22 November 2019

News Flash

साळा सुटली, पाटी फुटली

तुम्चं ‘एक साथ नमस्ते’ वाचून लई झ्याक वाटलं बगा.

|| कौस्तुभ केळकर- नगरवाला

 

जिगरी मैतर सदाभौ यांस,

दादासाहेब गावकरचा दंडवत!

काय चाललंया सदाभौ? कसं हाईसा? मजंत ना?

तुम्चं ‘एक साथ नमस्ते’ वाचून लई झ्याक वाटलं बगा. संतूर साबन वापरल्यावानी वाटाया लागलंय. ‘उमर का पताही नहीं चलता’सारकं आमीबी चाळीस र्वस मागं गेल्तो. जिंदगीचा शिनेमा वाईच जरा रिवाइन्ड केल्ता सदाभौ. कुलकर्नी मास्तरांच्या वर्गामंदी जाऊन पाढं म्हनून आलो की राव. आटवणीतलं सगळं दोस्त पुन्यांदा भ्येटलं. वाटलं, पुन्यांदा अक्सर गिरवाया हवं. बाराखडी याद करून जिंदगीचा पुन्यांदा श्रीगणेशा करायला पायजेल. ईस्वेस्वरानं परत्येक मनुक्शाला असा गोल्डन चानस द्यायला पायजेल सदाभौ.

साळंची किंमत सुट्टीबिगर समजत न्हाई. पयल्यांदा वाटायचं, सुट्टी पुरायची न्हाई. मे म्हैना कंदी यंड झाला, ध्यानामंदी यायचंच न्हाई. शून्य मिन्टामंदी दिस संपून जाई. रानात पिकल्याली करवंदं, बांधावरला आंबा, गाभूळलेल्या चिचा, देवळामागच्या ओढय़ामंदी धरल्यालं मासं, चावडीम्होरच्या मैदानात खेळल्यालं ईटीदांडू न्हाईतर आटय़ापाटय़ा, आमच्या वावरातल्या सूरपारंब्या, सुभान्याच्या रानातली ती सैराट हीर.. सदाफुलीवानी हमेशा पान्यानं फुगल्याली.. तिच्या कठडय़ावरनं वीस फूट खाली मारल्याला मुटका, ढगापत्तुर उडल्येलं पानी.. वलंचिंब झाल्यागत वाटून ऱ्हायलंय आज बी. सुभान्याचा आजा पट्टीचा पवनारा. गावच्या परत्येक पोराला हुडकून आनायचा. हिरीमंदी ढकलून देयाचा. तुमाला सांगतू सदाभौ, गावात पवायला येत न्हाई आसं येकबी पोरगं गावायचं न्हाई. ही समदी सुभान्याच्या आज्याची किरपा.

ह्य सुट्टीच्या टायमाला रानामंदी फारसं काम नसायचं. पोरं मोकाट. घडय़ाळाचं काम न्हाई. फकस्त क्यालेन्डर बगायचं. अंदार दाटला की घरला मागारी जायाचं. दावनीच्या जनावराला चारापानी दावायचा. धारा काडायच्या. भाकरतुकडा खाल्ला की मारोतीच्या देवळामंदी जायाचं. देवळाच्या ओसरीपाशी म्हातारदेव बसल्यालं आसायचं. ह्य़ो म्हातारा आमच्या आज्याचा दोस्त. म्हातारा लई ब्येश ष्टोरी सांगायचा. रामायन, म्हाभारत, पंचतंत्र आन् श्येवटाला भुताची ष्टोरी. भुताची ष्टोरी ऐकली की लई भ्या वाटायचं. अंदाराशी ईष्टॉपपार्टी खेळत आसंतसं घरला पोचायचू आन् आजीच्या गोदडीत शिरून झोपी जायचू. गावामंदी येकाबी घरामंदी टीवी नवता. नवता त्येच ब्येश व्हतं. तरीबी जून म्हैना सुरू झाला की जीवाची तगमग हुयाची. कंदी येकदा साळंला जातू असं हुयाचं. सुटीमंदी ममईला ग्येल्यालं दोस्त येकदम साळंतच भ्येटायचं. सुट्टीत मामाच्या गावाला ग्येल्याली पोरं परत गावाला यायाची. ममईची गंमतजम्मत ऐकताना लई भारी वाटायचं. कुनीतरी सरकारी अदिकारी गावात बदलून यायाचा. त्येंचं पोरगं आम्चं नवीन दोस्त हुनार आसायचं. लई दिसांनी मास्तरबी भ्येटनार आसायचं. नव्या पुस्तकांचा वास.. आन् खरं सांगू सदाभौ, साळंला कडकडून मिठी मारावी आसं वाटायाचं. साळंत शिरलं की मनाला अजीब थंडक वाटायची. दोन म्हैन्यानंतर जिगरी दोस्ताला भेटल्यावानी वाटायचं. साळंच्या भिंती बोलू लागायच्या. फळा-खडू ‘कसं हाईसा?’ आसं ईचारायचे. जिंदगीतलं येक साल संपून नवीन साल सुरू होयाचं.

कुलकर्नी मास्तरबी रिटायर्ड झालंत आताशा. साळाबी फुगलीया जनू. साळंत तसं धा-बारा मास्तर हाईत. पर भोईर मास्तरान्नी आजून सुट्टीला जित्ती ठेवलीया सदाभौ. मास्तर कुलकर्नी मास्तरांचा कित्ता गिरवून ऱ्हायल्येयत ना भौ. पूरा मे म्हैना मास्तर पोरान्ला पवायला शिकवीतो, पोरांबरूबर कबड्डी खेळतो, रातच्याला आकाशातलं चांदतारे वळखाया शिकवतू. येक दाव राहुरीला कृषी ईद्यापीटात येज्युकेशन टूर काढतू. ते बेणं मातीचं देणं ईसरलं न्हाई आजून. भोईर मास्तर हाये म्हनून पोरं सुट्टीच्या द्येवावानी वागत्यात. तुमच्या सिटीतल्या कंच्याबी सुट्टीतल्या शिबिरात ज्ये गावनार न्हाई त्ये भोईरमास्तर देत्यात. तेबी फिरी आफ चार्ज. धमालबी आन् बेशिक ज्ञानबी. तुम्च्या नोबिताचा आतापता म्हाईत न्हाई आम्च्या पोरान्ला. सदाभौ जी पोरं मोक्काट सुट्टी जगत्यात, तेन्लाच खरं साळंची ओढ वाटतीया. खरं की न्हाई?

येक डाव साळंचं रूटीन सुरू झालं की लौकीर उटावंच लागायचं सदाभौ. तसाबी गावाकडं दिस पहाटंच सुरू होतू. सुट्टीमंदीच वाईच जरा ल्येट उटल्यालं चालतं. रातच्याला आबासायब वारनिंग देयाचं- ‘टायमाला साळंत जावा.’ ते सौता पहाटंलाच रानात निघून जायाचं. आमच्या आयसायेब आमास्नी सा वाजता येक बार जागं करीत. आमचाबी ठरल्येला डायलाग.. ‘पाच मिल्टात उटतू.’ आमच्या आयसायेब पुन्यांदा कंदी हाक मारायच्या न्हाईत. पाच मिल्टानी आमी जागं झालो की घडय़ाळामंदी बगायचू. पाच मिल्टामंदी घडय़ाळ घंटाभर पुडं जायचं. आसंतसं आमी साळंत पोचुपत्तुर साळा भरल्याली आसायची.

कुलकर्नी मास्तर वर्गात घ्येताना त्येंचा फ्येमस डायलाग ऐकवायचं- ‘ह्य़ा बाबाला येळ सांबाळाया जमत न्हाई, ह्य़ो बायकू कसा सांबाळनार?’ समदी पोरं फिदीफिदी दात दाखवायची. लई वंगाळ वाटायचं. आम्च्या ल्येटची खबर थ्येट आबासायबांकडं पोचायची. आबासायेब गुस्सा झालं की आम्च्याशी येकदम रिश्पेक्टफुली बोलायचं. येकदम आदरार्ती बहुवचन.. ‘बरं का दादासायेब, तुमी साळा शिकता. सकाळच्याला लौकीर साळंत जायाचं म्हून आमी तुमाला कामाला जुपीत न्हाई. आता तुमास्नी घडय़ाळ समजंना. आम्चाबी नाइलाज हाई. उद्यापास्नं ईतवारपत्तुर अगुदर म्हशीच्या धारा काडायच्या आन् मंग साळंला जायाचं.’

सुप्रीम कोर्टानं आद्येश दिला की आम्ची गाडी लाईनीवर येयाची. ह्य़ो दनका सालभर पुरायचा. सालभर आमी सातच्या ठोक्याला साळंत हाजीर. कंदी कंदी मुद्दाम लौकीर उटून गोठा साफ करायचू. जनावराच्या धाराबी काढायचू. घडय़ाळाचं गनित जमाया लागलं की आबासायेब, आईसायेब खूश. तुमास्नी सांगतू सदाभौ, आमच्या आबासायेबानं जिंदगीत येक डाव सुदीक आमच्यावर कंदी हात उगारला न्हाई. आन् आमीबी आमच्या ल्येकीवर कंदी हात उगारला न्हाई. साळंत कुलकर्नी मास्तर आन् घरला आबासायेब आनि आईसायेब. जिंदगीची साळा आमी बिगीबिगी शिकत ग्येलो. आन् चांगल्या नंबरान्नी पासबी झालू.

तुमी तो राजाचा किस्सा सांगून ऱ्हायलाय ना भौ.. आक्षी तसंच आम्चं कुलकर्नी मास्तर व्हतं. पंचक्रोशीतलं परत्येक घर मास्तरांच्या रडारमंदी यायाचं. धा-बारा किलोमीटरचा ईलाका मास्तरांचा व्हता. मास्तरांचं सौताचं राज्यच जनू. या राज्यातल्या परत्येक पोरानं साळा शिकाया हवी म्हून ह्य़ो शिक्षकराजा वनवन हिंडायचा. परत्येक घरला जावून, बाबापुता करून मास्तरान्नी पोरं गोळा क्येली. पयल्या पयल्यांदा आईबाप तैयार व्हईनात. रानात मस कामं पडल्याली. गडीमानूस परवडायचं न्हाई. आशात पोरं साळंत जाया लागली तर परवडनार कसं? आमच्या गावाकडं धा वर्साची पोरबी तिचं धाकटं भावंडं सांभाळती. ती साळंत ग्येली तर तेन्ला कोन बघनार? मास्तर म्हनायचं, ‘पोरी, तुज्या धाकटय़ा भावासंगट साळंला ये. पर साळा सोडू नगंस.’

मास्तर पोरान्ला बाराखडी शिकवून ऱ्हायलेत. द्रुपदीचा धाकटा भाव मास्तरान्च्या कडंवर. द्रुपदी आशी साळा शिकली. आज तीबी तालुक्याच्या साळंत शिक्षिका हाई. तिचा नवराबी शिक्षक हाई. मायेराला आली की बापाच्या आदी मास्तरान्च्या पायावर डोकं टेकती ती. कित्यान्दा तरी मास्तर साळा सुटली की कुनाच्या तरी रानात कामाला जायाचं. ‘तुजं पोरगं जे काम करील ते म्या करतू, पर त्येला साळंत पाठीव.’ मास्तरान्ला असा किती पगार गावनार? निम्मा पगार गरिबाकडच्या पोरांसाटीच खर्च हुयाचा. मास्तरीण बाईनं काटकसरीनं घर सांभाळलं आन् मास्तरान्नी गाव. त्या पोरान्ला सौताच्या पैशानं मास्तर पुस्तकं घेवून देयाचं. हौले हौले लोकान्ला पटलं. समदा गाव सौताहून पोरान्ला साळंत धाडू लागला. पोरं आन् गाव साळा शिकू लागला. मोटं झाल्यावर कालेजच्या लायब्रीत आमी वेंकटेश माडगूळकरांचं ‘बनगरवाडी’ वाचलं. पयल्यांदा कुलकर्नी मास्तरांचीच याद आली. तवा साळा मंजी कुलकर्नी मास्तर. साळंत जायचंच. यखाद् दीस साळा चुकली तर घशाखाली घास उतरायचा न्हाई.

सदाभौ, आमच्या वर्गात जीवा नावाचा येक पोरगा हुता. वडय़ापल्याड डोंगरामागं ऱ्हायाचा. रोजच्याला चार-पाच किलूमीटर रस्ता तुडवत साळंत यायचा. लई मंजी लई हुश्शार. घरला दोन घास खायचं वांदं. मास्तर सौता तेच्यासाटी जास्तीची भाकर आनायचं. पावसामंदी वडय़ाला मस पानी यायाचं. जीवाची साळा चुकाया नगं म्हून मास्तर म्हैना-दोन म्हैने त्येला सौताच्या घरी ठेवून घेयाचे. आज त्योच जीवा क्लास वन सरकारी हापीसर हाये. दरसाल येक म्हैन्याचा पगार त्यो साळंला देतू. त्या पैशामदनं साळंत ब्येंच आलं. काम्प्युटर आलं. जीवा साळंला ईसरला न्हाई. जीवानं जोर लावला म्हून साळंला अनुदान सुरू जालं. तरीबी जीवाची गुरदक्षिना दरसाल भ्येटतीच.

सदाभौ, तुमी येकदम सही बोलून ऱ्हायलाय- ‘पोरान्ला वेदना वाचायला शिकवा.’ आमी म्हन्तू वेद, वेदना यासंगट पोरान्ला वेडं व्हायलाबी शिकवलं पायजेलं. येडय़ावानी अभ्यास क्येला, साळा शिकली तरच त्यो पोरगा आईबापाचं नाव रोशन करील. शिक्षनाचं येड लागल्यालं मास्तर आन् त्येंचे ध्येययेडे ईद्यार्थी. समदा देस शहाना हुनारच की भौ!

सदाभौ, तवा गावाकडं फकस्त झेडपीची साळा असायची. साळेचं नावबी ठरल्यालं- ‘जीवन शिक्षन मंदिर’! मऱ्हाटी मीडियमवाली. आता तिथंबी शेमी इंग्लिश मीडियम आलंया. तुमी म्हनून ऱ्हायलंय तशा दिल्ली बोर्डाच्या साळा तालुक्याच्या गावामंदीबी येवून ऱ्हायल्यात. साळा मस चकाचक हाईत. फाडफाड विंग्रजी बोलनारं मास्तर हाईत. ईश्कूलबशीतनं पोरं साळंला जात्यात. पब्लीक येडय़ावानी कर्ज काढून लाखभर फीया भरून ऱ्हायलंय. आईबाप झेडपीच्या साळंत शिक्षक आन् पोरगं खाजगी साळंत. पोरगं कंच्या साळंत जातू आईबापाचा प्रेश्टीज ईश्यू होवून ऱ्हायलाय सदाभौ!

आमी काय म्हन्तो सदाभौ, ‘पोरगं साळंत काय शिकतू?’ ह्य़े जवा प्रेश्टीज इश्यू हुईल तवाच समदी शिश्टीम सुदरून जाईल. ईस्वेस्वराला येकच रिक्वेश्ट हाये, साळा कंचीबी आसू द्येत- झेडपीवाली, नायतर प्रायवेट; येशयेशसी, न्हाई तर सीबीएशईवाली- शिक्षन समद्यास्नी परवडनेबल ऱ्हावू दे आन् परत्येक साळंत येक तरी कुलकर्नी मास्तरवानी येडा मास्तर आनि जीवावानी येडा ईद्यार्थी आसू देत.

न्हाईतर साळा सुटली, पाटी फुटली आसं हुयाचं. साळा सुटली तरी पाटी जिंदगीभर जपाया हवी. शिक्षन जिंदगीभर चालूच ऱ्हायला हवं. पोट भरन्यासाटी शिक्षन उपेगी पडलं की कुनाचीच पाटी कंदी कोरी ऱ्हानार न्हाई.

तुम्च्यावानी आम्चा जीवबी तिथंच.. साळंत अडकल्याला हाई आजून, सदाभौ.

टण्टण्ण टण्णटण्ण!

तुम्चा जिवाभावाचा दोस्त,

दादासाहेब गावकर

kaukenagarwala@gmail.com

First Published on June 16, 2019 12:21 am

Web Title: kaustubh kelkar nagarwala 2
Just Now!
X