किरण केंद्रे wkendrekiran@gmail.com
मुलांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांना अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान मिळावे, त्यांच्या संवेदनशील मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार व्हावेत, ही उद्दिष्टे ठेवून बालभारती ‘किशोर’ मासिक प्रकाशित करते. गेल्या ५० वर्षांत ‘किशोर’ने अनेक पिढय़ांवर वाचनाचे, ज्ञान-विज्ञान व मूल्यांचे संस्कार केले. अनेक चित्रकार, कवी, लेखक या मासिकाने घडवले.
पाठय़पुस्तकांबरोबर इतर पूरक साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावे म्हणून १९७१ साली पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी ८ ते १४ वष्रे वयोगटातील मुलांसाठी बालभारतीने ‘किशोर’ सुरू केले. ‘‘तुमच्या बुद्धीला, तरल अशा कल्पनाशक्तीला आणि जिज्ञासेला सतत काहीतरी हवे असते. काही अद्भुतरम्य विलक्षण असे पाहावे, ऐकावे याकडे तुमचे मन सारखे झेपावते. या तुमच्या सर्वागाने, सर्वाशाने फुलण्याच्या काळात तुम्हाला काही मदत करता आल्यास ती करण्याचा ‘किशोर’चा विचार आहे..’’ असे तत्कालीन शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांनी पहिल्या अंकातील आपल्या मनोगतात म्हटले होते. मराठी बालसाहित्याच्या इतिहासात ‘किशोर’ मासिकाने स्वत:चे स्वतंत्र असे स्थान निर्माण केले आहे. ‘किशोर’ला कलात्मक मांडणी आणि आशयसंपन्नतेचे अधिष्ठान दिले ते पहिले कार्यकारी संपादक वसंत शिरवाडकरांनी. गोष्टी, कवितांसोबत रंगीत चित्रे, रेखाटने वापरण्याची प्रथा ‘किशोर’ने पहिल्या अंकापासून पाडली. वसंत शिरवाडकरांनंतर हरहुन्नरी लेखक वसंत सबनीस आणि त्यानंतर ज्ञानदा नाईक या कार्यकारी संपादकांनी ‘किशोर’ची ध्वजा आणखी उंचावली.
२०१४ साली मंत्रालयातील अधिकारीपदाची नोकरी सोडून ‘किशोर’ची जबाबदारी मी स्वीकारली. त्यावेळी मनाशी काही गोष्टी निश्चित होत्या. पूर्वसुरींचा वारसा अधिक जोरकसपणे पुढे नेण्याचे आव्हान होते. मुलांसाठी काम करण्यासारखा दुसरा आनंद नाही. मुलांच्या मनाला आनंदित करणारे साहित्य त्यांच्या हाती देणे त्यांच्या भावनिक, बौद्धिक आणि वैचारिक विकासासाठी आवश्यक असते. उगवती पिढी ज्ञानसाधनेचे व्रत घेऊन जन्माला येते. त्यांच्या साधनेला योग्य साधने पुरवणे आपले कर्तव्य आहे. कोवळ्या आणि संवेदनशील मनावर जे ठसवाल त्याचा ठसा पक्का असतो. जाणिवांची बीजे पेरण्यासाठी किशोर गटाची मुले हे योग्य वय आहे. समाजात पाय रोवून उभे राहण्यासाठी मुलांना आधाराची गरज असते. हा आधार इतर गोष्टींबरोबरच साहित्यही देऊ शकते, ही जाणीव ठेवून कामाला लागलो. नवी पिढी ही अधिक वेगवान आहे. आधुनिक तंत्रज्ञानाशी तिची सुरुवातीपासूनच ओळख आहे. रंगीत टीव्ही आणि कार्टूनशी मत्री असणाऱ्या या पिढीला साहित्याची गोडी लावायची तर चांगल्या आशयाबरोबरच अंकाची मांडणीही तितकीच आकर्षक असायला हवी, म्हणून अंकाच्या मांडणीत मोठय़ा प्रमाणात बदल केले. आकर्षक चित्रे हे ‘किशोर’चे एक महत्त्वाचे वैशिष्टय़. यासाठी जुन्याजाणत्या चित्रकारांबरोबरच राज्यातील विविध कला महाविद्यालयांतून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या तरुणांची मदत घेण्यात येते. प्रत्येक अंकाचे मुखपृष्ठ कलात्मकदृष्टय़ा सरस आणि वैशिष्टय़पूर्ण असेल याची काळजी घेतली जाते. म्हणूनच गुणवत्ता या एकाच निकषावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील नवोदित लेखकांना संधी उपलब्ध करून दिली. बदलत्या काळातील मुलांच्या भावविश्वाशी जवळीक साधणारी विविध सदरे सुरू केली.
‘किशोर’च्या जुन्या अंकांना मोठय़ा प्रमाणात मागणी होती. कधीकाळी ‘किशोर’वर पोसलेल्या वाचकांसाठी हा स्मरणरंजनाचा विषय होता. नव्या पिढीतील वाचकांचाही ऑनलाइन अंकांसाठी आग्रह होता. यासाठी ‘किशोर’चे १९७१ पासूनचे सर्व अंक डिजिटल स्वरूपात ऑनलाइन मोफत उपलब्ध करून दिले. तब्बल ३२ हजार पानांचा हा खजिना वाचकांसाठी खुला झाला. दिग्गज लेखकांच्या साहित्याबरोबरच अनेक दुर्मीळ चित्रांचे जतन यामुळे होऊ शकले. देश-विदेशातील लाखो वाचकांचा या उपक्रमाला प्रतिसाद लाभला.
अंकाच्या वर्गणीदार वाढीसाठीदेखील मोठय़ा प्रमाणावर प्रयत्न करण्यात आले. ऑनलाइन पेमेंट गेट वेचा पर्याय वर्गणीदारांना उपलब्ध करून देण्यात आला. ‘किशोर’च्या लेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. मासिकाच्या प्रचार-प्रसारासाठी समाजमाध्यमांचा उपयोग करण्यात आला. परिणामत: वर्गणीदारांची संख्या वाढून ती ७३ हजारापर्यंत पोहोचली. ‘किशोर’ काळानुरूप बदलत आहे. नव्या पिढीचे भावविश्व समजून घेत पुढील वाटचाल करीत आहे. भविष्यातही सर्जनशील मनाला आनंद देतानाच मूल्यसंस्कार रुजविण्याचा ‘किशोर’चा वसा कायम राहणार आहे.
(कार्यकारी संपादक, ‘किशोर’)
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 10, 2021 6:39 am