18 November 2019

News Flash

लिब्रा : डिजिटल पेमेंट क्रांती

‘लिब्रा’ क्रिप्टोकरन्सी हे डिजिटल पेमेंट्सच्या विश्वात फेसबुकने उचललेले नवे पाऊल होय.

|| इंद्रनील पोळ

‘लिब्रा’ क्रिप्टोकरन्सी हे डिजिटल पेमेंट्सच्या विश्वात फेसबुकने उचललेले नवे पाऊल होय. आजवर मर्यादित वर्गापर्यंतच पोहोचलेली क्रिप्टोकरन्सी आता फेसबुकने या क्षेत्रात उडी घेतल्याने मोठय़ा वर्गापर्यंत पोहोचणार आहे. परंतु या करन्सीच्या विकेंद्रीकरणाच्या सिद्धान्ताबद्दल फेसबुकला कितपत आस्था आहे, हा प्रश्नच आहे.

फेसबुकने १८ जूनला ‘लिब्रा’ नावाच्या नवीन क्रिप्टोकरन्सीची घोषणा केली आणि बिटकॉइन, ब्लॉकचेन व डिजिटल पेमेंटच्या आयुष्यातलं एक पर्व पूर्ण झालं. यापुढे क्रिप्टोकरन्सी वित्त व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहातला महत्त्वाचा भाग होईल, या गृहितकावर तर या घोषणेने शिक्कामोर्तब केलेच; पण त्याही पुढे जाऊन भारत, चीन, जपान यांसारख्या देशांमधल्या डिजिटल आणि कॅशलेस व्यवहारांची भविष्यातली वाटचाल कुठल्या दिशेने असेल याबद्दलही सूतोवाच केले.

‘फेसबुक क्रिप्टोकरन्सीच्या जगात पाऊल टाकते आहे..’ ही बातमी काही अगदी नवीन किंवा आश्चर्यकारक नाहीए. फेसबुकच्या या वाटचालीचा कयास क्रिप्टो आणि डिजिटल क्षेत्रातले तज्ज्ञ गेल्या काही काळापासून लावत होतेच. फेसबुकने जारी केलेल्या श्वेतपत्रिकेत ‘लिब्रा’ नावाचे हे नवीन चलन व्यवहारांसाठी २०२० च्या पूर्वार्धात उपलब्ध होईल असे म्हटले आहे. या श्वेतपत्रिकेत काही लक्षवेधक गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फेसबुक जरी लिब्राला क्रिप्टोकरन्सी म्हणत असले तरी क्रिप्टोकरन्सीच्या सर्वसाधारण नियमांपेक्षा लिब्रा काहीसे वेगळे असणार आहे, असे या श्वेतपत्रिकेवरून स्पष्ट होते. म्हणूनच क्रिप्टो चलनांच्या आयुष्यातल्या एका नवीन पर्वाची ही नांदी आहे असे म्हणावेसे वाटते. असे का, हे समजून घ्यायला आपल्याला क्रिप्टोकरन्सी, ब्लॉकचेन आणि बिटकॉइनच्या इतिहासाविषयी थोडंसं जाणून घ्यावं  लागेल.

विकेंद्रित चलन ही संकल्पना तसं बघितल्यास नवीन नाही. बिटकॉइनच्या जन्माची पाळंमुळं फ्रेडरिश हायक या एकोणिसाव्या शतकात जन्मलेल्या ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञापर्यंत मागे जातात. हायकचे म्हणणे होते की, ज्या प्रकारे नियोजन आणि व्यवस्थापनावर केंद्रीय नियंत्रण असू नये, तसेच चलनावरसुद्धा अशा प्रकारचे कुठलेही नियंत्रण असू नये. चलन म्हणजे तरी नेमके काय? अर्थशास्त्राच्या खोलात न शिरता समजून घ्यायचं झाल्यास ‘चलन हे साधारणत: पशांच्या दळणवळणाचे सरकारमान्य साधन’ या अर्थाने परिभाषित केले जाऊ शकते. एखाद्या पशांच्या चलनाला तोपर्यंतच महत्त्व असते, जोपर्यंत एखादी मोठी संस्था (साधारणत: सरकार, बँका, इत्यादी) त्या चलनाला मान्यता देतात. उदाहरणार्थ- रुपया, डॉलर, युरो, येन हे वेगवेगळ्या देशांच्या सरकारने ठरवलेले आणि मान्य केलेले पशाच्या दळणवळणाचे साधन आहे. यातला महत्त्वाचा शब्द आहे-‘सरकारमान्य’!

यासंदर्भात आपल्याकडची ‘नोटाबंदी’ आठवा. एका रात्रीत भारत सरकारने पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करून टाकल्या आणि या नोटांची किंमत शून्य झाली. अशा प्रकारे कुठल्या ना कुठल्या केंद्रीय सत्तेच्या चलनावर असलेल्या नियंत्रणाला बऱ्याच लोकांचा आणि विचारवंतांचा सुरुवातीपासूनच विरोध राहिलेला आहे. हायकने त्याच्या ‘Denationalization of money’ या पुस्तकात या विषयावर विस्ताराने लिहिले आहे. पण हायकच्या काळात समस्या होती ती ही विकेंद्रीकरणाची कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात! एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला इंटरनेट क्रांतीचे परिणाम खऱ्या अर्थाने जाणवायला सुरुवात झाली आणि हायकची चलन विकेंद्रीकरणाची ही कल्पना वास्तवात उतरण्यासाठी खऱ्या अर्थाने पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या. यातून जन्म झाला सातोशी नाकोमोटो या इंटरनेट लिजेंडचा आणि ब्लॉकचेनवरच्या त्याच्या श्वेतपत्राचा! या श्वेतपत्रातून ‘बिटकॉइन’ जन्माला आलं आणि वित्तीय क्षेत्र बिटकॉइनमुळे ढवळून निघालं. हा झाला क्रिप्टोकरन्सीचा गेल्या दहा वर्षांतला इतिहास!

क्रिप्टोकरन्सीचे वेगळेपण दोन गोष्टींमुळे आहे. एक म्हणजे तंत्रज्ञान आणि दुसरं म्हणजे त्यांचे विकेंद्रीकरण. कुठलीही क्रिप्टोकरन्सी आदर्श परिस्थितीत पूर्ण विकेंद्रित असते. अर्थात कुठलीही केंद्रीय व्यवस्था तिच्या पाठीशी नसते. याला ‘ट्रस्टलेस सिस्टीम’ म्हणतात. कुठल्याही केंद्रीय संस्थेवर विश्वास न ठेवता तंत्र- अर्थात सिस्टीमवर विश्वास ठेवणे हे या चलनव्यवस्थेचं वैशिष्टय़ आहे. बिटकॉइनसारख्या चलनात हा विश्वास ब्लॉकचेन या तांत्रिक प्रणालीवर अवलंबून असतो. आणि नेमक्या याच विकेंद्रीकरणाच्या मूलभूत सिद्धान्ताला फेसबुकसारख्या कंपनीची क्रिप्टोकरन्सी धोका निर्माण करू शकते असं या क्षेत्रातल्या लोकांचे म्हणणे आहे.

बँक, सरकार इत्यादी केंद्रीय संस्थांना चलन व्यवहारातून बाहेर काढून फेसबुक स्वत: ती केंद्रीय संस्था बनायचा प्रयत्न करते आहे अशी भीती व्यक्त केली जात आहे. आणि ही भीती सर्वस्वी अनाठायी नाही. फेसबुकचे प्रायव्हसीबद्दलचे धोरण सुरुवातीपासूनच संदिग्ध राहिलेले आहे. ‘केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका’ हे या संदर्भातले बऱ्यापकी ताजे उदाहरण. त्याशिवाय फेसबुकची सोशल मीडियाच्या क्षेत्रात राक्षसी मक्तेदारी आहे. फक्त फेसबुकच नाही, तर इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स अ‍ॅप ही दोन्ही उत्पादनेदेखील फेसबुकचीच अपत्ये आहेत. या पाश्र्वभूमीवर फेसबुकने स्वत:चे चलन काढणे हे डिजिटल चलनाच्या क्षेत्रात क्रांती करणारे पाऊल असले तरी नकळतपणे फेसबुकला समाजावर अर्निबधित नियंत्रण ठेवण्याची शक्ती ते पुरवू शकते. हा विचार सावधानतेचा इशारा वाटत असला, तरी विशेषत: भारतासारख्या देशात हे घडण्याची शक्यता आपल्याला वाटते त्याहून कैकपटीने अधिक आहे. याचे कारण- आíथक क्षेत्रात भारतात इतकी र्वष असलेला पायाभूत सुविधांचा अभाव! अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये कितीतरी दशकांपासून क्रेडिट-डेबिट कार्डाचा वापर अतिशय सुलभतेने सुरू आहे. त्यासाठी छोटय़ातल्या छोटय़ा दुकानांमध्येदेखील सुविधा उपलब्ध आहे. मी जर्मनीमध्ये अगदी २० सेंट्सची खरेदीदेखील कार्ड स्वाइप करून करू शकतो. भारतात मात्र अगदी आत्ता-आत्तापर्यंत कॅशलेस व्यवहार करणाऱ्यांची संख्या नगण्य होती. याला मोठं कारण होतं : पायाभूत सुविधा नसणं. आता स्मार्टफोन्समुळे या सुविधा अगदी कमी वेळेत छोटय़ा गावांमध्येसुद्धा पोहोचल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत मोबाइल पेमेंट्सच्या क्षेत्रात भारतात जी क्रांती झाली आहे, त्याची तुलना फक्त चीनबरोबर केली जाऊ शकते. अर्थात चीनपर्यंत पोहोचायला आपल्याला बराच मोठा टप्पा गाठायचा आहे. पण मोबाइल पेमेंट्स आणि वॉलेट्सच्या बाबतीत आपण बऱ्याच पाश्चात्त्य देशांना आज मागे टाकले आहे.

यात दुसरा कळीचा मुद्दा आहे तो फेसबुकने व्हॉट्स अ‍ॅपद्वारे भारतात या मोबाइल पेमेंट्सरूपी सोन्याच्या खाणीत उतरण्याचा! व्हॉट्स अ‍ॅप लवकरच भारतात त्यांची पेमेंट सिस्टीम आणणार आहे. एकदा का तुम्ही व्हॉट्स अ‍ॅपद्वारे पशांची देवाणघेवाण करू लागलात की कॅशलेस पेमेंट्सचे प्रमाण कितीतरी पटींनी वाढेल. मात्र, त्याचबरोबर फेसबुकवर आपल्याला अशा प्रकारच्या सुविधांसाठी किती विश्वास टाकता येईल, हा प्रश्नदेखील उपस्थित होईल. लिब्रा क्रिप्टोकरन्सी ही डिजिटल पेमेंट्सच्या विश्वात आपले पाय रोवण्यासाठी फेसबुकने उचललेले पाऊल असून, क्रिप्टोकरन्सीच्या मूळ विकेंद्रीकरणाच्या सिद्धान्तावर फेसबुकची कितपत आस्था आहे, हा प्रश्नच आहे. तरीही फेसबुकने या क्षेत्रात उडी मारल्यामुळे क्रिप्टोकरन्सी ही समाजाच्या अगदी छोटय़ा भागापुरती सीमित असणारी गोष्ट समाजातल्या मोठय़ा वर्गाला एकाएकी उपलब्ध होणार आहे, हे सत्य नाकारता येत नाही. लिब्राची घोषणा झाल्यानंतर एका मोठय़ा अमेरिकन वृत्तपत्राच्या प्रतिनिधीची प्रतिक्रिया अतिशय बोलकी होती. तो म्हणाला, ‘अडछ या इंटरनेट कंपनीने जे इंटरनेटसाठी केलं, तेच लिब्रा क्रिप्टोकरन्सीसाठी करेल. ते म्हणजे क्रिप्टोकरन्सीला जनसामान्यांपर्यंत घेऊन जाणे. अडछ आज अस्तित्वात नाहीए. फेसबुकचे आणि लिब्राचे काय होते, हे येणारा काळच सांगेल.’

(लेखक जर्मनीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्जच्या प्रकल्पांवर काम करतात.)

pole.indraneel@gmail.com

First Published on June 30, 2019 12:14 am

Web Title: libra digital payment revolution
Just Now!
X