प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com

‘रीडर्स डायजेस्ट’ हे नियतकालिक बहुतेकांना माहिती असेलच. बऱ्याच जणांनी बरीच वर्षे ते वाचलेही असेल. काही तर त्याचे नियमित वर्गणीदारही असतील. जवळपास शंभर वर्षे पूर्ण होतील या अमेरिकन कौटुंबिक मासिकाला. ७० पेक्षा जास्त देशांत कोटय़वधी वाचक वर्षांनुवर्षे टिकवून धरणे ही अर्थातच साधी गोष्ट नाही. या मासिकात वाचनीय, माहितीपूर्ण, निव्वळ करमणूक करणारी अनेक सदरे, लेख, मुलाखती असतात. त्यातील एक उल्लेखनीय सदर म्हणजे ‘लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन’! हे सदर तर गेली पन्नास वर्षे सुरू आहे.

भरपूर चुटके, विनोद आणि व्यंगचित्रं यांनी हे सदर भरलेले असते. साहजिकच त्याचा वाचकवर्ग जास्त आहे. हे जाणून प्रकाशकांनी यातील काही निवडक मजकुराचा आणि व्यंगचित्रांचा भारदस्त असा संग्रहच प्रकाशित केला आहे. ‘लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन’ आणि ‘अ लाफ अ मिनिट’ या नावाने हे संग्रह प्रसिद्ध आहेत. या संग्रहात अनेक विनोद आणि व्यंगचित्रांची विभागणी विषयानुरूप केली आहे. उदाहरणार्थ, लहान मुले, वृद्ध माणसे, नवरा-बायको, सासूबाई, शाब्दिक विनोद, डॉक्टर्स, प्राणी, प्रवास, ऑफिस, स्वर्ग, कायदा, सेक्स, खेळ असे अनेक विभाग आहेत यात. विनोद, व्यंगचित्रं आणि सोबत काही खुशखुशीत लेख असे या संग्रहाचे स्वरूप आहे. बहुतेक सर्व साहित्य हे रीडर्स डायजेस्टप्रमाणेच ‘एनी टाइम’ या प्रकारातले आहे. यात ज्यांची व्यंगचित्रे आहेत ते सर्व व्यंगचित्रकार व्यावसायिक म्हणून इतर अनेक प्रतिष्ठित नियतकालिकांत काम करणारे आहेत. त्यांची खास या संग्रहासाठी काढलेली काही व्यंगचित्रे तर अफलातून म्हणावीत अशी आहेत. वेगवेगळ्या विभागांतील काही व्यंगचित्रांचा उल्लेख केला तर त्यातील विनोदाचे आणि विषयांचे वैविध्य लक्षात येईल.

एका चित्रात झेब्य्राची शिकार करून ती निवांतपणे खात बसलेले एक सिंहाचे जोडपे आहे आणि मागे दुसरी एक सिंहीण झेप घेऊन चक्क एका भोपळ्यावर हल्ला करताना दाखवली आहे आणि खाली कॉमेंट आहे..  ‘‘शाकाहारी जेवणसुद्धा एक्सायटिंग करण्याचा तिचा प्रयत्न दिसतोय!’’

वास्तविक प्रेयसीची वाट बघून कंटाळून शेवटी बीअर प्यायला जाणारा प्रियकर हा काही फार मोठय़ा विनोदाचा विषय नाही. पण त्याच्या चित्रणात व्यंगचित्रकार जे. डब्ल्यू. टेलर यांनी मजा आणली आहे.

एका व्यंगचित्रात एक मोर्चा दाखवलेला आहे आणि मोर्चेकऱ्यांच्या हातात अनेक फलक आहेत.. जे सर्व कोरे आहेत! मुठी आवळून घोषणा देत हे मोर्चेकरी चालले आहेत. (बहुतेक या घोषणा म्हणजे ‘लेके रहेंगे..’, ‘हमसे जो टकरायेगा..’, ‘अरे बघता काय..?’ वगैरे वगैरे असणार.) तेव्हा या कोऱ्या फलकांकडे पाहत फूटपाथवरचा एक नागरिक म्हणतोय, ‘‘हल्ली अशिक्षितही संघटित होऊन क्रांती घडवणार असं दिसतंय!’’

सर्व प्रकारच्या स्क्रीनच्या या जमान्यात एक व्यंगचित्र खूपच प्रभावी आहे. एक पालक आपल्या लहान मुलाला घेऊन आर्ट गॅलरी दाखवायला जातात. यात एका लढाईच्या पेंटिंगसमोर उभे राहून आई मुलाच्या प्रश्नाला उत्तर देते.. ‘‘हे पेंटिंग आहे बाळा.. यात आवाज नसतो!’’

लहान मुलं सतत खूप प्रश्न विचारत असतात. अशीच एक लहान मुलगी उंच डोंगरावर एका तपश्चर्या करणाऱ्या साधूसमोर येऊन पोहोचली आहे. मुलीने खूपच प्रश्न विचारलेले दिसताहेत. कारण तो साधू शेवटी हरल्याप्रमाणे म्हणतोय, ‘‘जा, तुझ्या आईला विचार!’’ मानवासमोरच्या असंख्य प्रश्नांची आध्यात्मिक उत्तरे शोधण्यात गर्क असलेला हा साधू शेवटी एखाद्या बालप्रश्नापुढे हात टेकतो, ही कल्पनाच झकास आहे!

पूर्वी कुत्री पोस्टमनवर भुंकत असत. या संदर्भाने एका व्यंगचित्रात एक कुत्रा घरातल्या टेबल-खुर्चीवर बसून कॉम्प्युटरकडे रोखून बघताना दाखवला आहे. त्याची मालकीणबाई शांतपणे पाहुण्यांना सांगते, ‘हा रोज येथेच असा बसून राहतो. नवी ई-मेल आली की हा भुंकायला सुरुवात करतो!’

अशी अनेक खुशखुशीत व्यंगचित्रे या संग्रहात आहेत.

पण काही व्यंगचित्रे खूप वेळ बघितल्यावरच त्यातले गमक उमगते. ज्येष्ठ ब्रिटिश व्यंगचित्रकार रोनाल्ड सर्ल हे व्यंगचित्रकलेतील एक फार मोठे नाव. त्यांचे सोबतचे व्यंगचित्र हे त्यांच्या प्रतिभेचा प्रत्यय देते.

सैनिक म्हटल्यावर तगडे, झुंजार पुरुष जगभरातल्या जनतेच्या डोळ्यासमोर येतात. यातही हे सैनिक जेव्हा जनतेसमोर काही कार्यक्रमासाठी येणार असतात त्यावेळी ही प्रतिमा जरा जास्तच जपावी लागते. ताठ उभा असलेला, भरदार छातीचा, उंचपुऱ्या देहयष्टीचा रुबाबदार सैनिक जनतेला आवडत असला तरी प्रत्येक वेळी तसा तो उपलब्ध असेलच असे नाही. अशा वेळी काही लेच्यापेच्या सैनिकांमध्ये हवा भरण्याचे काम व्यंगचित्रकाराने हाती घेतलेले या व्यंगचित्रात दिसतंय. (काही वेळेला अशी देशभक्तीची कृत्रिम हवा भरून जनतेची छाती फुगवावी लागते, असे काही विचारवंत म्हणतात.) व्यंगचित्रकार एच. एम. बेटमन यांच्या या चित्रातले बारकावे अगदी बराच वेळ निरखावेत असे आहेत. विशेषत: इमारतीबाहेरील कवायत किंवा भिंतीवर लावलेले पोस्टर. बेटमन यांनी एकूणच दिखाऊ कवायत संस्कृतीला या चित्रातून हास्यास्पद बनवले आहे.

काही लोकांना स्वत:ला काहीतरी झालंय असं सतत वाटत असतं. ते डॉक्टरांना भेटून नेहमी याची खात्री करून घेत असतात. त्यातच एखादी गोष्ट आनुवंशिक आहे असं म्हटलं की या लोकांना थोडं बरं वाटतं. म्हणून हे डॉक्टर या बाईंना सांगतात की, ‘होय.. हे आनुवंशिक आहे. याला म्हातारपण असं म्हणतात!’ .. व्यंगचित्रकार रॉय देलगाडू.

नोकरी मागायला जाताना मुलाखतीमध्ये आपला बायोडाटा किंवा रेझ्युमे किंवा सी. व्ही. हा आकर्षक असावा, त्याचा प्रभाव मुलाखत घेणाऱ्यावर पडावा असा सर्वाचा हेतू असतो. त्यासंदर्भातील व्यंगचित्रकार रिचर्ड जोली यांचे हे सोबतचे व्यंगचित्र नेमक्या भाष्यामुळे हास्य फुलवणारे ठरले आहे.

या संग्रहाची प्रस्तावना खूप छान आणि नेमकी आहे. त्यात संपादक म्हणतात.. ‘‘डॉक्टर्स आणि वैद्यकशास्त्रातील संशोधकांच्या मते, हसण्यामुळे मनावरचा ताण कमी होतो. रक्तदाब नियंत्रणात राहतो. प्रतिकारशक्ती वाढते. मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि हृदय सुरक्षित राहते. म्हणूनच सर्वसामान्य माणूस दिवसातून १७ वेळेला तरी हसतो. जेव्हा तुम्ही विनोद आणि आरोग्य याविषयी विचार करता तेव्हा आपल्याला असलेल्या विनोदबुद्धीमुळे विनोदाची लागण आपोआप होते आणि हशाचा संसर्ग होतो! (कारण विनोद ही गोष्टच अशी आहे की मनुष्य ती स्वत:पाशीच न ठेवता तातडीने दुसऱ्यापर्यंत पोहोचवतो!)’’

त्यामुळे सध्याच्या काळात यापेक्षा सर्वोत्तम औषध दुसरे काय असू शकते!