16 October 2019

News Flash

माध्यमयुगाचा आवाज!

लता मंगेशकर यांच्या गानवैशिष्टय़ांची तटस्थपणे आणि आगळ्या कोनातून चिकित्सा करणारा लेख.. त्यांच्या नव्वदीनिमित्ताने!

|| डॉ. चैतन्य कुंटे

‘जनसंगीत’ या संगीतकोटीतील चित्रपट संगीत आणि भावगीत या दोन महत्त्वाच्या प्रवाहांना अभिजाततेचे परिमाण देणाऱ्या कलाकार म्हणजे लता मंगेशकर! ज्यांच्या कामगिरीचा गहिरा ठसा संपूर्ण बृहत्-भारतीय संगीत संस्कृतीवर सदैव राहील अशा लता मंगेशकर या केवळ एक व्यक्ती नाहीत; तर त्या एक ‘सांगीतिक घटना’ (म्युझिकल फेनॉमिनन) आहेत.

लता मंगेशकर यांच्या गानवैशिष्टय़ांची तटस्थपणे आणि आगळ्या कोनातून चिकित्सा करणारा लेख.. त्यांच्या नव्वदीनिमित्ताने!

ज्यांच्या स्वरांनी माझ्यासारख्या अनेक पिढय़ांचे सांगीतिक पोषण झाले, ज्यांची गीते ही आपणा सर्वाच्या भावजीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेत आणि ज्यांच्या कामगिरीचा गहिरा ठसा संपूर्ण बृहत्-भारतीय (पॅन-इंडियन) संगीत संस्कृतीवर सदैव राहील अशा लता मंगेशकर या केवळ एक व्यक्ती नाहीत; तर त्या एक ‘सांगीतिक घटना’ (म्युझिकल फेनॉमिनन) आहेत, हे निर्वविाद सत्य! लताजींबद्दल आजवर विपुल भाषणे व लेखन झाले आहे. त्यांच्या गानमहिम्याचे गुणवर्णन अनेकांनी मुक्तकंठाने केले आहे. त्यात बडे गुलाम अली खांसाहेब, पं. कुमार गंधर्व अशी रागसंगीतातील मंडळी आणि अनेक संगीतकारांचाही समावेश आहे. एवढेच काय, त्यांचे सांगीतिक, व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य यांवरही पुष्कळ टिप्पणी केली गेली आहे. इतक्या साऱ्यानंतर म्या पामराने काय आणि का लिहावे, असा प्रश्न साहजिकच आहे! मात्र, लताजींच्या नव्वदीनिमित्त लिहा असे सांगण्यात आले तेव्हा वाटले की त्यांच्याबद्दल पूर्ण आदर बाळगून, तरीही वस्तुनिष्ठ तटस्थपणे लिहावे. (भारतात- विशेषत: कलाविषयात आणि त्यातही संगीत क्षेत्रात श्रेष्ठांना देवतेच्या मखरात बसवून व्यक्तिपूजा मांडण्याचा प्रघात आहे. दुर्दैवाने वस्तुनिष्ठता आणि विश्लेषण म्हणजे ‘मूर्तिभंजन’ नव्हे, तर ते व्यक्तीच्या कार्याची जाणीवपूर्वक, निरोगी वृत्तीने घेतलेली दखल असते, हा विचार अजूनही रुजलेला नाही. असो!)

‘जनसंगीत’ या संगीतकोटीतील चित्रपट संगीत आणि भावगीत (यात मराठी गीते, उर्दू गझल, हिंदी, बंगाली इ. प्रादेशिक भाषांतील गीते हे सारेच अध्याहृत!) या दोन महत्त्वाच्या प्रवाहांना अभिजाततेचे परिमाण देणाऱ्या कलाकार म्हणजे लता मंगेशकर! त्यांच्या कारकीर्दीचा आरंभ संगीत नाटकांत भूमिका आणि गायन करण्यातून झाला. पुढे मराठी-हिंदी चित्रपटांत बालकलाकार म्हणूनही त्यांनी अभिनयासह गायन केले. मात्र, एका टप्प्यानंतर त्या प्रत्यक्ष अभिनयाच्या क्षेत्रातून बाजूला झाल्या आणि केवळ पार्श्वगायिका म्हणून त्यांची पुढची कारकीर्द झाली. अर्थात आरंभापासून त्यांच्या व्यक्तित्वात असलेले अभिनयाचे अंग त्यांनी गायनात लाजवाबपणे मिसळले. चित्रपट संगीतास आवश्यक अशी नाटय़ात्मता, शब्दोच्चारांतून केलेला अभिनय, रजतपटावर दर्शित नायिकेच्या अभिनयशैलीला साजेसे गायन हे त्यांचे गुणविशेष. ‘आधीच्या पार्श्वगायिका केवळ आवाज देत होत्या. पण लता गाण्यांतून भूमिका करते..’ असे मजरूह सुलतानपुरींसारख्या शायरने केलेले बोलके विधान या संदर्भात स्मरते.

आपण ज्या माध्यमासाठी गात आहोत त्याचे आणि त्याच्या तांत्रिकतेचे योग्य भान लताजींना होते आणि म्हणूनच त्या अल्पावधीत यशस्वी ठरल्या. ध्वनिमुद्रकासमोर गाण्याचे तंत्र त्यांनी आत्मसात केले. एवढेच नव्हे तर हे तंत्र जसजसे बदलत गेले तसे त्या स्वत:ही अद्ययावत होत गेल्या. ज्या काळी सर्व वाद्यमेळ व गायक यांचे एकत्रच ध्वनिमुद्रण केले जाई- ट्रॅक पद्धतीने मुद्रण होत नसे, फीडबॅक मॉनिटर्स नसत- त्या काळात लताजी (आणि तेव्हाचे सर्वच कलाकार) इतके अचूक, सुरेल आणि प्रभावी कसे गात असत याचा राहून राहून अचंबा वाटतो. अनेक अवघड गीतांचे ध्वनिमुद्रण लताजींनी एकाच टेकमध्ये केले असे सांगितले जाते. अतिशयोक्तीचा भाग वगळला तरीही त्यांची ग्रहणशक्ती आणि तंत्र-माध्यमावरचे प्रभुत्व हे बेलाशकपणे सलाम करावा असेच आहे!

लताजींनी ‘उपयोजित संगीताचा आवाज’ म्हणून एक खास आविष्कार आपल्या गायनातून सिद्ध केला आणि यासंदर्भात त्या ‘आदर्श’ (रोल मॉडेल) बनल्या. त्यांच्यामुळे अत्यंत सफाईदार, चमकदार आणि नागर अभिजातता असलेल्या गाण्याचा साचा प्रस्थापित झाला. साधारणत: जनसंगीत आणि उपयोजित संगीतातील कलाकृती आणि कलाकार यांची कारकीर्द आणि व्यवहारमूल्य (शेल्फ लाइफ) अल्पजीवी असते असा सिद्धांत आहे. मात्र लताजी, आशाजींसारखे काही मोजके कलाकार व त्यांची गीते ही यास अपवाद ठरतात.

लताजींच्या आवाजाचा विचार करताना नाटय़शास्त्रातील ३३ व्या अध्यायातील कंठ आणि गायिका यांच्या गुणाचे निर्देश आठवतात. भरतमुनी म्हणतात की, श्रवण (गरिमावान, सहज ऐकू येईल असा), घन (रुंद), स्निग्ध (लवचीक), मधुर, अवधानवान (योग्य तसा स्वर गाणारा, बेसूर न होणारा), त्रिस्थानशोभित (तीनही सप्तकांत शोभणारा) हे कंठाचे सहा गुण आहेत. गायिकेचे गुण ते नमूद करतात : तिचे गायन हे पेशल (मृदू), अनुनादी (वाद्यांच्या स्वरात पूर्णत: मिसळून जाणारे), समरक्त (योग्य तेवढाच आणि अपेक्षित असाच भावरंग देणारे) असावे. गायिकेस गमकविधीची, तालाची, कुतपातील वाद्यकरणांची (वाद्यमेळातील वाद्यांच्या वादनतंत्राची) माहिती असावी. यांसोबत गायिका रूपवान, कांतीयुक्तही असेल तर तिला ‘श्यामा’ म्हणतात. भरताचे हे गायिका-वर्णन अर्थातच नाटय़ासाठी, दृश्यमितीसाठी गान करणाऱ्या गायिकेचे आहे. आणि म्हणूनच लताजी (आणि अर्थातच आशाजीही) म्हणजे भरताने वर्णिलेल्या ‘श्यामा’ गायिकेचे आदर्श उदाहरण म्हणता येईल.

त्यांचा आवाज ‘अप्पर रजिस्टर’चा आहे. म्हणूनच उंच पट्टीत तो प्रकाशमान व टोकदार वाटतो. सलिलदांसारख्या पाश्चात्त्य संगीताच्या जाणकाराने काही गाण्यांत त्यांना ‘सोप्रानो’ पद्धतीने गायला दिले ते या गुणामुळेच. मात्र, खालच्या पट्टीत किंवा मंद्र सप्तकात हा आवाज किंचित पुसट होत असला तरी तो अधिक भावगद्गद वाटतो. दुर्दैवाने फार कमी गाण्यांत त्यांच्या आवाजातील या क्षमतेचा वापर केला गेला.

त्यांचे गायन सहज, विनासायास वाटते, हाही एक महत्त्वाचा गुण आहे! वास्तविक हे गायन वाटते तितके इतरांना आणि त्यांनाही विनासायास नव्हते, तर ते त्यांनी मेहनतीने कमावले होते. मात्र, त्या घोटीवपणातून आलेली आभासी सहजसाध्यता सामान्यांनाही त्यांचे गाणे गुणगुणण्यासाठी उद्युक्त करू शकते, हे विशेष! ‘शुद्ध मुद्रा, शुद्ध वाणी’ या उक्तीचे तर त्या मूर्तिमंत उदाहरण आहेत!

केवळ निसर्गदत्त आवाज आणि रागसंगीताचे शिक्षण एवढय़ाच भांडवलावर लता मंगेशकर हे गानरसायन सिद्ध झालेलं नाही. त्यांनी मिळवलेले यश, त्यांची स्वतंत्र वाट आणि एक व्यावसायिक कलाकार म्हणून जवळपास सहा दशके यशोशिखरावर टिकून राहणे- यामागे ज्या माध्यमासाठी आपण गात आहोत ते माध्यम नेमके काय आहे हे जाणून घेऊन त्यानुसार आविष्कार करण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अद्वितीय आवाज आणि कमालीची ग्रहणशक्ती या त्यांना लाभलेल्या दैवी देणग्या होत्या. मात्र, त्यांच्या जोडीला श्वासाचे उत्तम नियोजन, लयीचे सूक्ष्म भान, गेय भाषेवर मिळवलेले प्रभुत्व आणि ध्वनिमुद्रण तंत्राचे पूर्ण भान हे चार गुण त्यांनी पूर्णत: मेहनतीने कमावलेले जाणवतात. विविध भाषांतील गीते गाताना त्या, त्या भाषेतील योग्य आणि परिणामकारक शब्दोच्चार करण्याचे त्यांचे कसब अलौकिक आहे.

त्यांच्या गायनात इतकी भावपूर्णता कशी येते? विचार करता लक्षात येते की गरिमाबदल (व्हॉल्युम व्हेरिएशन) आणि स्वनाधिक्य-स्वनान्त (फेड इन्- फेड आऊट) या दोन्हीवर कमालीचे प्रभुत्व असल्याने त्यांना भावनिर्मितीसाठी फार काही वेगळे करावे लागत नाही. भावात्म परिणाम साधताना त्या चार तंत्रे वापरतात.. १) स्वरोच्चारामधील गरिम्यातील सूक्ष्म चढउतार, २) शब्दोच्चारातील दबाव कमी-अधिक करून उच्चार अलगद वा ठाशीव करणे, ३) श्वासाच्या भारीतपणात किंचितसा बदल करणे, आणि ४) शब्द-स्वरांतील लयीला हलकासा अंतर्गत दोला देणे. एवढेच करून त्यांचे भागते, अन्य नाटकीय तंत्रे त्यांना वापरावी लागत नाहीत. यात त्यांचे मोठेपण आहे! ‘भाषण ते गायन’ या प्रवासातील सर्व आविष्कार प्रभावीपणे करण्याची त्यांची क्षमता अचंबित करणारी आहे. गीताच्या दरम्यान शब्द किंवा वाक्य बोलणे, हुंकार, सुस्कार, कुजबुज, पुकार असे सगळे उच्चारमार्ग त्यांनी सफाईने वापरले.

त्यांचा आवाज ‘निरंगी’ आहे. म्हणजे त्याला स्वत:चा एकच एक रंग नाही, तर टाकावा तो रंग त्या आवाजावर चढतो. प्रसन्नता आणि कारुण्य या परस्परविरोधी भावनांना एकाच वेळी स्पर्श करण्याची क्षमता या आवाजात आहे. मात्र, एक खरे की, हा आवाज हळव्या, खिन्न, हताश, करुण भावना व्यक्त करताना सर्वाधिक परिणामकारक ठरतो. प्रेमभावना व्यक्त करणाऱ्या त्यांच्या गीतांत उत्कटता असूनही तो आविष्कार विलक्षण संयत वाटतो. ते ‘धीरललित’ गीत असते. तिथे बटबटीतपणाला थारा नाही. त्यांचा आवाज तकलादू, नाजूक नाही. अपेक्षित असेल तिथे करारी होण्याचीही क्षमता त्यात आहे. राष्ट्रभावनादर्शक गीते गाताना आगळे तेज, ओजस्विता त्यांच्या स्वरांत येते.

त्यांच्या गायनात देश्यता (रस्टिकनेस) नाही, नागर संवेदना आहे. लोकगीत बाजाच्या चालीही त्यांनी प्रभावीपणे गायल्या. मात्र, त्याही नागरतेचे संयत वस्त्र पांघरून. लोकगीतांच्या ढंगासाठी आवश्यक असणारा अ-नागरी किंवा ग्राम्य पोत, ठसठशीत उच्चारण आणि आवाजाच्या झोताचा खुलेपणा त्यांनी स्वीकारला नाही. पारंपरिक दादऱ्याच्या चालींवर बेतलेल्या गीतांचे लताजींनी केलेले गायन आणि त्या रचनांचा पूर्वीच्या (खासकरून कोठेवाल्या) गायिकांनी केलेला आविष्कार यांचे तुलनात्मक श्रवण करता हा मुद्दा लक्षात येईल. अर्थात लताजींनी असे करणे ही चित्रपट संगीताच्या नव्या माध्यमाची गरज होती आणि म्हणूनच त्यांची शैली ही उत्तरवर्ती गायिकांकडून अनुसरली गेली.

शास्त्रीय संगीताच्या (खरे तर कलासंगीताच्या) बाजूने विचार करता आज लता मंगेशकर यांचे कलामूल्य कसे जोखता येते? प्रथमत: ध्यानात घ्यावे लागेल की, हिंदुस्थानी रागसंगीत हे काही चित्रपटगीत वा भावगीताप्रमाणे ‘निबद्ध संगीत’ नव्हे. तत्कालत्स्फूर्त आवर्ती विस्तार हा रागसंगीतात अनुस्यूत असलेला गुणविशेष आहे. लताजींनी असे अनिबद्ध, तत्कालत्स्फूर्त विस्ताराचे गायन फारसे केले नाही. तेव्हा असे मूल्यमापन शक्य आहे का?

लताजींनी प्रथम वडील, नंतर उस्ताद अमान अली खां, तुलसीदास शर्मा, अमानत अली खां अशा गवयांकडून रागसंगीताची तालीम घेतली होती. आणि पार्श्वगायनाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी अल्प काळ त्यांनी खयाल गायनही केल्याचे त्यांच्या समकालीनांनी नमूद केले आहे. मात्र, मालकंस रागाचे त्यांनी केलेले गायन हा एक अपवाद वगळता विशुद्ध रागसंगीताचा असा विस्तारशील आविष्कार त्यांनी केल्याची उदाहरणे आज दुर्दैवाने उपलब्ध नाहीत. ‘लताजींनी विशुद्ध रागसंगीत गायले नाही. तसे त्यांनी गायला हवे होते,’ असे मत पूर्वीही काहींनी मांडले होते. लताजींनी पार्श्वगायनाचे एक उच्च शिखर पादाक्रांत करून झाल्यावर आता खयाल गायकीकडे वळावे अशीही अपेक्षा काहींनी व्यक्त केली होती. तसे झाले असते तर काय? वगैरे स्वप्नरंजनात न रमता, वास्तवात ते स्वप्न काही आले नाही याचा स्वीकार करायला हवा.

रागाधारित, बंदिशीच्या धाटणीच्या अनेक गीतांत लताजींच्या रागसंगीताच्या रियाजाचा अंदाज बांधता येतो. अनेक रागांचे ‘सही’ (म्हणजे रागरूप नेमकेपणाने दर्शवणारे) स्वरलगाव, आलापांतील चनदारी, कमालीची दाणेदार तान, मींड-लहक-खटका-मुरकी-हरकत यांतील सहज, प्रभावी फिरत यांतून त्यांचा रागसंगीताचा अभ्यास दिसून येतो. लताजींनी कलासंगीताची वाट सोडली तरी त्याचा रियाज सोडला नाही. आणि त्याचमुळे कदाचित त्यांच्या गायनात असलेला अतीव सुरेलपणा, मोठा तारतापल्ला, फिरत, दमसास हे स्तिमित करणारे गुण दीर्घकाळ टिकून राहिले.

लताजींच्या आवाजात खयाल गायकीस अपेक्षित वजन, बोजदारपणा नसला तरीही त्यात असलेली तरल आद्र्रता आणि शब्दोच्चारांतील लालित्य या गुणांचा प्रभाव रागदारी गाणाऱ्यांवरही आहे, हे मान्य करायला हवे. त्यांच्या पार्श्वगायनाच्या शैलीचा प्रभाव उत्तरवर्ती गायिकांवरच नव्हे, तर रागसंगीत गाणाऱ्या काही समकालीन गायिकांवरही निश्चितपणे होता. काही गायिकांनी तो खुलेपणाने मान्यही केला.

कदाचित अगदी लहान वयापासून नाटय़ व चित्रपट या क्षेत्रांच्या संपर्कात आल्याने त्या, त्या माध्यमासाठी नेमके काय हवे याचे उत्तम भान लताजींना लाभले व त्यानुसार आपला कौशल्यसंच त्यांनी विकसित केला. प्रत्येक संगीतकाराची शैली, गीतातील अंगभूत आशय आणि दर्शित नायिकेचा अभिनय या बाबी जाणून घेऊन या तीनही पातळ्यांवर आपली स्वत:ची खास प्रक्रिया- ‘म्युझिकल प्रोसेसिंग’- करून लताजींनी गायन केले. लताजी संगीतकाराने दिलेली चाल सुरातालात नुसती नीट गाणाऱ्या गायिका नव्हत्या, तर त्यांचे सर्जनात्मक संस्कार गीतांवर होत आणि ते गीत केवळ संगीतकाराचे उरत नसे.. ते ‘लताजींचे गीत’ होई! ‘लता-गीत’ म्हणून सिद्ध झालेले हे गीत पुढेही प्रवास करते. कोणत्याही व्यक्तीच्या अनुभवाशी तादात्म्य साधण्याची सिद्धी असल्याने ते गीत विशिष्ट चित्रपट, चित्रित पात्र, प्रसंग, कवी, संगीतकार यांचे न उरता ते ‘तुमचे-आमचे’ होते. आणि त्यामुळेच अंतिमत: लता मंगेशकर या ‘भारताच्या संगीत-मानसाचे सांस्कृतिक प्रतीक’ ठरतात!

(लेखक हार्मोनिअम वादक, संगीतकार आणि संस्कृती-संगीतशास्त्राचे अभ्यासक आहेत.)

keshavchaitanya@gmail.com

First Published on September 22, 2019 1:37 am

Web Title: lata mangeshkar turns 90 musical phenomenon abn 97