मराठी भाषा, तिची वाकणंवळणं, मराठी साहित्य आणि मराठीतील वाङ्मयीन घडामोडी तसेच साहित्यिक आणि त्यांच्या सृजनावर मार्मिक टीकाटिपण्णी करणारे सदर..
लि हा. लिहा. काय लिहावे? जे लिहायचे आहे ते कसे लिहावे? जे लिहायचे आहे तेच लिहिले जाते का? त्यासाठी नेमके शब्द सापडतात का? बोलताना मी नेमके आणि नेटके बोलतो का? जर असे होत असेल, तर मग मी काही वेळा क्षमा का मागतो? किंवा, ‘मी असे बोललोच नाही,’ किंवा ‘मला तसे म्हणायचे नव्हते,’ असे म्हणण्याची पाळी माझ्यावर का येते? मग मी स्वत:शी असे प्रामाणिकपणे कबूल करावे का, की मी भाषेच्या उपयोगाबाबत निष्काळजीपणा करतो? किंवा मी सरळसरळ मान्य करावे का, की मी भाषा, शब्द, त्यांचे अर्थ, त्यांची मांडणी, त्यांचे संभाव्य परिणाम, अर्थाच्या शक्यता याबाबतीत अल्पज्ञानी आहे.
शब्द, अर्थ, भाषा याबाबतची तात्त्विक आणि शास्त्रीय मीमांसा ही गोष्ट मला करायची नाहीए. माझा साधा मुद्दा असा की, मला साधी, सहज, नैसर्गिक आणि भावनांचे वहन करणारी भाषा तरी लिहिता किंवा बोलता येते का? साहित्याची, वाङ्मयाची भाषा यांचे विवेचन वेगळे. प्रयोजन, उपयोजन, समायोजन, अभियोजन- असा शासकीय शब्दावलीचा घोळ दूर ठेवून, भाषेचा दैनंदिन जगण्याशी असलेला संबंध तपासता आला तर पाहू या, असे म्हणतो मी. तात्त्विक चर्चा होतच असतात; पण काही व्यावहारिक गोष्टींचाही विचार व्हायला काय हरकत आहे? माणूस आणि समाज यांच्यासाठी आवश्यक आणि प्रभावशील अशा भाषा नावाच्या माध्यमासंबंधीचा कुठलाही तपशील कमी महत्त्वाचा मानू नये असे वाटते.
असे विचार मनात यावेत असे प्रसंग पुन: पुन्हा अनुभवाला येतात. एका मित्राचे वडील वारले. त्यांच्या तेरवीची पत्रिका किंवा निमंत्रण किंवा जेवणासाठी बोलावणे अशा आशयाचा मजकूर छापायचा होता म्हणून ते माझ्याकडे आले. माझ्याकडेच का? तर त्यांना प्रामाणिकपणे असे वाटले की, मी मराठीचा मास्तर आहे, शिवाय कविताबिविता लिहितो- म्हणून मी चांगला मजकूर लिहू शकेन. प्रसंग दु:खाचा होता.. शिवाय मित्रकर्तव्य- म्हणून मी कागदावर पेन ठेवला आणि पहिला शब्द कोणता लिहावा, असा पेच पडला आणि मी बावरलो. तेरवीच्या जेवणाला कोणते जेवण म्हणतात? या निमंत्रणाला आनंदाची छटा लाभू नये म्हणून कोणते शब्द कसे वापरावेत? ‘सहकुटुंब या’ असे म्हणत असतात का? शिवाय, मित्र माझ्यासारखा (!) भाषातज्ज्ञ नसल्यामुळे जे लिहीन ते मान्य करेल असे जाणवल्याने तर मी घाबरलोच. याआधी आलेल्या तेरवीच्या पत्रिकांपैकी एखादी तरी आपण जपून ठेवायला पाहिजे होती असे वाटून मी चरफडलोदेखील. बरे, अशी पत्रिका (किंवा लग्नपत्रिकाही!) लिहवून घेताना तिच्यातील मजकुरात किमान एक-दोन शब्द तरी संस्कृतचे वजन असलेले (आणि जमले तर जोडाक्षर!) असावेत अशीही संबंधिताची अपेक्षा असते. (इथे औचित्याचा विवेक फोल ठरतो!) आता मात्र माझ्यावरील दडपण वाढले. कपाळावर घाम आला- न आला असे जाणवले. आतल्या खोलीत गेलो. टॉवेलने तोंड पुसले. पाणी प्यायलो. नेटाने बाहेर आलो. आत्मविश्वासपूर्वक मजकूर खरडला. ‘तो मी लिहिलाय असे कुणाला सांगू नकोस,’ असे मित्राला सांगितले आणि खूप थकल्यासारखा सुन्न बसून राहिलो. ‘या पिढीची पत्र लिहिण्याची सवय तुटल्यामुळे तुम्हाला मायना आणि मजकूर यांतला फरकही कळत नाही..’ असे वर्गात अनेकदा पोरांवर डाफरलो होतो, ते विसरण्याचा प्रयत्न करू लागलो.
परवा काही कारणाने एका पोलीस कॉन्स्टेबलला माहिती देण्याचा प्रसंग आला. मुलीच्या नोकरीची कंपनी म्हणून कॉग्निझंट असे मी म्हणालो आणि पोलिसदादाचा हात थबकला. त्यांचा चेहरा त्रासिक झाला. मी खोटे बोलत असल्याचा संशय आल्यासारखे ते माझ्याकडे रोखून पाहू लागले. कायझन, कोझनगट, कोगनझट असे तीन-चार वेगवेगळे उच्चार त्यांनी करून पाहिले. मग आम्ही दोघांनी नाद सोडून दिला आणि त्यांनी जे काही तिरप्या अक्षरांमध्ये (किंवा चिन्हांमध्ये) लिहिले ते जवळून पाहिल्यावर मला ते मराठी करस्यू रायटिंग असावे असे वाटले. ते सातवी किंवा नववी पास तरी नक्की असतील ना? मग तोपर्यंत जी मराठी ते शिकले, ती कोणती होती? ज्या लिखित मजकुराच्या अक्षराअक्षरावर पुढे विद्वान लोक कोर्टात कीस पाडतात, ते जर असे सटवीच्या विधिलिखितापेक्षाही दुबरेध असे हस्तलिखित असेल तर लोकांचे काय होणार? लिंग-वचन-पुरुषविरहित असे हे मराठी वाचताही येत नसेल तर? सातबारा आणि फेरफार आणि खोडतोड रजिस्टरमधील तलाठय़ाने लिहिलेला मजकूर वाचण्याची पात्रता ज्यांच्या डोळ्यांमध्ये आहे ते लोक धन्य होत! म्हणजे धुळाक्षरे, मुळाक्षरे, बाराखडी यांच्या गिरवण्याचा विचार आपण करायचाच नाही का? की प्राध्यापकांनी माध्यमिक शिक्षकांवर आणि त्यांनी प्राथमिक शिक्षकांवर आणि त्यांनी पालकांवर दोष ढकलण्यात समाधान मानायचे? काही थोर मराठी लेखकांच्या गचाळ अक्षरांचे आणि ‘मी’सुद्धा ऱ्हस्व लिहिण्याचेही लाड आणि कौतुक करणाऱ्या भाषिक समाजात यापेक्षा वेगळे काय घडणार म्हणा! पण अस्वस्थता उरतेच.
आपली भाषा जगेल का, तगेल का, की मरेल, की फक्त पुस्तकरूपाने उरेल, या प्रश्नांचा विचार करताना वास्तव लक्षात घेणे आवश्यक आहे, की भाषेची आवश्यकता वाढते आहे. तिची गरज वाढते आहे. भाषेविषयीचे भान विस्तारते आहे. केवळ शाळा-कॉलेजातील एक विषय म्हणजे भाषा नाही. केवळ साहित्याचे माध्यम म्हणजे भाषा नाही. मराठी वर्तमानपत्रांच्या आवृत्त्या वाढत आहेत. राजधानी किंवा उपराजधानीतून निघणाऱ्या वृत्तपत्रांच्या जिल्ह्य़ाच्या ठिकाणाहून आवृत्त्या निघत आहेत. तिथेच त्या आवृत्त्यांचे मुद्रण आणि प्रकाशनही होत आहे. चांगल्या साप्ताहिकांचे वाचन नव्याने निर्माण होणाऱ्या जागरूक वाचकांसाठी आवश्यक आणि आनंदाचे बनत चालले आहे. स्पर्धा परीक्षांसाठी ‘मराठी भाषा आणि वाङ्मय’ ही प्रश्नपत्रिका सखोल विषयाभ्यास म्हणून निवडता येते. मराठी भाषेत केवळ ललित साहित्य नाही, तर संगणक, मानसशास्त्रीय संशोधन अशा शास्त्रांसंबंधीची पुस्तकेही लिहिली जात आहेत आणि खपतही आहेत. नव्या मराठी वृत्तवाहिन्यांची संख्या वाढते आहे. त्यासाठी बऱ्यापैकी मराठी बोलणाऱ्या वार्ताहर, संवादक, विश्लेषक तरुण-तरुणींची गरज भासते आहे. यापुढच्या काळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपट आणि मालिकाही मराठी रूपात अवतरतील. शासकीय आणि राजकीय पातळीवरील मराठी शाळा आणि मराठी शिक्षण याविषयीची अनास्था सोडली (ती गंभीर व चिंतनीय बाब आहेच.) तर चांगले नाही, तरी बरे सुरू आहे असे (काही हातचे राखून) म्हणता येईल.
– आणि  इथेच मुद्दा येतो तो एक मराठी भाषिक माणूस म्हणून माझ्या जबाबदारीचा!
जगातील अनेक मोठय़ा राजकीय नेत्यांनी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले ते भाषेच्या बळावर! भाषेचा उपयोग कसा करायचा आणि कुठे करायचा, हे त्यांना चांगले कळत होते. आज मराठी नेते तोंडातल्या तोंडात काय बोलतात, हे तांत्रिक गुणवत्ता असलेला माईक ओठांच्या अगदी जवळ असूनही श्रोत्यांना कळत नाही. असे वाटते की, त्यांचे शब्द तंगडय़ात तंगडय़ा अडकून त्यांच्या तोंडातच कडमडत आहेत. कुस्त्यांची स्पर्धा असो की नागरिकांतर्फे सत्कार, ते काय बोलणार हे जाणकार श्रोते आधीच सांगू शकतात. त्यातून नेते आजकाल काही उथळ अभिनेत्यांना घेऊन येतात. उद्देश एकच- बापहो, ऐकत नाही तुम्ही; तर निदान पाहा तरी!
समारंभ, कार्यक्रम, सोहळा, उत्सव असे अनेक शब्द उपलब्ध असताना आपण ‘समारोह’ शब्द का डोक्यावर घेतलाय, हे कळत नाही. एखाद्या प्रश्नाला कोणी उत्तर न दिल्यास- ‘त्यांनी मौन राहून प्रश्नाला बगल दिली वा प्रश्न टाळला..’ असे छापून येण्याऐवजी ‘त्यांनी चुप्पी साधली’ असे मराठीत छापून येते तेव्हा सांगावेसे वाटते की, आपली भाषा भ्रष्ट न करणे हेसुद्धा भाषा सुरक्षित ठेवण्यासाठी करायचे एक मोठे काम आहे.
‘कानडीने केला । मराठी भ्रतार । एकाचे उत्तर । एकास न ये..’ असे तुकोबांनी वेगळ्या संदर्भात म्हटले होते. पण आजच्या काळात तर आपली भाषाच नीट येत नसल्यामुळे कुटुंबात संवादाची अशक्यता, संवाद टाळण्याकडे कल, गैरसमज, अनावश्यक कृती किंवा प्रतिक्रिया असे प्रकार घडत असल्याचे दिसून येते.
भाषेचे विविध स्तर, विविध प्रती, विविध छटा या कशा आत्मसात करता येतील? त्यांची गरज जाणवते तोपर्यंत वेळ आणि वय निघून गेलेले असते. एक बुद्धिमान, कष्टाळू, कर्तबगार माणूस समजा एका मोठय़ा बँकेच्या जिल्हा शाखेचा मॅनेजर झाला आणि बँकेकडे खानापूर नावाच्या खेडय़ातून ट्रॅक्टर घेण्यासाठी  कर्ज मागण्याकरता एखादा शेतकरी आला तर कर्जयोजनेचा तपशील कोणत्या भाषेत (मराठीच, पण..) मॅनेजरने समजावून सांगावा? त्याला विश्वासात कसे घ्यावे? आपल्या बँकेची योजना त्याच्या जास्त हिताची आहे, हे त्याच्या गळी कसे उतरवावे? यासाठी एकच साधन मॅनेजरजवळ आहे. ते म्हणजे- शेतकऱ्याला समजेल, विश्वासात घेईल अशी मराठी भाषा! ही, ‘अशी’ भाषा त्याला येत नसेल तर तो मॅनेजर म्हणून अपयशी ठरण्याचीच शक्यता आहे. ही भाषा शिकण्याची एक अशी शाळा नाही. ही जगण्याची भाषा जगता जगता शिकता येते. जीवनाचा कोष करून आपण भाषाही मर्यादित रूपात स्वीकारतो. कोषाबाहेरच अफाट विश्व असते.
ज्याला भाषा येते तो तहसील किंवा पंचायत समितीत कारकून जरी झाला, तरी तेथे त्याच्याकडे नेतृत्व चालून येते. छोटय़ा गटाचे, समूहाचे ते असेल; पण लोक त्याचे ‘ऐकतात.’ कुठला कार्यक्रम असेल, जयंती, पुण्यतिथी असेल; लोक त्याला ‘बोल’ म्हणतात. कारण त्याला बोलता येते. भाषेचे एक रूप त्याला त्याच्या कुवतीप्रमाणे प्रकट करता येते.
लिहिणे, वाचणे, ऐकणे, बोलणे या चार पातळ्यांवर भाषेशी मैत्री केली की माणूस एक भाषिक व्यक्तिमत्त्व धारण करतो. भाषणे, व्याख्याने, सीडी, कॅसेट्स, गाणी, भावगीते, अभंग, लावण्या, पोवाडे असे मराठीचे भाषिक आविष्कार ऐकले की माणूस श्रवणसमृद्ध होतो. म्हणून माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस केवळ भाषिकदृष्टय़ा नाही, तर सामाजिक-सांस्कृतिकदृष्टय़ाही समृद्ध आणि संपन्न होऊ शकतो. एकमेव नाही, पण एक उपाय असा- मराठी वाचा. मराठी लिहा. मराठी ऐका. मराठी बोला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व ऱ्हस्व आणि दीर्घ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Language and realization
First published on: 13-01-2013 at 01:07 IST