शास्त्रीय संगीताचा मानिबदू असलेले पं. प्रभाकर कारेकर यांचे हे अमृत महोत्सवी वर्ष. यानिमित्ताने ‘स्वर प्रभाकर’ हे मंगला खाडिलकर लिखित चरित्र, कौशिक प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. कारेकरांचा सुरेल जीवनप्रवास उलगडणारे हे चरित्र, हा एक अनमोल ठेवाच म्हणायला हवा. गोव्यात जन्मलेल्या नि कुटुंबासोबत काही काळ तिथेच व्यतीत केलेल्या कारेकरांची संगीताशी नाळ कशी जुळली इथपासून ते पं.अभिषेकींकडे त्यांनी गिरवलेले धडे आणि गायक म्हणून त्यांची घडण असा सारा प्रवास खाडिलकर यांनी तितक्याच रसाळ पद्धतीने या चरित्रातून मांडला आहे. कारेकरांची सांगीतिक कारकीर्दच नव्हे, तर त्यापलीकडे ते माणूस म्हणून कसे आहेत, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पलू या पुस्तकातून उलगडलेले आहेत. नाटय़ संगीताचा बहरलेला काळ, रसिकांनी कारेकरांच्या गाण्याला दिलेले उदंड प्रेम हा सगळा यशशिखरावरचा अनुभव वाचायला मिळतोच पण कारेकर जेव्हा पं. प्रभाकर कारेकर नव्हते, तो एक होतकरू, गुणी मुलगा होता, तेव्हापासून त्यांनी गाण्यासाठी घेतलेली मेहनत, आपली कला अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी केलेला संघर्ष यामध्ये मांडलाय, तो आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. पं अभिषेकी बुवांचे शिष्यत्व, दिग्गजांसोबतच्या मफिली, अनेक गुरुतुल्य व्यक्तिमत्त्वांचा सहवास अशा अनेक आठवणींसोबतच, त्यांची जन्मभूमी असलेली गोव्याची भूमी, तिथली संस्कृती, कोंकणी भाषेबद्दल त्यांना वाटणारा विलक्षण जिव्हाळा हे सारेही त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. याचे प्रतििबब त्यांच्या व्यक्तिमत्त्वात न पडते तरच नवल. तेव्हा प्रभाकर कारेकरांचा जीवनप्रवास समजून घेण्यासाठी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे.

  • स्वर प्रभाकर- मंगला खाडिलकर
  • कौशिक प्रकाशन,
  • पृष्ठे – १७१, मूल्य –  २७० रुपये

 

स्त्रीकेंद्री कथा

विविध सामाजिक स्तरांतील, वयोगटांतील स्त्रियांच्या आयुष्यात घडणाऱ्या विविध प्रकारच्या घडामोडींचा, दु:खानुभवांचा कथनात्मक वेध ‘सांजपर्व’ या कथासंग्रहात घेण्यात आला आहे. अंजली दिवेकर लिखित ‘सांजपर्व’ हा कथासंग्रह उन्मेष प्रकाशनानं प्रसिद्ध केला आहे.

माणसाच्या विविध भावभावना, स्वभावछटा आणि आयुष्यातल्या घटितांशी त्यांचा संबंध याचा कोलाज म्हणजे या कथा. वृद्ध सरुकाकी, स्वत: कर्णबधिर असताना आपल्या अपंग नि अंथरुणाला खिळलेल्या पतीची सेवाशुश्रूषा करणारी सुपर्णा अशा काही कथांमधल्या व्यक्तिरेखा स्थितप्रज्ञेकडे झुकलेल्या आहेत. नकारात्मक, दु:खमयी जीवन वाटय़ाला येऊनही त्या कुढत नाहीत, तर खिलाडूवृत्तीने त्यांनी या वास्तवाचा स्वीकार केलाय. या कथासंग्रहातील विविध नायिकांच्या आयुष्याबद्दल, त्यात येणारी माणसं, संघर्ष व त्याला अनुसरून या नायिकांचा वर्तनव्यवहार लेखिका तपशिलानं लिहितात ही एक या कथांची उत्तम बाजू आहे. माणसं, त्यांचे स्वभाव, आपापसातील हेवेदावे, स्वार्थ, व्यवहार, नातीगोती यांच्या विविध छटांचे प्रतििबब या कथांमध्ये दिसते. एखाद् दुसरी कथा अनावश्यक तपशिलांचा सामावेश असलेली, पाल्हाळिक वाटते, त्यामुळे मूळ कथाबीज भरकटल्यासारखे वाटते, पण याव्यतिरिक्त इतर कथा मात्र वाचनीय आहेत. अनेक कथांमधील व्यक्तिचित्रणे आपल्याला कथेचा दृश्यात्मक आस्वाद घ्यायला मदत करतात.

  • सांजपर्व- अंजली दिवेकर
  • उन्मेष प्रकाशन,
  • पृष्ठे – १९२, मूल्य –  २५० रुपये