तंत्रज्ञानामुळे आज सगळ्याच क्षेत्रांचा चेहरामोहरा बदलतोय. संगीत क्षेत्रही याला अपवाद नाही. मात्र, बदलत्या काळात, अद्ययावत तंत्रज्ञानाच्या जमान्यात लता मंगेशकर नामक स्वर्गीय सुराचं अव्वल स्थान अबाधित आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज ८५ वा वाढदिवस.
‘या आवाजानं अक्षरश: पिढय़ान्पिढय़ांना तृप्त केलं.’ लता मंगेशकर यांच्याबद्दल नेहमीच हे वाक्य बोललं जातं. गंमत म्हणजे गेली ५० र्वष हे वाक्य बोललं जातंय आणि त्याची प्रचीतीही येते आहे. लता मंगेशकरांना ऐकणाऱ्या थोडय़ा बुजुर्ग पिढीची सध्याच्या संगीताशी नाळ जुळणं कठीण आहे. यो यो हनी सिंगपासून अनेकांच्या हल्लीच्या लोकप्रिय गाण्यांवर, ‘याला संगीत म्हणायचं का’, इथपासून मागच्या पिढीचा आक्षेप आहे. पण ‘यो यो’ ला ऐकणारी नवी पिढी लता मंगेशकरही ऐकतेय आणि आवडीने ऐकते आहे. हल्लीच्या पिढीला लतादीदींच्या गाण्याबद्दल माहिती आहे का, त्यांना या गाण्यांबद्दल काय वाटतं, हे जाणून घेण्यासाठी तरुणाईशी संवाद साधला, तेव्हा हेच वरचं वाक्य अधोरेखित झालं- ‘लता मंगेशकरांचे स्वर पिढय़ान्पिढय़ा गानरसिकांना रिझवताहेत.’
हल्लीची पिढी म्हणजे विशी-बाविशीच्या आतली पिढी. ही पिढी गाणं ऐकायच्या वयाची झाली, तेव्हा लता मंगेशकरांनी िहदी चित्रपटांसाठी पाश्र्वगायन करणं जवळपास बंद केलं होतं. टीव्हीवरच्या संगीत वाहिन्या ऐन जोशात सुरू झालेल्या होत्या. एका जागी बसून, कान देऊन रेडिओ ऐकणारी पिढी बाद झाली होती. गाणी ऐकवायचं काम आरजे, व्हीजे, डीजे करतात हेच या पिढीनं कायम पाहिलेलं. अपवाद वगळता या जॉकींकडून लता मंगेशकरांच्या गाण्याची अपेक्षा धरणंही दुरापास्त होतं. तरीही या पिढीपर्यंत लतादीदींची गाणी पोचली आणि नुसती पोचली नाहीत तर थेट हृदयाला भिडली. याला त्या आवाजातली जादू, स्वरातलं वैविध्य हे जसं कारणीभूत आहे तसं या तरुणाईच्या म्हणण्याप्रमाणे लता मंगेशकरांच्या गाण्याची ‘रेंज’ आणि ‘क्वान्टिटी’ हेदेखील कारण आहे.
तरुण पिढीला लता मंगेशकर यांच्या गाण्याबद्दल काय वाटतं, हे शोधण्यासाठी आम्ही राज्यभरातील सुमारे १०० जणांशी संवाद साधला. ही सगळी मुलं १५ ते २५ या वयोगटातली होती आणि मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरपासून बारामती, यवतमाळ, लातूर अशा अनेक ठिकाणची होती. सगळ्यांच्या बोलण्यात लता मंगेशकरांविषयी प्रचंड आदर दिसला. ‘नवी गाणी आवडतात. पण जुन्या गाण्यांची जादू काही और आहे’, हे त्यांचं प्रातिनिधिक मत. लता मंगेशकरांची कुठली गाणी आवडतात, असं विचारल्यावर बहुतेकांनी ‘खूप गाणी आवडतात’, असं उत्तर दिलं. आवडत्या गाण्यांची त्यांची यादी बघितल्यावर लतादीदींच्या गाण्यातलं वैविध्य पुन्हा एकदा सिद्ध व्हावं एवढी गाणी समोर आली.
आताच्या या पिढीपुढे गाणी ऐकायला अनेक माध्यमं आहेत. रेडिओ, टीव्ही तर आहेच, पण त्याच्या जोडीला मोबाइल, म्युझिक सिस्टीम, एमपीथ्री प्लेअरही आहेत. ‘लता मंगेशकरांचा आवाज पहिल्यांदा कॉम्प्युटरवर बाबांनी लावलेल्या गाण्यातून ऐकला’, असं ही पिढी सांगते. ‘ओल्ड क्लासिक्स’ची व्याख्या नव्या पिढीसाठी वेगळी असेलही. कारण ही पिढी १९९८ मध्ये लता मंगेशकरांनी ए. आर. रेहमानसाठी गायलेल्या ‘जिया जले’ गाण्यालाही जुन्या गाण्यांच्या यादीत टाकते. पण तरीही या पिढीनं ‘आयेगा आनेवाला’ ऐकलं आहे. नुसतंच ऐकलं नाही, तर यू टय़ूबवर पाहिलं आहे. ‘इतक्या कमी वाद्यांच्या जोरावर किंबहुना वाद्यांचा कल्लोळ नसल्यामुळेच गाणं ऐकायला किती मधुर वाटतं, हे लता मंगेशकरांच्या याच जुन्या गाण्यांमुळे तर आम्हाला कळलं,’ असं ही पिढी सांगते. त्यांच्याकडे लता मंगेशकरांच्या गाण्यांचं स्वतंत्र ‘फोल्डर’ असतं.
ही गाणी या पिढीपर्यंत पोचली ती त्याच्या सांगीतिक बारकाव्यांसह हे विशेष. म्हणजे काहींना लता मंगेशकरांनी गायलेली शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी जास्त आवडतात. कारण एक तर आता अशी गाणी होतच नाहीत. झालीच तरी लता मंगेशकर त्यात जो भाव ओतायच्या, त्याबरोबरीने त्यातल्या हरकती घ्यायच्या ते कुणालाच शक्य होणार नाही. असं या मुलांचं म्हणणं. ‘रैना बीती जायें’ ऐकायला सहज वाटतं, पण गाणं गायचा प्रयत्न करा.. तसं गाणं उतरतच नाही’, गाणं शिकणारी १५ वर्षांची मानसी जोशी सांगते. तरुण पिढीला जुनी गाणी माहिती नाहीत, हा समज या मुलांनी पुरता खोटा ठरवला. यातल्या काही मुलांना अगदी गाण्यांचं वैशिष्टय़, संगीतकार कोण वगरेपासून सगळी माहिती होती. लता मंगेशकर आवडतात, म्हणजे फक्त त्यांचं केवळ चित्रपटसंगीत आवडतं असं नाही. लता मंगेशकरांनी गायलेल्या गझल आवडतात, भावगीतं आवडतात, त्यांच्या आवाजातला गीतेचा अध्याय आवडतो, त्यांचं ‘वंदे मातरम्’ आवडतं असं सांगणारीही मंडळी सापडली. ‘लता मंगेशकर आणि पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं ‘बाजे मुरलीयाँ बाजे’ हे गाणं मला खूप आवडतं. त्यांच्या आवाजातली सगळी भजनं आवडतात. ‘ए मेरे वतन के लोगों’ ऐकताना प्रत्येक वेळी तितकीच शहारते मी.’ श्रेया अयाचित सांगते. हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेल्या ज्ञानेश्वरांच्या रचना, सावरकरांचं ‘ने मजसी ने’ हे आवडणारी तर अनेक मुलं सापडली.
हल्लीच्या या पिढीपर्यंत हा स्वर्गीय स्वर आणि त्यातली ताकद पोचवण्याचं श्रेय आधीच्या पिढीला जातं. बहुतेकांनी लता मंगेशकर हा आवाज अगदी लहानपणीच ऐकला. आई-वडील, आजी-आजोबा यांच्यामुळे ही गाणी आधी आम्हाला माहिती झाली, असं त्यांनी सांगितलं. ‘माझ्या लहानपणी ‘नीज माझ्या नंदलाला हे गाणं आई ऐकवायची आणि मगच मला झोप यायची. अंगाईगीत म्हणजे ‘नीज माझ्या नंदलाला,’ हेच मला माहिती होतं. आता घरापासून दूर राहतेय तेव्हा हे गाणं ऐकलं की आईची मनापासून आठवण येते. ती जवळ आहे, असा भास होतो. ही हृदयाला हात घालण्याची स्वरांची जादू इतर कोणाच्या गायकीत आहे, असं वाटत नाही,’ नगरची ऐश्वर्या शेवाळे हे सांगते तेव्हा लतास्वरांची जादू नव्या पिढीपर्यंत तितक्याच प्रभावीपणे पोचल्याची जाणीव होते. ‘एका प्रसिद्ध आंतरमहाविद्यालयीन स्पध्रेत आमच्या कॉलेजची टीम पहिल्या फेरीतच बाद झाली. आम्ही शेवटचं एकत्र जमलो तेव्हा कुणीतरी लतादीदींचं ‘लुका-छुपी’ लावलं. इतकं भिडलं ते की, आम्ही सगळेच रडलो तेव्हा.’ पुण्याचा ओशन आपटे सांगतो.
लतादीदींची गाणी का आवडतात, तर गाण्यातले भाव थेट पोहोचतात. गाण्याच्या शब्दांतल्या भावना थेट स्वरातून उमटतात. मराठी न कळणाऱ्या मत्रिणीला ‘सुन्या सुन्या मफिलीत माझ्या’ ऐकवलं तर तीदेखील या गाण्याच्या प्रेमात पडली, असं एकजण सांगत होती. लतादीदींचा भावपूर्ण स्वर काळजाला भिडतो, ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया सगळ्यांनी व्यक्त केली. नव्या संगीतावरदेखील ही पिढी प्रेम करते. नव्या काळच्या रॅपच्या अगदी विरुद्ध जाणारी लता मंगेशकरांची गाणीदेखील ते मन लावून ऐकतात. हा विरोधाभास जाणून घ्यायचा प्रयत्न केला. ‘नवी गाणी आम्ही अर्थातच ऐकतो. पण ती कधी ऐकायची हे ठरलेलं असतं. म्हणजे पार्टीमध्ये, एकत्र िधगाणा सुरू असताना.. थोडक्यात टाइमपास म्हणून आम्ही रॅप ऐकतो. पण शांतपणे आता काहीतरी चांगलं ऐकू, मूड चांगला होईल असं वाटतं तेव्हा जुन्या गाण्यांना पर्याय नसतो आणि जुनी गाणी म्हटलं की लतादीदींना  पर्याय नाही’, असा सूर अनेकांनी आळवला.
आवडती गाणी
तरुणाईच्या मनातली लतादीदींची गाणी जाणून घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा ठरावीक कालखंडातली गाणी समोर आली नाहीत. ‘आयेगा आनेवाला’पासून ए आर रेहमानच्या ‘लुका- छुपी’पर्यंत अनेक गाण्यांची यादी या मुलांनी मनातली गाणी म्हणून सांगितली. तरुणाईच्या या आवडत्या गाण्यांच्या यादीवर नजर टाकली तरी त्यातून लतादीदींच्या गायकीतलं वैविध्य समोर येतं. ‘ए मेरे वतन के लोगो’, ‘लग जा गले’, ‘रैना बीती जायें’, ‘मोगरा फुलला’, ‘भय इथले संपत नाही’ ही गाणी अनेकांच्या यादीत अग्रस्थानी आहेत.

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
anna hazare arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा माणूस कधी…”
rupali chakankar jitendra awhad
“रुपाली चाकणकरांच्या बुद्धीची कीव येते”, सुप्रिया सुळेंवरील ‘त्या’ टीकेला आव्हाडांचं उत्तर; म्हणाले, “बुरसटलेले विचार…”