‘अमेरिका खट्टी मिठी’ या ललित लेखांच्या संग्रहात डॉ. मृण्मयी भजक  कुतूहलपूर्ण नजरेने, प्रवासवर्णनापलीकडे जात अमेरिकच्या सांस्कृतिक, सामाजिक अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न करतात. ललित लेखांच्या माध्यमातून अमेरिकेतली गावं, तिथली वेगळी ठिकाणं, माणसं, लोकजीवन, लक्षवेधी प्रसंग यात चितारलेले आहेत. तिथल्या वाचनालयांच्या वर्णनांपासून लोकजीवनापर्यंत सर्व बाबींची माहिती लेखिका या लेखांतून अगदी साध्यासोप्या भाषेतून देते. या पुस्तकाचं वैशिष्टय़ म्हटलं तर यातील लेख कोणत्याही वयोगटातील व्यक्ती वाचू शकते. तसेच मधेच कोणताही लेख वाचायला घेतला तरी रसभंग होत नाही. बहुरंगी निसर्गाच्या रूपांसोबतच बहुरंगी व्यक्तिमत्त्वांचा अनुभव लेखिकेला घेता आला, हा विविधांगी अनुभव माणूस म्हणून तिला समृद्ध करतो आणि तो शब्दांच्या रूपात इतरांसाठीही तितक्याच उत्कटपणे कागदावर उमटतो.

  • ‘अमेरिका खट्टी मिठी’- डॉ. मृण्मयी भजक
  • ग्रंथाली प्रकाशन
  • पृष्ठे-१७३, मूल्य-२०० रुपये.

 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

लहानग्यांसाठी मेजवानी

‘कळी उमलताना’ हे पुस्तक म्हणजे सुजाता लेले यांनी लहानग्यांसाठी खास लिहिलेले गमतीदार लेख, छोटय़ा छोटय़ा गोष्टी, माहितीपर लेख याचा चित्रमय कोलाज आहे. लेले यांनी विविध वर्तमानपत्रातून नियमितपणे लहानग्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे लेखन केले आहे. वेळोवेळी वर्तमानपत्रांतून प्रकाशित झालेल्या त्यांच्या लेखांचे संकलन या पुस्तकात केले आहे. लेखानुरूप काढलेली सुंदर चित्रे हे या पुस्तकाचं वैशिष्टय़. चित्रांमुळे हा गमतीदार आशय आणखी बोलका होतो. यातील कथा, बोधकथा, पर्यावरणाची, निसर्गाची माहिती, इतर माहितीपर लेख हे अत्यंत वाचनीय आहेत. हे लेख लहान मुलांचं रंजन करतात आणि जीवनावश्यक मूल्यांची रुजवणही यातून होते. आणि तरीही हे पुस्तक ‘उपदेशपर’ नाही, ही त्याची खासियत.

  • ‘कळी उमलताना’ – सुजाता लेले
  • पृष्ठे-१२८, मूल्य-१०० रुपये.