15 August 2020

News Flash

टपालकी : बंदीकाली या अशा..

दादू.. तू, तुझे कुटुंबीय आणि आप्तस्वकीय सुखरूप असाल, घराबाहेर पडत नसाल आणि आपली काळजी घेत असाल अशी आशा आहे.

आपण उष्णकटिबंधीय प्रदेशात येत असल्याने सुरुवातीला आपल्या देशात करोना येण्याची शक्यताच आपण नाकारली होती.

सॅबी परेरा – sabypereira@gmail.com

प्रिय मित्र दादू यास-

सदू धांदरफळेचा नमस्कार.

डिसेंबरमध्ये तुला लिहिलेल्या शेवटच्या पत्रात ‘मी पुन्हा येईन’ असं मी वचन दिलं होतं आणि तसा पुन्हा येण्याचा मी एका भल्या पहाटे प्रयत्नही केला होता. पण उसनी घेतलेली पॉवर ऐनवेळी गेल्यामुळे मी अजित होता होता पराजित झालो. ते असो. बरेच दिवस झाले तुझी काही खबरबात नाही. आणि आता करोना महामारीने लादलेल्या लॉकडाऊनमुळे टपाल, कुरियर सारं काही बंद असल्याने तुला हे पत्र ई-मेलने पाठवीत आहे.

दादू.. तू, तुझे कुटुंबीय आणि आप्तस्वकीय सुखरूप असाल, घराबाहेर पडत नसाल आणि आपली काळजी घेत असाल अशी आशा आहे. लॉकडाऊनच्या आधी तू सोशल मीडियाच्या भानगडीत पडत नव्हतास हे मला ठाऊक आहे. पण आता घरातच अडकून पडल्याने व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर रमला असशील आणि तुला एखाद्या मैत्रिणीची खरोखरच काळजी वाटत असेल तर तिच्या इनबॉक्समध्ये जाऊन ‘ख1 झालं का?’ विचारण्याऐवजी ‘साबणाने २० सेकंद हात धुतलेस का?’ असे विचार. काय आहे दादू, की आपल्याला सवयी वाईट लागल्या तरी हरकत नाही, पण माणसानं काळाचं भान ठेवावं, अपडेट राहावं. बाकी काही नाही.

मित्रा, करोना म्हणजेच कोविड- १९ नावाच्या विषाणूचा प्रसार चीन, इटली, अमेरिका अशा देशांमध्ये होत असताना हा परदेशी पिंजऱ्यातील सिंह आपलं काहीही वाकडं करू शकत नाही, या दुर्दम्य आत्मविश्वासाने प्राणिसंग्रहालयातील सिंहाला दगड मारणाऱ्या पर्यटकांसारखे आपण भारतीय खुशाल वावरत होतो. आपण उष्णकटिबंधीय प्रदेशात येत असल्याने सुरुवातीला आपल्या देशात करोना येण्याची शक्यताच आपण नाकारली होती. दादू, तसे पाहिले तर आजार नाकारणं हा आपला राष्ट्रीय गुणधर्मच आहे. आपल्या देशाच्या समाजमनाला एकमेकांचा द्वेष, हिंसा, जातीयता आणि ढोंगी देशाभिमान या विषाणूंची जी लागण झाली आहे, त्याविषयीही आपली भूमिका अद्यापि ‘आजार नाकारायची’च असल्यामुळे त्यावरील उपचार हीदेखील फारच लांबची बाब आहे. माझी अशी एक भाबडी भावना आहे, की अगदी सुरुवातीलाच आपण ‘आपल्याला करोनाचं सरकार पाडायचंच आहे’ अशी ठाम भूमिका घेतली असती तर घोडेबाजाराच्या कामामध्ये तरबेज असलेल्या आपल्या ‘शहा’ण्यासुरत्या राजकारण्यांनी एव्हाना कधीच करोनाचे आमदार फोडून, त्याचं सरकार पाडून आपल्या इशाऱ्याबरहुकूम वागणारा एखादा बिनकण्याचा विषाणू खुर्चीवर बसवलाही असता!

मित्रा, मला ठाऊकाय की, देशभर लागू झालेल्या या लॉकडाऊनमुळे गावाकडे शेतीभातीची कामं अगदी ठप्प झाली आहेत. इथे शहरातही रस्ते, रेल्वे, विमान आदी सगळी वाहतूक आणि उद्योगधंदे बंद असल्याने नियतीने जणू जगण्याचं पॉज बटन दाबलंय. पण केवळ फोनवर पोपटपंची करणारे आणि संगणकावर खर्डेघाशी करणारे आमच्यासारखे आधुनिक कारकून मात्र ‘वर्किंग फ्रॉम होम’ या नव्या व्यवस्थेनुसार घरून काम करीत आहेत. माझ्यापुरतं सांगायचं तर या ‘वर्क फ्रॉम होम’चा तोटा असा की, कालपर्यंत फक्त माझ्या बॉसपर्यंत मर्यादित असलेलं गुपित आज माझ्या बायको-पोरांनाही कळलंय, की हा ऑफिसचंदेखील काहीच काम करत नाहीये!

अरे, ‘वर्क फ्रॉम होम’ करतोय याचा अर्थ मी रिकामटेकडा बसलोय असा नव्हे. खरं सांगायचं तर मी ऑफिसमध्ये असतो त्याहूनही अधिक बिझी आहे. पण माझं बिझी असणं कुणाला म्हणजे अगदी कु-णा-ला-च पटत नाहीये. तुला सांगतो दादू, काल दुपारी भिंतीवरून जाणारी एक वाट चुकलेली मुंगी मला म्हणाली, ‘काका, जरा किचनमधील साखरेच्या बरणीचा अ‍ॅड्रेस सांगता का प्लीज?’ आत्ता बोल!

झालंय असं, की जागेपणीचा अर्धाअधिक वेळ साबणाने हात धुण्यात चाललाय आणि उरलेला वेळ नाश्त्याला काय करायचं आणि जेवायला काय करायचं, यावर खल करण्यात चाललाय. संपूर्ण कुटुंबच घरी असल्याने सर्वत्र बायकांनी स्वहस्ते बनविलेल्या नवनवीन खाद्यपदार्थाचे आणि पुरुष मंडळींनीही पाककला शिकत असल्याचे फोटो सोशल मीडियावर टाकण्याचे सत्र आरंभिलेले पाहून मध्यंतरी माझ्या कुटुंबानेही मला अंडय़ाचे ऑम्लेट बनविण्याचे चॅलेंज दिले होते. मला हे चॅलेंज काही झेपले नाही. माझ्यावरील उच्च भारतीय संस्कारांप्रमाणे मी त्या बिघडलेल्या ऑम्लेटचे खापर अंडय़ावर फोडले. कुणीतरी म्हटले आहेच.. ‘नाश्ता येईना अंडेच वाकडे!’

परिस्थिती अशी आहे की घरात मुलगा, नवरा, बाप म्हणून आपल्याला राज्याच्या राज्यपालांइतकाच मान आणि अधिकार आहे. सगळ्यांच्या हाताला स्मार्टफोन नावाचं अतिरिक्त बोट फुटल्यामुळे घरातले सगळेच रिकामटेकडे असले तरी तुमच्याशी बोलायला मात्र कुणाला वेळ नाहीये. जो-तो आपापल्या मोबाइल किंवा टीव्हीमध्ये घुसलेला. मांडीवर बसलेला लॅपटॉप, हातात बसलेला मोबाइल आणि २४ तास डोक्यावर बसलेली बायको या सगळ्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतर सगळ्यात जड काही जाणार असेल, तर ते म्हणजे मान वर करून बोलणं! दादू, तुला म्हणून सांगतो, कधी कधी मनाच्या उद्विग्नावस्थेत मला वाटतं- साला, दहा रुपयाच्या नाण्यासारखं झालंय आपलं आयुष्य. चलन म्हणून मान्यता तर आहे, पण कुणी फार वेळ ठेवून घ्यायला तयार नाही. परंतु माझा सकारात्मक दृष्टिकोन मला फार वेळ निराश राहू देत नाही आणि मला वाटू लागतं की, ‘सखाराम बाइंडर’मधील लक्ष्मीसारखं झालंय आपलं आयुष्य. घरात भले तोंड दाबून बुक्कय़ांचा मार खावा लागत असेल, पण साखरेच्या आशेनं इनबॉक्सात येणाऱ्या मुंग्या आणि सोशल मीडियाच्या खिडकीतून काव-काव करणारे खुंटावरचे कावळे यांच्याशी उत्तम संवाद सुरू आहे.. आणखी काय हवंय! असं म्हणून मी स्वत:ची मन:शांती करून घेतो. ‘मन:शांतीचा उत्तम मार्ग म्हणजे बायकोच्या मनासारखं वागा’ हा कानमंत्र आमच्या पणजोबांनी आजोबांना, आजोबांनी वडिलांना आणि वडिलांनी मला फार पूर्वीच दिलेला असल्यामुळे मला या लॉकडाऊनचा तसा फारसा ताप झाला नाही.

फक्त एक गोष्ट मागील आठवडाभर मला जरा त्रास देतेय. दादू, मी पापभीरू, कायदाभीरू आणि महत्त्वाचं म्हणजे दंडुकाभीरू माणूस असल्याचं तुला ठाऊक आहेच. सरकारी नियमांचं पालन आणि करोनाचा संसर्ग व्हायची भीती यामुळे मी लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून एकदाही घराबाहेर पाऊल टाकलेलं नाहीये. तरीही निसर्गदत्त बापुडवाणा चेहरा, दाढीचे वाढलेले खुंट, डोईवरील उरल्यासुरल्या केसांची काळी-करडी-पांढरी झुडपं, बम्र्युडा पॅन्ट आणि चुरगळलेला टीशर्ट अशा अवतारात मी एकदा वाणसामान आणायला जात असताना नाक्यावरील समाजसेवकांच्या तावडीत सापडलो. त्यांनी मला हायजॅक करून जबरदस्तीने पुरीभाजी भरवताना, उसळ पार्सल देताना फोटो काढलेत. त्यांच्या नेत्याचा फोटो असलेल्या पिशवीत मला डाळ, तांदूळ, तेल देतानाही फोटो काढलेत आणि ती पिशवी घेऊन मी माझ्या घरी पोहोचायच्या आत ‘तळागाळातील गरीब बांधवाला मदत करताना समाजसेवक अमुकतमुक आणि कार्यकर्ते’ अशा हेडलाइनसह माझे फोटो व्हॉट्सअ‍ॅपवरून सगळ्या देशभर पोहोचलेत! ..मागील आठवडाभरापासून या भयानक स्वप्नानं माझी पार झोप उडवलीय!

मित्रा, हल्ली कुठल्याही विषयावर मल्लिनाथी करण्यासाठी त्या विषयाचा अभ्यास असण्याची पूर्वअट काढून टाकलेली असल्याने जगातल्या यच्च्ययावत गोष्टींवर आपलं एक्स्पर्ट ओपिनियन सोशल मीडियाद्वारे देणाऱ्या विचारवंतांचं सगळीकडे पेव फुटलंय. व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीतील या विचारवंतांचे मौलिक विचार वाचले की या लोकांनी आपल्या जीवनात लॉजिक हा विषय वैकल्पिक म्हणून सोडून दिलेला असावा अशी दाट शंका येते. आज जगातील मोठमोठे शास्त्रज्ञ करोनावर औषध शोधण्यात गर्क असताना आणि करोनाची लस तयार होण्यासाठी किमान दीड वर्षे लागतील असे सांगत असताना, ‘गोमय वापरून हात धुणं आणि नियमित गोमूत्राचे सेवन करणं’ हाच करोनावर एकमेव आणि अक्सीर इलाज असल्याचं कालच माझ्या एका जवळच्या मित्रानं ठासून सांगितलं. मी त्याच्या म्हणण्याचा प्रतिवाद करण्याच्या भानगडीत पडलो नाही. कारण मला ठाऊक आहे की माझा हा मित्र गाईला ‘गो-माता’ मानतो. मी जरी तसं काही मानत नसलो तरी माझ्यावर लहानपणापासून मित्रांच्या भावना जपण्याचे संस्कार झालेले असल्यामुळे मीदेखील गाईला ‘गो-आन्टी’ म्हणतो! असो.

यार दादू, माणसाचं मरण आधीपासून स्वस्त होतंच; आता तर या करोनानिमित्ताने माणसांचा ‘एन्ड ऑफ द सीझन सेल’ सुरू आहे. अशा भीतीच्या वातावरणात काहीही गरज नसताना रोज शेकडो लोक आपल्याला- आज करोनाचे किती रुग्ण सापडले (जणू काही ते गंभीर गुन्हा करून फरार झालेले आरोपी आहेत!) आणि किती दगावले, याची माहिती पाठवून घाबरवण्याचं काम करीत असतात. दादू, तुला सांगतो, भीतीचं जाळं पसरवणारे असे नकारात्मक मेसेज मी हल्ली न वाचताच डिलीट करीत असतो. म्हणजे मरणाला तसा मी भीत नाही; पण जेव्हा केव्हा ते येईल तेव्हा आपण तिथं नसावं, इतकीच माझी इच्छा आहे. बस्स!

दादू, आपण जगणार, वाचणार आणि कधीतरी प्रत्यक्षात नक्की भेटणार.. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तू फक्त हिंमत हरू नकोस. स्वत:ची, कुटुंबाची आणि जमल्यास अडल्यानडल्यांची काळजी घे. सरकारच्या आणि प्रशासनाच्या कामात त्यांना मदत करता आली तर उत्तमच; पण ते नाही जमलं तर निदान आपल्यामुळे त्यांचा त्रास वाढणार नाही इतकी तरी दक्षता तूही घे, मीही घेईन.

तुझा मास्क-वादी मित्र..

सदू धांदरफळे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2020 1:05 am

Web Title: letter to dadu corona covid 19 tapalki dd70
Next Stories
1 शाश्वत विकासाची वाट खुणावते आहे..
2 महामंदी.. दोनशे वर्षांपूर्वीची!
3 हास्य आणि भाष्य : ..आणि मुंबईकर!
Just Now!
X