‘यंदाच्या पावसाळ्यात पिसारा फुलवून नाचताना काढलेला हा माझा सेल्फी.. चाहत्यांना धन्यवाद’! आटपाट जंगलातल्या एका तरुण मोराने स्वत:चा फोटो फेसबुकवर टाकला आणि त्याला ताबडतोब प्रचंड प्रतिसाद सुरू lok02झाला. सर्व वयोगटांतील लांडोर कौतुकाचा वर्षांव करू लागल्या.. सुंदर! अप्रतिम! क्लास! आहाहा! असे सर्व उद्गार टाईप झाले. ज्येष्ठ मोरांनी आशीर्वाद दिले. काही मोरांनी ‘असं नृत्य कुठलाही मोर करतोच!’ अशी हेटाळणी केली. बगळ्यांनी कॉमेंट लिहिली- ‘पांढराशुभ्र रंग हा विविध रंगांपेक्षाही उठून दिसतो. मोराच्या मानाने हा फोटो बरा आहे.’ यावर काही धूर्त लांडगे, कोल्हे यांनी नुसत्याच हसण्याच्या स्माईली टाकल्या.. ज्याने जो हवा तो अर्थ घ्यावा.
एकूणच साऱ्या जंगलाला फेसबुकचं महत्त्व समजलं होतं आणि त्याची सवयसुद्धा लागली होती. काही माजी जंगलराजे सिंह, हत्ती, काही सुस्त, म्हातारे अजगर असे अपवाद वगळता बहुतेक प्राणी, पक्षी आणि कीटकसुद्धा रोजच्या रोज आपले विचार, सुविचार, रोजचे जेवण, पिल्लांच्या गमतीजमती, विशेष घटना, निषेध, उल्हास, लग्नाच्या बातम्या, शिकाऱ्यांनी केलेली निर्घृण हत्या असे सर्व विषय फेसबुकवरून उधळत होते.
चित्त्यांनी केलेल्या चित्तथरारक पाठलागाच्या फोटोला दाद मिळत होती. पण त्याहूनही मोठी दाद मिळत होती ती राजहंसाच्या.. त्यातही राजहंसिणीच्या सुंदर फोटोला. सशाच्या रोजच्या फोटोला सगळे प्राणी- पक्षी ‘सो क्युट!’ म्हणायचे. दुसऱ्या दिवशी ससा तसाच फोटो टाकायचा. सगळे पुन्हा म्हणत : ‘सो क्युट..!’ जंगलाचा राजा सिंह आणि वाघोबा मात्र आपल्याच मस्तीत होते. ‘आम्ही डरकाळी फोडली की सारं जंगलभर ती घुमते. आमचे फोटोबिटो आम्ही टाकणार नाही,’ असं म्हणून ते आपल्या गुहेत कुटुंबासह सुखानं नांदत होते.
आटपाट जंगलाच्या एका कोपऱ्यात काही मांजरे आणि बोके यांना मात्र आपण एका कोपऱ्यात अडकल्याचा निषेध करण्यासाठी फेसबुक हे सर्वोत्तम माध्यम वाटत होतं. त्यातही गलेलठ्ठ असलेला बाबूबोका फारच तंत्रप्रवीण होता. त्याचा प्रत्येक विचार जगभरातील बोके आणि मांजरे कसा वाचतील याचा मार्ग त्याला सापडला होता.
बैलोबाने पोळ्याच्या दिवशी स्वत:चा सजलेला फोटो टाकल्याचे कौतुक झाले.. गाय-वासरू जोडीनं तर वसुबारसेच्या दिवशी फेसबुकवर हजारो नमस्कार, गायीवरच्या कविता मिळवल्या.. पोपटाची ऑडिओ क्लीप बरीच गाजली.. घोडे, गेंडे, बगळे, बदक सगळ्यांच्या फेसबुक-मित्रांची संख्या वाढत चालली होती. ‘मी यमाचे वाहन’ या रेडय़ाच्या लेखाचेसुद्धा बरेच वाचक कौतुक करत होते. मात्र, बाबूबोका, काही लांडगे आणि तरस हे मात्र अस्वस्थ होते. एकमेकांचे कौतुक करून करून थकत होते; पण जंगलच्या जनतेच्या मनात आणि फेसबुकवर मात्र त्यांचा ठसा उमटत नव्हता.
इतर बोक्यांपेक्षा लठ्ठ आणि उंच, भक्कम असलेला बाबूबोका एका दगडावर उभा होता. त्याने जबडा उघडला आणि एक पुरुषी मांजरी म्याव ऐकवलं. दुरून बघणारा लांडगा बाबूकडे एकटक पाहत होता. त्याचे डोळे एकदम चमकले. बाबूकडे येऊन लांडगा म्हणाला, ‘तू नक्की बोका आहेस ना रे?’ बाबू हसला. तेवढय़ात कोल्हा म्हणाला, ‘वाघच वाटलास लांबून! शप्पथ!! अरे, खरंच ज्यांनी वाघाला जवळून पाहिलं नसेल त्यांना तर नक्कीच तू एका वेगळ्या जातीचा ‘वाघ’ वाटशील!!’
काही क्षणातच बाबूबोका, लांडगा, कोल्हा, एक धूर्त बगळा, बाबूचे दोन मित्र बोके, काही अस्वस्थ तरस, साप, सरडे यांनी एक मीटिंग घेतली. कोल्हा तिच्या अध्यक्षस्थानी होता आणि लांडगा प्रमुख पाहुणा. सगळेजण एकटक बाबूबोक्याकडे बघत होते. पुढील सहा महिन्यांसाठी एक कारस्थान शिजलं. आता बाबूबोक्याच्या डोळ्यांत एक वेगळंच तेज दिसत होतं. त्याच्या डोक्यात दोन वाक्यं घुमत होती.. ‘तू वाघ आहेस.. आता म्यांव करायचं नाहीस.’
बाबूबोक्याच्या मित्रांनी मांजरवस्तीत जाऊन सांगितलं की, ‘बाबूचा आवाज कायमचा गेलाय. रानटी उंदीर खाल्ला त्याने.’ मांजरांनी हळहळ व्यक्त केली. एकीकडे समस्त लांडग्यांनी, कोल्हे-बगळ्यांनी फेसबुकवरून बातमी जाहीर केली- ‘आफ्रिकेच्या मसाईमारा जंगलातून एक अजब जातीचा वाघ आपल्या जंगलात आला आहे. त्याची डरकाळी अत्यंत वेगळी आणि दमदार आहे. काहीच दिवसांत तो आपल्यासमोर येणार आहे..’ त्याबरोबर नुसते वाघाच्या पावलांचे ठसे दाखवणारा फोटोसुद्धा आला. फेसबुकवर धुमाकूळ सुरू झाला.. wow, अफाट, Amazing! कम्माल!
प्राणी-पक्षी-कीटकांमध्ये कुजबूज वाढत चालली होती. बाबू जातीचा वाघ कसा दिसेल? कसा डरकाळी फोडेल? याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. एका मोठय़ा वर्तमानपत्रामध्ये ‘फेसबुकवर बाबूला प्रचंड दाद’ अशी बातमीसुद्धा आली. आणि न्यूज चॅनेलवरसुद्धा ‘खरंच, काय असेल या बाबूचं रूप?’ या विषयावर परिसंवाद रंगला.
बाबूबोका मात्र मौनव्रतामध्ये या सगळ्याचा आनंद लुटत होता. सगळ्या प्राण्यांपुढे ‘प्रकट’ होण्याचा दिवस जसजसा जवळ येत होता तसा बाबूचा आनंदही वाढत होता. आणि समस्त प्राण्यांनी आपलं ‘म्यांव’ ऐकलं तर किती गोंधळ होईल, या कल्पनेनं तो जरासा घाबरलेलाही होता. फेसबुकवर मात्र ‘बाबू’ या पेजला प्रचंड दाद मिळत होती. रसिकांच्या उडय़ा पडत होत्या.
‘तो’ दिवस १५ दिवसांवर येऊन ठेपला. ‘बाबू’ जातीचा हा वाघ ज्या ठिकाणी सगळ्यांना दर्शन देणारा होता, तिथे सगळे न्यूज चॅनेल्स आधीच येऊन प्रेक्षकांच्या मुलाखती घेत होते. मुख्य संयोजक कोल्होबा आणि लांडगा यांनी जंगलभर मोठे फलक लावले होते. ‘त्या’ दिवशी बाबूबोका आल्यानंतर नक्की काय काय होईल याची आठवडाभर तालीम झाली. ‘वाघ आणि सिंह यांना बाबूचं कौतुक नसल्याने त्यांना निमंत्रण नाही!’ अशी बातमी कोल्ह्य़ाने परस्पर पेपरला पाठवली. ‘वाघ आणि सिंह म्हणजे आपल्या अक्राळविक्राळ डरकाळ्यांनी आपल्याला घाबरवणारे दोघे ‘विकृत’ प्राणी नकोत!’ अशी बातमी लांडग्यांनी फेसबुकवर टाकली.
अखेर तो दिवस उजाडला. बाबूबोका त्याच्या दोन मित्रांसह एका उंच खडकावर अवतरला. कोल्ह्य़ाची कॉमेंट्री चालू झाली. ‘तो पाहा, आफ्रिकेचा ‘बाबू’ वाघ. त्याचा डौल पाहा. डोळ्यांतली जरब पाहा. आणि आता सगळ्यांनी चित्कार करा, ओरडा.. कारण आपण आता ती सुप्रसिद्ध डरकाळी ऐकणार आहोत..’ सगळे पक्षी, प्राणी ओरडू लागले. चित्कार करू लागले. लांडग्याने हात वर केला आणि बाबूने जबडा उघडला आणि काहीही आवाज न काढता पुन्हा मिटला. कोल्हा किंचाळला, ‘वाऽऽऽ! ही तर कमाल आहे. यंदापासून जंगल पुरस्कार सुरू होत आहेत आणि बाबू आहे ‘‘्रल्लॠ ऋ डरकाळी!’ पत्रकार, न्यूज चॅनेल्स यांनी आपल्याला सगळ्यांच्या आवाजात जो एक वेगळा आवाज आला तीच ‘ती’ डरकाळी म्हणून जाहीर केलं. काहींच्या भुवया उंचावल्या. पण गर्दीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. ‘बाबू.. बाबू..  ‘king of डरकाळी!’ या घोषणांमध्ये स्वत:च्या मनातल्या शंकासुद्धा त्यांना ऐकू आल्या नाहीत.
‘king of डरकाळी’ या पेजला २५००  likes आणि ८०० कॉमेंट्स आल्या. त्याच्या बातम्या छापून आल्या. बातम्या छापून आल्याची बातमी न्यूज चॅनेलवर आली. मुलाखती.. पुरस्कार.. बाबू खूश झाला. त्याला आपण ‘वाघ’ आहोत हे पटलं.
आता आटपाट जंगलात ‘बाबूबोका’ जे ओरडतो त्यालाच तिथली पिल्लं ‘डरकाळी’ समजतात. जंगलाच्या कोपऱ्यात राहणाऱ्या वाघ-सिंहाची डरकाळी ऐकू आलीच तर सगळे प्राणी फेसबुकवर ‘बाबू’चं पेज बघतात आणि स्वत:ला समजावतात, की इतके  likes इतक्या comments.. म्हणजे ‘बाबू is the only kking of डरकाळी.’
No doubt !!  

सलील कुलकर्णी      

shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा