05 July 2020

News Flash

‘लिव्हीन् ला विदा लोका’

बालगंधर्वाचं एक नाटय़गीत आहे : ‘मला मदन भासे हा मोही मना.’ आणि ते कधीही ऐकलं की मला रिकी मार्टिनच डोळ्यांपुढे दिसू लागतो.

| May 4, 2014 01:01 am

बालगंधर्वाचं एक नाटय़गीत आहे : ‘मला मदन भासे हा मोही मना.’ आणि ते कधीही ऐकलं की मला रिकी मार्टिनच डोळ्यांपुढे दिसू लागतो. तुमच्यापैकी ज्यांनी रिकीला गाणं गाताना पडद्यावर पाहिलं आहे, त्यांना माझं विधान क्षणात पटेल. आणि रिकी मार्टिनला ज्यांनी कधीच भेट दिलेली नाही, त्यांनी ‘गुगल’वर लगेच त्याला भेटण्याची तजवीज करावी! रिकी मार्टिन म्हणजे मदनच. भक्कम बांध्याचा, तरणाबांड पोतरेरिकन मदन! त्याचं ‘लिव्हीन् ला विदा लोका’ गाणं प्रसिद्ध झालं तेव्हा माझ्या निदान तीन मैत्रिणी तरी त्वरेनं त्याच्या प्रेमात पडल्या होत्या. आणि तरुण वयात असं होतंच. नाही? मुळात ते गाणंदेखील किती तरुण होतं! एका रंगेल पोराला (म्हणजे रिकीला) एक भामटी, पण रंगेल पोरगी भेटते.. घुमवते आणि मग त्या रात्रीनंतर येणाऱ्या सकाळी ध्यानात येतं की तिनं तुम्हाला झोपेची गोळी देऊन तुमचं पाकीट लंपास केलं आहे! त्या गाण्याचा व्हिडीओ हा असा तरुण, उफाडय़ाचा आहे. आणि सतेज आवाजात तो गाणारा रिकी :
Upside inside out she’s livin la vida loca
She’ll push and pull you down, livin la vida loca
‘इकडून तिकडून, आतून बाहेरून, ही तर ‘क्रेझी’ पोरगी
तुम्हास ओढेल, ढकलेल टेसात, ही तर वेडी मुलगी’
या गाण्याला प्रसिद्धी मिळाली यात काही आश्चर्य नव्हतं. आश्चर्य हे होतं, की जाणकारांनाही तेव्हा या गाण्यानं एक संगीताची नवी दिशा दाखवल्याचं पटकन् कळलं नाही! ते गाणं केवळ प्रणयक्रीडेचं वर्णन करणारं मोकळंढाकळं, चटकदार गाणं नव्हतं; ते दुसऱ्या पिढीच्या स्थलांतरितांसारखं नव्या भूमीला जोखून असलेलं गाणं होतं. या गाण्याचा बाज अमेरिकन पॉप संगीताचा होता खरा; पण त्याचं स्पॅनिश, पोतरेरीको बेटावरचं संवेदन हरवलेलं नव्हतं. साऱ्या इंग्रजी गाण्यात अट्टहासानं आणि अभिमानानं ‘लिव्हीन् ला विदा लोका’ (Livin la vida loca) हे स्पॅनिश शब्द वापरीत ते जागं होतंच. या गाण्यामध्ये लॅटिन ठेका होता. रिकीचा खास लॅटिन नृत्याचा पदन्यास होता. हां, पण गाण्याच्या शेवटी वाजणारी इलेक्ट्रिक गिटार ही या गाण्याला पुरेसं अमेरिकन पॉप-रॉकदेखील बनवीत होती. म्हणूनच हे गाणं मुळात पोचलं. जगभर रिकीला चाहते मिळाले. त्याचे फोटो नव्वदीच्या दशकात हजारो टीनेजर्सच्या खोल्यांमध्ये विराजमान झाले. तो इतका प्रसिद्ध झाला, की त्याच्याच रेकॉर्डच्या प्रकाशनाच्या वेळी चाहत्यांच्या लाटेला टाळण्यासाठी त्याला हेलिकॉप्टरनं व्यासपीठाजवळ पोहोचवण्यात आलं! ही अपार प्रसिद्धी त्याला अनेक कारणांमुळे मिळाली. एकतर तो उत्तम गातो. त्याचा चेहरा, व्हिडीओ, नृत्य हे न बघताही त्याचं गाणं ऐकलं तरी त्या आवाजाचा कस कळतो. खेरीज तो अप्रतिम ‘हिप शेकिंग’ करत नाचतो. वर अफाट ‘हॅण्डसम’ दिसतो. एवढं असल्यावर प्रसिद्धी मिळणार यात नवल नाही.
पण त्याच्या प्रसिद्धीचं अजूनही एक मुख्य कारण म्हणजे त्यानं लॅटिन अस्मितेला दिलेला आवाज! १९९९ साली ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याची सुरुवातच मुळी रिकी मार्टिनच्या गाण्यानं झाली. ग्रॅमीसारख्या प्रतिष्ठित व्यासपीठावर रिकीच्या गाण्याद्वारे प्रथमच स्पॅनिश शब्द उच्चारले गेले. त्याचं गाणं रंगलं. लॅटिन वाद्यं त्या व्यासपीठावर जोरकसपणे वाजली. समोर संगीत क्षेत्रामधले सारे दिग्गज बसलेले होते. त्यांनी ते गाणं उचलून धरलं. मॅडोनासारखी जगप्रसिद्ध पॉपस्टार उठून टाळ्या वाजवत ताल धरू लागली आणि तिकडे टी.व्ही.वर तो सोहळा बघणाऱ्या लॅटिनो मंडळींच्या डोळ्यांमधून घळाघळा पाणी वाहू लागलं होतं. आता त्यांच्या बेटावरच्या संगीताला कोणी कमी लेखणार नव्हतं. आता त्यांच्या स्पॅनिश शब्दांना गाण्यामध्ये कुणी अटकाव करणार नव्हतं. रिकीनं त्या दिवशी जणू या लॅटिन अमेरिकन निर्वासितांच्या इतक्या वर्षांच्या स्थलांतराच्या संघर्षांमध्ये त्यांना निर्णायक विजय मिळवून दिला होता!
आणि मग टॉमी मोटोलासारख्या चतुर निर्मात्यांनी ती ‘लॅटिन पॉप’ची लाट पसरविण्यासाठी केलेले सारे प्रयत्न फळास आले. रिकीचा पहिला इंग्रजी अल्बम आल्याबरोबर तीनेक आठवडय़ांमध्ये जेनिफर लोपेझचा पहिला ‘क्रॉसओव्हर’ अल्बम प्रसिद्ध झाला. ‘जे. लो.’ असं तिच्या नावाचं सुंदर लघुरूप तिच्या चाहत्यांनी केलं. ‘जे. लो.’ ही ‘नूयोरिकन’ अस्मितेचं सुंदर प्रतीक होतं. ‘नूयोरिकन’ (Nuyorican) ही खास स्पॅनिश संज्ञा. लॅटिन अमेरिकन निर्वासित, विशेषत: पोतरेरिकोची माणसं न्यूयॉर्कमध्ये डेरेदाखल झाली. त्यांची पुढची पिढी न्यूयॉर्कमध्ये वाढली. पण दोन भिन्न संस्कृती समजून घेताना त्यांची ओढाताणही झाली. बाहेर ऐकायचं असे मित्रांसोबत मायकेल जॅक्सनचं गाणं. घरी आल्यावर मात्र एखाद्या स्पॅनिश गाण्यावर त्यांचे पाय हलू लागत. त्यातली पुष्कळ मंडळी ही त्या दोन विश्वांत राहताना स्वत:ला हरवूनदेखील बसली. पण त्याहून जास्त ‘नूयोरिकन’ तरुण हे दोन्ही जगांमध्ये सहजतेनं नांदायला शिकले. ‘जे. लो.’ त्या जिंकलेल्या ‘नूयोरिकन’ मंडळींचं सुभग दर्शन आनंदात घडवीत म्हणत होती- ‘‘I am feeling so good’’ न्यूयॉर्कच्या ब्राँकस उपनगरामधलं तिचं घर.. सकाळी तिच्या पोतरेरिकन रॅपर मित्रांच्या फोननं तिला आलेली जाग.. तिचं न्यूयॉर्कच्या अॅव्हेन्यूवरचं भटकणं आणि ‘शॉपिंग’.. तिच्या मैत्रिणी.. आणि मग रात्री पबमध्ये चाललेली मस्ती.. ‘जे. लो.’चा त्यामधला अप्रतिम हिप-हॉप डान्स.. आणि मग शेवटी रात्री मेट्रोचा प्रवास आणि त्यातून जाणवणारी न्यूयॉर्कची गती.. हे सारं त्या गाण्याच्या व्हिडीओत आहे. या गीतामधल्या प्रसन्नतेची लागण आपल्यालाही होते. आपणही तो निव्र्याज आनंद खळखळ न करता सहजतेनं स्वीकारतो. तुम्ही आज रविवारी सकाळीही जर का उदास असाल, तर हे गाणं ‘यू-टय़ूब’वर तीनदा बघण्याचं प्रीस्क्रिप्शन मी डॉक्टर म्हणून तुम्हाला लिहून देतो आहे!
जेनिफर लोपेझ, रिकी मार्टिनच्या पंक्तीत मागून मार्क अँथनी आला आणि लॅटिन पॉपनं अमेरिकेभर धुमाकूळ घालायला सुरुवात केली. लिन मिरांडानं म्हटलं आहे, ‘‘शाळेतल्या गोऱ्या मित्रांसोबत मी कधी आमचं लॅटिनो संगीत ‘शेअर’ करू शकत नसे. पण एकाएकी माझे मित्र ‘बाईलामोज्’ म्हणत रस्त्यांवरून भटकू लागले. It was a heady time.’’ लिनच्या निवेदनातला ‘हेडी’ हा शब्द मला फार आवडला. तो शब्द किती अमेरिकन आहे! आणि लिनसारखा लॅटिनो तो किती आपलासा करून वापरतो! लॅटिन पॉपची ही लाट नंतर आस्ते आस्ते ओसरली. पण शकिरासारख्या बहुसांस्कृतिक सांगीतिक घटनेला तिनं जन्म दिला.
लोकांना त्या लॅटिनो गायकांचा नाच आवडला. त्यांचे ‘लूक्स’ आवडले. पण त्यांचं आर्त मात्र पुष्कळांलेखी अस्पर्शितच राहिलं. सुदैवानं मी रिकीचं पहिलं गाणं ऐकलं ते स्पॅनिश- इंग्रजी नव्हे. ‘‘ओ ब्वल्वे, के सी ती ला बिदा से मे वा’’ (Vuelve). स्पॅनिश भाषेच्या त्या एकाक्षरी वाक्यानं मला जिंकून घेतलं. त्या गाण्यात रिकी नाचत नाही. गंभीरपणे तो ते गाणं गातो. एका प्रासादाच्या लांबलचक पॅसेजमध्ये अनवाणी चालत चालत तो म्हणतो, ‘‘ब्वल्वे- परत ये! आयुष्य जातंय घरंगळून! परत ये! हवा जातीय दुरावून. ओ, परत ये!’’
त्याच्या व्यक्तिगत आयुष्याचे तपशील पुढे कळले. मूळचा हा पोतरेरिको बेटावरचा, बाराव्या वर्षांपासून गाणारा मुलगा पुढे वाढतच गेला. प्रसिद्धी त्याला नवी नव्हतीच. ती फक्त व्यापक होत गेली. पण त्याचं त्याच्या वडिलांबरोबर जमत नव्हतं. दहाएक वर्षे अबोला होता त्यांच्यात. पण मग रिकीनं तो मिटवला. त्या अबोल्याला अनेक अंगं असणार. जरी जगभरातल्या मुली त्याच्यावर फिदा असल्या (माझ्या तीन मैत्रिणींसकट), तरी तो मात्र प्रत्यक्षात समलिंगी होता. पुष्कळ काळ लपवल्यावर आणि अंतर्मनाची तडफड सोसल्यावर त्यानं अखेरीस आपल्या वेबसाइटवर ते स्वत:च जाहीर केलं. लॅटिनो अस्मितेसारखाच जगभरच्या समलिंगी अस्मितेला त्यानं आवाज दिला. आपल्या पालकांसोबतचा दुरावा त्यानं क्षमेचा हात धरत सोडवला. थायलंडमध्ये सामाजिक काम केलं. तिथे तो बुद्धाच्या प्रेमात पडला. योगाभ्यास करून तो बुद्धाची शिकवण आचरू लागला. जगताना आलेल्या इतक्या नानाविध अनुभवांमुळे एखाद्या गायकाचं गाणं घडत असतं, ते सारे अनुभव त्या गाण्यावर परिणाम घडवीत असतात. अनेक अर्थाने आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर निर्वासित होण्याचे अनुभव रिकीनं घेतले आहेत आणि आपल्या गाण्यांतून मुरवले आहेत. लोकांना वाटतं, रंगेल, नाचऱ्या रिकीमुळे त्याची गाणी गाजतात!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2014 1:01 am

Web Title: latin pop music and ricky martin
टॅग Music,Song
Next Stories
1 शिकण्यासारखी गोष्ट
2 इंडिया, भारत आणि रॉक
3 असंतोषाच्या दारावर..
Just Now!
X