सत्ताधाऱ्यांच्या अत्याचारी स्वरूपाचं दर्शन देणारं, गुंडगिरी आणि दहशतवाद्यांच्या वृत्तीवर नेमकं बोट ठेवणारं आणि हालअपेष्टा सहन करणाऱ्या पददलित जनतेचा रूपकात्मक चेहरा दाखवणारं ‘अलवरा डाकू’ तत्कालीन राजकारणाचा घेतलेला छेद म्हणून लक्षात राहतं. राजकारण्यांमागची ही गुंडगिरी आता पाश्र्वभागी राहिलेली नाही. त्यामुळे रस्त्यावरच्या मारामाऱ्या कमी झाल्या तरी विधिमंडळात व इतरत्र राजकीय वर्तुळात त्या थेट पोहोचल्या आहेत, हे दररोज दिसून येतं. त्यादृष्टीने ‘अलवरा डाकू’ आजही आमच्या राजकारणात ठामपणे कायम आहे.
ढोल आणि ताशे ढणाढण, तडातड वाजू लागतात. त्यांची लय टिपेला पोहोचत जाते. डावीकडून, उजवीकडून ज्वाळा वर आकाशाकडे वेगानं जाऊ लागतात. लोकांचा आरडाओरडा, किंकाळ्या आणि चित्कार! निवेदक कम् सूत्रधार जोरजोरात धापा लागल्यासारखा सांगत जातो : ‘डाकू गाव नि गाव जाळत चाललाय. भयंकर दहशत बसवत चाललाय. निवडणुकीच्या दिवसांतला तो राक्षसच आहे.’ या सगळ्या वेगवान आवाजांच्या मिश्रणात लेझिमांचा झणझणाट वातावरण अधिकच थरारक बनवतो. अंगावर काटा येण्यासारखं- शहारे येण्यासारखं नव्हे (ते सरसरून आलेच!), ते दृश्य पाहता पाहता अचानक दोन बाजूंच्या दोन भिंती कोसळतात. ‘अरे सांभाळा.. धावा.. धावा..’ प्रेक्षकांतले दामू केंकरे आणि कुणीतरी एक-दोघे स्टेजवर चढतात. मिट्ट काळोख होतो. पुन्हा प्रकाशाने रंगमंच उजळतो तेव्हा सर्व शांत झालेलं असतं. दामू केंकरे पुन्हा प्रेक्षक झालेले असतात.
१९७८ मधील १८ व्या राज्य नाटय़स्पर्धेतल्या त्या लक्षणीय प्रयोगाची आणि ज्वाळांची याद अजूनही माझ्या डोळ्यांसमोर भगभगतेय. नाटकाचं नाव होतं-‘अलवरा डाकू.’ आणि सादरकर्ती संस्था होती- ‘या मंडळी सादर करू या’! पुरुषोत्तम बेर्डे यांनी या पहिल्याच दिग्दर्शनात आणि लेखनात आपल्या कलाकर्तृत्वाचा ठसा रसिकांच्या मनावर उमटवला होता.
त्या काळात राज्य नाटय़स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक युवा कलावंताला आणि युवा संस्थेला आपण कसंही करून एखादं तरी राजकीय नाटक करावं असं तळतळून वाटत असायचं. कारण वर्तमान राजकारणावर भाष्य वा शेरेबाजी करण्याचं राज्य नाटय़स्पर्धा हे त्या युवकांसाठी एकमेव ठिकाण होतं. पुण्याच्या पी. डी. ए.ने ‘घाशीराम..’ केलं होतं. ‘रंगायन’ने ‘दंबद्वीपचा मुकाबला’ दिला होता. ‘जुलूस’ करून ‘बहुरूपी’ने वेगळंच श्रेय मिळवलं होतं. ‘बालनाटय़’ने ‘लोककथा ७८’ केलं होतं. कुणी कुणी ‘क्राइम पॅशन’ आणि ‘अ‍ॅन्टिगनी’ही केलं होतं.
राज्य नाटय़स्पर्धेत आपल्याच नाटकानं भाग घ्यायचा असं जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या काही विद्यार्थ्यांनी ठरवलं. आपल्या चमूला अन्वर्थक असं ‘या मंडळी सादर करू या’ हे नाव दिलं आणि चमूतल्या एका नव्या एकांकिकाकारालाच- म्हणजेच पुरु बेर्डेला नाटक लिहायला भाग पाडलं.
त्यावेळी ‘घाशीराम’ आणि ‘जुलूस’मुळे म्हणजेच विजय तेंडुलकर व बादल सरकारांमुळे नाटय़ाविष्काराची एक नवी वाट सर्वाना सापडली होती. आता नाटकाला गोष्टीची गरज नव्हती. तुमच्या डोक्यात, कल्पनेत असेल ते आकर्षक आकृतिबंधातून आणि प्रतीकरूपात व रूपक स्वरूपात तुम्ही मांडू शकत होता. विचारांना आणि दृश्यात्मकतेला अधिक महत्त्व आलं होतं. आणि हे सर्व साध्य करण्यासाठी लोककलांसारखं लवचिक माध्यम कमालीचं उपयोगी पडण्यासारखं होतं. नेपथ्याचं, झगमगाटाचं अवडंबर न माजवता उभी राहणारी, गरीब वाटणारी, पण आशय-विषयाच्या दृष्टीनं श्रीमंत वाटणारी रंगभूमी दिली ती राज्य नाटय़स्पर्धेने! त्याच संपन्न नाटय़ाविष्काराचा वापर करून पुरुने ‘अलवरा डाकू’ उभा केला.
पुरुचं शालेय जीवन कामाठीपुरात गेलं होतं. सकाळपासून रात्रीपर्यंत आजूबाजूला अनेक लोककलाकार आपल्या उपजीविकेसाठी आपल्यातल्या कलांचं प्रदर्शन करीत पै-पैसा गोळा करायचे. पोटासाठी कला राबवीत असल्यामुळे त्यांच्या कलाविष्कारात कसला विधी नव्हता की कसली पूजाअर्चा नव्हती. पुरुने त्या सगळ्यांना आपल्या नाटकात सामावून घेतलं. नव्हे, त्यांनाच सूत्रधार व भाष्यकार केलं. त्यांचा माध्यम म्हणून वापर केला. त्यात चमुरा आला. डोंबारी आला. अंगावर चाबकाचे फटके मारून घेणारी जरीमरी आली. जादूची पोतडी घेऊन फिरणारा जादूगार आला. मान डोलावीत ‘होय.. होय’ म्हणणारे नंदीबैल आले. देवी घेऊन निघालेल्या यल्लमा आल्या. तोंडातून आगीच्या ज्वाळा काढणारे मशालवाले आले. बेभान नाचणारे लेझीमवाले आणि ढोलवाले आले. हे सगळे रस्त्यावरचे खेळवाले आजूबाजूला जमलेल्यांचे रंजन करणारे होते. त्यांचीच चित्रे नाटकात उभी केल्यामुळे रंजन हा जो कुठल्याही नाटकाचा अविभाज्य भाग असतो, तो आपोआपच नाटकात आला. राजकारण आणि रंजन दोन्ही हेतू ‘अलवरा डाकू’ने सिद्ध केले. उत्तर प्रदेशातल्या एका डाकूची त्याचवेळी हत्या झाली होती. त्याचं नाव होतं- ‘अलवरा डाकू’! तेच नाव नाटकाला दिलं गेलं. राज्य नाटय़स्पर्धेत प्राथमिक फेरीत या नाटकाला दुसरा क्रमांक मिळाला. फक्त पहिल्या क्रमांकाचंच नाटक अंतिम स्पर्धेला पाठविण्याचा नियम असल्यामुळे हे नाटक अटीतटीच्या स्पर्धेत जाऊ शकलं नाही. पण स्पर्धेबाहेर या नवीन नाटकाचे काही प्रयोग केले गेले. या नाटकाचे काही प्रयोग अमोल पालेकर यांनीही प्रायोजित केले होते. राष्ट्रीय प्रयोग कला केंद्राकडून (एनसीपीए) या प्रयोगाला आलेलं निमंत्रण त्यातील प्रत्यक्ष आगीच्या दृश्यामुळे नाकारावं लागलं. (या नाटय़गृहात जिवंत आगीला मज्जाव होता. रंगमंचावर सिगरेट, लायटर किंवा काडेपेटी चालत असे.) दिल्लीच्या श्रीराम सेंटरने या नाटकाच्या प्रयोगांना खास निमंत्रण दिलं होतं.
खेळ सुरू होतो. रस्त्यावरचा खेळ. जादूचा खेळ. जादूगार आपली पोतडी उघडतो आणि त्यातून एकेक वस्तू बाहेर काढतो. हिंदुस्थानच्या सर्व धर्माच्या लोकांना सलाम करून तो खेळ सुरू करतो. वेगवेगळ्या वस्तू आपल्या पोऱ्याला ओळखायला सांगतो. वेगवेगळे पर्याय देतो आणि मग ‘हा’, ‘नाही’ करीत पोऱ्या ओळखतो. ते खुर्चीचे पाय असतात. प्रत्येक पाय वेगवेगळा. प्रत्येक स्क्रू वेगवेगळा. पाठ वेगळी. बसायची गादी वेगळी. पाठीवर रेललं तर पोट सांभाळता आलं पाहिजे. खुर्ची धोकादायक. जरा हलली तरी पडू शकते. एकदा जादूगार लोकांनाच सांगतो, ‘या खुर्चीचे पाय तुमच्यात आहेत. ते शोधायचे आणि जोडायचे.’ दोन टोपी घातलेली मुलं येतात. त्यांचा हात टोपीकडे गेला की टोपी फिरलीच. हात फिरला की नुसती टोपी फिरून उपयोगाचं नाही. या हाताने द्राक्षाचे मळे उभे केले पाहिजेत. साखर तोलून धरली पाहिजे. कारखाने उभे केले पाहिजेत. याच हातांनी उद्घाटनाच्या फिती कापायच्या आणि मुहूर्ताचे दगडही रोवायचे. दोघे समोरासमोर उभे राहिलात तरी समोरच्याची ताकद अजमावा आणि मग दंड थोपटा. समोरच्याच्या मागे शहरातले दारूवाले आहेत. मटकाकिंग आहेत. अड्डेवाले आहेत. एक शिटी मारायची खोटी, की अख्खी वानरसेना हजर होईल. मधेच तो जादूगार ‘शिवाजी म्हणतो’ असं सांगून त्यांना दम देतो आणि जायला सांगतो. कारण आता येथे एक भयानक खेळ सुरू व्हायचा असतो. त्याअगोदर सूत्रधाराने केली ती फक्त सुरुवात.
जादूगार सत्ताधाऱ्याची टोपी घालतो आणि प्रेक्षकांत अलवरा डाकूला शोधतो. ‘तो महाभयंकर अलवरा डाकू तुमच्यात बसलाय. अगदी तुमच्या शेजारीही असेल. टोपीचा आदेश आहे. निवडणूक जवळ आली आहे. आताच्या आता अलवरा डाकूला हजर करा.’ आणि तो तर मिळत नाही. मग इव्हबाई नावाची माकडीण येते. तिच्या पाठीवर तिचा बाडबिस्तारा आहे. पण तिचा बाबा आदम तिच्याजवळ नाही. माकडीण आपले वंशज कुठपर्यंत पोहोचलेत ते प्रेक्षकांत पाहते. जादूगाराचा अलवरा डाकू नाही. माकडीणीचा बाबा आदम नाही. तो सफरचंद आणायला गेलाय. सत्ताधाऱ्याकडून ते मिळण्याची आशा नाही. त्यासाठी वेगळा तांडा घेऊन बाबा आदम निघणार आहे.
हरवलेल्या आदिबाबाची माकडीण इव्हबाई पुढाऱ्याची मिरवणूक अडवते. हे असले आदिमानवांचे, माणूस नसणाऱ्यांचे अडथळे दूर करण्यासाठी उपाय एकच- अलवरा डाकू. आणि हरवलेला अलवरा डाकू प्रेक्षकांतच असतो. त्याला रंगमंचावर आणण्यात येतं. अलवराचे सर्व गुन्हे माफ केले जातील, त्याच्या फायली दडपल्या जातील; त्याने फक्त सत्ताधाऱ्यांचं ऐकायचं. सर्वत्र दहशत बसवायची. त्याबद्दल अलवराला एका बाईचा- बिंदाचा नजराणाही दिला जातो. ही बाई खालच्या जातीची असते. अलवरा खालच्या जातीच्या बाईला हातदेखील लावत नाही. तरीही तो तिला ठेवून घेतो.
उत्तरार्धात दोरीवरचा खेळ चालू आहे. त्याचवेळी बिंदाला पकडायला सत्ताधारी पक्षाचे कुत्रे येतात. बिंदा त्यांच्या भुंकण्याला भीक घालीत नाही. ते जबरदस्तीने बिंदाला बांधून घेऊन जातात. अलवरा डाकू बिंदाच्या अंगाला हात लावत नाही. खालच्या जातीतल्या स्त्रियांना हात लावायचा नाही असा त्याचा नियम असतो.
बायोस्कोपवाले येतात. ‘कुतुबमिनार देखो.. कु- कु देखो..’ असं म्हणत विरोधी पक्ष घराघरात घुसल्याचं सांगितलं जातं. त्यांच्या बोटाला शाईचा थेंब कोण लावतो ते बघू या, अशा निर्धारानं अलवरा निघतो. मंगळागौर साजरी करणाऱ्या बायकांवरच तो घाला घालतो. किंकाळ्या फुटतात. अलवरा गाव बेचिराख करतो.
सत्ताधारी पक्ष जनतेला देशाच्या प्रगतीसाठी खुर्ची बळकट करण्याचं आवाहन करतो. विरोधी पक्ष सांगतात- ‘सत्ताधारी लोक पुंगीवाले आहेत. त्यांच्या खोटय़ा आश्वासनांवर भाळू नका. जनतेने आपले हात आमच्या हातात द्यावेत. त्यांना संरक्षण मिळेल.’
जनता, अलवरा आणि सत्ताधारी यांची एक साखळी तयार होते.
अलवराच्या गुहेत बिंदाला आणलं जातं. तेव्हा ती सर्वाचे संसार धुळीला मिळवणारा हा महाराक्षस कसा आहे ते पाहते. अलवरा तिच्याबरोबर सहानुभूतीने बोलतो. सत्ताधारी पक्षाने अलवराला पोसला असून त्याच्याच बळावर त्याचे गोरगरीबांवर, दलितांवर अत्याचार चालू आहेत हे तिला समजतं. अलवराचा पुरा नायनाट झाल्याशिवाय, दहशतवाद किंवा गुंडगिरी नेस्तनाबूत झाल्याशिवाय गरीबांची परिस्थिती सुधारणं शक्य नाही हे तिच्या लक्षात येतं. खालच्या जातीतल्या स्त्रीला हात न लावण्याचं नाटक करणारा हा दुष्ट राक्षस वधलाच पाहिजे हे तिच्या लक्षात येतं. आणि हाती मशाल घेऊन केवळ दलितांच्याच नव्हे, तर पीडितांच्या, शोषितांच्यावतीने अलवराच्या छाताडावरच ती आरूढ होते. ‘अलवरा डाकू मेलाच पाहिजे!’ हे तिचे निर्वाणीचे शब्द असतात. ती जणू हाती मशाल घेऊन महिषासुरमर्दिनी होते.
सत्ताधाऱ्यांच्या अत्याचारी स्वरूपाचं दर्शन घडवणारं, गुंडगिरी आणि दहशतवाद्यांच्या वृत्तीवर नेमकं बोट ठेवणारं आणि हालअपेष्टा सहन करणाऱ्या पददलित जनतेचा रूपकात्मक चेहरा दाखवणारं ‘अलवरा डाकू’ तत्कालीन राजकारणाचा घेतलेला छेद म्हणून लक्षात राहतंच; पण त्यातलं संगीत आणि रस्त्यावरच्या खेळवाल्यांचं वापरलेलं माध्यम या नाटकाला कमालीचं परिणामकारक करून जातं. त्याचं संगीत दृश्यात्मकतेचं एक वेगळंच परिमाण नाटकाला देऊन जातं.
राजकारण्यांमागची ही गुंडगिरी आता पाश्र्वभागी राहिलेली नाही. त्यामुळे रस्त्यावरच्या मारामाऱ्या कमी झाल्या तरी विधिमंडळात व इतरत्र राजकीय वर्तुळात त्या थेट पोहोचल्या आहेत हे दररोज दिसून येतंय. त्यादृष्टीने ‘अलवरा डाकू’ आजही आमच्या राजकारणात ठामपणे कायम आहे.
या नाटकाचे नेपथ्यकार होते अशोक साळगावकर. पाश्र्वभागी सापशिडीच्या खेळाचा रंगवलेला विशाल पडदा हेच या नाटकाचं नेपथ्य होतं. त्यामुळे दिग्दर्शकाने रस्त्यावरच्या खेळगडय़ांना व त्यांच्या खेळाला भरपूर अवकाश प्राप्त करून दिला होता. हे खेळकरी आपला खेळ करता करताच मिरवणूक व्हायचे, तर कधी जनता, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षही!
पुरुषोत्तम बेर्डे यांनी दिग्दर्शनाच्या बरोबरीनं संगीताची आणि प्रमुख सूत्रधाराची जबाबदारी स्वीकारली होती. रघुवीर कुल यांनी वेशभूषेकडे लक्ष पुरवलं होतं. मंगेश दत्त आपल्या पहाडी आवाजातल्या गाण्यानं प्रेक्षकांमध्ये स्फुरण चढवायचा. जरीमरी, मंगळागौर, आंधळ्यांची मिरवणूक, फकीर, वासुदेव, लेझीम-ढोल या सर्व प्रकारांना त्या-त्या व्यवसायाला अनुसरून संगीताची साथ दिली होती वाद्यकार अर्थात पुरुषोत्तम बेर्डेनंच!
अलवरा डाकू झाला होता- अशोक वंजारी, तर बिंदा झाली होती- राणी सबनीस. नंदू देऊळकर, महेश कुबल, राकेश शर्मा, नलेश पाटील, मंगेश दत्त, प्रदीप मुळ्ये हे प्रमुख कलावंत होते. एकूण टोळी ४० कलावंतांची होती.
राज्य नाटय़स्पर्धेत प्राथमिक फेरीत या नाटकाने दुसरा क्रमांक पटकावल्यामुळे अंतिम स्पर्धेला हे नाटक जाऊ शकलं नाही. प्रेक्षकांनी मात्र या सापशिडीच्या रंजक व भेदक नाटय़प्रयोगास उत्तम प्रतिसाद दिला. एका बिनव्यावसायिक, हौशी कलावंतांच्या नाटय़प्रयोगाने अर्धशतकी मजल मारावी ही १९७८ सालातली अपूर्वाईची घटना होती. ‘अलवरा’ प्रेक्षकांच्या डोक्यात व मनात घुसला होता.
kamalakarn74@gmail.com