News Flash

बाईची फरफटयात्रा

लोककलांची ताकद हळूहळू आधुनिक रंगभूमीवरील रंगकर्मीना कळू लागली आणि नाटकांतून लोककलांचा वापर व्हायला लागला.

| September 15, 2013 01:01 am

लोककलांची ताकद हळूहळू आधुनिक रंगभूमीवरील रंगकर्मीना कळू लागली आणि नाटकांतून लोककलांचा वापर व्हायला लागला. राज्य नाटय़स्पर्धेतील अशा काही नाटकांपैकी एक म्हणजे नागपूरच्या रसिकरंजन’ या संस्थेनं सादर केलेलं पोहा चालला महादेवा’ हे नाटक. उद्धव शेळके यांच्या धग’ या गाजलेल्या कादंबरीचा हा नाटय़ावतार! यातले सगळे कलावंत वैदर्भीय असल्यामुळे त्यांच्या लोकभाषेतील आर्तता व गोडवा अस्सलपणे आस्वादता आला.
द सऱ्याच्या सुमुहूर्तावर १९७९ साली दामूभाई झवेरी यांनी लोककला संशोधन केंद्राचं प्रस्थान मांडलं. एक दशक झपाटल्यासारखं महाराष्ट्राच्या लोककलांसाठी काम केलं. विस्मृतीत गेलेल्या लोककला आणि लोककलावंत यांचा शोध घेतला. त्यांचा कलाविष्कार प्रकाशात आणला. कितीतरी लोककला प्रकारांची नव्याने ओळख पटली. मराठी रंगभूमीवरच्या सिद्धहस्त कलावंत व मूळचे लोककलावंत यांच्या सहयोगाने मराठी मातीतली सादरीकरणे अस्सल स्वरूपात सादर केली. या संदर्भातली केवळ प्रयोगशील बाजूच त्यांनी सांभाळली नाही, तर त्यातील तात्त्विक आणि अभ्यासपूर्ण बाजूंसाठी त्या विषयातील तज्ज्ञांची मदत केली. परिसंवाद, चर्चा आणि संमेलने आयोजित करून तात्त्विक आणि प्रायोगिक अशा दोन्ही बाजू आस्वादकांपुढे ठेवल्या. अशोक जी. परांजपे यांच्यासारख्या व्यासंगी विद्वान व्यक्तीची त्यासाठी खास नेमणूक केली. सर्व लोककला प्रकारांचा चित्रमय दस्तऐवज आणि पूरक माहिती सिद्ध केली. एका गुजराती रंगकर्मीने महाराष्ट्राच्या रंगभूमीसाठी केलेले हे अमौलिक असे योगदान होते.
या लोककलांच्या दर्शनाने तरुण नाटय़दिग्दर्शकांना, नाटककारांना आपल्या कलात्मक मूळांचा शोध लागला. त्यातील गुणवत्तेच्या नाटकासाठी उपयोग करून घेण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यातूनच राज्य नाटय़स्पर्धेत होणाऱ्या नाटकांना लोकसंस्कृतीची लोकझळाळी मिळाली. रांगडी कलाही किती सूचक, प्रतीकात्मक असू शकते, याचा प्रत्यय दिग्दर्शकांना आला आणि त्यांच्या नाटकांतून लोककलांचा वापर व्हायला लागला. अशा काही स्पर्धेतील नाटकांपैकी एक म्हणजे नागपूरच्या रसिकरंजन या संस्थेनं सादर केलेलं पोहा चालला महादेवा’ हे नाटक. एकविसाव्या राज्य नाटय़स्पर्धेत १९८१ साली नागपूर येथे प्राथमिक स्पर्धेतून या नाटकाची अंतिम स्पर्धेसाठी निवड झाली आणि अंतिम स्पर्धेतही या नाटकाने सर्वोत्तमतेची बाजी मारली. नागपूरला झालेल्या प्राथमिक स्पर्धेचा मी एक परीक्षक होतो. आम्ही अंतिम स्पर्धेसाठी निवडलेल्या नाटकाने अंतिम स्पर्धेतही सवरेत्कृष्टतेचे पारितोषिक मिळवल्यामुळे आमची निवड द्विगुणित झाली.
उद्धव शेळके यांच्या धग’ या गाजलेल्या कादंबरीचा नाटय़ावतार म्हणजेच पोहा चालला महादेवा’ हे नाटक. पडदा उघडतो तेव्हा रंगमंचाच्या अगदी मागे आकाशाच्या पाश्र्वभूमीवर भक्तांचा तांडा चालताना दिसतो. पंढरीची वारी चालावी तशी. पण या वारीत महादेवाचा जयघोष आहे. शंकरदेवाची गाणी म्हटली जात आहेत. भजनही चालू आहे. टाळ, मृदुंग वाजताहेत. शंकरनामाने सर्व धुंद आहेत. एकच गडबड होऊन राहिलीय. या गडबड गोंधळात कुणी वेडीपिशी भिरभिरत्या नजरेनं कुणालातरी शोधतेय. आयुष्यातले सारे भोग तिच्या अवघ्या देहावर उमटले आहेत. नवऱ्याला भेटण्यासाठी तिचा जीव आसुसलेला हवा. हरवलेला आपला नवरा या पोह्य़ामध्ये- या भक्तांच्या गर्दीत, मांदियाळीत कुठेतरी गवसेल अशी कौतिकीची खात्री आहे. तिची नजर भिरभिरतेय. तिच्या १२ वर्षांच्या नाम्याला आपल्या आईच्या मन:स्थितीची कल्पना आलीय. तो तिला घरी चलण्यासाठी आग्रह करतोय. छोटी यशोदा घरी एकटी झोपल्याचंही तो तिला सांगतोय. पण कौतिकीचं त्या कशाकडे आणि कुणाकडेच लक्ष नाही. तिला तिचा महादेव- तिचा नवरा हवा आहे. कुठे हरवलाय तो? का नाही परतला घरी? कुठे गेला असेल? त्या जिवाला तर काही बरं वाईट.. वेडय़ा मनाला कोण आवरणार?
हिंगणघाटला भावाच्या घरी तसं कौतिकीचं बरं चाललं होतं. भाऊ गोविंदा, त्याची बायको गंगा, आई यांच्याबरोबर नवरा महादेव आणि नाम्या व भीम्या अशी दोन मुलं. पिढीजात शिंप्याचा धंदा होता. गावाबरोबर महादेव दुकानात जायचा. त्याच्या कामात मदत करायचा. नंतर वेगळं मशीनही महादेवानं घेतलं, पण त्याचा जीव त्या हिंगणघाटच्या बाजेरात रमेना. म्हणून मग महादेवने कौतिकी आणि दोन मुलांसह मेहुण्याचं घर सोडून तळेगावला आपल्या घरात बिस्तरा हलवला, पण तिथेही बुटय़ाशी झगडा झाला.
तळेगावहून आपला बाडबिस्तरा घेऊन म्हाताऱ्यावरच्या रागानं कौतिक आणि तिचं कुटुंब बाहेर पडतं. मोझरीला मारवाडय़ानं कपडे शिवण्यासाठी बोलावलं होतं. कौतुकी महादेव, नाम्या, भीमा पोचतात तेव्हा संध्याकाळ झालेली असते. सुखदेव महादेवला घेऊन गावात मारवाडय़ाची चौकशी करायला जातो. आता रात्र कुठे काढायची हाच कौतुकीपुढे प्रश्न पडतो. समोरच्या घरात साद देते. पाणी मागते. ते मुसलमानाचं घर असतं. सकीना म्हणते, आम्ही मुसलमान, आमच्या घरचं पाणी तुम्हाला चालणार नाही.’ तर पाण्यावर का कुणाचं नाव लिहिलेलं असतं’ असं सांगून ती पाणी घेते. मुसलमानाला बानो नावाची एक चुणचुणीत तरुण मुलगीही असते. तिला ही पाहुणेमंडळी आवडतात. मुसलमानाच्या टपरीत आसऱ्यापुरती त्यांना जागा मिळते. मारवाडी बाहेरगावी गेला असून आठ दिवसांनी परतणार असल्याची बातमी घेऊन महादेव येतो. कौतिकचं कुटुंब रात्र अनोळखी मुसलमानाच्या टपरीवर काढतं. तिला तळेगावातल्या आपल्या शेजारणीची सीतेची फार आठवण येते. तिची ती आठवण वैदर्भी लोककलांमधील दंडार’ या प्रकारातून सीताहरण’च्या प्रसंगातून कलारूप धारण करते.
कासीम लोहाराची भट्टी चालू आहे. गावातले लोक गप्पा मारत बसले आहेत. सकीना भाता चालवते आहे. बानो आत-बाहेर करते आहे. अंगणात शिबलेवाला येतो (महाराष्ट्रात वासुदेव तसा वऱ्हाडात शिबलेवाला). शिबला म्हणजे बाहुलं. हातात बाहुलं घेऊन तो गाणं म्हणतो-
आडगाव पेडगाव.. गाव मोठं
तेथे पेरला गेहू
न पाटाच्या बायकोला कोठी ठेवू
रुपये लागले बहु.. शिवबा बनविला
पाटाच्या बायका असलेल्या गावच्या पाटलाची या गाण्याने छान गंमत होते. नथूशेट, महादेवाला घरातल्या सगळ्या मंडळींचे कपडे शिवायला सांगतो, पण आळशी महादेव झटकन काम करायला तयार होत नाही. दरवर्षी महादेवाच्या पोह्य़ाला नेमाने जाणारा कासमभाई. त्याची आता महादेवशी चांगली जान पहचान झाली आहे. तो आणखी काही दिवस कासीमकडे राहायची परवानगी मागतो. कौतुकीला उपकाराचे हे ओझे मानवत नाही. नवऱ्याला स्वत:च्या पायावर उभं करण्याच्या सतत धडपडीत ती आहे. अखेरीस कौतिकीच्या रट्टय़ामुळे महादेव तयार कपडय़ाचा गठ्ठा घेऊन दुकान मांडायला बाजारात जातो. भीमाची नजर बानोवर जाते. तिच्याशी तो गैरप्रकार करतो. कासीम चिडतो. कौतिकीला मेल्याहून मेल्यासारखं होतं. कासीमच्या घरातून ती बाहेर पडू पाहते, पण एवढं झालं तरी मोठय़ा मनाचा कासीम व सकीना कौतिकीला घराबाहेर पडू देत नाहीत.
नाम्याला आता थोडे थोडे इंग्रजी शब्द येऊ लागले आहेत. त्याचा तो अधूनमधून वापर करतोय.
शहराच्या बाजारात कपडय़ाचा गठ्ठा घेऊन दुकान मांडायला गेलेला महादेव बरेच दिवस झाले तरी घरी परतलेला नाही. धडधडत्या मनानं कौतिकी त्याची सर्वाजवळ चौकशी करतेय. उमरावतीच्या देवळात त्याला पाहिल्याचं कुणाकडून तरी कळतं. ती उमरावतीला नवऱ्याचा शोध घ्यायला निघते. इतक्यात नाम्याचा आजोबा खूप आजारी असल्याचं तिला कळतं. पूर्वीचं भांडण विसरून ती सासऱ्याची देखभाल करायला निघते. इकडे महादेव घरी येतो. त्याचा कपडय़ाचा गठ्ठा चोरांनी पळवून नेलेला असतो. कासीम त्याला धीर देतो. नाम्याच्या शिक्षणासाठी, कौतिकीसाठी त्याने नेटाने पुढची वाट चालली पाहिजे’ असं सांगतो. पोहाला- यात्रेला गेल्याशिवाय आपल्याला चांगले दिवस येणार नाहीत, या समजुतीने कासीम व महादेव पोह्य़ाला जातात. कासीमच्या बानोचं लग्नही ठरलेलं असतं. तेव्हा त्यालाही पोह्य़ाला जायचंच असतं.
सासऱ्याच्या मृत्यूनंतर त्याचे दिवस करून महिन्याभराने कौतिकी घरी येते. पुस्तकं नाहीत, पैसे नाहीत म्हणून नाम्याला शाळेतून काढून टाकलेलं असतं. कौतिकी डगमगत नाही. रोजंदारी करून नाम्याला शिकवण्याचं स्वप्न ती पाहते. पोह्य़ाला गेलेला कासीम एकटाच घरी परततो. वाटेत महादेवाचे हात-पाय लुळे पडल्यामुळे त्याला दवाखान्यात ठेवल्याचं सांगतो. महादेवाला रक्तपितीचा रोग झालाय हे कळल्यावर तर कौतिकीला जबरदस्त धक्काच बसतो. ती वेडीपिशी होते. इकडून तिकडे नवऱ्याच्या नावाने हाका मारीत धावत सुटते. महादेवाचं गाणं म्हणत पोहा चाललेला असतो. त्यात ती घुसते. तिला ओलांडून महादेवाचा पोहा पुढे जातो. कौतिकीचा महादेव कुठे आहे?
देवा तुझ्या डोई गा नाग फण्याचा डोलते
संकर राजा बापा तुझ्या इशाऱ्याने सारी पृथ्वी हालते
पोहा गाणे म्हणत पुढे जातो- कौतिका त्याच्याकडे शून्य नजरेने पाहत राहते..
‘पोहा..’ हे उद्धव शेळके लिखित धग’ या कादंबरीचं नाटय़रूपांतर आहे. प्रा. ज. रा. फणसळकरांनी हे रूपांतर सिद्ध केलं आहे. मूळ कादंबरी १९६० साली प्रसिद्ध झाली. नऊ पुनर्मुद्रणानंतर आता या कादंबरीची पाचवी आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे. आज ही गाजलेली कादंबरी वाचल्यानंतर तिच्या लोकप्रियतेच्या कारणांचा शोध घेणे आवश्यक वाटते.
वैदर्भी भाषेतील ही मराठी कादंबरी. प्रादेशिक भाषा हे तिचं खास वैशिष्टय़ आहे आणि ही भाषा एवढय़ा प्रभावीपणे मराठी कादंबरीतून त्यापूर्वी उतरली नसेल. कादंबरीतील पात्रांचे संवाद वैदर्भी भाषेतील असले तरी सर्वसामान्य वाचकाला ती अडचणीत टाकत नाही. प्रसंगांची रचनाच अशी केली आहे की, त्या भाषेतला नेमका अर्थ कुणालाही पोचावा आणि त्याच्या विशिष्ट लहेजाची गंमत घेता यावी. खेडय़ातील हिंदू-मुसलमानांच्या संबंधावरही ही कथा प्रकाश टाकते. या कादंबरीतील दुसरं महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे संपूर्ण कादंबरीत गरिबीचे केलेले विदारक चित्रण. गरिबी असली तरी लेखकाने तिचे भांडवल केलेलं नाही. येथे विलाप नाही. दु:खाचे पाट वाहात नाहीत. प्राप्त जीवनाचा एक अविभाज्य घटक म्हणूनच दारिद्रय़ येथे प्रकटते. या कथेतल्या घटना ढोबळ किंवा हिशेबी नाहीत. प्रसंग ओढूनताणून आणलेले नाहीत. आपल्या गतीने, स्वाभाविकरीत्या ही कादंबरी पुढे पुढे जात राहते. त्या दृष्टीने ‘पोहा चालला महादेवा’ हे नाटकाचं शीर्षक अधिक समर्पक आहे.
एका खेडय़ातील सर्वसामान्याचे जग ही कादंबरी उभी करते आणि करुण असूनही ही कादंबरी कुठे मेलोड्रामा होत नाही. राज्य नाटय़स्पर्धेत कादंबरीचं हे नाटय़रूपांतर सादर करण्याचं प्रमुख कारण ही कथा कुटुंबाची असूनही कुठे अतिरंजित वा भडक नाही. हे आहे नाटय़स्पर्धेतले तरुण दिग्दर्शक निखळ वास्तवाच्या बाजूनेच उभे राहतात आणि मेलोड्रामाला ते टाळतात याचं पोहा..’ एक चांगलं उदाहरण आहे.
कौतिकी आणि तिचं कुटुंब याभोवती ही नाटय़कथा फेर धरते आणि कौतुकीलाच केंद्रस्थानी मानते. नामा, भीमा, यशोदा, महादेव ही कौतिकीची मुलं आणि नवरा विविध प्रसंगांतील कौतुकीची जिद्द प्रस्थापित करण्यासाठी निर्माण झाली आहेत. त्यांना व्यक्तिरेखांचं स्वरूप आहे, पण ते गडद नाही. या कथेत कुणी खलनायक नाही. कडोविकडोचा संघर्ष नाही. कौतिकीचा झगडा आहे, पण तो बाह्य़ कुणा व्यक्तीबरोबरचा नाही तर एकूण परिस्थितीच्या विरोधातला आहे. गरिबीच्या विरोधातला आहे आणि खरं तर तिचं भांडण हे स्वत:शीच आहे. म्हणूनच या कथेत व्यक्तिरेखा कमी आणि पात्रं जास्त आहेत. पण ती पात्रं कुठेही केंद्रिभूत व्यक्तिरेखेवर कुरघोडी करीत नाहीत. या कथेतल्या अभावाच्या जागा याच तिच्या जमेच्या बाजू झाल्या आहेत. मदर इंडिया’ छापाची गरीब, स्वप्नं पाहणाऱ्या वैदर्भी आईची ही कथा भावविवश नाही. ती चटका लावते, पण अश्रूपात करीत नाही आणि म्हणूनच आस्वादकाच्या मनात ती कायमची घर करते. अश्रूंबरोबर वाहून जात नाही.
महादेवाला जाणारा पोहा’ कादंबरीतच आहे, पण नाटककाराने आणि दिग्दर्शकाने सबंध नाटकभर त्याचा थीमसाँगसारखा थीम अ‍ॅक्शन म्हणून वापर केला. नाटकाची सुरुवात पोह्य़ा’ने होते आणि कौतिकीला मागे सारून पुढे जाणाऱ्या पोह्य़ानेच नाटकावर अखेरचा पडदा पडतो. नाटकातला हा पोहा’ प्रतिकरूप आहे. कौतिकीच्या आयुष्याची फरफटीची यात्रा म्हणजेच पोहा’. कौतिकीच्या नवऱ्याचं नावही महादेवच आहे. आपल्या नवऱ्यासाठी तिचा हा आयुष्याचा प्रवास आहे. कादंबरीत अन्य लोककलांचा उल्लेख नाही. नाटय़प्रयोगातील वैदर्भी लोककलांचा वापर ही खास दिग्दर्शनीय जमेची बाजू. महादेवाची गाणी, जात्यावरची गाणी, बहिणाबाईची गाणी, भजनं, दंडार, शिलबेवाला, पोतवाला असे सर्व विदर्भीय लोकगीतांचा व कलाप्रकारांचा अगदी चपखल वापर करून मुळातला आशय अधिक परिणामकारक केला होता.
रंगमंचावर वेगवेगळ्या ठिकाणी चौथऱ्यांची योजना करून कथेतली विविध स्थळे निश्चित केली होती. पाश्र्वभागी सायक्लोरामा आणि त्याच्यापुढे महादेवाची यात्रा (पोहा) दिसत असल्यामुळे एकूण अवकाश विस्तृत झाला आणि एक खेडं मूर्तिमंत झालं.
सगळेच कलावंत वैदर्भी असल्यामुळे त्यांच्या लोकभाषेतील आर्तता आणि गोडवा अस्सलपणे आस्वादता आला. कौतिकीच्या प्रमुख भूमिकेत वत्सला पोलकमवार होती. झाडीपट्टी रंगभूमीवरील या कलावतीने कुठेही आक्रस्ताळीपणा न करता जी सोशिकता प्रकट केली त्याला तोडच नव्हती. तिची हालचाल, तिचे बोलणे आणि तिचा मुद्राभिनय कमालीचा अस्सल होता. तीन दशकांचा काळ लोटला तरी अजूनही कौतिकीची भूमिका माझ्या डोळ्यासमोर आहे. त्यानंतर ही कलावती कुठच्याच नाटकात वा चित्रपटात दिसली नाही. व्यावसायिक नाटकातून ती आली असती तर आजच्या लोकप्रिय व गुणी कलावतींमध्ये तिला अग्रक्रम द्यावा लागला असता. अन्य भूमिकेत ज्ञानेश्वर धमाळ, संजीव कोलते, राजेश पराडकर, मनोहर पोलकमवार, मनीषा बिळेकर, दिवाकर जमादे, शुभदा सावदेकर, सुधा सोनार, विजय चवरे, उर्मिला जोशी, प्रदीप धरमटोक, सानिया देशपांडे, बाळ देशपांडे, निरंजन कोकर्डेकर, अनिरुद्ध देशपांडे, शिरीष साल्पेकर, रमेश भिसीकर, सुरेश जोशी, अभिजित शेणवाई, उदय कोकडेकर, सुधाकर धाकतोड, रमेश मटकर, अंजली गडकरी, सारंग अभ्यंकर, राजू मोपकर, विलास तरणकटीवार, दिलीप पोडे अशा अनेक कलावंतांनी वैदर्भी खेडे आणि त्यातील नाटय़ जिवंत केलं.
नाटय़प्रयोगाच्या कार्यक्रमपत्रिकेत जी अन्वर्यक कविता छापली आहे तिच्या अखेरच्या ओळीत या नाटकांचा संपूर्ण आशयच प्रकट झाला आहे
वेदनांकित डोळ्यांचे मौन
जळत जाणाऱ्या ज्वाला
हृदयाशी कवटाळून
तुटल्या फुटल्या स्वप्नांची..
वैदर्भीय बोली
लोककला लोकजीवन कथन करणारी
जीवनयात्रा..
पोहा चालला महादेवा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2013 1:01 am

Web Title: kamlakar nadkarni sharing his memories of marathi drama plays and marathi theatre
Next Stories
1 ‘अलवरा डाकू’ रस्त्यावर!
2 राजकारणी चेहरे आरपार!
3 ‘राजा लिअर’चा प्रमाथी झंझावात
Just Now!
X