इंग्रजीत लेखन करणाऱ्या भारतीय लेखकांत बिनीचे शिलेदार म्हणून मनोहर माळगावकर यांचा सन्मानानं उल्लेख केला जातो. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त त्यांच्या लेखन कारकीर्दीचा आणि त्यांच्या लेखनावरील ब्रिटिशराज आणि नजीकच्या इतिहासाच्या प्रभावाचा साकल्याने घेतलेला हा परामर्श..
१९३० च्या दशकात आर. के. नारायण यांची ‘स्वामी अ‍ॅण्ड फ्रेण्ड्स’, मुल्कराज आनंद यांची ‘अन्टचेबल’ व राजा राव यांची ‘कांतापुरा’ या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आणि इंग्रजीतून लेखन करून जागतिक पातळीवर वाचकप्रियता तसेच समीक्षकमान्यता मिळवणाऱ्या भारतीय कादंबरीकारांची एक निश्चित अशी परंपरा आरंभ झाली. नंतरच्या काळात विक्रम सेठ, अरुंधती रॉय, खुशवंतसिंग, अनिता देसाई यांच्याप्रमाणेच मनोहर माळगावकरांनीही आपल्या वैशिष्टय़पूर्ण ऐतिहासिक कादंबरीलेखनानं ही परंपरा समृद्ध आणि गतिमान केली.
आपल्या कादंबऱ्यांतून ‘ब्रिटिशराज’ समर्थपणे रेखाटणाऱ्या माळगावकरांची लेखन कारकीर्द जवळपास चार दशकांची! १९५८ मध्ये त्यांची ‘डिस्टन्ट ड्रम’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या ‘कॉम्बॅट ऑफ श्ॉडोज्’ (१९६२) मुळे त्यांच्या लेखनाची भारतात आवर्जून दखल घेतली जाऊ लागली. १९६३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘दि प्रिन्सेस’ने तर विक्रमच केला. इंग्लंडमध्ये हॅमिश हॅमिल्टन आणि अमेरिकेत वायकिंगने प्रसिद्ध केलेली ही कादंबरी ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या ‘बेस्ट सेलर्स लिस्ट’मध्ये सलग सतरा आठवडे अग्रक्रमावर झळकत होती. ‘दि प्रिन्सेस’मुळे मनोहर माळगावकरांच्या वाचकप्रियतेच्या कक्षा जगभर विस्तारल्या. त्यानंतरच्या ‘ए बेंड इन दि गँजेस’, ‘दि डेव्हिल्स विंड’, ‘दि गार्लण्ड कीपर’ या कादंबऱ्यांनी त्यांच्या पूर्वलौकिकात आणखीन भर टाकली. आजपावेतो माळगावकरांच्या पुस्तकांच्या लक्षावधी प्रती खपल्या असून जगातील विविध भाषांतून त्यांचं भाषांतर झालेलं आहे. मराठीपुरतं सांगायचं झालं तर पु. ल. देशपांडे, श्री. ज. जोशी, भा. द. खेर यांच्यासारख्या मान्यवर साहित्यिकांनी त्यांच्या कादंबऱ्यांचं भाषांतर समर्थपणे केलेलं आहे.
‘दि प्रिन्सेस’ या माळगावकरांच्या कादंबरीला संस्थानांच्या विलिनीकरणाची ऐतिहासिक पाश्र्वभूमी लाभली आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात भारताचा नकाशा लाल आणि पिवळ्या रंगात रेखाटला जात असे. पिवळा रंग होता राजेरजवाडे, महाराज-महाराण्या, नबाब आणि संस्थांनिक यांच्या ताब्यात असलेल्या भूप्रदेशाचा; तर लाल रंग होता ब्रिटिशांच्या अधिपत्याखालील भूमीचा! त्यावेळी भारतात जवळपास ६०० संस्थानं होती. लहान-मोठे राजे-महाराजे, त्यांचे विलासी सरंजाम, दरबार, महाल, शिकारखाने व जामदारखाने, रंगविलास, त्यांची एकतंत्री सत्ता हे सर्व वर्षांनुर्वष जोपासलं गेलं होतं. आणि एके दिवशी ते पूर्णपणे लयाला गेलं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्तारूढ झालेल्या काँग्रेस सरकारनं संस्थानांच्या विलिनीकरणाची मोहीम हाती घेतली आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली ती यशस्वीपणे राबविली. सर्व संस्थानं भारतीय प्रजासत्ताकात विलीन करण्यात आली. देशाच्या नकाशावरून पिवळा रंग पूर्णपणे आणि कायमचा पुसला गेला.
या ऐतिहासिक वास्तवाचा संदर्भ लाभलेली ‘दि प्रिन्सेस’ ही माळगावकरांची निर्विवादपणे श्रेष्ठ कादंबरी आहे. भारताच्या डोंगराळ भागातील ‘बेगवाड’ या संस्थानाच्या विलिनीकरणाची कहाणी त्यांनी तपशीलवारपणे या कादंबरीत रेखाटली आहे. फार मोठं नव्हे, परंतु या संस्थानाच्या अधिपतींना दहा लाख रुपये वार्षिक खर्चासाठी घेता यावेत, एवढय़ा उत्पन्नाचं हे संस्थान! संस्थानाधिपती आहेत हिरोजी महाराज. १२ तोफांच्या सलामीचा मान त्यांना आहे. युवराजांचं नाव अभय. दुसरं महायुद्ध सुरू झालं तेव्हा हिरोजी महाराजांनी ब्रिटिश सरकारला सैन्यबळ आणि द्रव्यबळ या दोहोंचीही मदत केली होती. इतर अनेक संस्थानिकांप्रमाणेच हिरोजी महाराज यांचा असा अंदाज होता की, दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश सत्ता दुबळी झाल्यावर आपल्याला साम्राज्यविस्तार करण्याची संधी मिळेल. पण प्रत्यक्षात वेगळंच घडलं. भारत सोडून जाताना ब्रिटिशांनी काँग्रेसच्या ताब्यात सत्ता दिली. देशाचा कारभार हाती आल्यावर काँग्रेस सरकारने संस्थानांचं विलिनीकरण करण्याचं ठरवलं. बेगवाड संस्थानाचं विलिनीकरण अटळ आहे, हे लक्षात आल्यावर ‘जेथे फुले वेचली तेथे गोवऱ्या वेचण्यापेक्षा मरण बरे’ असा विचार करून हिरोजीराजे शांतपणे मरणाला सामोरे जातात. त्यांच्यानंतर राजपुत्र अभय राजगादीवर येतो. पण संस्थानाचं विलिनीकरण झाल्यानं त्याची कारकीर्द अवघी ४९ दिवसांचीच ठरते. त्याला पदच्युत व्हावं लागतं. हे या कादंबरीचं थोडक्यात सूत्र!
या कादंबरीच्या निमित्ताने एका विशाल परिप्रेक्ष्यातून माळगावकरांनी ब्रिटिश सरकारच्या अस्तकालाचं आणि त्या अनुषंगानं संस्थानी राजवटीचं जे चित्रण केलं आहे, ते त्यापूर्वी साहित्यात अपवादानंच प्रकटलं होतं. समस्येची जटिलता, घटनांची व्यामिश्रता याबरोबरच व्यक्तिरेखांच्या विविधतेचा पट येथे त्यांनी विलक्षण सामर्थ्यांनं उलगडलेला आहे.
‘ए बेंड इन दि गँजेस’ (१९६४) ही माळगावकरांची कादंबरी भारताच्या फाळणीवर आधारित आहे. या कादंबरीचं शीर्षक आणि शीर्षवचन ही दोन्ही रामायणातून घेतलेली आहेत. ‘गंगेच्या एका वळणापाशी श्रीराम आपण सोडून जात असलेल्या भूमीकडे शेवटचा दृष्टिक्षेप टाकण्यासाठी थांबले..’ हे या कादंबरीचं शीर्षवचन आहे. तथापि या शीर्षवचनाचा ध्वनी कादंबरीत उमटलेला दिसत नाही. या कादंबरीचा आरंभ भारतात मध्य अंदमानात आणि उत्तरार्ध पाकिस्तानात घडतो. ग्रामीण भारताची कृषक संस्कृती, कोलकात्यातील उच्चभ्रू बंगाल्यांचं सुखासीन जीवन आणि जहालमतवादी तरुणांच्या क्रांतिकारी कारवाया, अंदमानचा सेल्युलर जेल आणि तेथे होणारा राजकीय कैद्यांचा छळ, फाळणीच्या काळात पाकिस्तानातील हिंदूंची झालेली ससेहोलपट.. हे व असेच आणखी काही ऐतिहासिक तपशील या कादंबरीत विस्तारानं येतात.
घटनाबहुलता हा या कादंबरीचा आणखी एक गुणविशेष! त्यामुळे आवर्ती घटनांच्या पाश्र्वभूमीवर व्यक्तिरेखाटन मात्र तितकंसं जोरकस उमटत नाही. यातला ग्यान हा तथाकथित गांधीवादी तरुण, शैफी हा मुस्लीम माथेफिरू, देवीदयाळ हा उच्चभ्रू गांधीवादी, पण दहशतवादाकडे झुकलेला आणि पतीशी सांसारिक सूर जुळू न शकलेली तुच्छतावादी मनोवृत्तीची तरुण सुंदरी यांच्यापैकी कोणतीही व्यक्तिरेखा वाचकाच्या मनावर ठसत नाही. मात्र फाळणीच्या वेळी पाकिस्तानातील धर्मवेडय़ा मुस्लिमांचे नृशंस अत्याचार आणि हिंदूंची झालेली र्सवकष वाताहतच वाचकांच्या मनावर जास्त ओरखडे उमटवते. लष्करी अधिकारी असलेले माळगावकर फाळणीच्या वेळी दिल्लीत होते. त्यावेळी त्यांनी अशा अनेक भीषण घटना पाहिल्या होत्या. अनेकदा जीव धोक्यात घालून त्यांना दंगलींतून काम करावं लागलं होतं. आपली ही अनुभूती माळगावकर या कादंबरीत संक्रमित करताना दिसतात.
१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाची पाश्र्वभूमी लाभलेल्या ‘दि डेव्हिल्स विंड’ (१९७२) या कादंबरीत माळगावकरांची प्रतिभाशक्ती पुन्हा एकदा तेजानं तळपताना दिसते. या कादंबरीचा विषयच मुळी असा आहे की, केवळ कल्पनाशक्तीच्या बळावर त्याला एक पृथगात्म घाट देणं कोणाही प्रतिभावंत लेखकाला सहजशक्य व्हावं. ‘नानासाहेब पेशव्याची गोष्ट त्याने स्वत:च लिहिली असती तर ती कशी उतरली असती, हे सांगण्याचा प्रयत्न मी या कादंबरीत केला आहे,’ असा निर्वाळा माळगावकरांनी या कादंबरीविषयी दिलेला आहे. इतिहासात रूढ झालेल्या समजुतींना माळगावकर येथे छेद देताना दिसतात. या कादंबरीच्या केंद्रस्थानी नानासाहेब पेशवे ही व्यक्तिरेखा आहे. नानासाहेब स्वभावत: आरंभापासून क्रांतिकारक होते असे मात्र नव्हे. त्यांच्याजवळ फार मोठी संपत्ती होती आणि ख्यालीखुशालीत ते ती व्यतीत करीत होते. ते अतिशय दुर्बल मनोवृत्तीचे आणि कमालीचे निष्क्रिय होते. या कादंबरीत नानासाहेब म्हणतात, ‘माझ्या दृष्टीने या स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वाचे प्रश्न कोणते, याचा स्पष्ट उलगडा मला केव्हाच झाला नाही. कारण देशाचे स्वातंत्र्यसंगर आणि माझे व्यक्तिगत हितसंबंध यांच्यात फरक करणे मला शक्य झाले नाही.’
संपत्तीबरोबरच सामाजिक प्रतिष्ठेचीही पाश्र्वभूमी त्यांना लाभली होती. त्यामुळे हिंदी सैनिकांनी उठाव केला आणि हे आंदोलन त्यांच्या दाराशी नेऊन पोहोचवलं. त्यानंतर मात्र नानासाहेब खडबडून जागे झाले. त्यांच्या सुप्त शक्ती उफाळून आल्या. त्यांचं मन खंबीर झालं. प्रतिकाराच्या भावनेनं ते पेटून उठले आणि मग खऱ्या अर्थानं समर्थ बनत गेले. आणि त्यानंतरचा इतिहास त्यांच्याभोवतीच आकाराला येत गेला. नानासाहेबांच्या प्रेरणेनं लोक इंग्रजांविरुद्ध उभे ठाकले. हा सर्व ऐतिहासिक घटनाक्रम माळगावकरांनी या कादंबरीत साकारला आहे.
कोणत्याही ऐतिहासिक कादंबरीच्या संदर्भात त्यात इतिहास किती आणि काल्पनिक भाग किती, असा प्रश्न नेहमीच उपस्थित होत असतो. ‘दि प्रिन्सेस’, ‘ए बेंड इन दि गँजेस’, ‘दि डेव्हिल्स विंड’ यांसारख्या ऐतिहासिक कादंबऱ्यांच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना माळगावकरांनी म्हटलं होतं, ‘याबाबतीत मी एक निश्चितपणे आणि अभिमानाने सांगतो की, ऐतिहासिक कादंबरीत मला आकलन झालेला वास्तव इतिहास मी काटेकोरपणे स्वीकारतो. त्यात वास्तवाची मोडतोड होऊ नये अशी मी काळजी घेतो. तत्कालीन घटनांच्या संदर्भात प्रत्यक्ष कालप्रवाह आणि व्यक्तीची प्रतिक्रिया यांत स्वाभाविकपणा असावा याची दक्षताही घेतो. तसेच काळाच्या दृष्टीने आणि प्रत्यक्ष घडामोडींच्या दृष्टीनेही मी कोणतेच अनाठायी स्वातंत्र्य घेत नाही. प्रत्यक्ष घटना आणि काळ-वेळ मी यथातथा स्वीकारतो आणि मग त्या घटनांच्या भोवती कथा विणतो. मी इतिहासही लिहिला आहे. पण असा इतिहास काहीसा शुष्क असतो. अशा इतिहासाला शर्करावगुंठित करून आणि कथेचा एक सलग भाग म्हणून तो वाचकांपर्यंत कसा नेऊन पोहोचवायचा, याचे कसब कादंबरीकाराकडे असावे लागते. ऐतिहासिक कादंबरीच्या दृष्टीने ते एक आव्हान असते आणि खऱ्या अर्थाने ते पेलण्यावरच कादंबरीचे यश अवलंबून असते असे मला वाटते..’ माळगावकरांची ही भूमिका त्यांच्या लेखनात पूर्णपणे प्रतिबिंबित झाली होती. त्यामुळेच तर त्यांना ‘इतिहास जपणारा कादंबरीकार’ असं म्हटलं गेलं.
कादंबरीलेखनाप्रमाणेच माळगावकरांनी कथालेखनही केलं. त्यांच्या कथा ‘ए टोस्ट इन दि वॉर्म वाईन’ (१९७४), ‘बॉम्बे बिवेअर’ (१९७५) आणि ‘रम्बल टम्बल’ (१९८२) या कथासंग्रहांत ग्रथित झाल्या आहेत. या कथांमध्ये त्यांनी धडपडय़ा माणसांच्या उलाढालींचं रंजक चित्रण केलं होतं. पण माळगावकरांच्या कादंबरीलेखनाप्रमाणे त्यांचं कथालेखन मात्र यशस्वी ठरलं नाही. अर्थात आपल्या या मर्यादांची त्यांना जाणीव होती. माळगावकरांनी एका मुलाखतीत त्यासंदर्भात म्हटलं होतं- ‘माझ्या कादंबरीलेखनाप्रमाणे माझे कथालेखन गाजले नाही, हे खरे आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे माझ्या कथा एका अर्थाने जुन्या साच्याच्या आहेत. सॉमरसेट मॉम याने केलेल्या लघुकथेच्या व्याख्येप्रमाणे त्यात आरंभ, मध्य व शेवट यांसारखे काही टप्पे असतात. आधुनिक पद्धतीची आणि समकालीन लेखकांच्या नमुन्याची माझी लघुकथा नाही. पण खरे म्हणजे लघुकथेपेक्षा कादंबरी लिहिण्यात मला जास्त आनंद वाटतो. कादंबरीच्या कथानकाशी, त्यातील व्यक्तींच्या सुख-दु:खांशी, त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीच्या परिस्थितीशी, मानसिक संघर्षांशी, भावनांच्या विविध आंदोलनांशी मी समरस होतो. लघुकथा आणि कादंबरी यांची प्रकृती वेगळी असते. त्यातील कादंबरीच्या प्रकृतीशी मला अधिक जुळवून घेता येते. तसे लघुकथांबाबत मात्र घडत नाही.’
मनोहर माळगावकरांच्या कादंबरीलेखनात आढळणारी साहित्यमूल्यांची अभिजातता हा केवळ त्यांचा वाङ्मयविशेष नव्हता, तर तो सर्वार्थानं त्यांचा जीवनधर्म होता. १३ जुलै १९१३ रोजी जन्मलेल्या माळगावकरांच्या व्यक्तिमत्त्वात लहानपणापासूनच पाश्चात्त्य आणि पौर्वात्य संस्कृतींचा गोफ विणला गेला होता. वडील संस्कृत भाषेचे अभिमानी असल्यानं बालवयातच ते संस्कृत शिकले, तर आईमुळे पाश्चात्त्य साहित्यविश्वाशी त्यांचा परिचय झाला. माळगावकरांच्या आईचे वडील पी. बाबूराव हे ग्वाल्हेर संस्थानात मंत्री होते. त्यामुळे राजघराण्याशी त्यांचा संबंध आला आणि संस्थानी वातावरणाचे त्यांच्यावर संस्कार झाले. त्याचा उपयोग त्यांना ‘दि प्रिन्सेस’ ही कादंबरी लिहिताना झाला.
तारुण्याच्या उंबरठय़ावर असताना माळगावकरांना शिकारीची गोडी लागली. त्यांनी व्यावसायिक शिकारी होण्याचं ठरवलं होतं. पण घरातील मंडळींच्या आग्रहामुळे पदवीधर झाल्यावर त्यांनी लष्करी नोकरी स्वीकारली आणि इन्फन्ट्री ऑफिसरचं कमिशन मिळवलं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रणभूमीवर पराक्रम गाजवणारे माळगावकर नंतर लेफ्टनन्ट कर्नल झाले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर माळगावकरांना लष्करात राहणं निष्क्रिय वाटू लागलं. १९५३ मध्ये त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि ते कर्नाटकातील आपल्या जन्मगावी परतले.
माळगावकरांची वडिलोपार्जित मालमत्ता उत्तर कॅनराच्या जंगलात होती. तसेच त्यांच्या मालकीच्या मँगेनीजच्या खाणी होत्या. ते आपल्या मालमत्तेची देखभाल करू लागले. स्वत: अनुभवलेल्या लष्करी जीवनातील काही तपशिलांच्या आधारे त्यांनी ‘डिस्टन्ट ड्रम’ (१९५८) ही कादंबरी लिहिली. या कादंबरीचा नायक किरण याच्या व्यक्तिमत्त्वात माळगावकरांच्या स्वभावातील काही छटाही उतरलेल्या आहेत.
माळगावकरांची ‘दि प्रिन्सेस’ ही कादंबरी अतिशय गाजली. या कादंबरीच्या स्वामित्वधनातून त्यांनी बेळगावपासून ६० कि. मी. अंतरावर जगलबेट येथे भव्य वास्तू बांधली आणि आयुष्याच्या अखेपर्यंत ते तेथेच शांतपणे लेखन-वाचन करत राहिले. माळगावकरांच्या लेखनयशाला अभिजात साहित्यमूल्यांप्रमाणेच त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोनही कारणीभूत ठरला. ‘स्पाय इन दि अ‍ॅम्बर’सारखी थरारक कादंबरी आणि ‘शालिमार’ व ‘ओपन सीझन’ या चित्रपटांच्या पटकथाही त्यांनी लिहिल्या. देवासच्या पवार यांच्या राजघराण्याचा इतिहास लिहिणाऱ्या माळगावकरांनी ‘दि मेन हू किल्ड गांधी’ या पुस्तकामध्ये गांधीहत्येचा मागोवा घेतला आहे. त्यांनी विजयाराजे शिंदे यांचं अप्रतिम चरित्र लिहिलं. तसेच ‘करवीर रियासती’चं संपादनही केलं. ‘मी जाणीवपूर्वक आणि कसोशीने कथाकथनाचा प्रयत्न करतो. मला प्रसंगनिर्मिती आवडते. कथाकथन करणाऱ्या रंजक उपजातीचा टिळा मी कपाळी लावून घेतला आहे. त्यामुळे या संप्रदायाविषयी मला विशेष निष्ठा वाटते,’ अशी आपली लेखनविषयक भूमिका मनोहर माळगावकरांनी स्पष्ट केली होती. कोणताही वाङ्मयीन अभिनिवेश न आणता केवळ वाचकांच्या मनोरंजनाचा हेतू डोळ्यांसमोर ठेवून साहित्यनिर्मिती करणाऱ्या मनोहर माळगावकरांच्या दीर्घकालीन लेखनयशाचं हेच रहस्य होतं.