News Flash

उद्यमशीलतेत कमी नाहीच…

मला कायमच वाटते की, कोणत्याही उद्योग-व्यवसायात व्यवस्थापन खूप महत्त्वाचे असते.

|| विक्रम किर्लोस्कर 

बघता बघता महाराष्ट्राने साठी पार केली… आणि कालच एकसष्ठीचा टप्पाही गाठला. परंतु करोनाच्या जगत्व्यापी कहराने आपण हर्षोल्हासाचे हे क्षण साजरे करू शकलो नाही. तथापि यानिमित्ताने महाराष्ट्राबाहेरून महाराष्ट्राकडे पाहणाऱ्यांना तो नेमका कसा दिसतो, त्याची शक्तिस्थळे  अन् वैशिष्ट्ये काय, याचा धांडोळा घेणारी मनोगते…

माझ्या पणजोबांनी महाराष्ट्रामध्ये किर्लोस्कर उद्योगसमूहाची सुरुवात केली. आम्ही गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र या तिन्ही राज्यांशी सारखीच जवळीक साधणाऱ्या गावातले. त्यामुळे आजही आमच्याकडे मराठीबरोबरच कन्नडदेखील बोलली जाते. गेली अनेक दशके मी महाराष्ट्राबाहेर आहे, पण तरीही मराठी भाषा विसरलेलो नाही. मला पुणे-बंगलोर असा फरक कधी जाणवलाच नाही. कायम हा सरळ एकच रस्ता वाटत आलेला आहे. फक्त आमच्या कामाचाच नाही तर माझ्या आयुष्याचा रस्ता, तसंच आमच्या किर्लोस्कर समूहाच्या वाटचालीचा हमरस्तादेखील!

मला कायमच वाटते की, कोणत्याही उद्योग-व्यवसायात व्यवस्थापन खूप महत्त्वाचे असते. व्यवस्थापन चांगले असेल तर तिथे भरभराट नक्कीच होते. मी महाराष्ट्रात राहिलो नसलो तरीही पुणे, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणच्या आमच्या प्रकल्पांना भेट द्यायला नियमितपणे जातो. आणि मला दरवेळी त्या परिसरामध्ये नवीन काही सुधारणा झालेल्या बघायला मिळतात. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात अनेक छोटी शहरे पुढे येत आहेत. औरंगाबाद, नगर अशा अनेक ठिकाणी नवीन प्रकल्प आले आहेत. ऑटोमोबाइल क्षेत्रात महाराष्ट्राचे मानाचे स्थान आहे. त्यातही पुणे परिसरातल्या छोट्या-मोठ्या इंडस्ट्रींची तुलना इतर कुठल्याही ठिकाणांशी होऊ शकत नाही.

मला महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये उद्यमशीलता दिसते. त्यामुळेच अनेक नवनव्या व्यवसायांचा इथे उदय झालेला आहे. नाशिकच्या वाईनला तोडीस तोड सोलापूर वाईनचा एक वेगळा ब्रँड उभा राहतो आहे. आपल्याकडे असलेल्या साधनसंपत्तीचा योग्य विनियोग केला जात आहे. माझा एका गोष्टीवर ठाम विश्वास आहे की, जे झालेलं आहे त्याबद्दल बोलून वेळ वाया दवडण्यापेक्षा जो वेळ आपल्या हाती आहे तो सत्कारणी लावला पाहिजे. मी कायम चांगल्याच गोष्टी लक्षात ठेवतो. त्यामुळे तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत होते. म्हणूनच मला महाराष्ट्रातली प्रगती सुखावते.

आम्ही महाराष्ट्रात वास्तव्य करीत नसलो तरीही इथले हापूस आंबे आणि नागपुरी संत्री आमच्या प्रचंड आवडीची आहेत. दरवर्षी आमचे काही मित्र, हितचिंतक अगदी आवर्जून आम्हाला संत्र्यांची, आंब्यांची पेटी पाठवतात. त्यामुळे महाराष्ट्रात नसूनही अस्सल मराठी गोष्टींचा आम्हाला छानपैकी आस्वाद घेता येतो. नागपुरी संत्री, हापूस आंबा हीदेखील औद्योगिक महाराष्ट्राची ओळख आहे. आम्ही घरात तर मराठी बोलतोच, परंतु मी जेव्हा बाहेर फिरतीवर असतो तेव्हा आजूबाजूला कोणी मराठी व्यक्ती दिसली किंवा एखाद्याचे नाव/ आडनाव मराठी वाटले तर आवर्जून त्यांच्याशी मराठीतच संवाद साधतो. काही वर्षांपूर्वी मी आणि माझी पत्नी नामिबियामध्ये फिरत असताना आमचा तिथला गाईड आम्हाला एका आडगावी घेऊन गेला आणि तिथल्या विहिरीवरचा पंप त्याने दाखवला. त्यावरचे ‘किर्लोस्कर’ हे नाव वाचून मला म्हणाला, ‘हे तुम्हीच का?’ असे अनेक प्रसंग आम्हाला जगभरात अनुभवायला मिळतात. त्या क्षणी वाटणारा सार्थ अभिमान फक्त ‘किर्लोस्कर’ म्हणूनच नसतो, तर आपण एक मराठी… एक भारतीय आहोत म्हणूनदेखील असतो. मी  महाराष्ट्रात राहत नसलो तरीही महाराष्ट्रावर लक्ष ठेवून असतो. ते केवळ भावनिकतेपोटी नव्हे, तर औद्योगिक कारणासाठीदेखील! करोनाचे सद्य: संकट आपणच जबाबदार होऊन घालवून लावू शकतो… आणि आपण ते नक्कीच करू.

महाराष्ट्राला ६१व्या वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा देताना इतकेच म्हणेन : आजवर आपण उत्तम प्रगती केलेली आहेच, पुढेही महाराष्ट्राची अशीच प्रगती होत राहील. करोनाच्या या संकटातूनही आपण नक्कीच बाहेर पडू. -शब्दांकन : मानसी होळेहुन्नूर

 

कलावंतांचा सहवास… : गुलाममोहम्मद शेख

बडोदे शहरात महाराजा सयाजीराव विद्यापीठात नुकत्याच स्थापन झालेल्या दृश्यकला विभागात मी शिकू लागलो तेव्हा अर्थातच ना. श्री. बेन्द्रे हे माझे शिक्षक होते. तेव्हा महाराष्ट्र, गुजरात ही राज्ये नव्हतीच. चंदू बोर्डे हे ‘बडोद्याचे क्रिकेटर’ मानले जात, असा तो काळ. वर्गात मराठीभाषक मुले-मुली होत्या. त्यापैकी रमाकांत लेले हे पुढे डिझायनर बनले. आता ते आयर्लंडमध्ये राहतात. प्रभा डोंगरे या मराठी पद्धतीने साडी नेसून येत असत… तसा पोशाख करणाऱ्या त्या एकट्याच होत्या असे आता आठवते.

बडोद्यातील कलाशिक्षणाच्या सुरुवातीचा तो काळ. तेव्हा येथे मराठीभाषक शिक्षक अनेक होते. पैकी कलेचा इतिहास शिकवणारे माझे आवडते अध्यापक व्ही. आर. अंबेरकर, मुद्राचित्रण शिकवणारे ए. बी. जोगळेकर यांचा स्नेह पुढेही राहिला. बेन्द्रे महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर मुंबईला कलानगरात- अगदी ठाकरेंच्या जवळ राहायला गेले. जोगळेकरही मुंबईत आले होते. त्यांच्या ‘थ्री ए प्रिंटिंग प्रेस’मधून आमच्या ‘वृश्चिक’ या गुजराती लघु- अनियतकालिकाचे (१९६९ ते ७३ या काळातले) अनेक अंक छापले गेले आहेत!

चित्रकार, कलाशिक्षक अशा भूमिकांतून वावरताना माझी साहित्याची आवड कायम राहिली होती. ती पुढेही फुलली, याचे श्रेय सुरेश जोशी यांचे. याच सुरेश जोशींमुळे विंदा करंदीकरांच्या कवितेशी माझी पहिल्यांदा ओळख झाली. सुरेश जोशींनी विंदांच्या कवितांचा अनुवाद गुजरातीत केला होता. वास्तुरचनाकार माधव आचवल यांचे ‘किमया’ हे पुस्तकही जोशींनी मराठीतून गुजरातीत आणले होते. आचवल बडोद्याचेच… त्यामुळे ते परिचयाचे होतेच. त्यांचे ‘किमया’ आजही गुजरातीत आवडीने वाचले जाते.

महाराष्ट्रात माझे अनेक मित्र आजही आहेत. पण महाराष्ट्र व गुजरात राज्यांच्या स्थापनेपूर्वीचे ते दिवस आणि तेव्हाचे लोक आजही आठवतात. महाराष्ट्राचा सहवास हा माझ्यासाठी कलावंतांचा सहवास आहे.

(गुलाममोहम्मद शेख हे ज्येष्ठ चित्रकार आहेत.)

शब्दांकन : अभिजीत ताम्हणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2021 12:09 am

Web Title: kirloskar group of companies in maharashtra corona virus infection akp 94
Next Stories
1 प्रागतिक चळवळींच्या देशा…
2 महाराष्ट्रात स्वतंत्र विचारवंतांची वानवा?
3 रफ स्केचेस  : माझ्यात मी
Just Now!
X