स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नव्वदीनिमित्त त्यांच्या नऊ दशकांच्या सुरेल कारकीर्दीचा आढावा घेणारा ‘लता’ हा ग्रंथ ‘जीवनगाणी- सांजशकुन’ प्रकाशनतर्फे प्रसिद्ध होत आहे. या ग्रंथातील खय्याम यांचा लेख.

ते साधारणपणे ४६-४७ साल असावे. मी त्या काळात स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी धडपडत होतो. अनेक संगीतकार आणि वादकांशी ओळख करून घेत होतो. अशाच भेटीगाठींतून संगीतकार गुलाम हैदर यांच्याशी चांगले स्नेहसंबंध जुळले होते. काही वेळा काम नसे तेव्हा मी त्यांच्या रेकॉìडगच्या कामात छोटी-मोठी मदत करावयास जात असे.

एकदा मी गुलाम हैदर यांच्याकडे गेलो असता, ते एका उदयोन्मुख गायिकेला घेऊन गाणं रेकॉर्ड करत असल्याचे कळले. चौकशी केल्यावर कळले की त्या गायिकेचे नाव लता मंगेशकर आहे. मी तोपर्यंत या गायिकेला पाहिलेही नव्हते आणि तिचे गाणेही कधी ऐकले नव्हते. रेकॉìडग सुरू होण्याच्या वेळी मी लताजींना पहिल्यांदा पाहिले. शिडशिडीत बांध्याची नाजूक मुलगी. तिला पाहून ही मास्टर गुलाम हैदरजींचे गाणे कसे गाणार, असा प्रश्न मला पडला. पण मास्टरजींनी तिची निवड केलीय म्हणजे या मुलीत काहीतरी विशेष गुण असणार, अशी खूणगाठ मनात पक्की झाली.

गाण्याचे रेकॉर्डिंग सुरू झाले. लताजी माइकवर तयारीने आणि सहजतेने गीत गायल्या. त्यांच्या गायनात आत्मविश्वास होता. त्यांचा आवाजही पातळ आणि प्रस्थापित गायिकांपेक्षा वेगळा होता. त्यांच्या गायनाने मी चांगलाच प्रभावित झालो. ते गीत होतं, ‘पिया मिलन को आ’ आणि चित्रपट होता ‘मजबूर’ (१९४८).

गाण्याचे रेकॉर्डिंग झाल्यानंतर मी मास्टरजींबरोबर त्यांच्या घरी गेलो तेव्हा ते म्हणाले, ‘‘ही (लता) एक नवीन गायिका आहे. प्रसिद्ध गायक दीनानाथ मंगेशकर यांची मुलगी. ही अशीच मनापासून गात राहिली तर एक दिवस हिंदुस्थानातील सर्वश्रेष्ठ गायिका बनेल.’’ मास्टरजींची भविष्यवाणी किती सार्थ ठरली हे आपण सर्वानी पाहिलेच आहे.

या दरम्यान, खेमचंद प्रकाश यांनी लताजींकडून ‘आयेगा आनेवाला’ हे गीत गाऊन घेतलं. ‘महल’ चित्रपटात हे गाणं कमाल अमरोही यांनी इतकं सुंदररीत्या वापरलं की, अवघ्या हिंदुस्थानावर लताजींच्या गायकीने गारूड केलं. त्यानंतर ‘एक अनार और सौ बिमार’ अशी परिस्थिती निर्माण झाली. प्रत्येक संगीतकाराला वाटू लागले की लताजींनी त्यांचे एक तरी गाणे गायले पाहिजे. लताजींनीदेखील त्यांना शक्य होतील तेवढय़ा संगीतकारांची गाणी गायली. हळूहळू त्यांचे सर्वत्र नाव झाले.

लताजींसोबत काम करण्याची माझीही इच्छा होती, पण तशी संधी मिळत नव्हती. मी त्यावेळी स्वत:ला संगीतकार म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्याकडे तेव्हा फारसे काम नव्हते. मी योग्य संधीच्या शोधात होतो. लवकरच ती संधी चालून आली. त्याकाळी माझे नर्गिसजींच्या मातोश्री जद्दनबाई यांच्याकडे जाणे-येणे होते. त्या काळात जद्दनबाई यांचे गायिका म्हणून मोठे नाव होते. त्या आपल्या मुलीला, नर्गिसला घेऊन ‘प्यार की बातें’ (१९५१) हा चित्रपट करीत होत्या. त्यांच्या कंपनीचे बहुतेक चित्रपट संगीतकार बुलो सी. रानी करत असत. ‘प्यार की बातें’ या चित्रपटासाठीदेखील त्यांनी काही गाणी रेकॉर्ड केली होती, पण त्यानंतर ते आजारी पडल्यामुळे संगीताचे काम अडले होते.

त्याच सुमारास सहज म्हणून जद्दनबाईंकडे गेलो असताना त्यांनी मला त्या चित्रपटाच्या संगीताचे राहिलेले काम पूर्ण करण्याची विनंती केली. मी त्यास तात्काळ होकार दिला. या चित्रपटाच्या गाण्यांच्या रेकॉìडगच्या वेळी माझा आणि लताजींचा एकत्र काम करण्याचा सुवर्णयोग जुळून आला. या चित्रपटासाठी ‘अब कहाँ जाए के अपना मेहरबाँ कोई नही’ आणि ‘हुए है मजबूर हो के अपनों से दूर’ अशी दोन गाणी लताजी माझ्या संगीत दिग्दर्शनाखाली गायल्या. त्यांच्या आवाजात वेगळीच जादू आहे, याची जाणीव ही गाणी रेकॉर्ड करताना मला झाली. त्यांच्या जादूई स्वरांचा स्पर्श होताच गाण्यांना एक वेगळीच उंची लाभते ही वस्तुस्थिती आहे.

आज लताजी त्यांच्या कार्यक्षेत्रात सर्वोच्च पदावर आहेत, तरीही त्यांचे वागणे आजही शालीन आणि विनम्र आहे. एवढय़ा मोठय़ा गायिका असूनही त्यांचे वागणे साधे आहे. प्रत्येक गाणे शिकताना त्या लक्षपूर्वक शिकतात, प्रत्येक जागा टिपून ठेवतात व गाताना त्याचा उत्तमरीत्या वापर करतात. माझ्याकडे गायकांनी ‘मी जसे गाणे शिकविले आहे तसेच त्यांनी गावे’, असा माझा आग्रह असतो. त्यात बदल केलेला मला आवडत नाही, कारण मी गाण्याची चाल रचताना त्याचा सर्वागीण विचार केलेला असतो. त्यामुळे ऐनवेळी त्यात बदल केला तर गाण्याचे स्वरूप बदलण्याचा धोका असतो. लताजी एवढय़ा मोठय़ा गायिका असूनही त्यांनी कधी माझ्या कामात ढवळाढवळ केली नाही. मी शिकविल्याबरहुकूम त्या हुबेहूब गात. त्यांच्याबरोबर काम करणे आनंददायी असे.

‘प्यार की बातें’नंतर लताजींनी माझ्या संगीत दिग्दर्शनाखाली ३१ चित्रपटांमध्ये ८१ गाणी गायली. इतर संगीतकारांच्या तुलनेत हे काम तसं कमी आहे. पण जी गाणी त्यांनी माझ्याकडे गायली ती सर्व गाजली आणि आजही लोकप्रिय आहेत, ही गोष्ट मला अतिशय समाधान देणारी आहे. त्यांनी माझ्याकडे अनेक वैविध्यपूर्ण गाणी गायली. त्यांच्यासारखी तयारीची गायिका लाभल्यामुळे मीदेखील वेगवेगळे प्रयोग करण्याचे धाडस दाखवू शकलो.

‘आखरी खत’मधील ‘बहारो मेरा जीवन भी सँवारो’ हे गाणं खूप गाजलं, पण त्याच चित्रपटातील ‘मेरा चंदा मेरे नन्हे तुझे’ ही त्यांनी गायिलेली लोरी ऐका. लताजींनी ती हळुवार आवाजात आईच्या ममतेने गाऊन त्या गाण्याचे सोने केले आहे.

शंकर हुसन (१९७५) मध्येही लताजींनी कमाल केली आहे. ‘अपने आप रातों में’ आणि ‘आप यूं फासलों से’ या दोन्ही गाण्यांत संगीतापेक्षा गायकीला प्राधान्य आहे. गाण्यात वाद्यांचा वापर फार कमी आहे. लताजींनी आपल्या गायकीने या दोन्ही गीतांना अप्रतिम न्याय दिलेला आहे.

मध्यंतरी टीव्हीवर कुठल्यातरी कार्यक्रमात लताजींची मुलाखत चालू होती. प्रश्नकर्त्यांने त्यांना विचारले की, ‘तुम्ही अनेक गाणी गायली, पण त्यातून तुम्हाला सर्वात जास्त आवडलेले गीत कोणते?’ तेव्हा लताजी म्हणाल्या, ‘रजिया सुलतान’मधील ‘ऐ-दिल-ए-नादान’. त्यांचे उत्तर ऐकून मला खूप आनंद झाला. त्यांच्या हजारो गाण्यांतून त्यांनी माझ्या गाण्याची निवड केली. माझ्या जीवनाचे सार्थक झाले.

‘उमराव जान’च्या वेळी प्रथम मी लताजींचाच विचार केला होता. पण ‘पाकिजा’ आणि ‘उमराव जान’ या चित्रपटांची कथावस्तू साधारणत: एकसारखीच असल्याने ‘उमराव जान’च्या संगीताची ‘पाकिजा’च्या संगीताशी तुलना केली जाण्याचा धोका वाटला. ‘पाकिजा’चे संगीत अजरामर आहे. लताजींनी त्यात जे काही गायलंय त्याला तोड नाही. तसे संगीत पुन्हा निर्माण करता येणार नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून मी लताजींऐवजी आशाजींच्या आवाजाचा वापर केला. पण असे असूनही लताजी माझ्यावर नाराज झाल्या नाहीत उलट ‘उमराव जान’ला नॅशनल अ‍ॅवार्ड जाहीर झाल्यावर त्यांनी माझे अभिनंदन केले. यात त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसतो.

आजही आमचे संबंध सलोख्याचे आहेत. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी त्या न विसरता मला फोन करून माझे अभीष्टचिंतन करतात. त्यांच्यासारखी महान गायिका आपल्या देशात जन्मली. आम्हाला त्यांच्यासोबत काम करायला मिळालं आणि आपणांस ते स्वर्गीय संगीत ऐकायला मिळालं हेच तुमचं आणि आमचं अहोभाग्य आहे.

शब्दांकन- विश्वास नेरुरकर