आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकांना आपल्या आरोग्याकडे पुरेसं लक्ष देणं जमत नाही. स्त्रियांचे तर घर आणि नोकरी अशी तारेवरची कसरत करताना आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं. अनेकदा शरीराच्या छोटय़ा छोटय़ा तक्रारींकडे काणाडोळा केला जातो. पण याच छोटय़ा तक्रारींचं पुढे मोठय़ा आजारांमध्ये रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे वेळीच शरीराच्या छोटय़ा कुरबुरींकडेही लक्ष देणं गरजेचं असतं. अर्थात या वृत्तीला कारणीभूत आहे ते शरीर आणि मनाविषयी असलेलं आपलं घोर अज्ञान. डॉ. अश्विनी भालेराव-गांधी यांचं ‘स्त्रीत्व आणि आरोग्य’ हे पुस्तक याचदृष्टीनं महत्त्वाचं ठरतं.

या पुस्तकात स्त्रियांना वयात आल्यापासून रजोनिवृत्तीपर्यंतच्या विविध टप्प्यांची माहिती करून दिली आहे. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आहार कसा असावा, शरीर-मनाकडे कसे सजगतेने पाहावे, याबाबत लेखिका मार्गदर्शन करते. यात स्त्रियांच्या अनेक शारीरिक आणि मानसिक अवस्थांबद्दल सखोलपणे विवेचन केले गेले आहे. त्यात प्रथम पाळी, पाळीत होणारा अनियमित वा अति-रक्तस्राव, पौगंडावस्था, मातृत्व, कुटुंबनियोजन, वंध्यत्व, श्व्ोतप्रदर, रजोनिवृत्ती अशा विविध टप्प्यांचा समावेश आहे. स्त्रियांच्या आयुष्यात येणाऱ्या या वेगवेगळ्या अवस्थांत त्या अनुषंगाने येणाऱ्या मनोवस्थेविषयीही लेखिका लिहिते. त्याचबरोबर ऑस्टिओपोरॉसिस, कर्करोग, स्तनाचा कर्करोग, वयस्क स्त्रियांच्या आरोग्याचे प्रश्न, नैसर्गिक इस्ट्रोजेन अशा विविध आजारांवरील स्वतंत्र लेख स्त्रियांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहेत. पुस्तकात शेवटी ‘स्त्रीजन्म आणि मानसिक आजार’ हा मनोज भाटवडेकर यांचा विशेष लेखही आहे. ‘एकविसावे शतक आणि स्त्री-आरोग्य’ हा लेख समस्त स्त्रियांना विचार करायला लावणारा आहे.

या पुस्तकामुळे आपण आजारांविषयी किती अनभिज्ञ आहोत, तसेच आपल्या शरीराची आपण किती हेळसांड करतो याची वाचकाला जाणीव होईल. खरं तर प्रत्येकानेच, विशेषत: स्त्रियांनी तर आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे. या पुस्तकातून आपल्याला आपल्या शरीर-मनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन मिळतो; जो आपल्याला आरोग्याविषयी अधिक जागरूक करतो. आपल्यात आरोग्यभान जागवतो.

‘स्त्रीत्व आणि आरोग्य’-

डॉ. अश्विनी भालेराव-गांधी,

मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस,

पृष्ठे- १८९, किंमत- २०० रुपये. ल्ल

lata.dabholkar@expressindia.com