News Flash

‘कांगितेन’ : युगुल गणेश

एकत्रित दोन गणेशमूर्तीचा उल्लेख कोणत्याही भारतीय पुराणांमध्ये आढळत नाही. तथापि, चिनी व जपानी बौद्ध धर्मात ‘कांगितेन’ ही आपल्या गणेशाशी साधम्र्य असलेली मूर्ती आढळून येते.

| August 31, 2014 01:26 am

एकत्रित दोन गणेशमूर्तीचा उल्लेख कोणत्याही भारतीय पुराणांमध्ये आढळत नाही. तथापि, चिनी व जपानी बौद्ध धर्मात ‘कांगितेन’ ही आपल्या गणेशाशी साधम्र्य असलेली मूर्ती आढळून येते. जपानी भाषेत ‘शाश्वत सुखाची देवता’ असा ‘कांगितेन’ या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. पवित्र देवता वा थोर देवता या अर्थाचे ‘कांकितेन’ तसेच ‘शॉतेन’ हे शब्दही त्याकरता वापरले जातात. बौद्ध तंत्र-मंत्रयान या गूढ उपासना परंपरेतील ‘वज्रयान’ संप्रदायामध्ये अनेक अर्थानी तसेच नावांनी ओळखला जाणारा हा गणपती! स्त्री-पुरुषरूपात परस्परांना मिठी मारलेल्या उभ्या स्थितीतील गणेश असे या मूर्तीचे स्वरूप आढळते. या देवतेची निर्मिती तसेच तिच्या पूजाविधीसंबंधात चिनी व जपानीतील अनेक प्राचीन ग्रंथांतून माहिती आढळून येते.
मुंबईच्या भाईंदर भागातील एका गणेशोत्सव मंडळाने गेल्या वर्षी गणेशाचा जपानी अवतार म्हणून इको-फ्रेंडली ‘कांगितेन’ मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. जपानी व चिनी लोक गणपतीला ‘शॉटेन’ किंवा ‘कांगितेन’ या नावाने संबोधतात. परंतु या नावाचा गणपतीच्या प्रचलित नावांशी कुठेही मेळ बसत नाही. मात्र, त्याचे मूर्तिरूप भारतातील गणेशमूर्तीशी साधम्र्य सांगणारे आहे. परस्परांना आलिंगन देणाऱ्या या समरूप गणेशमूर्ती जागतिक शांतता आणि बंधुभावाचे प्रतीक म्हणून या मंडळाने स्थापित केल्या होत्या.
मात्र, असे दोन गणेश एकाच वेळी उपस्थित असल्याचा उल्लेख कोणत्याही भारतीय पुराणांमध्ये आढळत नाही. जपानी भाषेत ‘शाश्वत सुखाची देवता’ असा ‘कांगितेन’ या शब्दाचा अर्थ आहे. पवित्र देवता वा थोर देवता या अर्थाचे ‘कांकितेन’ तसेच ‘शॉतेन’ हे शब्दही त्यासाठी वापरले जातात. याच अर्थाचे दैशो-तेन, दाइशो कांगितेन, तेन् सोन, कांगी जिझाइ-तेन, शॉदेन-सामा, विनायका-तेन, बिनायका-तेन, गनपतेल आणि झोबी-तेन हे शब्दही ‘कांगितेन’ या देवतेविषयी वापरात आहेत. जपानी बौद्ध धर्मातील शिंगॉन आणि तेंदाई या संप्रदायांमध्ये प्रामुख्याने त्याची उपासना केली जाते. हिंदू धर्मात ज्ञानाची देवता तसेच बौद्ध धर्मामध्ये बोधिसत्त्व अवलोकितेश्वराशी नाते सांगणाऱ्या गजमुख गणेशाचे हे चिनी-जपानी रूप होय.
बौद्ध तंत्र, मंत्रयान या गूढ उपासना परंपरेतील ‘वज्रयान’ संप्रदायामध्ये अनेक अर्थानी तसेच नावांनी ओळखला जाणारा हा गणपती. ‘शिंगॉनन’ हे त्यापैकी एक. स्त्री-पुरुषरूपात परस्परांना मिठी मारलेल्या उभ्या स्थितीतले गणेश असे या मूर्तीचे स्वरूप असते. स्वतंत्र गजमुख गणपती स्वरूपातही कांगितेन मूर्ती चिनी-जपानी परंपरेत आढळतात.
‘बिनायकाटेन’ हे कांगितेनचे एक नाव भारतीय पुराणांतील विनायकाला दिलेले विशेषण आहे. ‘गणबची’ नावानेही त्याला चिनी-जपानी परंपरेत संबोधले गेले आहे. ‘गण्वा’ किंवा ‘गणपती’ हे नावही काही ठिकाणी वापरले जाते. बिनायक हा विघ्ननिर्माता म्हणून मानला जातो. पण तो प्रसन्न झाल्यावर मात्र आपल्या भक्तांना भरभराट, यश, आरोग्य आणि उज्ज्वल भवितव्य बहाल करतो, अशी चिनी-जपानी बौद्धांची धारणा आहे. बिनायकाविषयी चिनी बौद्ध धर्मानुयायांमध्ये अशी समजूत आहे की, तो सैतानी प्रवृत्तीचा आहे. त्याचप्रमाणे बेबनाव निर्माण करून, कलह माजवून पुढे जाणाऱ्यांना तो चालना देतो.
शॉटेन किंवा आर्यदेव या त्याच्या नावांतून उज्ज्वल भवितव्य सूचित होते. कांगितेनचे परस्परांना मिठी मारण्याचे मूर्तिरूप सुख व समृद्धीचे प्रतीक म्हणून तांत्रिक बौद्ध धर्मात पूजले जाते. ‘सोशीन कांगितेन’ म्हणजे दोन शरीरे असलेली शाश्वत सुखाची देवता ही शिंगॉन बौद्धांमध्ये आपले वेगळे स्थान राखून आहे. जपानी बौद्ध ‘सोशीन बिनायका’ नावाने तसेच चिनी बौद्ध ‘क्वान्-शी-टेन’ या नावाने त्याला संबोधतात. त्याचा संस्कृत भाषेतील अर्थ ‘नंदिकेश्वर’ असा होतो.
दायशो कांगितेनविषयी माहिती देताना फिलीप फ्रांझ वॉन सिबोल्ड या अभ्यासकाने- दोन हातांच्या कांगितेनने एक त्रिशूळ आणि मुळा आपल्या हातांमध्ये धारण केल्याचे वर्णन केले आहे. अशा स्वतंत्र कांगितेन मूर्ती क्वचितच सापडतात. प्रचलित कांगितेन गजमुखी स्त्री-पुरुष परस्परांना आलिंगन देताना दिसतात. स्त्रीरूपी गणपतीने मुकुट धारण केलेला असून ठिगळे लावलेला भिक्खूचा पेहराव आणि लाल-रुंद बाह्यांचा डगला परिधान केलेला असतो. पुरुष मूर्तीमध्ये कधी कधी खांद्यावर काळे वस्त्रे पांघरलेले दिसते. त्याला लांब सोंड आणि अणकुचीदार सुळे असतात. लालसर तपकिरी रंगाचा पुरुष गणपती, तर पांढऱ्या रंगाची स्त्री-गणपतीची मूर्ती असते. ती त्याच्या पायावर पाय आणि त्याच्या खांद्यावर डोके टेकवलेल्या अवस्थेत असते. काहीसे वेगळे रूप असलेल्या कांगितेनला ‘प्रेमळ स्मित शॉटेन’ (Shoten Fondly Smiling या नावाने संबोधले जाते. स्मितहास्य करीत एकमेकांच्या नजरेत नजर घालून पाहत असलेली अशी त्यांची स्थिती असते. स्त्री कांगितेन ढिले वस्त्र, तर पुरुष तंग कपडे घातलेला असतो. काही मूर्तीमध्ये एकाच वस्त्रात त्यांना दाखविले जाते. परस्परांना मिठी मारणारे ‘शॉटेन’ खांद्यावरून पलीकडे पाहताना दिसतात. ‘शॉटेन’ या शब्दाच्या अर्थानुसार, एकमेकांच्या खांद्यांच्या पलीकडे पाहणारे दाम्पत्य असे त्यांचे स्वरूप असते. परस्परविरोधी प्रवृत्तींमधील एकता अशा मूर्तिविधानातून सूचित होते. स्वतंत्र रूपे असलेल्या भिन्नलिंगी मूर्तिशिल्पांनाही ‘कांगितेन’ या नावाने संबोधले जाते. त्याचप्रमाणे भावनिक तल्लीन रूपातील त्यांच्या एकरूपतेलाही हेच नाव दिलेले आढळते. एकमेकांपासून विलग अवस्थेतील कांगितेनचे एकमेकांच्या पायावर पाय तसेच एकाच वस्त्रात एकवटल्या स्थितीतून त्यांचे लैंगिक आकर्षण सूचित होते.
गजमुखी पुरुष स्वरूपाच्या शॉटेन मूर्तीला दोन, चार, सहा, आठ किंवा बारा बाहू असल्याचे दाखवतात. सार्वजनिक पूजास्थानांत अशा मूर्ती क्वचितच दिसतात. पुल्लिंगी शॉटेन सहसा चार हात असलेला तसेच त्याच्या हातांमध्ये मुळ्याचे रोप आणि मोदक दाखविला जातो. इतर हातांमध्ये तलवार, गदा वा अधिकारदंड, अमृतकुंभ किंवा पुढील हात दुमडलेल्या स्थितीत असतात. सहा हातांच्या कांगितेनच्या हातांत चाकू, फळांची परडी, डाव्या हातात वाटोळा दगड आणि सोटा असतो. त्याचा उजवा दात तुटलेला असतो आणि हातात पाश असतो.
वज्रधातू आणि गर्भकोशधातू ही दोन शिंगॉन पंथातील महत्त्वाची मंडले बिनायकाजवळ दाखविली जातात. साधारणपणे एकापेक्षा अधिक बिनायकाजवळ ही मंडले दिसून येतात. गजमुख बिनायकाची प्रतीके म्हणून मुळा आणि परशू असून पद्मासनात तो घडविला जातो. दुष्ट शक्ती आणि सैतानांपासून सर्वाचे रक्षण करणारा असा हा विनायक चिनी-जपानी बौद्धांमध्ये पूजनीय आहे. वैरोचन या पाच थोर बुद्धांपैकी एक असलेल्या या दैवताला मंडलांमध्ये केंद्रस्थानी ठेवले जाते. बिनायकाचे बाह्यरूप म्हणजे त्याचा अवतार होय अशी त्यांची श्रद्धा आहे.
काही प्रतीकांद्वारेही कांगितेनचे अस्तित्व दर्शविण्याची चिनी-जपानी परंपरा आहे. शुजी किंवा बिजा या शब्दांनी किंवा छत्र, पोशाख, धनुष्य आणि बाण या प्रतीकांनी मंडलामध्ये कांगितेनचे स्थान मानले जाते.
इ. स.च्या आठव्या-नवव्या शतकात जपानी बौद्ध मंदिरांमध्ये एक दुय्यम देवता म्हणून कांगितेनचा समावेश झाला. शिंगॉन बौद्ध संप्रदायाचा संस्थापक कुकाइ (७७४-८३५) याच्या प्रभावामुळे तो झाला असावा असा अभ्यासकांचा कयास आहे. सर्वप्रथम चीनमध्ये रेशीममार्गाने व्यापार करणाऱ्यांनी आपले आराध्यदैवत म्हणून गणेशाची मूर्ती तिथे नेली. तिचा समावेश मग त्यांनी बौद्ध धर्मात केला. त्यानंतर जपानमध्ये तिचा प्रवेश झाला. अन्य हिंदू दैवतांपेक्षा सर्वात आधी कांगितेनचा शिंगॉन बौद्ध धर्मात स्वीकार केला गेला. दोन मंडलांमध्ये दुय्यम द्वारपाल असे त्याचे प्रारंभी स्थान होते. त्यानंतर एक जुळे म्हणून स्वतंत्र दैवत या नात्याने तो प्रस्थापित झाला. युवान काळात (७९४-११८५) मोठय़ा प्रमाणात जपानी लोकांनी त्याचा स्वीकार केला. हिंदू धर्मातील गणेशाचे बौद्धरूप म्हणून प्राचीन चिनी साहित्यात त्याचा उल्लेख तसेच पूजाविधी आढळतात.
कांगितेनच्या प्राचीन प्रतिमांमध्ये त्याला दोन वा सहा हात आढळतात. सोनेरी कांस्यप्रतिमा आणि चित्रांमध्ये युगुल कांगितेन लैंगिक क्रियेत मग्न असल्याचे हैन कारकीर्दीच्या शेवटच्या काळात दर्शविले गेले. यब-युम या जोडगोळीसारख्या लैंगिक क्रियेत मग्न प्रतिमा तिबेटमधील तांत्रिक बौद्ध धर्मात प्रचलित होत्या. त्यांच्या प्रभावातून कांगितेन मूर्ती बनविल्या गेल्या असाव्यात. कन्फ्युशिअसच्या नीतिशास्त्रीय संस्कारांमुळे जपानमध्ये अशा लैंगिक मूर्तीना लोकांच्या नजरेआड गुप्तपणे ठेवले जाई. परंतु हैन राजवटीत एक शिंगॉन दैवत या नात्याने कांगितेनला महत्त्व प्राप्त झाले.
कांगितेनच्या युगुलमूर्तीचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करण्यात बराच काळ अभ्यासक गुंतले होते. परंतु त्यांना अशा एकत्रित आकृतीच्या निर्मितीमागील सबळ पुरावा शोधण्यात अपयश आले. चीनमधील प्राचीन ग्रंथांमध्ये तांत्रिक बौद्ध धर्माची माहिती जेव्हा पुढे आली, तेव्हा वैरोचन बुद्ध आणि त्याचा संप्रदाय वाढविण्यात शुभकरसिंह, वज्रबोधी व अमोघवज्र या ज्या तीन महागुरूंचे योगदान होते, त्यांच्याभोवती अभ्यासकांचे लक्ष केंद्रित झाले. चिनी भिक्खू अतिगुप्त याने इ. स. ६५४ मध्ये ‘धरणीसमुच्चय’ या ग्रंथाचे चिनी भाषेत भाषांतर केले. त्यात युगुल कांगितेनच्या पूजाविधीचे वर्णन आहे. त्या विधीचे अनुकरण अमोघवज्र (७०५-७७४) या गुरूने ‘दायशोटेन कांगी सोशीन बिनायका हो’ या आपल्या ग्रंथात केले. सोशीन कांगितेनचे वर्णन अमोघवज्राने एक दैवत म्हणून केले. त्रिकाया या बुद्धरूपाप्रमाणे दुष्ट शक्ती आणि दु:खद घटनांपासून आपल्या भक्तांना सुरक्षित करणारे दैवत या स्वरूपात त्याने कांगितेनला प्रस्थपित केले.     
(पान १ वरून) सहा हातांच्या शॉटेन या दैवतासारखे युगुल कांगितेनला मानून त्याच्या पूजाविधी व मंत्रांचा वापर त्यासाठी त्याने केला. अमोघवज्राने सोशीन कांगितेनला एका ग्रंथात बोधिसत्त्व म्हणून संबोधलेले आढळते. या ग्रंथात त्याने त्याच्या भक्तांचे तीन प्रकारे वर्गीकरण केले आहे. एक म्हणजे उच्च प्रकारचे अंतर्गत गुपिते जाणू शकणारे, दुसरे या ग्रंथाचे वाचन करू शकणारे आणि तिसरे उपासक निम्न श्रेणीतील असून, फक्त त्यांना उच्च प्रतीच्या उपासकांनी केलेल्या पूजाविधीमध्ये सहकार्य करण्याचा अधिकार होता. प्रेम आणि वशीकरण, संरक्षण व मिळकत या चार सिद्धी प्राप्त करण्याकरिता या गणपतीची उपासना केली जात असे. याचबरोबर राज्य, ऐश्वर्य आणि मुबलक अन्न व वस्त्र या भौतिक गरजांच्या प्राप्तीकरताही या गणपतीला आळविले जाई. शाश्वत सुखाचे पाणी या नात्याने कांगितेनला मद्य अर्पण केले जावे, अशी सूचना याविषयीच्या अधिकृत संहितेत केलेली आढळते. पोइ-जो-जे चिएह-लो या लेखकाने ‘शो कांगितेनचे पूजाविधी’ (इ. स. ८६१) या गं्रथामध्ये ‘कांगितेनची मंडले’ वर्णिलेली आहेत. बोधिरूसीने विनायकाचे वर्णन दोन ग्रंथांमध्ये केले आहे. त्यापैकी एकामध्ये विनायक एका मंत्राचे उच्चार दैवते व राक्षसांच्या समूहाला शिकवीत असल्याचे वर्णन आहे. युगुल कांगितेनविषयीच्या उपासनेकरिता अमोघवज्राने रचलेल्या ‘दायशोटेन कांगी सोशीन बिनायका हो’ या ग्रंथातही हा मंत्र आहे. या मंत्राचे उच्चारण वारंवार केल्याने दैवतांनाही जीवनदान देण्याचे आश्वासन विनायकाच्या राक्षस अनुयायांनी दिल्याची माहिती यात आढळते. एका प्राचीन संहितेत बोधिरूसीने विनायकाची कथा तपशीलवार कथन केली आहे. त्याचप्रमाणे चार हातांचे दैवत म्हणून युगुल कांगितेनच्या आराधनेसाठी पूरक अशा अनेक विधींचे वर्णन केले आहे. मोहात पाडणे, विद्वत्ताप्राप्ती, शत्रुनाश, इ.साठीही काही कर्मकांडे त्यात सांगितली आहेत. आठव्या शतकाच्या प्रारंभी शुभकरसिंह ग्रंथात कांगितेनचे मंत्र, मूर्तिविधान आणि इतर काही पूजाविधी विस्तृतपणे सांगितले आहेत. अमोघवज्र तसेच अतिगुप्त या विद्वानांनी ते रचले आहेत. त्याच कांगितेनचे शिव आणि हिंदू राजा विनायकाशी असलेले अवलोकितेश्वराचे (कॅनॉन) साधम्र्य दर्शविलेले आढळते. हिंदू तंत्रग्रंथांमध्ये वर्णिलेल्या गणेशाशी युगुल कांगितेनचे नाते आहे. त्याविषयीच्या आख्यायिकांमधून ते स्पष्ट होते.
विनायकाच्या दुष्ट प्रवृत्तीबद्दलच्या अनेक आख्यायिका जपानी बौद्ध ग्रंथांमध्ये आढळतात. ‘कांगिसोशीनकुयो हो’चे वर्णन प्राचीन चिनी ग्रंथांमधील शुभकरसिंहासारखे त्यात केलेले दिसते. हिंदू धर्मात पार्वतीचा पुत्र म्हणून गणेश सर्वश्रुत आहे, तसाच जपानी बौद्ध ग्रंथांमध्ये राजा विनायक (बिनायक) उमापुत्र किंवा उमाहीपुत्र म्हणून येतो. त्याचा पिता महेश्वर हा शिवाशी साधम्र्य सांगणाऱ्या बौद्ध दैवतासारखा आहे. उमेने तिच्या एका बाजूपासून १५०० मुले निर्माण केली आणि तिच्या डाव्या बाजूपासून दुष्ट विनायकाचे सैन्य निर्माण झाले. त्यावर विनायकाचे मस्तक होते. त्याचप्रमाणे तिच्या उजव्या बाजूवर परोपकारी, सद्गुणी प्रवृत्तीचे प्रतीक म्हणून अवलोकितेश्वराचे मस्तक होते. तो देवांचा सेनानायक या नात्याने बौद्ध ग्रंथांमध्ये चितारलेला आढळतो. शिवगणातील स्कंद-कार्तिकेयाशी त्याचे साधम्र्य सांगितले जाते. नंतर गणेशाचा भाऊ म्हणून त्याची ओळख आपणास झाली. दोन परस्परविरोधी संप्रदायांमध्ये झालेल्या सामंजस्याचे ते प्रतीक आहे. सेनानायकाने गणेशाचा मोठा भाऊ या नात्याने अनेक जन्म घेतले आणि त्यात विनायकाच्या पत्नीने त्याचा अनेकदा पराभव केला अशी वर्णने हिंदू पुराणांमध्ये येतात. त्यानंतरच्या शुभकरसिंह या ग्रंथामधील कथांमध्ये ती पत्नी सेनानायकाला आलिंगन देताना वर्णन केलेली आढळते. या पुराणकथेवरून युगुल कांगितेनच्या मूर्ती घडविल्या गेल्या. जपानी परंपरेत इडा-तेनचा भाऊ म्हणून कांगितेनचा स्वीकार केला गेला. स्कंदापासून या देवतेचा जपानी अवतार बनला असण्याची दाट शक्यता आहे.
एका आख्यायिकेत मराकेईराचा राजा फक्त गोमांस व मुळा खात असल्याचे वर्णन येते. जेव्हा हे पदार्थ मिळेनासे होतात तेव्हा मानवी प्रेतावर तो ताव मारतो आणि शेवटी जिवंत प्राण्यांना खाऊ लागतो. त्याचे रूपांतर विनायकाच्या सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या महान राक्षसराजात होते. त्याच्या उत्पाताने त्रस्त झालेले लोक शेवटी अवलोकितेश्वराची प्रार्थना करतात. या प्रार्थनेत स्त्रीरूपी विनायकाचे रूप धारण करून त्याने विनायकाशी समागम करून त्याला वाईट मार्गाला लावावे अशी विनंती केलेली आढळते. या समागमाने आनंदप्राप्ती (कांगी) झाल्यामुळे त्यांच्या एकत्वाला युगुल कांगितेनचे रूप प्राप्त झाले.
कांगितेनचा शॉटेन या जपानी दैवताशी कसा संबंध आला, याबद्दल  कुकोझेन्शो कथांमध्ये माहिती मिळते. त्या झाई झिझाइ व महेश्वराविषयी माहिती देतात. त्यांना शोटेन नावाचा एक मुलगा होता. त्याच्या दुष्ट व आक्रमक वृत्तीमुळे त्याला स्वर्गात प्रवेश करायला मनाई होती. त्याला स्वर्गातून हद्दपार केले होते. गुंडारी किंवा कुंडली नावाच्या एका सुंदर मातृदेवतेने भयानक राक्षसीचे रूप धारण करून शोटेनशी लग्न केले. त्याला चांगल्या मार्गाकडे वळविण्याकरिता तिने असे केले. एका आख्यायिकेनुसार, कांगितेन ही महेश्वराची दुष्ट मुलगी होती व तिला स्वर्गातून हाकलून दिले होते. त्यानंतर तिने बिनायक पर्वताचा आश्रय घेतला आणि पुरुष बिनायकाचे शिष्यत्व पत्करून त्याच्याशी विवाह केला. त्यातून युगुल कांगितेन या दैवताची निर्मिती झाली. जपानी बौद्ध धर्मात विनायक व विनायकी या पुरुष व स्त्री-गणपतीच्या एकत्रीकरणावर आधारित आख्यायिका विपुल आढळतात. दुष्ट व विघ्नकारक अशा अवस्थेतून सुष्ट व विघ्नान्तक अवस्थेकडे होणारा त्यांचा स्वतंत्र प्रवास त्यातून चित्रित करण्यात आला आहे. भारतीय परंपरेतही अशा कथा  उपलब्ध आहेत.
कांगितेन या चिनी-जपानी गणपतीविषयीच्या दंतकथांवरून असे दिसून येते की, भारतीय परंपरेतील गणपतीचा स्वीकार करताना तेथील बौद्धांनी त्याला आधी विरोध केला असावा. परंतु त्याच्या उपासकांची संख्या वाढल्यावर त्याला नाकारणे त्यांना अशक्य झाले असावे. शेवटी स्थानिक दैवतांच्या स्वभाववैशिष्टय़ांशी जुळणारी त्याची वैशिष्टय़े पाहून त्याला स्वीकारणाऱ्या कथांची निर्मिती झाली असावी. भारतातही आर्यपूर्व द्रविडांच्या स्कंदकार्तिकेयाचा शिवगणात आधी प्रवेश झाला. त्यानंतर गणेशाचा स्वीकार करताना त्याचा सामना कार्तिकेयाशी झाला. शेवटी कार्तिकेयाचा लहान भाऊ म्हणून त्याला शिवपरिवारात सामावून घेतले गेले. ब्राह्मणी धर्माच्या परशुरामाशी गणपतीचे झालेले युद्ध पुराणांनी रंगवून कथन केले आहे. गणपतीचा एक दात परशुरामाने परशूने तोडला म्हणून ‘एकदंत’ हे नाव गणपतीला प्राप्त झाले, असे पुराणे सांगतात. तर तो तुटका दात म्हणजे बौद्धमत होय असे ज्ञानेश्वर म्हणतात.
दंतकथा या सांगीवांगीच्या गोष्टी असतात. त्या जेव्हा धार्मिक पूजाविधीशी जोडल्या जातात, तेव्हा त्यांना पुराकथांचा (मिथ्स) दर्जा मिळतो. त्यांचे पावित्र्य त्यामुळे वाढते. कांगितेनविषयीच्या दंतकथा बौद्ध धर्मातील उपासनांशी संबद्ध आहेत. चिनी-जपानी बौद्ध परंपरेत कांगितेनला महान शक्तीचे प्रतीक मानले जाते. तो मंदिरांचा संरक्षक मानला जातो. सामान्यत: जुगारी, कलावंत, आनंदमय गोष्टींचा व्यापार करणारे आणि गेशा- म्हणजे जपानी नर्तकी यांमध्ये तो पूजनीय आहे. विघ्नकारी शक्ती दूर करण्यासाठी आणि कांगितेनला प्रसन्न करण्याकरिता विशिष्ट मंत्रांची योजना त्याच्या पूजाविधीसाठी रचलेल्या ग्रंथांमध्ये केलेली आहे. सेक या नावाने ओळखली जाणारी तांदळापासून तयार केलेली दारू, मुळे आणि ‘कांगीदान’ या नावाने प्रचलित ‘आनंद पाव’ नैवेद्य म्हणून कांगितेनपुढे ठेवतात.
संपूर्ण जपानमध्ये कांगितेनच्या उपासना प्रचलित आहेत. परंतु होझान-जी हे त्याचे मंदिर सर्वात प्रसिद्ध असून, इकोमा पर्वताच्या शिखरावर ते आहे. या मंदिराची उभारणी सहाव्या शतकात केली गेली असे मानले जात असले तरी ते प्रकाशात मात्र सतराव्या शतकात आले. तांकाई (१६२९-१७१६) या बौद्ध भिक्खूने हियान कारकीर्दीत गोहोन्झॉन मंदिराची निर्मिती करून त्यात युगुल कांगितेनची कास्यमूर्ती बसविली तेव्हा ते सर्वसामान्यांच्या आकर्षणाचे केंद्र बनले. जेनरोक (१६८८-१७०४) काळात ओसाका येथील व्यापारी- विशेषत: वनस्पती तेलाची विक्री करणारे कांगितेन संप्रदायात सामील झाले. त्यामुळे त्याची उपासना जोरात सुरू झाली. युगुल कांगितेनच्या मूर्ती व्यापारी संकुलाभोवती असलेल्या मंदिरांमध्ये स्थापन करण्याची परंपरा त्यांनी सुरू ठेवली. दुकानांच्या मधोमध असलेल्या या मंदिरामध्ये युगुल कांगितेच्या मूर्ती लिंगकोष या नावाने प्रचलित आवरणाने झाकून ठेवल्या जात. १९७९ पर्यंत शिंगॉन संप्रदायाच्या जवळपास २४३ पूजास्थळांमध्ये कांगितेनची उपासना चालू असल्याची माहिती उपलब्ध आहे. अशा आगळ्या गजाननाची ही अनोखी कथा..!     

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2014 1:26 am

Web Title: kangiten joint ganpati like chinese god
टॅग : Ganesh Festival
Next Stories
1 जादुई संगीतकार
2 भारतीपूर
3 चतुरकथा..
Just Now!
X