांत लक्षात राहिला तो एडगरची भूमिका करणारा हृषिकेश जोशी. त्यांनी प्रकट केलेली संभ्रमित अवस्था दाद देण्याजोगीच. इतर पात्रांच्या अभिनयाची पातळी समाधानकारक होती. पण सर्व दुय्यम पात्रे मिळूनही डॉ. भुथाडियांच्या अभिनयउंचीला स्पर्श करू शकली नाहीत. त्यामुळे प्रयोगात गोळीबंद परिणामाचा अभाव जाणवला. राज्य नाटय़स्पर्धेत या नाटकाला तृतीय क्रमांक मिळाला. वैयक्तिक अभिनयाची रौप्यपदके डॉ. शरद भुथाडिया (लिअर) व अंजली ताम्हाणे (गॉनरिल) यांना मिळाली. गौरी चिटणीस (कॉर्डिलिया) यांना प्रशस्तिपत्रक मिळालं. अन्य भूमिकांतील सहभाग- सुकुमार पाटील, प्रकाश फडणीस, विनायक भोसले, समीर वैती, अशोक नित्यानंद, मकरंद कुळकर्णी, किरण खेबुडकर, पवन खेबुडकर, ज्ञानेश चिरमुले, चंद्रकांत कल्लोळी, मिलिंद इनामदार, रूपा गोखले.
भावनिक कल्लोळ, मानसिक आरोह-अवरोह ही बहुतांशी मोठय़ा नाटकाची व्यवच्छेदक लक्षणे असतात. राजा लिअरच्या मनातला आणि बाहेरचा प्रमाथी झंझावात डॉ. भुथाडियांनी आणि ‘प्रत्यय’च्या कलावंतांनी साक्षात्कारी केला. या नाटकाबद्दल आपल्या ‘रामप्रहर’ या स्तंभात नाटककार विजय तेंडुलकरांनी म्हटले होते- ‘मोठय़ा नटाशिवाय मोठे नाटक होऊच शकत नाही.’
अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वांची आणि नटांची नाटकं मराठी रंगभूमीवर पुन्हा कधी अवतरतील?
पण अर्थातच जे समाजातच नाही, ते नाटकात तरी कुठून उतरणार?
स्मरणरंजनात आनंद मानणे, अन्य काही न होणे.