राम पटवर्धनांची प्रकृती बरी नाही, खूप थकले आहेत, आठवण धूसर होते आहे,. मधून मधून हॉस्पिटलमध्ये राहावे लागते.. असे कुणा ना कुणाकडून ऐकू येत होतेच. परवा त्यांच्या निधनाची बातमी कळली. वय दगा देणारेच होते. २१ मार्चला त्यांचा वाढदिवस. या वर्षी त्यांच्या वयास ८६ वर्षे पूर्ण झाली होती- पण तरीही वाईट वाटले फारच. त्यांच्या खूप आठवणी मनातल्या मनात दाटून आल्या. संपादक पटवर्धनांच्या आणि स्नेही पटवर्धनांच्या. पटवर्धनांची ओळख झाली ती ‘सत्यकथे’च्या कचेरीत. १९६७-६८ च्या सुमाराला. १९६८ सालापासून सत्यकथेचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांचे नाव ‘सत्यकथे’वर छापले जाऊ लागले असले तरी ते ‘मौज’ परिवाराचाच एक घटक बनून गेलेले होते- १९४९ सालापासून. त्यावेळी ‘मौज’ साप्ताहिक होते. पुढे १९६० पर्यंत ते ‘मौज’चे कार्यकारी संपादक होते. १९६० साली ‘मौज’ साप्ताहिक बंद झाले तेव्हा पटवर्धन ‘सत्यकथा’ मासिकाच्या संपादनात साहाय्य करू लागले. पु. ल. देशपांडे शाळेत, तर न. र. फाटक, श्री. पु. भागवत यांसारखे गुरू महाविद्यालयीन काळात लाभलेल्या पटवर्धनांनी प्राध्यापक होण्याऐवजी संपादकीय क्षेत्रात राहायचे ठरवले ते स्वाभाविकच होते. ‘सत्यकथा’ मासिकाचे रूप अनंत अंतरकर संपादक म्हणून काम पाहू लागले तेव्हाच बदलू लागले होते. १९४४-४५ च्या दरम्यान वि. पु. भागवत आणि त्यांचे धाकटे बंधू श्री. पु. भागवत यांनी ‘सत्यकथे’ची धुरा खांद्यावर घेतली आणि नवकथा, नवकाव्य, चित्रपट, चित्रकला, संगीत, साहित्यशास्त्र अशा क्षेत्रांतले नवचैतन्य सत्यकथेतून सळसळू लागले. या नवतेच्या नव्या पर्वाचे सक्रिय साक्षीदार म्हणून पटवर्धन वावरू लागले. १९६० पासून ते सत्यकथेचे काम बघू लागले आणि श्री. पु. भागवतांच्या शब्दांत- त्यांचे ‘अभिन्नजीव सहकारी’ ठरले. १९८२ साली ‘सत्यकथा’ बंद झाले. त्यानंतर ‘मौज’ वार्षिकाचे संपादक म्हणून ते काम करीत राहिले.
‘मौज’ प्रकाशनाचे गिरगावातल्या खटाववाडीत कार्यालय होते आणि छापखानाही. मौजेच्या ऑफिसात पोचण्यासाठी एका लाकडी जिन्याच्या पायऱ्या चढून जावे लागते. एकेकाळी या पायऱ्या चढून मराठी साहित्य आणि कला क्षेत्रातली दिग्गज माणसे श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन यांच्याकडे येत. १९६७-६८ मध्ये ‘सत्यकथे’त लिहिणारी म्हणून मीही मुंबईला गेले की त्या लाकडी जिन्याच्या पायऱ्या उत्साहाने चढून जात असे. १९६६ साली माझी आणि संभाजी कदमांची घट्ट मैत्री झाली आणि नंतर पटवर्धन हे केवळ संपादक राहिले नाहीत, ज्येष्ठ स्नेहीही बनले. कदम त्यावेळी जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकवीत आणि चेंबूरला राहात. पटवर्धन चुनाभट्टीला. कदमांकडे राहून त्यांच्याबरोबर सकाळी आठच्या सुमारास लोकल पकडून मी जे. जे. त जाई. त्या गाडीतच पटवर्धनही भेटत. कदमांचे जे. जे.तले सहकारी शंकर पळशीकर, गजानन भागवत, सोलापूरकर, प्र. अ. धोंड या सर्वाच्या गप्पा आणि चर्चाची मी निमूट साक्षीदार असे. तेव्हा लवकरच कामासाठी निघालेले पटवर्धनही त्यांत सामील झालेले दिसत. कदम कडवे कलावादी. शिवाय चित्र, शिल्प, संगीत आणि साहित्य या कलांचे ज्ञाते आणि दर्दी. त्या काळात ते मुंबईतल्या कलादालनांमध्ये भरलेल्या अनेक प्रदर्शनांसंबंधी ‘सत्यकथे’त लिहीत. ते पटवर्धन आवर्जून छापत.
सत्यकथेच्या कचेरीत पटवर्धनांसमोरच्या खुच्र्यावर रोज वेगवेगळे साहित्यिक भेटत. ताज्या सत्यकथेच्या अंकातल्या लेखनाचा विषय निघे. चर्चा, हास्यविनोद होत. पटवर्धन ‘संपादक’ म्हणून त्यावर कधीही भाष्य करीत नसत. ते एकतर सगळय़ांचे म्हणणे ऐकत असत, नाहीतर पेनने मांडीवर नोटबुक ठेवून काहीतरी लिहीत असत. आपले इतरांच्या बोलण्याकडे लक्ष आहे हे दाखवण्यासाठी मधून मधून वर पाहत. हसत. दाद देत. ‘सत्यकथे’च्या कचेरीत माझी विद्याधर पुंडलिक, नरेश कवडी, वृंदा लिमये, श्रीनिवास कुलकर्णी, र. कृ. जोशी अशा अनेक साहित्यिकांशी पटवर्धनांनी ओळख करून दिली. त्यांच्याबरोबर मी दुर्गाबाई, पद्मा सहस्रबुद्धे, बाळ ठाकूर, शांताबाई शेळके यांच्या घरी गेले. त्यांच्याकडून लेखन, चित्रे आणायला पटवर्धन स्वत: जात. दुपारच्या वेळी खटाववाडीची गल्ली ओलांडून जवळच एक हॉटेल होते, तिथे चहा घ्यायला जाणे आणि बरोबर असलेल्या साहित्यिकाबरोबर गप्पा करणे- हा पटवर्धनांचा एक विरंगुळा असे.
साहित्यिकांनी पाठवलेले साहित्य वाचणे, तपासणे, त्यावर लेखकांना आपला अभिप्राय कळवणे, मुखपृष्ठाची योजना करणे, सजावटीसाठी चित्रकारांकडून चित्रे काढवून घेणे अशा अनेक पातळय़ांवर पटवर्धन रोज व्यग्र असत. प्रूफेही ते तपासत. लेखक, कवी, चित्रकारांना त्यांच्याकडून प्रोत्साहन असे. लेखकांना त्यांची पत्रे जात. त्यावर त्यांचा मार्मिक अभिप्राय असे. त्यावर अनेक निराश आणि नाराज लेखक टवाळी करणारे बोलत आणि तो विनोदाचाही विषय होई! तरीही सत्यकथेकडून लेखन साभार परत येणे हा लेखकांना मोठा धक्का असे! त्यामुळे सत्यकथेत वशिला लावून, युक्ती-प्रयुक्ती लढवून लेखन छापून कसे आणता येईल, याचा मार्ग शोधणारे पुष्कळ तत्कालीन लेखक मला भेटलेले आहेत! श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन यांच्या वाङ्मयीन श्रेणीत समावेश होणे जिकिरीचेच होते. दोघेही मर्मज्ञ. मुळातच उत्कृष्ट वाङ्मयीन जाण असणारे आणि श्रेष्ठ वाङ्मयाच्या वाचनाने अधिकच धारदार झालेल्या दृष्टीने वाङ्मयाची पारख करणारे होते. पटवर्धनांनी चेकॉव्हच्या कथांचे केलेले अनुवाद मी वाचले आहेत.
त्यांनी ‘इयरलिंग’चे केलेले ‘पाडस’ हे भाषांतर उत्कृष्ट भाषांतराचा एक नमुना आहे; जे आमची मुले अजूनही वाचतात.
१९४५ ते १९८२ या काळात ‘सत्यकथा’ मासिक आणि ‘मौज’ वार्षिक यांतून उत्कृष्ट साहित्य वाचायला मिळत असे. १९६५ च्या सुमाराला ‘सत्यकथे’च्या वाङ्मयीन अभिरुचीची खिल्ली उडवणारा अनियतकालिकांतील लेखकांचा एक गट उदयाला आला. छोटय़ा अनियतकालिकांतून त्यांनी सत्यकथेला ‘लक्ष्य’ केले. आमंत्रणे छापून त्यांनी खटाववाडीतल्या गल्लीत सत्यकथेची जाहीर होळी केली. वास्तविक श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन यांनी लिहिलेली प्रत्येक अंकातली मार्मिक संपादकीय टिपणे वाचली तरी त्यांच्या वाङ्मयीन मर्मदृष्टीची कल्पना येऊ शकेल. ‘सत्यकथा’ मासिक आणि ‘मौज’ वार्षिक यांतले सर्वच लेखन सातत्याने उत्कृष्ट होते असे म्हणता येणार नाही; पण उपलब्ध लेखनातले उत्कृष्ट ते छापण्याचा संपादकांचा आग्रह असे. लेखन साभार परत पाठवताना अनेकदा त्याविषयीची चर्चाही केली जात असे. तरीदेखील खूपदा अधिक-उणे होई. (‘सत्यकथे’ची ‘सत्यकथा’ या लेखात या उण्याचे अतिरंजित वर्णनही केले गेले.) आणि ते साक्षेपी वाचक नोंदवीतही असे. (उदा. ‘सत्यकथे’च्या विशेष निकषाने ज्यावेळी एक कथा चांगली ठरते, त्याचवेळी तिच्याच शेजारी त्या निकषाने मृत वाटणारी कथा येते, हे का व कसे? : इति जी. ए. कुलकर्णी) लेखन परत पाठवताना राम पटवर्धनांनी केलेल्या चर्चाची किंवा केलेल्या सूचनांची आपल्याला किती मातब्बरी वाटत असे ते अनेक लेखकांनी बोलून दाखवले आहे. सत्यकथेचा प्रत्येक अंक कथा आणि कविता या प्रकारांतील उपलब्ध असे उत्तम आणि ताजे लेखन देणारा असावा याचा पटवर्धनांनी जणू वसाच घेतला होता. याशिवाय त्या काळातले उत्कृष्ट असे ललितगद्यही राम पटवर्धनांनी वाचकांना सादर केले आहे. प्राणहिता, वि. द. घाटे, पुढे श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे अनवट ललितलेखन वाचताना, सत्यकथेची मुखपृष्ठे व त्यासंबंधीचे विविध प्रयोग पाहताना, आतल्या रेखाचित्रांची सजावट पाहताना, संगीताचे प्रायोगिक कार्यक्रम, चित्रप्रदर्शने यासंबंधीची त्या- त्या क्षेत्रातल्या जाणकारांची टिपणे वाचताना ‘राम पटवर्धन’ या संपादकाची सव्यसाची जाण, मर्मदृष्टी आणि अंक काढण्यामागची तळमळ, आत्मीयता आणि वाङ्मयप्रेम पारदर्शीपणे जाणवत असे. तशीच त्यांची कलाविषयक दुर्मीळ जाणही त्यातून कळून येत असे.
आणि हे सारे अगदी कोणताही आव न आणता, दिमाख वा आढय़ता न दाखवता, व्रताइतक्या निष्ठेने आणि सर्वस्व ओतून चाललेले असे. श्री. पु. भागवतांबद्दल जरा धाक किंवा दरारा वाटावा असे एक वलय होते. पण पटवर्धनांबद्दल तसे काही वाटत नसे. त्यांचे राहणे, वागणे, बोलणे अगदी साधे, घरगुती. घरी धुतलेला पायजमा, खादीसारखा वाटणारा हाफ शर्ट किंवा झब्बा आणि खांद्यावर अनेक कागद ठासून भरलेली शबनम झोळी या वेशातच मी त्यांना कायम पाहिलेले आहे. खरे तर साहित्य, संगीत, चित्रकला, प्रकाशन व्यवसाय, मुद्रण या क्षेत्रांतल्या सर्व नामवंतांशी पटवर्धनांचा रोजचा संबंध असे. पण तसे त्यांनी कधी दाखवले नाही. श्री. पु. भागवतांची अभिजात आणि चोखंदळ कलादृष्टी जशी त्यांनी निवडलेल्या आणि प्रकाशित केलेल्या सर्व पुस्तकांतून प्रत्ययाला येते, तसाच पटवर्धनांचा मोकळा आणि स्वागतशील दृष्टिकोन त्यांच्या संपादनातून प्रकट होत असे.
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राबद्दल पटवर्धनांना आस्था होती. सामाजिक-राजकीय घटनांमध्ये स्वारस्य होते. त्यांच्याकडे येणारे ‘इंडेक्स ऑन सेन्सॉरशिप’ हे नियतकालिक स्वत: वाचून नंतर ते वसंतला (वसंत आबाजी डहाके) देत असत. या नियतकालिकासंबंधी वसंतने पुढे एक सविस्तर लेख लिहिला. अमरावतीला असताना दिवाळीची किंवा उन्हाळय़ाची सुटी साधून मुंबईला गेल्यावर आमच्या पटवर्धनांबरोबर होणाऱ्या नैमित्तिक भेटी आमची मुंबईला बदली झाल्यानंतर नित्य होत गेल्या. आम्ही चर्चगेटला राहत असू. ट्रेन किंवा बस पकडून दुपारचे खटाववाडीत जायचे, पटवर्धन, गुरुनाथ सामंत, प्रभाकर भागवत यांच्याशी गप्पा मारायच्या, खटाववाडीतल्या पिठाच्या गिरणीतून दळण दळून आणायचे आणि थोडे पलीकडे चालत जाऊन बनाम हॉल लेनमधून भाजी-फळे, भटवाडीच्या नाक्यावर भजी, बटाटावडे आणि ‘नारायण केशव’मधून किराणा, पणशीकरांकडून मिठाई आणि रजनी परुळेकरबरोबर कौटुंबिक गुजगोष्टी करून परत जायचे असा माझा क्रम वर्षांनुवर्षे सुरू होता.
‘सत्यकथा’ बंद पडले तरी ‘मौज’ सुरू होते. पटवर्धनांचे आवडते संपादनाचे काम सुरू होते. दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पटवर्धनांकडे जाण्याची आमची प्रथाच होती. त्या दिवशी ललिताबाईंच्या हातचे खास जेवण, ऐसपैस गप्पा होत. पटवर्धनांनी त्यांच्या अनिरुद्ध आणि श्रीरंगसाठी आणलेली अप्रतिम इंग्रजी पुस्तके त्यांनी राही-ऋ त्विकसाठी दिली होती. आम्ही मुंबईत नव्हतो, पण विद्या मन्सूर होते. त्यावेळी त्यांचीही खटाववाडीत फेरी असेच आणि जी. ए.ची ‘इस्किलार’ त्यांनी छापली जाण्याआधीच ‘मौजे’त बसून वाचली होती.
पटवर्धन चुनाभट्टीचे घर सोडून ठाण्याला राहायला गेले तेव्हा आमच्या भेटी कमी झाल्या, पण आस्था कमी झाली नाही. कदमांमुळे माझा धाकटा भाऊ संजयही पटवर्धनांशी जोडला गेला. पटवर्धन मारुती चितमपल्लींकडे इकडे चार दिवस राहून गेले तेव्हा आमच्या घरी संजयकडे त्यांनी आवर्जून मुक्काम केला. डहाक्यांवर- म्हणजे वसंतवर पटवर्धनांचे खास प्रेम होते. त्याची अनेक रेखाटणे त्यांनी मुखपृष्ठासाठी, आतल्या सजावटीसाठी वापरली. त्याच्या सामाजिक- राजकीय दृष्टीचे त्यांना कौतुक होते. त्यांच्या कविता-कथांविषयी ते उत्सुक असत. पटवर्धनांनी ‘परिक्रमा’ सदर सुरू केले, ते आवडीने, मन:पूर्वक वाचणारा वसंत हा बहुधा एकमेव वाचक असावा! पण ‘परिक्रमा’त पटवर्धन इतक्या अनेकविध सांस्कृतिक, जागतिक घटनांची दखल घेत. ती पाहिली की कधी कधी त्यांनी पत्करलेल्या आणि मनापासून, आदर्शपणे, व्रतस्थपणे, निष्ठेने निभावलेल्या ‘सत्यकथा’ मासिकाच्या संपादनात त्यांनी आपल्या अनेक प्रिय गोष्टींना बाजूला सारले असावे असा मला संशय आहे. बालपण कोकणातल्या गणेशगुळे गावी, पुढे शिक्षणासाठी मुंबईला राहून ओढगस्त अनुभवत शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण, मोठय़ा कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणे- हे सारे सुरू ठेवण्यासाठी लागणारे ऐहिक बळ सश्रद्ध पटवर्धनांनी कुठेतरी आत सांभाळून ठेवलेल्या आध्यात्मिकतेतून मिळवले असावे असेही मला आतून वाटते. पटवर्धन अतिशय प्रेमळ होते, ते मी खूपदा अनुभवले आहे. माझ्या आजारपणाच्या तक्रारी सुरू झाल्या तेव्हा ते मला संजीवनी चिकित्सेसाठी स्वत: घेऊन गेले. ‘सत्यकथे’ने माझी वाङ्मयीन आणि कलात्मक जाण समृद्ध केली, तर पटवर्धनांनी आमच्या मुंबईच्या वास्तव्यात आम्हाला निर्मळ स्नेहाने समृद्ध केले. लाभलेल्या एका आयुष्यासाठी हे पुरून उरणारे सुदैव आहे अशी याक्षणीची माझी भावना आहे.

pet dog helped the owner to plant a tree Emotional Video
अरे देवा! मदत करायला गेला अन् मालकाचं काम वाढवून आला; VIDEO चा शेवट पाहून पोट धरून हसाल
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
rohit pawar slams ram kadam ashish shelar
“सभागृहात अ‍ॅक्टिंग कशाला करताय? होय, आहे योगेश सावंत आमचा कार्यकर्ता”, रोहित पवारांचा राम कदमांवर हल्लाबोल!
girish mahajan manoj jarange
“मनोज जरांगेंना माफी नाही, त्यांनी आता…”, गिरीश महाजनांचा टोला; म्हणाले, “त्यांच्या डोक्यात…”