गदी लहानपणीच आपली मैत्री होते ती चिऊ आणि काऊशी. हे आपले लहानपणीचे हक्काचे सखेसोयरे. ‘एक चिऊ आली..’ असं म्हणतच आई आपल्या तान्ह्याला चिऊ-काऊचा घास भरवते. या अबोल जिवांनी अनेकांचं आयुष्य अधिक सुखकर केलं आहे. मृणाल पर्वतकर या त्यापैकीच एक. या प्राण्यांनी त्यांचं आयुष्य अधिक समृद्ध केलं, अविस्मरणीय केलं. त्याविषयीचे अनुभव त्यांनी ‘लळा अबोलांचा’ या पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत.
प्राणिमात्रांविषयीचं प्रेम हे आजोळपासूनच वारशात  मिळालं, असं सांगतच लेखिका पुस्तकाची सुरुवात करतात. त्यांच्या आजोबांच्या गोव्याच्या घरात मांजर, कुत्रा, कोंबडय़ा, गुरं-वासरं होती. त्यांच्या काही मजेशीर आठवणी लेखिकेने सांगितल्या आहेत. या आठवणीही त्या-त्या प्राण्यांचं वैशिष्टय़ विशद करणाऱ्या आहेत. या पुस्तकातून प्राण्यांचं एक अनोखं विश्व उलगडत जातं. आपण ज्यांना मुके समजतो ते माणसाशी lr14प्रेमाने, समजूतदारपणे (कधी कधी तर माणसालाही असे प्रेम, समजूतदारपणा जमणार नाही) वागू शकतात, याची प्रचीती येते. लेखिकेच्या घरची ‘मनी’ ही त्यांच्या बाबांची विशेष लाडकी. लेखिकेचे बाबा म्हणायचे, ‘ही गेल्या जन्मी माझी आई असणार, म्हणून माझ्या घरी आलीय.’  का? तर ‘माझी आई अशीच बसल्या बसल्या डुलक्या काढायची.’ अशी गमतीदार आठवण ते सांगत. असे अनेक मजेशीर प्रसंग वाचताना वाचकाचं मनोरंजनही होतंचं; पण अशा प्रसंगांमधून आपल्या मनात प्राण्यांविषयीची आत्मीयता जागृत होते.
 या पुस्तकात आपल्याला भेटतात कुत्रे, मांजर, कासव, मोर, चिमणी, हळद्या, बदक, खारुताई, पोपट, कबूतर.. या प्राण्यांचे आपापसातील मैत्रही तितकेच दृढ. अगदी कासवाच्या पाठीवरून एक चक्कर मारणारी चिमणी असं छायाचित्र पाहताना खूप गंमत वाटते. गोल्डी, ठकी, बॉबी या श्वानकुळाविषयींच्या आठवणींमधून माणूस आणि कुत्रा यांच्यातील दृढ नात्यांची एक वेगळी झलकच पाहायला मिळते.
छोटय़ा आणि छोटी या कूर्मावतारांच्या गमती-जमती, त्यांच्या सवयी, त्यांचे आवडते खेळ याविषयी वाचताना मनोरंजन होतं.
जसजसं आपण पुस्तक वाचत जातो, तसतसं ‘मी जन्माला येतानाच परमेश्वराने या सोयऱ्यांशी ऋणानुबंधांच्या गाठी अशा पक्क्या मारून ठेवल्या आहेत, की राहती घरं सोडाच, पण सेकंड होम किंवा हॉलिडे होम म्हणतात तसलं माझं घरही त्यांच्या अस्तित्वाने सजलं,’ हे लेखिकेचं म्हणणं अगदी पटतं. कारण सेकंड होममध्येही त्यांना मोर, हळद्या, कबुतरं, चिमण्या यांचा सहवास लाभला. आपल्या आयुष्यात काही काळ पाहुण्यांसारखे येऊन अक्षय आनंदाचा ठेवा देऊन जाणाऱ्या आणि लेखिकेचं भावविश्व अधिक समृद्ध करणाऱ्या या मित्रांना त्या मनापासून सलाम करतात.
हे पुस्तक वाचून हातावेगळं केल्यावर आपलीही मन:स्थिती काहीशी लेखिकेसारखीच होते. अबोलांचा हा लळा मनाच्या कोपऱ्यात दडवून ठेवावा असाच आहे.
‘लळा अबोलांचा’- मृणाल पर्वतकर, उत्कर्ष प्रकाशन, पुणे,
पृष्ठे- ४७. मूल्य- १०० रुपये.