12 July 2020

News Flash

दखल : अनोख्या वारीची कथा

सद्य:स्थितीत विद्वेषी राजकीय-सामाजिक वातावरणात ही पुस्तिका अतिशय महत्त्वाची आहे.

(संग्रहित छायाचित्र)

२०१४ पासून देशात धार्मिक-जातीय हिंसाचाराचा एक नवा पॅटर्न सुरू झाला. गोमांस बाळगल्याच्या संशयावरून, लहान मुलं पळवण्याची टोळी सक्रिय झाल्याच्या अफवेवरून आणि तत्सम कारणांनी निरपराध माणसांची जमावानं हत्या करण्याचा हा नवा पॅटर्न. झुंडबळीची ही समस्या दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत आहे. यामध्ये मुस्लीम, दलित, भटक्या समूहांतील अनेकांचा आतापर्यंत बळी गेला आहे. राजस्थान, पश्चिम बंगालसारख्या अनेक राज्यांनी याविरोधात कायदेही केले आहेत तरीही ते निष्प्रभ ठरत आहेत. या झुंडबळीच्या घटनांमुळे समाजातल्या दुर्बल घटकांत अस्वस्थता, असुरक्षितता, दहशत आहे. न्यायालयीन पातळीवर अशा प्रकारच्या खटल्यांत विशेष प्रगती नाही. कधी तपासातील त्रुटींमुळे, तर कधी पुराव्यांअभावी आरोपींना मुक्त केल्याचे न्यायालयीन आदेश येतात. अशा स्थितीत ही पीडित कुटुंबं समाजापासून तुटली आहेत. या कुटुंबांना भेटून, त्यांचं दु:ख, समस्या समजून घेण्यासाठी माजी सनदी अधिकारी हर्ष मंदेर यांनी २०१७ मध्ये आठ राज्यांतून एक यात्रा केली. ‘कारवाँ-ए-मुहब्बत’असं या मोहिमेचं नाव होतं आणि प्रेम, शांतता, सहिष्णुतेचा संदेश देण्यासाठी तिचं आयोजन केलेलं होतं. आसामातून या मोहिमेची सुरुवात केल्यानंतर झारखंड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, हरयाणा, राजस्थान येथील पीडित कुटुंबांच्या भेटी घेऊन, लोकशाहीवादी संस्था, नागरिकांशी संवाद केल्यानंतर या एकंदर मोहिमेचे अनुभव मंदेर यांनी रोजनिशी स्वरूपात लिहिले आहेत. यातून देशातील विद्वेषी हिंसेचं भयकारी रूप थेटपणे समोर येतं. मूळ इंग्रजीत केलेलं हे अनुभवकथन संकलित करुन त्याचा अनुवाद करण्याचं काम स्वातिजा मनोरमा व प्रमोद मुजुमदार यांनी केलं आहे आणि त्यातून ‘कारवाँ – ए- मुहब्बत अर्थात प्रेमाची वारी’ ही पुस्तिका साकारली आहे. सद्य:स्थितीत विद्वेषी राजकीय-सामाजिक वातावरणात ही पुस्तिका अतिशय महत्त्वाची आहे.

या वारीतील सहभागी सदस्यांनी प्रत्येक राज्यातील धार्मिक हिंसाचाराला बळी पडलेल्या कुटुंबांची भेट घेऊन, ही कुटुंब त्यांच्यावर कोसळलेल्या आपत्तीला कशाप्रकारे तोंड देत आहेत, या दु:खातून सावरण्यासाठी काय प्रयत्न करत आहेत, याबाबतच्या न्यायालयीन खटल्यांत आतापर्यंत काय प्रगती झाली, इ. बाबींची माहिती संकलित केली आहे. अशा कुटुंबांना सामाजिक पातळीवर धैर्याने, निर्भयपणे उभं राहता यावं यासाठी त्यांना कोणत्या प्रकारची मदत आवश्यक आहे याचाही आढावा यात घेतलेला आहे. अनेक गावांत वारी सदस्यांनी अमन सभाही घेतल्या. सौहार्द आणि एकजुटीची भावना लोकांमध्ये निर्माण व्हावी, हा यामागील उद्देश होता. तसंच या परिसरांत ठिकठिकाणी स्थायी स्वरूपाची अमन इन्सानियत नागरिक समिती स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा सगळा प्रवास व अनुभव अतिशय परिणामकारकपणे या लहानशा पुस्तिकेत वाचायला मिळतात

‘कारवाँ – ए- मुहब्बत अर्थात प्रेमाची वारी’    – हर्ष मंदेर,

अनुवाद – स्वातिजा मनोरमा, प्रमोद मुजुमदार

लोकवाङ्मय गृह

पृष्ठे – ६४, किंमत – ५० रुपये.

फ्रँकलिन समजून घेण्यासाठी

मानवी आयुष्य सुखावह करण्यासाठी आवश्यक असणारे शक्य तितके सारे काही एकाच आयुष्यात साध्य करणारे बेंजामिन फ्रँकलिन हे एक जगप्रसिद्ध असं प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व. अमेरिकेत सार्वजनिक क्षेत्रातील अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा, सार्वजनिक ग्रंथालये अशा यंत्रणांपासून अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. खरं तर बेंजामिन यांचा जन्म एका गरीब कुटुंबातला. दारिद्रय़ाशी झगडत, पडेल ती कामं करत ते जीवन कंठत होते. मात्र या परिस्थितीपासून जगातील एक प्रभावशाली व्यक्ती बनेपर्यंतचा त्यांचा प्रवास खडतर होता. अनेक नाटय़मय वळणं त्यात आली. मात्र त्यामुळेच बेंजामिन यांची जीवनदृष्टी अधिक प्रगल्भ होत गेली. वयाच्या बाराव्या वर्षांपासून मुद्रक असलेल्या भावाच्या व्यवसायात मदत करताना त्यांनी जो अनुभव कमावला, त्यामुळेच पुढे ते मुद्रण व्यवसायातही यशाची भरारी मारू शकले. ‘नाही रे’पासून ‘आहे रे’पर्यंतचा त्यांचा हा प्रवास समजून घेण्यासाठी ‘बेंजामिन फ्रँकलिन’ हे आत्मचरित्र उपयुक्त आहे. सई साने यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. ‘बेंजामिन फ्रँकलिन – एक आत्मचरित्र’

अनुवाद – सई साने मेहता पब्लिशिंग हाऊस,

पृष्ठे – १६२, किंमत – २४० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2019 4:09 am

Web Title: karwan e mohabbat buy benjamin franklin ek atmacharitra book review abn 97
Next Stories
1 बहरहाल : उबारा देणारी मुलाखत
2 टपालकी : दिल तो बच्चा है जी!
3 नाटकवाला : ‘एपिक गडबड’
Just Now!
X