सामाजिक प्रबोधन हे जसे सामाजिक विचारवंतांच्या चिंतनातून घडून येते, तसेच कलाकारांच्या आविष्कारातून आणि लोककलेतूनही आपल्यासमोर येते. प्रबोधनपर विचार आणि वास्तवातील आचार यात नेहमीच मोठे अंतर दिसते. त्यातील विसंगती टिपणे आणि ती न झोंबता लोकांच्या नजरेस आणून देणे यात कलेची उंची दिसून येते. चंद्रसेन टिळेकर यांचे हे पुस्तक याच मार्गाने जाणारे आहे.
रोजच्या दैनंदिन व्यवहारात आपल्याला आढळणाऱ्या अनेक गोष्टी, प्रसंग आणि घटनांचा त्यांनी या संग्रहातील कथालेख लिहिताना सुंदर विडंबनात्मक वापर करून घेतला आहे. व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवर आजही आपल्या समाजात अंधश्रद्धा, बुवाबाजी बोकाळताना आणि पुरोगामी विचारांचा विपर्यास पदोपदी होताना दिसतो. तो टिपून विडंबनात्मक, नर्मविनोदी शैलीने मांडण्यात टिळेकर यशस्वी झाले आहेत. यासाठी शाब्दिक कोटय़ा आणि प्रसंगनिष्ठ विनोद त्यांनी चांगल्या रीतीने हाताळला आहे. आचार्य अत्रे यांच्या मते, विनोद आणि विडंबन ही साहित्यातील अहिंसेची शस्त्रे आणि साधने आहेत. टिळेकर यांनी ती समर्थपणे वापरली आहेत.
या संग्रहात एकंदर १७ कथालेख आहेत. एकनाथांच्या भारुडांची आठवण यावी असे यातील काही कथालेख जमून आले आहेत. ‘पाहू कवतिके- गणेशू महिमा’ या कथेतील शंकर-पार्वती आपल्या मुलाचे – गणेशाचे – गणेशोत्सवातील कवतिक पाहण्यासाठी पृथ्वीवर अवतरतात. इथे त्यांना ज्या ज्या गोष्टींना सामोरे जावे लागते, त्यावरील टिप्पण्या मुळातून वाचण्यासारख्या आहेत. प्रबोधनाचा आव न आणता अनेक सामाजिक विषयांवर लेखकाने मार्मिक भाष्ये केली आहेत. ‘सिद्धी-बुक्के महाराजांची’, ‘काटय़ाने काटा’ आणि ‘कुंभार व्हा, गाढवांना तोटा नाही’ हे लेख अंधश्रद्धा, ढोंगी साधू,  बुवाबाजी प्रवृत्ती आणि त्यातील दांभिकता उघड करतात.  ‘लोकांनी सुधारायला पाहिजे हाय’, ‘खासदारांचीये अंगी यातना कठीण’, ‘राजमान्य राजश्री श्रीमंत कृपाशंकरजी यांसी..’, ‘परदेशगमनी आमदार बंधूस’, ‘पैसा तितुका मेळवावा’ या लेखांतून राजकारण्यांचे पराक्रम ते उघड करतात. ‘म्हैस तारी त्याला..’ या कथेत वृत्तवाहिनीवरील क्षुल्लक ब्रेकिंग न्यूजमागील बातमीदारी, सावरकर आणि पु.ल. यांच्या विनोदावरील कोर्टातील सुनावणी आणि पु.लं.च्या घरी झालेली चोरी हे या पुस्तकातील दीर्घकाळ लक्षात राहतील असे लेख आहेत. समाजातील दांभिक गोष्टींवर भाष्य करण्यासाठी टिळेकरांची लेखणी विडंबनशैली सहजतेने अवलंबते.
नवे विचार स्वीकारायला लागणारी वृत्ती आणि गती आपल्या समाजात धीम्या स्वरूपाची आहे. त्यामुळे साध्या यशासाठीही सोपे मार्ग अवलंबले जातात. सारी दु:खे निवारण्यासाठी नव्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा जन्माला घातल्या गेल्या आहेत. देवळांची संस्थाने होऊ लागली आहेत. त्यांच्या वाऱ्या, पदयात्रा आणि मोठमोठय़ा रांगांमध्ये तरुणाई आपला आधार शोधू लागली आहे. धंदेवाईक अतार्किक  वास्तुशास्त्र, वृत्तवाहिन्यांवरील अध्यात्म, सुखकारी आणि दुख:हारी खडे, रत्ने यांचे व्यापार सुगीला येत आहेत. अशा समाजात न पटलेल्या गोष्टींविरुद्ध प्रश्न विचारता येत नाहीत, जाब विचारता येत नाही. शास्त्र आणि विज्ञानाचे फायदे घेता येतात, पण त्यांच्या आधाराने स्वत:ला तार्किक प्रश्न विचारता येत नाहीत. अशा काळात स्वत:ला आरसा दाखवणारे हे पुस्तक आहे.
विवेक प्रभूकेळुसकर यांनी काढलेली व्यंगचित्रं मार्मिक आहेत. या पुस्तकात कमी आहे ती केवळ मुद्रितशोधनाची. पण ती जबाबदारी प्रकाशकाची.
‘कुंभार व्हा, गाढवांना तोटा नाही!’ – चंद्रसेन टिळेकर, अक्षर प्रकाशन, मुंबई, पृष्ठे – १२७, मूल्य – १३० रुपये.