18 October 2019

News Flash

माय-मातीच्या स्मरणाची चित्रलिपी

‘आई’ आणि त्याभोवतीचे अनुभवविश्व हे जगभरातील कलाभिव्यक्तीचे आस्थाकेंद्र राहिलेले आहे.

|| केदार काळवणे

‘आई’ आणि त्याभोवतीचे अनुभवविश्व हे जगभरातील कलाभिव्यक्तीचे आस्थाकेंद्र राहिलेले आहे. मराठीसह जगातील सर्वच भाषांतील साहित्यही त्याला अपवाद ठरलेले नाही. त्यातून ‘आई’ या संकल्पनेचे वात्सल्यसिंधूस्वरूपी मिथकच आकाराला आलेले आहे. असे असले तरी, प्रत्येकाची आई ही प्रत्येकासाठी वेगळी आहे. ती शब्दांत कुणालाच पुरेशी गवसलेली नाही. परंतु आईचे मातृप्रेम श्रेष्ठ असल्याची अनुभूती सार्वत्रिक आहे. याच अनुभूतीची ‘स्व’ जाणीव महेंद्र कदम यांनी ‘तू जाऊन तीन तपं झाली’ या बत्तीस पृष्ठांच्या दीर्घ कवितेतून अभिव्यक्त केलेली आहे. मराठी कवितेत प्रथमच आईसंबंधीचा आशय या संग्रहाच्या निमित्ताने दीर्घ कवितेच्या आकृतिबंधातून प्रकटतो आहे.

महेंद्र कदम हे मराठी साहित्यात समीक्षक, भाषा अभ्यासक आणि कथा-कादंबरीकार म्हणून सर्वपरिचित आहेत. या दीर्घ कवितेच्या माध्यमातून पहिल्यांदाच त्यांची कविता वाचकांसमोर आली आहे. बालपणीच आई गेल्याने आलेल्या पोरकेपणाची जाणीव आणि आईविना तीन तपांपासून काढलेल्या आयुष्याची खोलवर जखम या कवितेतून उजागर होते. आई नसण्याने आकाराला आलेले भावविश्व हे जरी या कवितेचे मध्यवर्ती सूत्र असले, तरी ही कविता ग्राम अवकाशाला सामावून घेत शेतीच्या पडझडीलाही संदर्भाकित करते.

माती आणि मातेच्या सांस्कृतिक संचिताच्या संस्कारशीलतेचा प्रभाव या कवितेच्या बीजस्थानी आहे. गावभूमीच्या बदलत्या चित्रलिपीचा काळकोलाज मांडत आईशी संवाद साधणारी ही कविता माय आणि मातीच्या वेदनेची गोष्ट सांगू पाहते. ही गोष्ट आईशिवायच्या दु:खाची जशी आहे, तशीच ती गावगाडय़ातील भारतीय स्त्रीचे प्रतिनिधित्व करणारीही आहे. आई आणि तिच्याभोवतीच्या पर्यावरणाची एकजीवी स्मरणानुभूती या कवितेच्या अंतरंगातून उत्कटतेने प्रकटते.

कृषिव्यवस्थेतील भारतीय स्त्रीचे जीवन हे परंपरानिष्ठ आणि बारोमास दारिद्रय़ाला बांधल्याचे वास्तव सार्वत्रिक आहे. या कवितेत आलेली कवीची आई कृषिव्यवस्थेतील भारतीय स्त्रीच्या याच सनातन चरित्राला उजागर करणारी आहे. तिचे दु:खभोग, परवड नि संघर्षांची कवीने केलेली अभिव्यक्ती गावखेडय़ातील समस्त स्त्रियांच्या कहाणीला मुखरित करणारी आहे. अनेक घटना-प्रसंगांच्या आविष्करणातून कवीने आपल्या आईचे चरित्र साकारलेले आहे. ‘तुळशीवाणी सत्त्वशील’ असणाऱ्या या आईच्या आजारपणात उपचारासाठी पैसे नसणे, पंधराव्या वर्षी लग्न आणि तिसाव्या वर्षी मरण येणे ही काळीज पिळवटून टाकणारी घटना आहे.

बालपणीच आई पोरके करून गेल्याने आयुष्याची झालेली फरपट आणि जगण्याला आलेल्या निराधारतेची अनुभूती या कवितेतून साक्षात होते. या आईचे ग्राम अवकाशातून तयार झालेले विशिष्ट असे मूल्यशास्त्र आहे. या मूल्यविचाराचाही संस्कारठसा कवीच्या व्यक्तिमत्त्वावर असल्याचे या कवितेतून दिसते. आईशी जोडलेले वडिलांचे भावविश्व आणि आई असताना व नसतानाचे वडिलांचे स्थितीचित्र, खेडय़ातील समूहभावाच्या मूलधर्मातून आकारलेला प्रेम-जिव्हाळा, तह-कलह आणि स्वार्थ-संघर्ष यांनी भारलेली कुटुंबकथा, तीन तपांपूर्वीच्या आणि आजच्या गावाचे बदलते चरित्र अशा अनेकविध बाबींना ही कविता मुखरित करते.

मुक्तशैलीत असलेली ही कविता आंतरिक लयीने बांधलेली आहे. सांगण्याच्या तीव्र ऊर्मीतून व साध्या-सुगम भाषेतून या कवितेने आपले रूप धारण केलेले आहे. बोली प्रभावितता आणि लोकभाषा संस्कारातून या कवितेची भाषा घडली आहे. वाक्यबंधाच्या भाषिक प्रयोगशीलतेतून या कवितेचा आकृतिबंध साकारलेला आहे. ‘मातीची कूस उजवत’, ‘कुंकवाचा दगड’ आदी प्रतिमाबंधांनी या कवितेच्या भाषेला अनेकार्थक्षम बनवलेले आहे. ‘निवळसंख’, ‘झटाझोंबा’ आदी विशिष्ट भू-सांस्कृतिक शब्दवापराने या कवितेला वेगळे परिमाण प्राप्त झालेले आहे. संवादात्मकता, दृश्यात्मकता आणि वक्तृत्वशीलता हा या कवितेचा भाषाशैलीस्वभाव आहे.

या कवितेतील आई आणि कृषिव्यवस्था यांचे नाते एकजीवी स्वरूपाचे आहे. त्यांचा सुटा सुटा विचार करता येत नाही, इतके ते एकमेकांत मिसळून गेलेले आहे. त्यामुळेच आईसोबत तीन तपांपासूनच्या कृषीव्यवस्थेच्या पडझडीचे संदर्भ आणि कृषिसंस्कृती संस्काराने भारलेले तिच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन या कवितेतून घडते. मातीत जन्म घेऊन मातीमाय होत तिच्यामध्येच सामावून जाणे या प्रकारचा जैवसंबंध या कवितेतील आई आणि कृषिव्यवस्थेत आहे. म्हणून ही कविता कृषिव्यवस्थेत विरघळून गेलेल्या आईची चित्रलिपी आहे.

  • ‘तू जाऊन तीन तपं झाली’ – महेंद्र कदम, रेखाटन प्रकाशन,
  • पृष्ठे – ३२, मूल्य – ५० रुपये

kedar.kalwane.28@gmail.com

First Published on May 12, 2019 3:05 am

Web Title: kedar kalwane