News Flash

अनवट रागांचा बादशहा

अनेक वर्षे आईकडे माझे शिक्षण झाल्यानंतर, जयपूर-अत्रौली घराण्याची मूलभूत तालीम गळ्यावर चढल्यानंतर, मी संगीताच्या साधनेकरिता पूर्णवेळ

| August 16, 2015 01:38 am

अनवट रागांचे बादशहा पं. रत्नाकर पै यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे विद्यार्थी दरवर्षी ‘अनवट राग महोत्सव’ साजरा करतात. या वर्षी
२२ ऑगस्ट रोजी मुंबईत दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये, तर २३, ३० ऑगस्ट आणि ६ सप्टेंबर रोजी कर्नाटक संघात हा महोत्सव साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने..

अनेक वर्षे आईकडे माझे शिक्षण झाल्यानंतर, जयपूर-अत्रौली घराण्याची मूलभूत तालीम गळ्यावर चढल्यानंतर, मी संगीताच्या साधनेकरिता पूर्णवेळ समर्पित केल्यानंतरही जवळजवळ सात-आठ वर्षांनी या घराण्याच्या ‘प्रगत’ तालमीकरिता आई स्वत:च मला आमच्या घराण्याचे अध्वर्यु श्रद्धेय पं. रत्नाकर पै यांच्याकडे घेऊन गेली. तोपर्यंत मी पै सरांना ओळखत होते, घाबरत होते; एवढेच नव्हे तर दरवर्षी ते त्यांच्या गुरूंच्या (स्व. पं. मोहनराव पालेकर आणि उ. गुलुभाई जसदनवाला यांच्या) पुण्यतिथीचा कार्यक्रम करीत असत, त्यात त्यांनी मला एकदा गायलाही बोलावले होते. (माझ्या आठवणीनुसार मी राग ‘बिहाग’ आणि ‘गौडमल्हार’ गायले होते.) आम्ही शिष्यगण त्यांच्या अपरोक्ष त्यांचा उल्लेख ‘पै गुरुजी’ असा करायचो. पण त्यांच्याशी बोलताना मात्र ‘अहो सर!’ असे संबोधायचो!
उंच, शिडशिडीत अंगकाठी, तेजस्वी, गोरापान वर्ण, ओठावर तलवारकट मिशी आणि चेहऱ्यावर विद्याव्यासंगाचे तेज! सरांना मी बऱ्याचदा झब्ब्या-पायजम्यातच पाहिलंय. पण शर्ट-पॅंट किंवा पॅंटवर टी-शर्ट घातलेले सरांचे रूपडेही परिचयाचे होते. अशा पेहेरावात ते मुळीच ‘जयपूर घराण्याचे व्यासंगी गायक’ भासत नसत, तर ‘फोर्ब्स अँड फोर्ब्स’मधले रुबाबदार ऑफिसरच वाटायचे. अपवाद फक्त तोंडातल्या पानाचा! कोणत्याही कोकणी माणसासारखेच आमचे सर फटकळ. पण त्या फटकळपणामागे त्यांचे निव्र्याज मन असे. अगदी कोकणी फणस. बाहेरून काटेरी, पण आत रसाळ, गोड गरे! त्यांना एखादी गोष्ट आवडली नाही तर समोरच्याचे मन मोडू नये म्हणून त्यांनी कधीही ती आवडल्याचे सांगितले नाही. असला दिखाऊ शिष्टाचार त्यांना कधीच जमला नाही. आणि समोरच्याचे मन राखून त्यांना कधी स्वत:चा काही स्वार्थ साधायचा नसेच. त्यामुळे या शिष्टाचाराची त्यांना गरजही नव्हती. माझ्या ‘बंदिश रचनाकारी’च्या मुशाफिरीत मी जयपूरच्या काही अनवट रागांत बंदिशी बांधल्या. त्यानंतर त्या सरांना गाऊन दाखवल्या. सरांकडून मला कधीच ‘फर्स्ट क्लास’ची शाबासकी मिळाली नाही. पण त्यांनी ‘‘हं, ठीक आहे. राग मोडलेला नाहीये,’ असे प्रमाणपत्र दिले की मला ती बंदिश मैफलीत मांडायचे बळ येई. सरांनी मला सावनीनट रागामधली ‘सब नीस जागी’ ही बंदिश विलंबित तीनतालात शिकवली होती. पण मी एकदा गानतपस्विनी मोगूबाईंनी हीच बंदिश पंचमसवारीत गायलेली ऐकली आणि मग मी माझी तीनतालातली (१६ मात्रांतली) बंदिश १५ मात्रांच्या पंचमसवारीत बसवून सरांच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात त्यांच्यासमोर गायले. यासाठी मला बराच खटाटोप करावा लागला होता. कारण पंचमसवारी हा काही ‘आम’ ताल नव्हे! या अवघड तालात मला गाता आले या गोष्टीचा मला इतका कैफ चढला, की सर काय म्हणाले ते मला आठवतदेखील नाही. पण त्यांनी विरोध केला नाही, हेच माझ्यासाठी पुरेसे होते. सरांकडून मला ‘फर्स्ट क्लास गायलीस!’ अशी शाबासकी त्यांच्या पंच्याहत्तरीच्या कार्यक्रमात मी गायले तेव्हा मिळाली. तेव्हा मी इतकी धन्य झाले होते ना, की विचारता सोय नाही.
सरांनी कधीच पूर्णवेळ संगीतोपासना केली नाही. ‘फोर्ब्स’मधली नोकरी सांभाळूनच स्वत:चा विद्याव्यासंग आणि आमच्यासारख्या ‘ज्ञानपिपासू’ विद्यार्थ्यांचे शंकानिरसन ते करीत राहिले. स्व. मोहनराव पालेकर गुरुजींकडून त्यांना विद्येचा एवढा अनमोल ठेवा मिळालेला असूनही पालेकरांच्या निधनानंतर स्वत:ची विद्य्ोची भूक भागवण्याकरिता त्यांनी मरहूम उ. गुलुभाई जसदनवाला यांचे शिष्यत्व पत्करले व अखेपर्यंत निभावले.
त्यांच्या अशा प्रकांड पांडित्याचा परिणाम म्हणून की काय, संगीत क्षेत्रातले लोक त्यांना वचकून असायचे. भल्या भल्या लोकप्रिय गायकांची भलावण सर एका वाक्यात ‘‘तो/ ती ना? वाह्यत गातो/ गाते!’’ अशी करायचे. पण एखाद्याचे गाणे आवडले तर ‘‘फर्स्ट क्लास गातो/ गाते!’’ अशी ते चटकन् दिलखुलास दादही द्यायचे! पण एकूणच ते मितभाषी! दोन-तीन शब्दांत वाक्य संपणार! त्यांची आणि माझ्या नवऱ्याची- राजेंद्रची जन्मतारीख एकच- १७ ऑगस्ट! दरवर्षी या तारखेला रात्री उशिरा (दहाच्या सुमाराला) सरांचा माझ्याकडे फोन यायचा. (त्यावेळी मोबाइल नव्हते. घरच्या लँडलाइनवरच फोन यायचा.)
‘‘हॅलो..’’
‘‘हॅलो..’’
‘‘राजू आहे?’’ (माझ्या नवऱ्याला ‘राजू’ म्हणणारे ते एकटेच बहुधा!)
‘‘हो, देते हं! कोण बोलताय आपण?’’
‘‘मी पै!’’ (देवाने आडनावही त्यांच्या सोयीसाठी ‘पै’ एवढंच दिलं होतं!)
मग फोन जरी मी उचललेला असला, तरी माझी चौकशी वगैरे फालतू बातचीत नाहीच! दोन शब्दांत ते ‘राजू’पर्यंत पोचणार. पुढच्या दोन वाक्यांत त्याला ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा’ देणार- की फोन संपला! त्यांचा कॉर्डलेस फोन चार्जिगसाठी क्रेडलवर.. आणि वर छोटय़ाशा टेबलक्लॉथचे आच्छादन घालून काम तमाम! गाणे शिकवण्याच्या बाबतीतही असेच मितभाषी धोरण. कुठल्याही रागाचे स्वरूपदेखील एकाच वाक्यात समजावणार. अमक्या रागाची अमुक छटा, तमक्या स्वराची तमुक श्रुति, पूर्वागात असा, उत्तरांगात तसा.. असली काही भानगड नाही!
कंठसंगीताच्या क्षेत्रात सरांचा दरारा ‘एकमेवाद्वितीय’ असाच होता. सरांकडे जयपूर घराण्याच्या विद्य्ोचे अमूल्य भांडार होते. कानडय़ाचे अठरा प्रकार (मला अठरा नावेसुद्धा सांगता यायची नाहीत!), नटाचे चौदा प्रकार वगैरे सरांना मुखोद्गत होते. एकापाठोपाठ एक कानडे गायचे! एकमेकांची सावली एकमेकांत मिसळू न देता! ‘सावनीनट’सारख्या अच्छोप रागात सरांकडे १३-१४ बडय़ा ख्यालाच्या बंदिशी असायच्या. त्या सगळ्या स्मरणात असायच्या. आणि कधीही विचारलं तर गाऊन दाखवायचे. त्यांची शिकवायची पद्धत अतिशय पारंपरिक. प्रथम घोटून घोटून बंदिश (अस्थाई- अंतरा) बसवून घ्यायचा. तो इतका पक्का झाला पाहिजे की प्रत्येक वेळी अमुक एक अक्षर अमुकच मात्रेवर पडलेच पाहिजे. उदा. काफी कानडय़ातल्या सुप्रसिद्ध ‘लाई रे मद पिया’ या बंदिशीच्या मुखडय़ातील ‘ला’ आणि ‘ई’ या दोन अक्षरांच्या मध्ये १६ वी मात्रा पडली पाहिजे म्हणजे पडलीच पाहिजे. असाच आग्रह बंदिशीच्या इतर अक्षरांबाबतही असायचा! अमुक अक्षर १० व्या मात्रेवर पडलेच पाहिजे, तमुक अक्षर हे १३ व्या आणि १४ व्या मात्रेच्या मध्ये पडले पाहिजे, वगैरे.. एवढे साधले, बंदिश पक्की झाली, की सर म्हणायचे, ‘‘हं, आता बढत कर!’’
‘‘म्हणजे काय?’’ माझा असहाय प्रश्न!
‘‘गा ना- आलाप, ताना..’’
‘‘सर, पण काफी कानडा हा काही भूप- यमनसारखा सरळ राग नाही. काफी कानडय़ाचे नियम, त्याचे चलन मला माहीत नाही. त्यात फिरता कसे येईल?’’
सर म्हणायचे, ‘‘बंदिशीत जसे रस्ते दाखवले आहेत, त्यानुसारच गायचे. ज्या स्वरसंगती बंदिशीत घेतल्या आहेत त्याच आणि तशाच घ्यायच्या. आपण जे गायलो ते रागात बसतंय की नाही असा जिथे संशय येईल, तिथे पुन्हा एकदा बंदिश म्हणायची. बंदिशीत जसा आणि जेवढा राग दाखवला आहे तशीच बढत व्हायला हवी. उगीच आपलं ‘रागाच्या नियमांच्या बाहेर नाहीयेत’ म्हणून वाट्टेल त्या स्वरसंगती वापरायच्या नाहीत.’’ (ही एवढी सारी वाक्ये माझ्या पदरची. सर कधी एवढे लांब बोलतील? नाव नको!)
मी बढत सुरू केली, की सर डोळे मिटून (डग्ग्यावर!) ठेका धरणार. माझे गाडे व्यवस्थित रुळावर चालत असेल तोवर सरांच्या चेहऱ्यावर काहीही बदल नाही. जरा माझी गल्ली चुकली, की एक जोरदार ‘हुं..!’ आणि मग माझी चूक दुरूस्त केलेले गायन- डोळे मिटूनच! आणि अशा असंख्य चुका व्हायच्या, हे निराळे सांगायला नकोच. किंबहुना, सरांनी तोंड उघडावे म्हणून कित्येकदा मुद्दाम चुकीचे गावे लागायचे! मग सरांकडून दिशादिग्दर्शन मिळत असे.
सरांनी मला पहिलाच राग शिकवायला घेतला- रायसा कानडा! ‘री तुम समझ नाही कछु ..’ ही सुप्रसिद्ध बंदिश. इतके दिवस मी आईच्या तालमीत ‘मात्रेवर अक्षर टाक’च्या शिस्तीत शिकलेली. पहिलीच ठेच लागली- जेव्हा सर म्हणाले, ‘‘मात्रेवर अक्षर पडता कामा नये. मात्रेच्या आधी तरी टाक, नाहीतर नंतर तरी!’’
आणि अशा शिस्तीत ते जेव्हा संपूर्ण अस्थायीचे सगळे शब्द वापरून लीलया, हुकमी, ऐटीत सम गाठायचे तेव्हा असं वाटायचं, की हे असं सहज गाणं आपल्याला कसं जमेल? अन् कधी? ‘मात्रेवर अक्षर पडता कामा नये’च्या दहशतीखाली मी इतकी चाचपडत, फरफटत, लोंबकळत सम गाठायची, की सरांच्या छोटय़ाश्या मिशीत मावेल एवढंच हसू हळूच त्यांच्या नकळत त्यांच्या चेहऱ्यावर पसरायचं!
सरांनी मला भरभरून दिलं. कधी कोणता राग मागितला अन् त्यांनी दिला नाही असं होत नसे. सरांनी त्यांची विद्या हातची राखली नाही. भोपाळचे भारत भवन असो, गोव्याची कला अकादमी असो की कलकत्त्याची संगीत रिसर्च अकादमी; सरांनी सर्वाना स्वत:जवळच्या अनवट चिजा रेकॉर्ड करून दिल्या. कधी पन्नास, कधी शंभर! आम्हा सर्व विद्यार्थ्यांवर त्यांनी मनापासून प्रेम केलं. असंच प्रेम त्यांना त्यांच्या गुरूंकडूनही मिळालं असावं. त्यांचे गुरू पं. मोहनराव पालेकर आणि उ. गुलुभाई जसदनवाला यांच्या स्मरणार्थ जून महिन्यात ‘पालेकर पुण्यतिथी’ साजरी करायची प्रथा सरांनी त्यांच्या अखेरीपर्यंत सोडली नाही. दरवर्षी कार्यक्रमाच्या पत्रिका छापून आल्या की ते स्वत:च्या हाताने त्यांवर पत्ते लिहून पोस्टात टाकत असत. कार्यक्रमाच्या शेवटी ते स्वत: गायला बसत आणि गुरूंना स्वरश्रद्धांजली वाहत! फक्त शेवटची तीनेक वर्षे प्रकृतिअस्वास्थ्यामुळे त्यांना स्वत:ला गाता आले नाही. माझे गुरुबंधू डॉ. मिलिंद मालशे आणि पं. भालचंद्र (सरांसाठी ‘भालू’!) टिळक हे तर त्यांचे डावे-उजवे हात होते. सरांबरोबर त्यांनी खूप प्रवासही केला. सरांच्या कार्यक्रमांत त्यांची तानपुरा व स्वरसाथही केली. त्यांचा शिष्य विश्वास शिरगावकर अमेरिकेत राहत असे. (अजूनही राहतो.) त्याने एकदा सरांना चार महिन्यांसाठी अमेरिकेला नेले. सरांनी तिथे दिवसभर आराम, वाचन, रियाज करावा आणि रोज संध्याकाळी त्याला शिकवावे-एवढीच त्यांची दिनचर्या असे. त्यावेळी त्यांच्या अमेरिकेतल्या वास्तव्यात त्यांनी मला लिहिलेले पत्र अजूनही माझ्या संग्रही आहे. माझ्या इंग्लिशमध्ये लिहिलेल्या पत्राला सरांनी मराठीतून उत्तर लिहिले होते आणि मी इंग्लिशमध्ये पत्र लिहिल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली होती! (‘मराठी माणसाला मराठी व्यक्तीशी मराठीत पत्रव्यवहार करण्यास लाज वाटू नये अशी माझी भावना आहे.’ सरांचं एकदम ‘फोर्थराइट’ लेखन!)
आता सर नाहीत. आम्ही सगळे शिष्यगण आता सरांच्या पालेकर व गुलुभाई पुण्यतिथीच्या बरोबरीने सरांचीही पुण्यतिथी करतो. सरांचा जन्म आणि मृत्यू दोन्ही ऑगस्टमधलेच. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात आम्ही त्यांचे शिष्य ‘अनवट राग महोत्सव’ असा दोन-तीन दिवसांचा समारोह करून त्यांना श्रद्धांजली वाहतो. त्यांच्यासारख्या ‘अनवट रागांचा बादशहा’ असलेल्या गुरूसाठी हीच आदरांजली योग्य ठरेल अशी आमची भावना आहे.
lokrang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2015 1:38 am

Web Title: king of singing
Next Stories
1 सिंहस्थातील विकासयोग
2 आधुनिक तंत्रयोग!
3 वैद्यकव्यवस्थेचे ‘अचूक निदान’
Just Now!
X